मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥४७॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥४७॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमदानंदाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय देवा करुणासागरा । धांवतचि येईं तूं त्वरा । तिष्ठती श्रोते सकलही गुरुवरा । कधीं पाहूं तुज म्हणूनि ॥१॥
म्हणोनि झडकरीं येईं अवनीं । तूं निश्चयें कृपेची खाणी । उद्धरिता तुजवांचोनि । नाहीं कोणी या जगतीं ॥२॥
तुझी भक्ति करी जो साचार । न ये भय कसलेंही त्यासमोर । यापरता नाहीं आणिक विचार । देवा दयाळा कृपाधना ॥३॥
परी देवा मजलागोन । न कळे तव महिमा जाण । तेवींच तुझे मी नायकें वचन । ऐसा मूढ मी असें ॥४॥
न करितां तुझें वचन - पालन । कैंची भक्ति उद्भवे जाण । जरी केले नाना यत्न । होती त्याविण निष्फळ ते ॥५॥
ज्यासी कळे वचन - रहस्य । तोचि पार होईल खास । त्याविण अन्य साधन तयास । नलगे कांहीं लागत पैं ॥६॥
म्हणोनि देवा सद्गुरुनाथा । नाहीं मागत आणिक ताता । वचन पाळाया मजला आतां । देईं शक्ति तूंचि बा ॥७॥
असो इकडे रामचंद्र हरिदास । मागील अध्यायीं वर्णिलें त्यास । दोन कन्या एक पुत्र परियेस । असती जाण त्यालागीं ॥८॥
ऐसें असतां उगवला दिवस । आम्हां अज्ञांच्या भाग्याचा बहुवस । हरिदासभार्या सीताबाईस । धरिला गर्भ त्या समयीं ॥९॥
ऐका आतां सविस्तर । डोहाळे तियेचे परम सुंदर । साक्षात् विष्णूचा अवतार । तेव्हां काय वर्णावें ॥१०॥
साध्वी सीताबाई इजसी । जाहली इच्छा काय ती परियेसीं । सात्त्विक आहार आवडे निश्र्चयेंसीं । तोचि घेई ती प्रेमें ॥११॥
अंगीं आली परम शांति । आणि प्रसन्न सर्वदा चित्तीं । पुराणश्रवण-भजनप्रीति । लागली बहुतचि तिजलागीं ॥१२॥
पुढें कार्य असे थोर । त्याची खूण ही साचार । परी कवणाही हा विचार । कळला नाहीं त्या समयीं ॥१३॥
येथे कवणेंही न धरावा संशय । कीं लटिका हा डोहळ्यांचा विषय । बोलसी तूं देखिल्याविण काय । उगीच बडबड करिसी कां ॥१४॥
परी नव्हे लटिका माझा बोल । केलिया याचा विचार खोल । ज्यांनीं स्वामींचें चरणकमल । पाहिलें त्यांसी कळेल का हें ॥१५॥
गर्भिणीला लोटले दिवस । पूर्ण भरले नऊ मास । उगवला सकलांचा सुदिन खास । परिसा पुढें श्रोते हो ॥१६॥
शके अठराशें चोवीस । शुभकृत् नाम संवत्सरास । ज्येष्ठ वद्य अष्टमीस । सीतामाय प्रसवली ॥१७॥
जाहलें असे परम सुंदर । सुहास्य - वदन मनोहर । पुत्ररत्न महाचतुर । बघतां थक्क होती जन ॥१८॥
ब्रह्मतेज मुखावरी विलसे । आणि शांति सद्गुण भासती खासे । ऐशी मूर्ति कसल्या पुण्यवशें । लाभली आम्हां कळेना ॥१९॥
पूर्वसुकृत महाथोर । मायबापें केलें अपार । म्हणोनि उदरा आला कुमर । साक्षात् श्रीधररूप हा ॥२०॥
ज्याच्या अंगीं ब्रह्मज्ञान । त्याचें वदन सदा प्रसन्न । म्हणोनि विलसे तेज तें पूर्ण । सत्पुरुषांच्या मुखावरी ॥२१॥
आतां येथें कराल प्रश्न । कीं जन्मा येतांचि ब्रह्मज्ञान । प्राप्त झालें तयां कोठून । ब्रह्मतेज कैंचें तें ॥२२॥
तरी ऐका श्रोते हो सज्जन । साधु-सत्पुरुषांचे जनन । तें ब्रह्मज्ञानात्मकचि पूर्ण । जन्माआधींच ते ज्ञानी ॥२३॥
साक्षात् परमेश्वराचा अवतार । तो नित्य मुक्तचि असे साचार । विश्वकल्याणा अवतरे प्रभुवर । नलगे जोडावें ज्ञान तया ॥२४॥
परी दावाया आम्हां अज्ञांसी । गुरु-उपदेश घेती सायासीं । साधन अभ्यास करोनि दिननिशीं । ज्ञान पावती परमादरें ॥२५॥
त्यांनीं जरी न केला गुरुवर । अथवा न केला आत्मविचार । अन्यही न करतील साचार । म्हणोनि गुरु करिती ते ॥२६॥
अज्ञ जनांपरी करिती व्यवहार । परी योग्य तोचि करिती साचार । आणि लाविती जनांही सत्वर । परमार्थासी प्रमानें ॥२७॥
असो ऐसी सद्गुरुमूर्ति । अवतरली शिराळी - ग्रामाप्रति । आनंदले आप्तजन चित्तीं । मुखकांति पाहूनियां ॥२८॥
दिवस लोटले एकादश । मग उगवला दिवस द्वादश । सकलही मिळोनि आनंदें त्यास । पाळण्यांत घालिती प्रेमानें ॥२९॥
शांतमुख बघुनी नयनीं । 'शांतमूर्ति' हें नाम कर्णीं । बोलुनी दाविलें बालका त्या क्षणीं । आनंद जाहला सकलांसी ॥३०॥
सकल नारी येउनी तांतडीं । म्हणती 'बाळा जो जो घडीघडी । आणि म्हणती बाळा तोडीं । प्रपंचगोडी ही आमुची ॥३१॥
अससी तूं वैकुंठवासी । आम्हां सकल अज्ञ जनांसी । कैसें पार घालावें म्हणोनि रडसी । खराचि कां तूं देवा ॥३२॥
तेवीं स्वधर्मरक्षणाकरितां । जनांलागीं देऊनि हाता । कैसें उपदेशं त्यांच्या हितार्था । म्हणोनि चिंतेनें रडसी कां ॥३३॥
न ऐकूं पुढें तुझें वचन । म्हणोनि चिंता तुजलागोन । लागली म्हणोनि आक्रंदोन । रडसी कीं सांग छकुल्या ॥३४॥
अथवा जन्म वायां घालुनी । देव - गुरूंसी न भजती कोणी । काय करूं ऐशियांलागुनी । म्हणोनि रडसी कां बापा ॥३५॥
कासया तुज इतुकी चिंता । सारें जगचि तुझिया हाता । ऐसें असुनी रडसी कां ताता । माझ्या तान्हुल्या शांतमूर्ति ॥३६॥
तुज काय लागली भूक । निजभक्त - प्रेमाची एक । म्हणोनि मुख पसरोनि देख । उव्यां उव्यां करुनी रडसी ॥३७॥
तुज काय उणीवता म्हणुनी । रडसी ऐसा आक्रंदोनी । विषयांचा वीट येउनी । उव्यां करोनि वमन करिसी ॥३८॥
असो आतां माझ्या देवा । उगी उगी तूं करुणार्णवा । जन धरूनि दृढतर भावा । येतील शरण तव पायां ॥३९॥
तुझी वृत्ति स्वरूपीं लीन । हीच तुज निद्रा जाण । करीं आतां सुखेंकरोन । माझ्या बाळा करुणाळा ॥४०॥
ऐशापरी बहुविध गाउनी । गेल्या नारी आपुल्या सदनीं । असो पुढें ऐकावें कर्णीं । श्रोते सज्जन तुम्हीं हो ॥४१॥
बाळ झालें सुंदर सुकुमार । दिवसेंदिवस जाहलें थोर । शांत वृत्ति त्याची अपार । वर्णवेना आमुचेनि ॥४२॥
नाम जैसें 'शांतमूर्ति'। त्यापरीच घेतली कीर्ति । अंगीं वसे बहुत शांति । बाळपणींच हो जाणा ॥४३॥
न करी खोड्या कधीं काळीं । न जाई दुर्जन - संघ - मेळीं । जरी आला दुर्जन जवळी । नच धिक्कारी त्यालाही ॥४४॥
त्यासी प्रेमानें घेउनि जवळी । दुर्गुण त्याचे सर्व उधळी । ऐसी प्रेमळ मूर्ति कोंवळी । किती सद्गुण वर्णावे ॥४५॥
कर्नाटक शाळेमाजीं । जाई नेमानें प्रेमें सहजीं । सांगती जो अभ्यास गुरुजी । करी निष्ठेनें नित्य पहा ॥४६॥
परम चतुर बुद्धि त्याची । नाहीं अहंता अणुभरी साची । हौस असे सकल कार्याची । स्वधर्मापरीच ती जाणा ॥४७॥
माता पिता स्वधर्म पाळिती । त्यापरीच आपण वर्तती । जरी लहान बाळ तरी ती । किती प्रीति स्वधर्माची ॥४८॥
पितयासंगें जाई नित्य - । नेमानें स्वामींच्या मठांत । भजन आरती करुनी येत । आनंदें डोलत निजसदना ॥४९॥
गृहीं येतां पित्याजवळ । जाउनि बैसे तिष्ठत बाळ । निद्रा आळस टाकुनी समूळ । ऐकाया कथा पुराणींच्या ॥५०॥
पिता सांगे कथा गोड । नानाविध सविस्तर उघड । धरी हृदयीं जरी अवघड । कथा अनेक असतांही ॥५१॥
परम भक्ति असे अंगीं । प्रेमें भजत गुरुदेवालागीं । निष्काम निरहंकार राहत जगीं । परम कनवाळू हो जाणा ॥५२॥
सूर्योदयापूर्वी उठुनी । मुखमार्जनादि सकल सारुनी । तुलसी - वेल - पुष्पें घेउनी । जात गोपाळकृष्ण - देउळीं ॥५३॥
गृहाजवळी त्यांचें देऊळ । 'गोपाळकृष्ण' म्हणती सकळ । तेथें द्यावया फुलें सोज्ज्वळ । जात घेउनी सूर्योदयीं ॥५४॥
यापरी करी सेवा अनेक । रात्रंदिन त्यांतचि गर्क । सदा सुप्रसन्न असे मुख । आणि वृत्ति अति शांत ॥५५॥
नाहीं कवणही मानावमान । देव गुरूंपुढें वांकवी मान । ऐसी मूर्ति सुंदर सगुण । किती वानूं गुण त्याचे ॥५६॥
केलें पितयानें मौजीबंधन । अष्टमवर्षी प्रेमेंकरून । ब्रह्मचर्य पाळिलें पूर्ण । दृढ निष्ठेनें बालकें त्या ॥५७॥
तेथे गोपाळकृष्ण - देउळीं । जो करी पूजा तये वेळीं । त्याच्यावरी श्रद्धा चांगली । होती त्याची सहज पैं ॥५८॥
आणि श्रावणमासामाझारीं । उत्सव होत असे त्यांच्या घरीं । रमावल्लभदास - सांप्रदायापरी । करीत बाप हरिदास ॥५९॥
त्यांच्या संगें सदा रात्रीं । जाउनि प्रेमानें भजन करी । आळस निद्रा सारोनि दुरी । वैसे भजनासी नियमानें ॥६०॥
अद्यापिही तये स्थानीं । कृष्णजन्माष्टमीचे दिनीं । सवड झालिया जाती रजनीं । उत्सवालागीं प्रेमभरें ॥६१॥
असो एवं परमभक्तः । आमुची शांतमूर्ति विख्यात । सकल सद्गुण अंगीं अमित । लिहाया मेदिनी न पुरेचि ॥६२॥
असतांही वय लहान । हृदय कनवाळू त्यांचें पूर्ण । न बोलती कठोर वचन । कवणालागींही अणुमात्र ॥६३॥
अंगीं नसे किंचितही क्रोध । असे जरी कुणाचा अपराध । तरीही त्यासी कठोर शब्द । न बोलती ते कदापिही ॥६४॥
जरी कुणीही बोलती आपणा । प्रत्युत्तर न देती त्यांना । जरी प्रसंगी बोलिले कवणा । न दुखवितां अंतर बोलती ॥६५॥
आणि सुहास्य वदनांतुनी । निघे जी कोमल मधुर वाणी । सुंदरशा वाक्येंकरोनी । देती उत्तर सकलांसी ॥६६॥
यावरी एक सुरस कथा । बाळपणींची सांगूं आतां । श्रोतीं सावध करोनि चित्ता । परिसावी प्रेमादरानें ॥६७॥
शाळेमाजीं एके दिनीं । बैसले असतां मार्गावरोनी । एक इसम गेला घेउनी । घोडा आपुला त्या समयीं ॥६८॥
त्यासी बघुनी सारीं मुलें । पहाया धांवलीं तत्काळें । आमुचे चरित्रनायकही ते वेळे । धांविन्नले सवें त्यांच्या ॥६९॥
पाहूनियां घोडा सुंदर । मुलें आलीं शाळेभीतर । तेव्हां बघुनी त्यांचा मास्तर । काय बोलिला तें ऐका ॥७०॥
म्हणे तुम्हीं घोडा ऐसा । देखिला ना कीं अजुनी सहसा । कासया पळालां करुनि साहसा । शिकणे सोडुनी आपुलें पैं ॥७१॥
यावरी बोलिले आमुचे चतुर । भावी आनंदाश्रमस्वामी गुरुवर । गुरुजी सांगतों आमुचा विचार । परिसावा तो कृपेनें ॥७२॥
म्हणे गुरुजी कीं हा घोडा । नाहीं कधीही देखिला बापुडा । म्हणोनि आम्ही धांवुनी दुडदुडां । गेलों पहाया लगबगेंसीं " ॥७३॥
ऐसें ऐकतां मधुर वचन । मुलें गुरुजी सारे जन । खदखदां हांसती पोट धरोन । म्हणती भलारे शांतमूर्ति ॥७४॥
पहा कैसें दिधलें उत्तर । बालपणींच इतुके चतुर । काय यामाजीं चतुरता थोर । ऐसें म्हणाल तरी ऐका ॥७५॥
पहा शिक्षक काय बोलिला । घोडा अजुनी ना कीं देखिला । पठण सोडोनि धांवुनि गेलां । यावरी बोले शांतमूर्ति ॥७६॥
जो हा घोडा मार्गीं गेला। तो ना आम्हीं कधींही देखिला । काय अर्थ यामाजीं भरला । ऐका सविस्तर हो पाहीं ॥७७॥
जगीं असती अनेक घोडे । त्यांचे आम्हां काय कोडें । हा जो देखिला दृष्टीपुढें । तो देखिला नव्हता यापूर्वी ॥७८॥
हें असे सत्यचि उत्तर । कीं हा घोडा न पाहिला साचार । परी न सुचला हा विचार । कवणालागीं ते समयीं ॥७९॥
आणिक ऐका सूक्ष्म अर्थ । श्रोतीं करोनि सावध चित्त । सद्गुरुनाथ जैसें स्फुरवित । तैसें सांगूं आतां पैं ॥८०॥
हा घोडा येथें विचार करितां । सारें आत्मरूपचि तत्त्वतां । कैसें तें ऐका आतां । चित्त सावध करोनियां ॥८१॥
'तो हा' येथे काय भेद । नये सर्वथा निश्र्चयें द्विविध । केवळ एकचि ब्रह्म प्रसिद्ध । ‘तो हा’ हें विशेषण त्यागावें ॥८२॥
'हा' म्हणतां 'तो' एक असे । ऐसें सिद्ध होय आपैसें । तेव्हां एकरूप होईल कैसें । 'हा' शब्द लावितां पैं ॥८३॥
म्हणोनि म्हणनी शांतमूर्ति । ‘हा कधीं ना पाहिला’ निश्र्चितीं । 'तो' असे ज्याच्या चित्तीं । 'हा' शब्द येत सहज तैं ॥८४॥
‘हा’ शब्दचि नाहीं येथे । म्हणोनि बोलिले प्रेमळ चित्तें । आम्हीं ना पाहिले 'हा' या शब्दांतें । केवळ ब्रह्मचि सारें हें ॥८५॥
म्हणोनि 'हा घोडा' या विशेष वाक्यें । ना पाहिला ऐसें सांगितलें निकें । एवं बाळपणींच ऐशा कौतुकें । बोलती आमुचे गुरुराय ॥८६॥
पहा कैसी सूक्ष्म बुद्धि । कुणीं ही शिकविली का ती आधीं । बाळपणापासुनी जनांसी बोधी । परम चातुर्येंकरोनियां ॥८७॥
परी याचा न कळतां अर्थ । म्हणती बुद्धिचातुर्य अमित । 'हा घोडा ना देखिला' म्हणत । हाचि अर्थ बांधियला ॥८८॥
यापरी साधु हे जे सारे । त्यांच्या भाषणीं महत्त्वचि भरे । एकही शब्द व्यर्थ न सरे । बाळपणींही मुखांतुनी हो ॥८९॥
ऐसे नानापरी शब्द । प्रेमयुक्त असती प्रसिद्ध । ऐकतां सकलां होय आनंद । हांसती गदगदां जन प्रेमें ॥९०॥
सांगूं जातां सकल लीला । जन्मभरी ग्रंथ जरी लिहिला । संपूर्ण करावया मजला । दिवस न मिळे कदापिही ॥९१॥
असो आतां ऐका पुढती । देव - गुरूंवरी असे भक्ती । एकें स्थापिली दत्तमूर्ति । हरिदासमठामंनिधीं हो ॥९२॥
तेथें जाउनी पूजा करिती । न धरितां कामना कांहीं चित्तीं । न चुकतां नित्य नेमाप्रति । शांतमूर्ति ते पाहीं ॥९३॥
अहोरात्र भक्तिप्रेम । हेंचि असे त्यांचे काम । सत्कर्मीं झिजविती काया उत्तम । धरिती नाम सतत मुखीं ॥९४॥
मायबाप यांची आज्ञा । शिरसावंद्य असे त्यांना । स्वधर्मापरी करिती वर्तना । अजुनी बाळ असतांही ॥९५॥
म्हणती मानसीं रात्रंदिन । स्वधर्म हेंचि मुख्य साधन । याचि मार्गीं जातां आपण । जनही मागुती येती पैं ॥९६॥
आपण तरुनी जनांसी तारणें । तरीच होय धन्य हें जिणें । आपुलें कार्य स्वधर्म रक्षिणें । म्हणोनि झटती त्यालागीं ॥९७॥
एवं करिती स्वधर्माचरण । मौंजीबंधन झालियापासोन । आठव्या वरुषीं इतुकें ज्ञान । आलें कोठुनी सांगा हो ॥९८॥
स्वधर्म हाचि मुख्य जनांसी । नातरी भय सतत मानसीं । जरी राजा झाला त्यासी । स्वधर्मचि श्रेष्ठ असे हो ॥९९॥
मागील अध्यायीं हेंचि कथन । केला जरी अधर्म आपण । हिंसा घडे निश्र्चयें हातून । कैसी ती सांगूं आतां हो ॥१००॥
पहा कैसी घडे हिंसा अधर्में । कीं स्वधर्म करी जो नित्यनेमें । त्याच्या हातुनी पापकर्में । न घडती सहसा जाणा हो ॥१०१॥
जो करी खरा स्वधर्म। तो पापा भीइजे हा नेम । न करी कधींही हिंसाकर्म । कैसें तें हें परिसा हो ॥१०२॥
ब्राह्मणें सेवूं नये मदिरा मांस । ऐसें शास्त्रीं कथिलें बहुवस । जो पाळी स्वधर्म तयास । निषिद्ध वाटोनि त्यागी तें ॥१०३॥
पशु पक्षी यांचे मांस । पशु मारिल्यावीण एकाद्यास । न मिळे कदापि खावयास । हिंसा घडे प्रत्यक्ष ती ॥१०४॥
जरी तें घेतलें विकत त्यानें । तरी दोषचि लागे तेणें । जो वागे स्वधर्माचरणें । तो करी त्याग सहजचि ॥१०५॥
जो कोणी अधर्म करी । तो न मानी विधि-निषेध अंतरीं । तया हातुनी हिंसा सारी । घडे निश्र्चयें हो जाणा ॥१०६॥
मांसभक्षणाविण आणिक । बहुत हिंसा असे देख । पुढती सांगूं ती आणिक । सद्गुरुकृपें अणुमात्र ॥१०७॥
असो स्वधर्माची श्रृंखला एक । मनासी घट्ट बांधितां देख । जरी देखिले दुर्विषय सन्मुख । न घेववनी तयासी ते ॥१०८॥
श्वान जाय विष्ठादि खावया । चांगुले पदार्थ देतांही तया । बांधी श्रृंखला घेऊनियां । धनी त्याचा ते समयीं ॥१०९॥
जेव्हां सुटते शृंखला कंठींची । तेव्हां धांव श्र्वान त्वरेंचि । विष्ठादि असे जेथ त्याची । ओढ असे तेथ धांवे ॥११०॥
तैसें आम्हां अज्ञजनांसी । श्रीस्वामींनीं स्वधर्मशृंखलेसीं । बांधिलें घट्ट निश्र्चयेंसीं । प्रेमाचा गांच घालूनियां ॥१११॥
जरी प्रेमगांच सुटला अणुमात्र । स्वधर्मशृंखला निसटे पवित्र । तेव्हां धांवे मन हें सर्वच । दुर्विषयांकडे तत्काळ ॥११२॥
श्वान जाउनी भलतें खातां । वेडे होय तें कीं तत्त्वतां । तैसा कोणी दुर्विषयीं जातां । दुर्गुणी होय तो जाणा ॥११३॥
प्रपंच-परमार्थीं दोहींकडे । नाडला खास, येई सांकडें । मग धांवे इकडूनि तिकडे । कोणी ना ढुंकिती त्यालागीं ॥११४॥
म्हणोनि स्वधर्म सारा आपुला । सद्गुरु सांगती जैसा भला । तैशा रीतीं करितां त्याजला । नाहीं कवणही भय जाणा ॥११५॥
धरितां प्रेम त्यांच्या चरणीं । कैंचें भय त्यालागोनी । परी असावें अंतःकरणीं । अनिवार प्रेम जाणा हो ॥११६॥
असो यापरी स्वधर्म-ममता । हृदयीं धरोनि शमवी चित्ता । केवळ लोकहितार्थी । करी कार्य शांतमूर्ति ॥११७॥
तेवींच नाहीं अन्य चिंतन । जगाच्या कल्याणावांचोन । जरी बालक आपण लहान । तरीही प्रेम अनिवार ॥११८॥
परी न दावी कवणालागून । कीं आपुली इच्छा अमुक म्हणोन । मीही सर्वजनांसमान । असें अज्ञ हें दावी ॥११९॥
पहा कैसी वृत्ति त्यांची । जनांसी दावी असें मी अल्पचि । परी श्रीविष्णूची ही मूर्ति साची । तयांसी कैसें वानावें ॥१२०॥
सकल विद्यापारंगत । पुढें बोलूं त्या गोष्टी प्रख्यात । आतां धरूं मूर्ति सतत । श्रीगुरूंची हृदयीं हो ॥१२१॥
जन्माआधीं ब्रह्मज्ञानी । ने वामदेवासमान सुनी । केवळ जगाच्या कल्याणावांचोनी । अन्य चिंतन ना त्यांसी ॥१२२॥
प्रपंच सारा मिथ्या ऐसा । निश्र्चयचि त्यांचा परियेसा । परमार्थ नवा करावा नलगे सहसा । जीवन्मुक्तचि असती ते ॥१२३॥
घेतला अवतार आम्हांस्तव । उद्धरावे अज्ञ जड जीव । म्हणोनि लागली चिंता सदैव । पार घालूं कैसें यांतें ॥१२४॥
कीं यांच्या पूर्वजीं करोनि साहस । स्थापिला मठ प्रेमें बहुवस । जनासी व्हावा धर्मोपदेश । म्हणोनि सद्गुरु आळविला ॥१२५॥
आमुच्या सारस्वत पूर्वजांनीं । केली जी व्यवस्था सुंदर जनीं । ती आम्हीं बरवी राखुनी । करावा उद्धार जनांचा ॥१२६॥
हेचि चिंता शांतमूर्तीस । लागली असे रात्रंदिवस । अवतार जो विष्णूचा खास । 'पालन करणें' धर्म त्याचा ना ॥१२७॥
एवं आमुचे चरित्रनायक । शांतमूर्ति सुखदायक । अवतरले होउनी स्वधर्मरक्षक । चित्रापुर - ग्रामीं हो जाणा ॥१२८॥
म्हणोनि बालपणींच इतुका । स्वधर्म पाळिला कौतुकें निका । ऐसा त्यांचा अपूर्व देखा । भक्तिभाव प्रख्यात ॥१२९॥
पहा कैसें पणं प्रेम अद्भुत । बालपणींच इतुके शांत । नाहीं कवणापाशीं भांडत । कदापिही निर्धारें ॥१३०॥
आपुले सवंगडी असती त्यांसीं । प्रेमानें वागती निश्चयेंसीं । मृदु वचनीं बोलुनी परियेसीं । खेळती तयांसंगें हो ॥१३१॥
एकही नसे न्यूनता अंगीं । रूप-गुण-विद्येची त्यांलागीं । संपूर्णता असोनि, विरागी । जन्मापासुनी पहा हो ॥१३२॥
मदनासारिखें रूप सुंदर । बुद्धि असे परम चतुर । आणिक करूं पुढें विस्तार। सद्गुणांचा परिसा हो ॥१३३॥
श्रोते होउनी सावधान । सर्वांगाचे करोनि कान । परिसा तुम्ही प्रेमळ सज्जन । पुढील अध्यायों वर्णन हें ॥१३४॥
आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें सप्तचत्वारिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१३५॥
स्वस्ति श्रीचित्रापुर । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां होय जीवन्मुक्त साचार । सप्तचत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥१३६॥ अध्याय ४७॥
ओंव्या १३६॥
ॐ तत्सत्-श्रीमदानंदाश्रमस्वामी - सद्गुरुचरणारविंदार्पणमस्तु ॥    
॥ इति सप्तचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP