मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥३॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥३॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ ॐ ॥
जय जय जय जय सद्गुरुराज । स्मरतां होय सकलही काज । महिमा अपार वर्णितां सहज । होय विश्रांति मनासी ॥१॥
सगुरो तूंचि सकलां रक्षक । नाहीं आप्त तुजहुनी आणिक । तूंचि अससी माय जनक । आम्हां अज्ञ जनांसी ॥२॥
असो आतां भाविक सज्जन । परिसा रसाळ महिमा वर्णन । मागील कथेचें निरूपण । पुढें बोलूं लवलाहीं ॥३॥
ऐकुनी आलाप भक्तजनांचा । कंठ दाटला सदाशिवाचा । प्रेमाश्रु लोटले मग तो साचा । उठला लगबगें त्या समयीं ॥४॥
जटा बांधुनी सांवरी नेसण । सिद्ध जाहला पंचवदन । मग निजकांतेसी म्हणे येऊन । देवी पार्वती येतों मी ॥५॥
ऐकतां आपुल्या पतीचें वचन । म्हणे अंवा कुठें हो गमन । मुखें गेलीं कोमेजून । सौख्य आहे ना तुम्हांसी ॥६॥
यावरी बोले पिनाकपाणी । गेलें पाहिजे मजला धरणीं । भक्तसंकटा पाहुनी नयनीं । तळमळ वाटे मम जीवा ॥७॥
काय तयांची प्रेमळ भक्ती । असे अंगीं बहुत विरक्ती । रात्रंदिन ते मजला बाहती । प्रेमोद्गारेंकरोनि ॥८॥
अन्य कित्येक बाहती भक्त । नाना ढोंगें करोनि दावित । मी नच देई दरुशन त्यांप्रत । काय सांगूं गिरिजे तुज ॥९॥
खरे भक्त मिळणें दुर्लभ । म्हणुनी जातों मी तुझा वल्लभ । यापरी बोलतां शिवहरसांब । बोले वेल्हाळ स्मितमुखें ॥१०॥
म्हणे अंवा प्राणनाथा । कोण भक्त सांगा कीं आतां । कोणत्या ग्रामीं काय ती वार्ता । सांगावें मज सदाशिवा ॥११॥
यावरी बोले जाश्वनीळ । सांगतों ऐक तुजला सकळ । गोकर्णग्रामीं जातों येवेळ । काय सांगूं तुजलागीं ॥१२॥
तेथील सारस्वत ब्राह्मण । नाहीं त्यां अन्न सप्तदिन । बैसले माझें करीत ध्यान । तनुमन सकलही अर्पुनी ॥१३॥
दुःखी झाले गुरुवांचोन । केला दुर्जनीं त्यां अवमान । मीचि धरोनि अवतार जाण । करितों उद्धार तयांचा ॥१४॥
ऐकतां भवानी कळवळे चित्तीं । म्हणे कां हो तुम्ही जगतीं । पडतां भक्त ऐशा संकटीं । अंत किती पाहातां हो ॥१५॥
यावरी बोले जाश्वनीळ । काय सांगूं तुजला सकळ । परीक्षा पाहतों आधीं समूळ । मग धांवतों सत्वरी ॥१६॥
ना तरी ऐसे बहुत भजती । देहममता धरोनि चित्तीं । किंचित् शिणतां डगमगे वृत्ती । जाती आपुल्या कार्यासी ॥१७॥
जो असे खरा भक्त । कधींही न ढळे तो विरक्त । जरी घोर संकट येत । तरी मजला न विसंबे ॥१८॥
ज्याच्या अंतरीं दृढभाव । त्यासीच मी रक्षितों सदैव । जें जें मागे तें तें सर्व । देतों त्याजला निश्वयेंसीं ॥१९॥
जरी तो भजे होऊनि कामुक । त्याची इच्छा मी पुरवितों देख । हे तरी ब्राह्मण भाविक । सद्गुरूकरितां तळमळती ॥२०॥
नाहीं मागती पुत्र पौत्र । सद्गुरु स्वामी परम पवित्र । त्याच्या दरुशना अहोरात्र । करिती चिंतन प्रेमानें ॥२१॥
ऐशा माझ्या भक्तांलागुन । धिक्कारील सांग तूं कवण । जाउनी ध्यानीं सांगतों खूण । एका प्रमुख ब्राह्मणासी ॥२२॥
जो येई अनन्य शरण । त्यासीच आम्ही देऊं दरुशन । आतां सत्वर समाधान । करितों जाउनी भक्तांचें ॥२३॥
यावरी बोले हेरंब - जननी । अवतार धरितों म्हणसी धरणीं । सोडुनी मजला कैलासस्थानीं । कैसा जासी तूं एकटा ॥२४॥
आजवरी ऐसें नाहीं नाथा । अवतार धरिला मजवीण सर्वथा । रामावतारीं जाहल्यें मी सीता । कृष्णावतारीं रुक्मिणी ॥२५॥
आतां सोडुनी  मज त्रिपुरारी । कां होतां हो अवतारी । मीही येवोनियां अवनीवरी । अवतारकार्य करीन ॥२६॥
तिचें ऐकुनी ऐसें वचन । काढितील आक्षेप सारे जन । येथें राम-कृष्ण आले कोठून । तो अवतार विष्णूचा ॥२७॥
तरी ऐका हो चित्त देऊन । सांगतों आतां सद्गुरुवचन । विष्णु आणि शंकर जाण । एकचि परिपूर्ण देव तो ॥२८॥
नाहीं त्यांसी कांहीं भेद । अज्ञजन म्हणती त्रिविध । विधि-हर-विष्णु ऐसा छंद । धरिला आम्हीं नरांनीं ॥२९॥
आणिक ऐका एक वचन । एकाप ग्रामीं एक ब्राह्मण । तो करी वेदमंत्र पठण । म्हणती त्यासी 'भिक्षुक' ॥३०॥
तोचि शिकवी जाउनी शाळेसी । म्हणुनी 'शिक्षक' म्हणती तयासी । औषध देतां रोगी जनांसी । तेव्हां 'वैद्य' म्हणती त्या ॥३१॥
मुलें म्हणती आमुचा 'पिता' । 'पुत्र' म्हणे त्याची माता । भार्या बोले 'प्राणनाथा' । ऐसें बहुविध बाहती ॥३२॥
कार्यपरत्वें बाहती त्या जन । परी तो एकचि असे ब्राह्मण । तैसें देवासी आपण । बाहतों सर्व नानापरी ॥३३॥
सृष्टिकर्ता म्हणोनि नामा । देती सकलही त्यासी 'ब्रह्मा' । तोचि करितां पालन-कामा । 'विष्णु' नामा पावला ॥३४॥
करितो सकलां संहार । म्हणुनी म्हणतों तया 'शंकर' । नाहीं भेद अणुमात्र । तिघेही एक खचित पें ॥३५॥
एवं एकचि तिन्ही देव । मंदमति आम्ही भिन्न भाव । धरुनी चित्तीं देतों नांव । नानापरी देवांसी ॥३६॥
असो आतां ऐका वृत्तांत । श्रीहर-सांव-सदाशिव हांसत । पार्वतीसी उत्तर देत । कीं हें काय बोलसी तूं ॥३७॥
अवो मागील सकळ अवतारीं । तुजला वरिलें होतें भूवरी । परी संन्यासी मी त्रिपुरारी । होऊनि जातों आतां पैं ॥३८॥
तेथे तुझें नसे काज । कासया नेऊं तुजला आज । ऐसें म्हणोनि श्रीप्रभुराज । गदगदां हांसे प्रेमभरें ॥३९॥
यावरी खेदयुक्त बोले गौरी । टाकुनी जातां मज अंतरीं । कैसें करमेल सांगा सत्वरी । नच मी सोडीं चरण हे ॥४०॥
ऐसें बोलोनि दाक्षायणी । सिद्ध जाहली जावया अवनीं । तेव्हां बोले मधुर वचनीं । गिरिजाकांत कनवाळू ॥४१॥
आतां मी अयोनि-संभव । अवतरोनि महादेव । शीघ्र जातों तळमळती सर्व । भक्त माझे गुरुवीण ॥४२॥
म्हणोनि मीचि होऊनि संन्यासी । दरुशन देतों मद्भक्तांसी । तुजला संगें नेतां आम्हांसी । हंसतील पिशुन सकलही ॥४३॥
म्हणोनि अंबे ऐसी आर्त । सोडीं तूं ना येतों आतां त्वरित । ऐकुनी वचन पतीचें अद्भुत । करी रुदन भवानी ॥४४॥
म्हणे शंभो पिनाकपाणी । राहूं कैसी तुजला सोडुनी । प्रियकर भक्तचि तुजलागोनी । मजहुनी जाण खचितचि ॥४५॥
ऐसें बोलुनी ती वेल्हाळ । घरी घट्ट चरणकमल । म्हणे नाथा तूं कृपाळ । नको करूं उपेक्षा ॥४६॥
यावरी बोले नीलकंठ । तुजहुनी मजला भक्तचि श्रेष्ठ । खचितचि स्थापोनियां मठ । राहतों सदा तेथेंचि ॥४७॥
ऐसें वचन पडतां कानीं । दचकोनि पडली हिमनगनंदिनी । म्हणे नाथा अघटित करणी । कवणासीही न कळे तुझी ॥४८॥
नको पाहूं माझा अंत । धरोनि आपुल्या कांतेचा हस्त । जाउनी राहें भूतळीं सतत । करीं उद्धार जनांचा ॥४९॥
ऐसें म्हणोनि अपर्णा सुंदरी । स्फुंदस्फुंदोनि रडे बहुपरी । म्हणे काय करावें त्रिपुरारी । तुजविण देवा दयाळा ॥५०॥
यावरी बोले पंचवदन । तुज नाहीं कळली खूण । तुजला नाहीं कीं मी सोडून । गिरिजे सांगतों निर्धारें ॥५१॥
अग्निवीण न राहे ज्योति । शर्करेसी गोडी न सोडे ती । तैसें तूं हो मज सांगातीं । राहसी निरंतर सहजचि ॥५२॥
तूं निर्विकल्प परम शांति । संत संन्यासी तुजला सेविती । हें तूं विसरसी कीं तव प्रख्याति । अथवा ढोंग करिसी हें ॥५३॥
पहा तूं नसतां संन्यास । त्याहुनी बरा गृहस्थाश्रम विशेष । म्हणोनि तुजवांचोनि खास । होउनी संन्यासी न जाऊं ॥५४॥
इतुकेंचि नव्हे आणिक एक । सांगतों चित्त देउनी ऐक । सारस्वत स्वामी सकलही देख । तुजसहित नांदतील ॥५५॥
अर्थात् सारस्वत-गुरुपरंपरा । ब्रह्मनिष्ठ होउनी स्वधर्म सारा । करुनी आपण दावितील इतरां । पूर्णज्ञानी सकलही ॥५६॥
ऐसी ही तुज पुढील वार्ता । सांगितली गुह्य गोष्ट आतां । संगें घेउनी तुजला भक्तां । जाउनी भेटतों लवलाहीं ॥५७॥
ऐसें बोलुनी अपर्णावर । आरूढ होउनी नंदीवर । धांविन्नला श्रीहर शंकर । गोकर्णग्रामीं भूवरी ॥५८॥
श्रोते ऐका सावधान । पुढील अध्यायीं निरूपण । श्रीशंकर अवतार धरोन । करील उद्धार जनांचा ॥५९॥
नाम घेवोनि 'परिज्ञानाश्रम' । सुखवुनी जनांसी मार्ग सुगम । दावुनी सकलां लावील प्रेम । निजस्वरूपाचें सवेंचि ॥६०॥
 ऐकतां चित्त होय तल्लीन । सकलही पाप जाय नासोन । यामाजीं नसे अनुमान । नच सांगें लटिकें मी ॥६१॥
नकळे मजला ब्रह्मज्ञान । नाहीं केलें पुराणश्रवण । अति पापी मूढ मलिन । हीनदीन मंदमति ॥६२॥
ऐसा मी काय करितों वर्णन । श्रीसद्गुरुचरित्र कथन । श्रोते हो काय सांगूं तुम्हांलागून । सद्गुरुचि देई मज स्फूर्ति ॥६३॥
मी अज्ञ बालक काय वर्णन । कैसें हो करूं शकेन । मजला निमित्त करोन । तोचि वदवी गुरुनाथ ॥६४॥
येथे करितील प्रश्न थोर । म्हणसी घडिघडी श्रीसद्गुरुवर । तोचि करवितो ग्रंथ सविस्तर । तरी संशय एक उठे ॥६५॥
आजवरी बहुत ग्रंथ जाहले । एकनाथज्ञानदेवादि संत भले । यांनीं नाना ग्रंथ सविस्तर केले । अति सुंदर सुकुमार ॥६६॥
नाना युक्तीनें दृष्टांतसहित । लिहिले परम रसभरित । ऐकतां तल्लीन होय चित्त । असे विदित तुजलागीं ॥६७॥
परी त्वां हें जें वर्णन केलें । येर ग्रंथांच्या जोडीस न आलें । म्हणसी सद्गुरुनाथाच्या कृपावळें । करितों चरित्रवर्णन हें ॥६८॥
तरी हें वर्णन परम उत्कृष्ट । येर ग्रंथांपरी न होय खचित । कां हे ऐसा संशय येत । ऐसा आक्षेप धरितील ॥६९॥
तरी अवधारा श्रोते हो सज्जन । उत्तर देऊं तुम्हांलागुन । तेंचि किंचित् करोनि कथन । अध्याय संपूर्ण करितों पैं ॥७०॥
ज्ञानेश्वरादिक संत महंत । तयांची योग्यता कैंची मजप्रत । अवतारी पुरुष ते प्रख्यात । काय वानूं तयांसी ॥७१॥
सूर्यासमीप खद्योत चमके । तयाचा उजेड काय तो फांके । तैसा मी संतांच्या सन्मुखें । काय तें कवन करीन ॥७२॥
जरी सद्गुरु वदविता सकल । तरी पाहिजे आपुलें पुण्य विपुल । नातरी सद्गुरु काय करील । वृत्तिच मलिन माझी पैं ॥७३॥
जें जें होईल आपुलें कार्य । तें तें सफल करी गुरुराय । येथें नाहीं संशय । न बोलें मी लटिकें हें ॥७४॥
परी जयात्री जितुकी भक्ती । तितुकीच तयासी होय प्राप्ती । जेवढें पात्र नदीसी नेती । आणिती पाणी तितुकेंचि ॥७५॥
आणिक एक असे दृष्टांत । अहो तुम्ही भाविक भक्त । करोनि आपुलें सावध चित्त । ऐका प्रेमळ श्रोते हो ॥७६॥
एका मातेसी दोघे सुत । आपुल्या हस्तीं तयांचे हात । धरोनि एकेकासी चालवी त्यांप्रत । दोघांलागीं सारिखेंचि ॥७७॥
परी ज्याचे पाय असती बळकट । धरोनि हात दुडदुडां धांवत । चालोनि जाय तो त्वरित । मातेसंगें त्या समयीं ॥७८॥
ज्याच्या पायां नसे शक्ति । तो अडखळोनि पडे खालती । आणि हळूहळू चाले सांगातीं । जननी-कराच्या आधारें ॥७९॥
यांत असे कवणाचा दोष । मातेचा कीं पुत्राचा विशेष । याचा विचार करील तयास । कळेल पुत्राचा दोष हा ॥८०॥
तद्वत् येर जे करिती ग्रंथ । तयांचे भक्तिरूप पाय बळकट । सद्गुरुकृपेचा धरोनि हस्त । करिती वर्णन रसाळ ते ॥८१॥
माझी भक्तीचि असे अशक्त । चंचल अवघी, निश्चल नसत । परी गुरुकृपेचा धरूनि हस्त । अणुमात्र वर्णन करितों पैं ॥८२॥
जरी मजला नसे भक्ती । सद्गुरुमाउली कृपा करी ती । म्हणोनि धैर्यें लागलों कार्याप्रती । पार करील तीचि पैं ॥८३॥
आनंदाश्रम सद्गुरुसदय । शिवानंदतीर्थ अभेदरूप उभय । यांच्या कृपाप्रसादें तृतीय । अध्याय गुरुदासें संपविला ॥८४॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां पापें नासती थोर । तृतीयाध्याय रसाळ हा ॥८५॥ अध्याय ॥३॥
ओंव्या ॥८५॥
ॐ तत्सत् - श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥

॥ इति तृतीयोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 19, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP