मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥१६॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥१६॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीशंकराश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ ॥ॐ॥
जय जय सद्गुरो करुणाघना । नमितों देवा आपुल्या चरणा । उद्धरीं मातें अत्रिनंदना । भक्तवत्सला करुणाळा ॥१॥
तुझे नाम वदतां वदनीं । जळती पातकांच्या खाणी । ऐसी तुझी महिमा ऐकोनी । आलों धांवत चरणीं या ॥२॥
किंचित् स्तवन करावें म्हणुनी । वाटलें माझ्या अंतःकरणीं । परी देवा मजलागोनी । त्वांचि द्यावी स्फूर्ति बा ॥३॥
कर्ता करविता तूंचि एक । मज नाहीं बा कांहीं विवेक । म्हणोनि धरितों अहंता देख । म्यां केलें म्हणोनि ॥४॥
परी देवा मजला जाण । तूंचि सोडवीं अहंतेपासोन । आणिक करवीं चरित्र संपूर्ण । करीं रक्षण बा देवा ॥५॥
असो आतां परिसा सज्जन । मागील अध्यायीं केलें कथन । शंकराश्रमस्वामींची जाण । महिमा वर्णन केली पैं ॥६॥
अनुष्ठानसमयीं येतां हिंवताप । दंडीं ठेवितां सुटे त्या कंप । विस्मयें एकानें पुसतां खूप । केला बोध स्वामींनीं ॥७॥
साधूंसी कांहीं करितां प्रश्न । त्यावरी करिती मोठें प्रवचन । नसे तयांसी देहाचें भान । न वाटे शीण अणुमात्र ॥८॥
असो आतां आणिक एक । स्वामींची लीला सांगतों सुरेख । तुम्ही सज्जन श्रोते हो भाविक । परिसा चित्त देवोनि ॥९॥
शंकराश्रमसद्गुरुनाथ । सदा योगाभ्यासीं रत । येतां भेटीसी आपुले भक्त । करिती बोध योग्य तयां ॥१०॥
एवं सतत परमार्थीं । घालिती मन दिवसरातीं । यापरी असतां निजदेहाप्रती । करिती दुर्लक्ष बहुतचि ॥११॥
मागें कथिल्यापरी येई हिंवताप । गोड न लागे, अन्न साफ । सोडिलें, आणि घेती ते सुखरूप । पेजचि सारी त्या समयीं ॥१२॥
अनुष्ठान होतांक्षणीं । पेजेची भिक्षा करिती ते झणीं । ऐसें असतां एके दिनीं । चमत्कार एक जाहला ॥१३॥
श्रीस्वामी - परिज्ञानाश्रम यांची । पुण्यतिथि होती साची । म्हणोनि केशवाश्रम स्वामींची । आज्ञा झाली आचाऱ्यांतें ॥१४॥
की आज परमगुरूची पुण्यतिथी । म्हणोनि नका करूं पेज तुम्ही ती । स्वयंपाक वेगेंचि करा निश्चितीं । इतुकें मांगुनी गेले ते ॥१५॥
तेव्हां आचारी स्वयंपाक । करूं लागती लगबगें देख । पेज न करितां सकळिक । लागती आपुल्या कामासी ॥१६॥
यावरी शंकराश्रम सद्गुरुराज । अनुष्ठानादि सारुनी सहज । भिक्षा करावी आतां पेज । म्हणोनि आले पाकगृहीं ॥१७॥
नेहमीं भिक्षा करिती पेज । त्यापरी गेले सद्गुरुराज । स्वयंपाकी सोडुनी हातींचें काज । उभे राहती ते  पाहीं ॥१८॥
एकमेकां बघती सकल । म्हणती आपुल्या मानसीं ते वेळ । कासया आले आतां दयाळ । कांहीं न कळे हें आम्हां ॥१९॥
पेज घ्यावया आले कीं काय । नच केली म्हणोनि वाटलें भय । आतां करूं काय उपाय।  म्हणोनि घाबरले अंतरी ते ॥२०॥
तेव्हां बघती सद्गुरु भोंवती । पेज न दिसे चुलीवरती । मग आचाऱ्यांप्रति पुसती । झाली कीं सिद्ध पेज पहा ॥२१॥
सांगती मग आचारी तेव्हां । केली नाहीं पेज देवा । आमुच्यावरी क्षोभ न करावा । प्रभो गुरुराया दयाळा ॥२२॥
यावरी बोलती कृपाघन । न कराया काय कारण । तेव्हां बोलती आचारी ब्राह्मण । झालें वर्तमान तें सारें ॥२३॥
परमगुरूंची पुण्यतिथी आज । म्हणोनि छोटे सद्गुरु महाराज । यांनी आज्ञा केली नको पेज । स्वयंपाकचि वेगें करावा ॥२४॥
तेव्हां स्वामी सद्गुरुनाथ । बरें म्हणोनि शय्यागृहांत । जाउनी पहुडले स्वस्थ । विसांवा घ्याया त्या समयीं ॥२५॥
पहा कैसी श्रीगुरुमाय । किती शांत त्यांचे हृदय । अणुमात्र चित्तीं क्रोध न येय । जरी झाला अपराध थोर ॥२६॥
असो यावरी ऐका सज्जन । काय चमत्कार झाला तो पूर्ण । पाकशालेमाजीं जाण । सांगतों आतां भाविक हो ॥२७॥
पाक सिद्ध झाला झडकरी । वडे तळायाची केली तयारी । कढई ठेविली चुलीवरी । घातला विस्तव उत्कृष्ट ॥२८॥
तेल तापतां वडे सोडिती । परी ते तळासी जाउनी बैसती । कांहीं केल्या वरी न येती । जैसेचे तैसे राहती ते ॥२९॥
वडे नच तळूनि येती । हा प्रकार सकलही बघती । मानसीं बहुत विस्मय करिती । म्हणती काय हा चमत्कार ॥३०॥
नैवेद्यासी होय उशीर । काय करावें ऐसा विचार । करोनि गेले आचारी थोर । केशवाश्रम गुरूंकडे ॥३१॥
म्हणती स्वामिन् चमत्कार । होय एक महाथोर । ऐसें म्हणोनि सकल प्रकार । कथुनी प्रार्थिती त्या काळीं ॥३२॥
तेव्हां म्हणती केशवाश्रमस्वामी । विस्तव प्रज्वलित न केला तुम्हीं । येरू म्हणती नाहीं, आम्हीं । केला विस्तव थोर तो ॥३३॥
तापलें तेल कडकडीत । परी वडे तळूनि नाहींत येत । सकल बुडाशीं जाऊनि बैसत । काय कारण कळेना ॥३४॥
येरही जन तें पाहती । स्वामींप्रति येऊनि सांगती । नसे अपराध निश्चितीं । आचारी जनांचा कांहींही ॥३५॥
केला असे विस्तव अमित । काय हें न कळे परम अद्भुत । महास्वामी यांसी विदित । नाहीं कळत आम्हांसी ॥३६॥
तेव्हां छोटे स्वामी म्हणती । करा प्रार्थना श्रीगुरूंप्रति । सांगा वार्ता झाली जी ती । तेचि निवारण करतील ॥३७॥
त्यांचीच ही सर्व करणी । असती ते पहा परमज्ञानी । न कळे महिमा कवणालागुनी । आम्हां अज्ञ जनांप्रति ॥३८॥
पहा कैसी सद्गुरुभक्ति । केशवाश्रमस्वामींची ती । वाढवावया त्यांची कीर्ति । बळेंचि पाठविती त्या स्थानीं ॥३९॥
असुनी आपुल्यासी सकल विदित । दाविती न कळे आपुल्याप्रत । असो पुढें वर्णूं यांचे समस्त । सद्गुण सारे हो पाहीं ॥४०॥
मग जाती सकल सद्गुरुसंनिधीं । करिती प्रार्थना परमावधी । म्हणती काय चमत्कार सांगा आधीं । कृपा करोनि गुरुराया ॥४१॥
अहो देवा सद्गुरुराया । काय सांगूं आतां सदया । चुलीवरी कढई वडे कराया । ठेविली तेल घालोनि ॥४२॥
खालीं विस्तव पेटतो थोर । तेल उकळे अति भयंकर । वडे घातले त्यामाझार । परी तळाशीं बसती ते ॥४३॥
तळुनी वरी नच येती । केली आम्हीं बहुविध युक्ति । परी सकल निष्फल होय ती । कां हें ऐसें कळेना ॥४४॥
आतां देवा त्वांचि दयाळा । कृपा करावी, तरीच ये वेळां । कार्य होईल सफल, हें सकळां । आम्हां वाटतें खचितचि ॥४५॥
काय अपराध झाला आमुचा । कांहीं न कळे कवणाही साचा। आपुल्यावांचुनी आम्हां कैंचा । सद्गुरु येउनी उद्धरील ॥४६॥
आतां त्वांचि क्षमा करुनी । पार करावें आम्हांलागुनी । ऐसें म्हणोनि लागले चरणीं । भक्तजन ते सकलही ॥४७॥
यावरी बोलती ते हंसून । सांगतों ऐका आतां वचन । भवानीशंकर याची जाण । लीला सकल ही पहा ॥४८॥
जरी पेटविली आग बहुत । कढईखालीं तुम्हीं सतत । काय उपयोग होईल तेथ । व्यर्थ होईल सर्वही ॥४९॥
आमुच्या उदरामाजीं बहुत । महाभयंकर दाह होत । तेव्हां कैसी पोंचेल तेथ । वड्यांसी उष्णता सांगा हो ॥५०॥  
ऐकतां ऐसें सद्गुरुवचन । कळवळले सकलांचे अंतःकरण । काय त्याची कळली खूण । पेज न वाढिली यांसी पैं ॥५१॥
म्हणोनि ऐसा चमत्कार । झाला असे हा निर्धार । ऐसें चित्तीं जाणोनि सर्वत्र । गेले शरण गुरुचरणीं ॥५२॥
घातलें साष्टांग दंडवत । म्हणती देवा आपुल्याप्रत । पेज न दिधली ऐसा बहुत । अपराध आमुचा जाहला ॥५३॥
अज्ञपणे अपराध केला । क्षमा करावी त्वां आम्हांला । कवणा न कळे बा तव लीला । पाहिल्यावांचुनी कदापि ॥५४॥
ऐसें बोलुनी पुनरपि नमन । करुनी लगबगें जाती धांवून । पेज करवुनी वाढिती जाण । शंकराश्रम स्वामींसी ॥५५॥
करितां भिक्षा झाले तृप्त । उदरींचा अग्नि झाला शांत । इकडे वड्यांसी दाह लागुनी त्वरित । वडे तळूनि येती छान ॥५६॥
मग करोनि नैवेद्य देवाचा । घेतला प्रसाद जनांनीं साचा । अद्भुत चमत्कार हा स्वामींचा । पसरली वार्ता चोहोंकडे ॥५७॥
पहा कैसी साधूंची वृत्ति । जरी पेज न वाढिली आपुल्या प्रति । अणुमात्र मानसीं न वाटे खंती । बैसती एकांतीं जावोनि ॥५८॥
परी न चुके तयांसी भोग । क्षुधादि आणिक नाना रोग । याचें कारण उदरीं आग । आली, अशक्त म्हणोनि ॥५९॥
केवळ ब्रह्मज्ञानी म्हणोनि । केली आग सहन तयांनीं । परी हें न सोसे देवालागोनि । दाविला थोर चमत्कार ॥६०॥
अज्ञजनांसी कळावें म्हणोनि । कीं साधुसंत हे देवचि असूनि । तयांसी तृप्त न करितां मजलागोनि । करिती नैवेद्य हैं व्यर्थ ॥६१॥
ऐसें समजोनि भवानीशंकर । करिता झाला चमत्कार । परी केशवाश्रम - श्रीसद्गुरुवर । यांचा नाहीं अपराध ॥६२॥
येथें कुणीही करील प्रश्न । केशवाश्रम - गुरूंचा अपराध कां न । त्यांच्याचि आज्ञेवरूनि जाण । पेज नाहीं केली ती ॥६३॥
तरी ऐका याचें उत्तर । जनीं जैसा असे प्रचार । त्यापरी वागणें कर्तव्य थोर । जरी झाला ज्ञानी तो ॥६४॥
परिज्ञानाश्रम यांची पुण्यतिथि । ऐशा दिवशीं आधींच जेविती । म्हणोनि गुरूंची निंदा करिती । येती प्रसादासी जन बहुत ॥६५॥
यापरी त्यांनीं जें केलें कार्य । तें विचारेंचि खचित होय । पूर्ण ब्रह्मज्ञानी उभय । गुरु-शिष्य ते पाहीं ॥६६॥
गुरु म्हणिजे शंकराश्रम । शिष्य केशवाश्रम उत्तम । विख्यात असे त्यांचें नाम । त्या सद्गुरु-स्वामींचें ॥६७॥
असती केशवाश्रम ब्रह्मज्ञानी । सर्व विदित तयांलागुनी । म्हणोनि येथें तयांसी कोणीं । दोष न द्यावा सर्वथा ॥६८॥
सद्गुरुस्वामींची विमल कीर्ति । वाढवावी जगीं निश्र्चितीं । ऐसा हेतु धरोनि चित्तीं । इतुकें कार्य केलें त्यांनीं ॥६९॥
असो देव आणि सद्गुरुराय । एकचि असती ते उभय । अर्जुना सांगे श्रीकृष्ण सदय । कीं सद्गुरूसी भजतां मज पावे ॥७०॥
 तोचि सकलांसी सन्मार्गदायक । त्याहुनी त्राता नाहीं आणिक । तोचि निवारील भवभय दुःख । सत्य वचन हें पाहीं ॥७१॥
असो बहुत बोलणें तें वायां । हातींच्या कंकणा आरसा कासया । दाविला की सद्गुरूचि श्रेष्ठ म्हणोनियां । वरील कथेमाजीं पैं ॥७२॥
अद्यापिही त्यांची महिमा । असे कैसी ती सांगतों तुम्हां । समाधिसंनिधीं मल्लापुरग्रामा । नवस करिती तो ऐका ॥७३॥
कांहीं येतां आपत्काळ । पेज-नैवेद्य करविती ते वेळ । तेव्हां इच्छा होय सफल । अद्यापिही लोकांची ॥७४॥
आणिक कांहीं गोष्टी असती । सकलही त्या सांगूं पुढती । सद्गुरु जितुकी देईल स्फूर्ति । सांगूं तितुकें सविस्तर ॥७५॥
पुढील अध्यायीं कथा सुरस । सद्गुरु सांगती बोध जनांस । ऐकतां वृत्ति होईल खास । निजानंदीं निमग्नचि ॥७६॥
आणिक घेती समाधि सघन । सांगूं तेथील महिमान । बोलूं तेंही रसाळ वर्णन । असा सादर श्रोते हो ॥७७॥
आनंदाश्रम-सद्गुरु महेश । आणि  शिवानंदतीर्थ एकरूप खास । यांच्या कृपाप्रसादें षोडश । अध्याय गुरुदासें संपविला ॥७८॥
स्वस्ति श्रीचित्रापुर । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां अज्ञान निरसे समग्र । षोडशाध्याय रसाळ हा ॥७९॥
अध्याय १६ ॥
ओव्या ७९ ॥
ॐ तत्सत्-श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति षोडशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 19, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP