मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥१४॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥१४॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीपरिज्ञानाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय सद्गुरो महादेवा । भक्तवत्सला तूं करुणार्णवा । दावीं दयाळा ज्ञानदिवा । करीं उद्धार बाळाचा ॥१॥
विसरलों मी मजलागोन । कोण कैसा आलों कोठून । हेंही न कळे मजला जाण । दावीं तूंचि माउलिये ॥२॥
भवजलडोहीं बुडालों सारा । नाहीं माझ्या चित्ता थारा । तुजविण नाहीं आन आसरा । म्हणोनि करितों प्रार्थना ही ॥३॥
भजतां तुजला पाप - ताप । दैन्य सर्व जाउनी अमूप । ज्ञान होय परमस्वरूप । नसे संशय यामाजीं ॥४॥
तूं आतां वदवीं खास । तव गुणमहिमा दावूनि विशेष । पायीं रत हा तुझा दास । तरी उद्धरीं कृपाघना ॥५॥
असो आतां श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं केलें निरूपण । बोधुनी उद्धरिला लक्षुमण--। सारस्वत, कृपेनें ॥६॥
ऐसे सद्गुरु परम ज्ञानी । सद्गुणांचीच असे खाणी । वर्णन कराया मजकडुनी । शक्य नसे कल्पांतीं ॥७॥
परिमा आतां स्वामीराज । करितां कालक्रमण रोज । वृद्धापकाल होय सहज । क्रमेक्रमेण त्यांलागीं ॥८॥
तेव्हां करावया शिष्य - स्वीकार । करिती प्रार्थना जन समग्र । अवश्य म्हणोनि श्रीसद्गुरुवर । करिती बोध भक्तजनां ॥९॥
आतां श्रोते हो काय तो बोध । परिज्ञानाश्रमस्वामींचा शुद्ध । चित्त करोनि आपुलें सावध । परिसा भाविक सज्जन हो ॥१०॥
म्हणती स्वामी भक्तजनांसी । अवश्य करूं शिष्य त्वरेंसीं । कथितों विचार धरा मानसीं । करा त्यापरी आचरणा ॥११॥
आजवरी आपुली पाहुनी भक्ति । संतोष आला आमुच्या चित्तीं । सद्गुरु हाचि श्रेष्ठ जगतीं । तोचि देईल मोक्षासी ॥१२॥
तयावांचूनि नाहीं अन्य । त्याची आज्ञा करावी मान्य । तेव्हां तोचि हरील दैन्य । नाहीं अनुमान यामाजीं ॥१३॥
घालूनि तयावरी भार । करावा परमार्थविचार । तेव्हां सहजचि करील उद्धार । आपुल्या भक्तांचा तो पाहीं ॥१४॥
काया-वाचा-मनें-करोनि । भजावें त्या सद्गुरूलागूनि । धरावा विश्वास त्याच्या वचनीं । मग कैंचें भय त्याला ॥१५॥
गुरुभक्ति हीचि मुख्य सर्वांसी । तेणेंच होय समाधान मानसीं । निजात्मस्वरूप क्षणेंचि पावसी । बळकट गुरुभक्ति करितांचि ॥१६॥
ते जें सांगती साधन । बरवेंचि ऐसें समजोन । करावें कार्य न करितां अनुमान । तरी हें होय सफल हो ॥१७॥
जें करूं नका म्हणती । त्यावरी बलात्कारें करूं लागती । तरी तें बरवें न होय निश्चितीं । कार्य समूळ तें पाहीं ॥१८॥
सद्गुरु म्हणिजे नव्हे मनुष्य । साक्षात् देवचि म्हणावें त्यास । त्यांची वाणी होय ती खास । सत्यचि सारी सहजचि ॥१९॥
म्हणोनि त्यांच्या वदनांतून । निघती जे शब्द तेचि प्रमाण । यावरी तिळभरी नच करी भाषण । तरीच उत्तम कार्य होय ॥२०॥
प्रापंचिक अथवा पारमार्थिक । कवणही असो तें कार्य देख । शास्त्रीय अथवा लौकिक । करावें गुरुवाक्यापरी तें ॥२१॥
येथें कराल कुणीही प्रश्न । आमुचा प्रपंच सद्गुरूलागोन । पुसावा कीं तो आपण । सांगूं उत्तर आतां तें ॥२२॥
प्रपंचामाजीं महत् कार्य । तरी तें विचारितां दोष न होय । जैसें सांगती श्रीगुरुराय । तैसेंच करावें निजभावें ॥२३॥
घालुनी सद्गुरूवरी भार । आज्ञेपरी करितां समग्र । तोचि कृपाळू निरंतर । करी रक्षण तयांचें ॥२४॥
करितां व्यवहार नानापरी । घडती आपुल्या हातुनी कितीतरी । न कळतां अथवा कळोनि अंतरीं । बरीं वाईट कर्में पैं ॥२५॥
न कळतां जीं कर्में घडती । तें नाहीं आपुल्या हातीं । जीं बळेंचि समजोनि करिती । वाईट अथवा चांगुलीं ॥२६॥
त्यांत करावा विचार थोर । हें चांगुले किंवा वाईट अतितर । आपुल्या चित्तासी जरी वाटे बरोबर । तरीही पुसावें सद्गुरूसी ॥२७॥
जरी असे आपण चतुर । तरीही पुसावा गुरूसी विचार । यासी कासया सद्गुरुवर । ऐसी अहंता दवडावी ॥२८॥
सद्गुरूपाशीं व्हावें दीन । करावें प्रेमळ मृदु भाषण । जरी जाहला चतुर आपण । सद्गुरुसन्मुख अज्ञचि तो ॥२९॥
म्हणोनि करितां महत्कार्य । पुसावें गुरूसी करूं कीं काय । आज्ञा देतां श्रीगुरुमाय । तरीच करावें प्रेमानें ॥३०॥
समजा एक बरवेंचि कार्य । परी सद्गुरूलागीं तें मान्य न होय । तरी तें कधींही न करण्या निश्र्चय । धरावा निजमानसीं दृढतर तो ॥३१॥
जरी त्या कार्यापासुनी बहुत । होय नुकसान आपणाप्रत । तरीही नुल्लंघी आज्ञा तोचि खचित । खरा गुरुभक्त जाणिजे ॥३२॥
एवं गुरुआज्ञेवांचुनी श्रेष्ठ । नाहीं कैंचेंही भक्तांसी वरिष्ठ । म्हणे माझा सद्गुरु एक बलिष्ठ । त्यावीण नको मज अन्य ॥३३॥
सद्गुरु जें सांगती काम । तेंचि माझें विश्रांतिधाम । त्यांची आज्ञा तोचि परम । आनंद सुख मज पाहीं ॥३४॥
सद्गुरुवीण नसे आन । जगामाजीं समाधान । त्यावीण नसे दुजा कवण । विषय जगामाजीं पैं ॥३५॥
विषय पांच असती अवनीं । शब्द - स्पर्श - रूप आणि । रस-गंध नारे मिळोनि । पंचविषय हे पाहीं ॥३६॥
परी सद्गुरुमाउली - सन्मुख । काय तयांचा उल्लेख । जे जे विषय ते ते देख । तुच्छ सारे मजलागीं ॥३७॥
सद्गुरुस्वामी तोचि एक । सकळ विषयांचा सुखदायक । त्याहुनी नाहीं आणिक । सुख मजलागीं वेगळें ॥३८॥  
म्हणोनि देवा श्रीसद्गुरुनाथा । आपुली आज्ञा मान्य ती ताता । तुझिया वचनापरता । नाहीं अणुमात्र सुख तेथें ॥३९॥
ऐसें वाटावें आपुल्या चित्ता । आणिक वर्तावें तेसेंचि तत्त्वतां । मग तो कृपाळु आपुल्या भक्तां । सहजचि रक्षण करी प्रेमें ॥४०॥
यापरी करितां सकलां बोध । संतोषले परम भक्तवृंद । धरिले प्रेमानें सद्गुरुपाद । म्हणती धन्य धन्य प्रभो ॥४१॥
असो मग जन समस्त । गेले आपापुल्या गृहाप्रत । कांहीं प्रमुख जन देशांत । फिरती शिष्य निवडावया ॥४२॥
मठाच्या करारापरी एक । शुक्लभट्ट यांचा सुरेख । पुत्र वेंचोनि काढिला देख । शिष्य-स्वीकार करावया ॥४३॥
कुमठ्याचे ग्रामासन्मुख । 'मल्लापुर' या नामें खेडे एक । तेथील शुक्लभट्ट प्रमुख । त्याचा पुत्र सुलक्षणी ॥४४॥
असे परम उत्कृष्ट चतुर । अंगीं सद्गुण भरले अपार । ऐसें पाहुनी मागती नर । तया पुत्रालागीं पैं ॥४५॥
इतुक्यामाजीं स्वामी गुरुवर । गोकर्णा जावया येती सत्वर । परिवारासहित ग्रामांतर । कुंभापुरी त्या काळीं ॥४६॥
मग तेथुनी मल्लापुरासी । पाचारूनि नेती स्वामींसी । येथेंचि शिष्य-स्वीकार व्हावा ऐसी । प्रार्थना करिती तेधवां ॥४७॥
मग केला शिष्य स्वीकार । 'शंकराश्रम' अभिधान सुंदर । देउनी मग तोषले अपार । भक्तजन ते त्या समयीं ॥४८॥
नानापरी उत्सव थोर । करिती जन प्रेमपुरस्सर । दुमदुमलें 'मल्लापुर' - नगर । येती जन बहुतचि ॥४९॥
यापरी करोनि शिष्य - स्वीकार । घेउनी संगें श्रीसद्गुरुवर । येती शिराली - ग्रामाभीतर । परिवारासहित त्यावेळीं ॥५०॥
पुढें कांहीं दिवस लोटतां । परिज्ञानाश्रम आपुल्या पंथा । जावया निघाले सोडुनी ममता । निजदेहाची ती ऐका ॥५१॥
विकृत संवत्सर भाद्रपद । दिवस तो पाहीं एकादशी वद्य । सांगती बोलावुनी शंकराश्रमा, सिद्ध । परिज्ञानाश्रम त्यावेळीं ॥५२॥
देह हा असे अशाश्वत । न करावी यावरी खचित । प्रीति कदापि दिवसरात । करावें भजन श्रीहरीचें ॥५३॥
जरी झाला देह गुप्त । आत्मा येथेंचि राहे सतत । ना भीं तूं बा परमविख्यात । पावसी पद उत्तम तें ॥५४॥
करी जनांसी प्रेमें बोध । असती जन नानाविध । परी तूं न करी तयांसी भेद । पहा सर्वांसी शिशुपरी ॥५५॥
असो आतां येतों आम्ही । म्हणती जनांसी अहो तुम्हीं । सांगितला विचार अंतर्यामीं । धरा निरंतर तो पाहीं ॥५६॥
आणिक बोंनि तैसेंचि । राहतां तरीच सार्थकता त्याची । नातरी कासया तनु साची । पुष्ट करोनि ठेवाया ॥५७॥
ऐसें न करितां आपण । करावें जितुकें होईल साधन । याचे पुढें विवरण । सांगतील श्रीशंकराश्रम ॥५८॥
इतुकें बोलुनी परिज्ञानाश्रम-तात । झाले तेव्हां समाधिस्थ । आले धांवुनी जन समस्त । जेथील तेथील ऐकोनि ॥५९॥
जाहला सकलां अपार शोक । परी शंकराश्रम पाहुनी सन्मुख । तेचि हे म्हणोनि विवेक । धरिला चित्तीं जनांनीं ॥६०॥
मग सकल मिळोनि भक्त । देती समाधि स्वामींसी तेथ । मुख्य समाधि असे जेथ । दक्षिणभागीं दिधली पैं ॥६१॥
आणि करुनी पुढील कर्में । परम थोर उत्सव प्रेमें । करिती सज्जन भक्त निष्कामें । विधिपूर्वक त्या समयीं ॥६२॥
करिती यावरी आणिक काय । शंकराश्रम श्रीगुरुवर्य । यांसी गादीवरी बैसवी समुदाय । सर्वही मिळोनि त्यासमयीं ॥६३॥
सद्गुरुवीण व्यर्थचि जन्म । जगोनि करावें कोणतें काम । तोचि शिकवी उत्तम धर्म । आणिक ज्ञान तें पाहीं ॥६४॥
आधीं लाविती निजधर्मासी । मग हळू हळू नेती कैसी । युक्ति सांगुनी परमार्थासी । दाविती मार्ग स्वरूपाचा ॥६५॥
म्हणोनि करावा त्यांचा संग । तेव्हां होईल सहजचि त्याग । विषयसुखाचा दवडी भोग । प्रेममदानें निश्चयेंसीं ॥६६॥
जोंवरी न लाभे सद्गुरुप्रेम । तोंवरी धरी विषयकाम । जें जें दिसतें तें हें 'मम' । वाटे आपुल्यासी खचित पैं ॥६७॥
सद्गुरुप्रेम काय असत । कैसें तें सांगण्या नाहीं येत । तया गांवीं जो कोण जात । तोचि जाणे ते पाहीं ॥६८॥
सद्गुरुप्रेम ऐसे शब्द । वाचेनें म्हणतां न होय मोद । भोगितांचि परमानंद । प्राप्त होय त्यापासुनी ॥६९॥
साखरेची कैसी गोडी । वाचेनें बोलतां न कळे घडीघडी । जरी लाविली जिव्हेसी थोडी । तरीच ती कळतसे हो ॥७०॥
तैसें येथे म्हणतां वाचे । अथवा भजन करोनि नाचे । तरी त्यासी गुरुप्रेम कैंचें । प्राप्त होईल तें बापा ॥७१॥
ज्यासी गुरुचरणांची आवडी । त्यासीच कळे प्रेमाची गोडी । अनुभवेंचि पहावें घडीघडी । चित्तीं विचार करोनियां ॥७२॥
केलें बहुत वेद - पठण । अथवा देतां नाना प्रवचन । सद्गुरुप्रेमाइतुकी गोडी जाण । न ये त्यामाजीं खचितचि ॥७३॥
जपतप ऐसें नाना कर्म । उपासनादि केला नेम । गुरुप्रेमाइतुकी गोडी परम । न ये त्यामाजीं खचितचि ॥७४॥
गायत्रीजपादि पुरश्चरण । अथवा केलें होमहवन । गुरुप्रेमाइतुकी गोडी जाण । न ये त्यामाजीं खचितचि ॥७५॥
कीर्तन - भजन - नामस्मरण । केलें नानाग्रंथ-लेखन । गुरुप्रेमाइतुकी गोडी जाण । न ये त्यामाजीं खचितचि ॥७६॥
एवं सद्गुरुप्रेमाची गोडी । कवणही न ये त्याच्या जोडी । ज्यासी अनुभव त्यासीच आवडी । अन्यासी न कळे गोडी ती ॥७७॥
मी कथितों म्हणोनि मजला । गुरुप्रेमा कैसा हा नाहीं कळला । बहुत सुकृत पाहिजे त्याला । सद्गुरुप्रेम ठसावया ॥७८॥
ज्यासी असे खरें प्रेम । त्यासी सुखदुःख सर्वही सम । कैसें सांगूं त्याचें वर्म । देउनी चित्त परिसा हो ॥७९॥
एक सद्गुरुप्रेमावांचूनि । अन्य विषय गुरुभक्तालागोनि । नको कांहीं ऐसें म्हणोनि । न बाधे त्यासी सुखदुःख ॥८०॥
अमुक एक विषय आवडे । म्हणूनिच येई सुखदुःख बापुडें । जरी तो आन्हां न सांपडे । होय दुःख त्यावेळीं ॥८१॥
जरी मिळे तो विषय वेगीं । तरी सुख उपजे त्यालागीं । म्हणोनि द्वैत विषय हेचि जगीं । सुखदुःखांसी कारण पैं ॥८२॥
म्हणोनि ज्यासी सद्गुरु हाचि । एकचि विषय आवडे, त्याची । वृत्ति न वचे अन्य विषयीं साची । मग कैसें सुख-दुःख बाधे तया ॥८३॥
पंचज्ञानेंद्रियांच्या द्वारें । पांच विषय भोगी सारे । परी हे विषय गुरुभक्त विसरे । सद्गुरुप्रेमाच्या सन्मुख पैं ॥८४॥
म्हणोनि गुरुप्रेम धरावें बळकट । तोचि निवारी आपुलें संकट । त्यापुढें सर्व विषयांचा थाट । कसपटासमान समजावा ॥८५॥
बहुत काय सांगावें आतां । निशिदिनीं धरावे गुरुचरण तत्त्वतां । तोचि होय सकलां त्राता । म्हणोनि न विसंबें त्यालागीं ॥८६॥
एवं सद्गुरुप्रेमाची गोडी । जरी नसे आम्हां त्याची आवडी । बळेंचि आणुनी घ्यावी तांतडी । अति प्रयतेंकरोनियां ॥८७॥
जेव्हां येईल आपुल्या मानसीं । तेव्हांचि करीं त्याच दिवशीं । उदयीक म्हणोनि जरी तूं वससी । तरी नसे देहाचा भरंवसा ॥८८॥
इतुकेंचि नव्हे, मन हें आपुलें । हेंही क्षणेंचि होय वेगळें । आतां असे जी इच्छा ये वेळे । क्षणेंचि बदले ती पाहीं ॥८९॥
म्हणोनि जेव्हां येईल सद्वासना । तेव्हांचि तें करावें काम जाणा । उदयीक म्हणोनि ठेवितां नाना । येती विघ्नें तयासी ॥९०॥
यापरी जेव्हां येईल स्वमना । शरण जावें ऐसें सद्गुरुचरणां । तत्काळ जावोनि त्या कृपाघना । जावें शरण प्रेमानें ॥९१॥
जरी असती दूर देशीं । तरीही जावें इच्छेसरशीं । उशीर न करावा येविषीं । खचितचि जाण निर्धारें ॥९२॥
ऐसें करितां रोज । येईल योग कांहीं दिनीं सहज । भेट देईल सद्गुरुराज । करील उद्धार प्रेमानें ॥९३॥
असो आतां परिज्ञानाश्रमस्वामी । स्वामी यांचा तृतीय आश्रम । यांनीं करोनि जनांसी निष्काम । दाविला मार्ग मोक्षाचा ॥९४॥
यापरी करोनि प्रेमानें यांनीं । शके सोळाशें एकोण्यांशींपासुनी । ब्याण्णवपर्यंत जगीं राहोनी । स्वधर्मराज्य चालविलें ॥९५॥
असो आतां पुढील अध्यायीं । चतुर्थ आश्रम शंकराश्रम गुरुमाई । चालवील स्वधर्मराज्य सर्वही । सारस्वतवृंदाचें ॥९६॥
त्यांची कथा परम प्रेमळ । महिमा अगाध अति रसाळ । ऐकतां चित्त होय निर्मळ । महापातकी यांचेंही ॥९७॥
आनंदाश्रमपरमहंस । शिवानंदतीर्थ एकचि खास । यांचे कृपाप्रसादें चतुर्दश । अध्याय गुरुदासें संपविला ॥९८॥
स्वस्ति श्रीचित्रापुर । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां मोह निरसे समग्र । चतुर्दशाध्याय रसाळ हा ॥९९॥
अध्याय १४ ॥
ओंव्या ९९ ॥ॐ॥
तत्सत्- श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥   
॥ इति चतुर्दशोऽध्यायः समाप्तः॥

N/A

References : N/A
Last Updated : January 19, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP