मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥६॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥६॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीपरिज्ञानाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥
ॐ जय जय सद्गुरो देवा सदया । करुणाकरा निजबाळासी या । पार घालीं कृपा करोनियां । भवसागरांतूनि पैं ॥१॥
तूंचि करविसी कार्य समस्त । ऐसा धरोनि चित्तीं भावार्थ । पुढें सरसावलों स्मरुनी तुजप्रत । तूंचि सफल करीं हें आतां ॥२॥
मातेवीण बालका आधार । कोणी नाहीं पृथ्वीवर । तैसा तूं मज सद्गुरु सुखकर । आधार सर्वांसी अससी पैं ॥३॥
आधार म्हणिजे अधिष्ठान । अससी तूंचि सकलां जाण । मग कैसा राहूं भिन्न । तुजहुनी देवा दयाळा ॥४॥
समुद्र लाटेसी होय अधिष्ठान । तेव्हां लाट कैसी होईल भिन्न । अलंकार सुवर्णाहून । न राहे वेगळा कदापि ॥५॥
तैसा देवा तुजवांचोन । नच मी कधींही राहें भिन्न । परी ना समजे मजलागोन । तूंचि दयाळा शिकवीं बा ॥६॥
असो आतां ऐका सज्जन । मागील अध्यायीं नगरासी जाण । धाडिलें पत्र सारस्वतांलागून । गोकर्णाहुनी प्रमुख जनीं ॥७॥
बघतां पत्र तेथील लोक । भक्तवृंद सारे प्रमुख । गोकर्णग्रामीं धांवुनी देख । आले लगबगें त्या ठायीं ॥८॥
भेट घेउनी सद्गुरु-स्वामींची । करिती प्रार्थना चरणीं साची । म्हणती दयाळा रहावें येथेंचि । म्हणोनि घातलें लोटांगण ॥९॥
आम्हां बालकां सोडुनी येथ । न जावें ऐसें प्रार्थितों तुजप्रत । कांहीं अपराध जरी होत । तरी करावी क्षमाचि बा ॥१०॥
जावया निघालां ऐसी वार्ता । ऐकुनी आलों चरणीं ताता । कृपा करोनि त्वां बा आतां । रहावें येथेंचि कृपानिधे ॥११॥
ऐकुनी सकल जनांची प्रार्थना । तोषला चित्तीं सद्गुरुराणा । आणि म्हणती न करा अनुमाना । निर्भय मानसीं असा हो ॥१२॥
तुमच्या भक्तीच्या दोरीनें आम्हांस । बांधिलें तें न सुटे खास । नका होऊं तुम्हीं उदास । राहूं आम्ही येथेंचि ॥१३॥
मातेसी न लगे सांगणें येथ । कीं बालकाचें रक्षण करीं तूं सतत । तैसें आपुल्या निजभक्तांप्रत । स्वयें गुरुनाथ सांभाळी ॥१४॥
जैसें भक्तांसी सद्गुरुप्रेम । तैसेचि निजभक्त सद्गुरूसी परम । प्रियकर असती ऐसा नेम । असे सहजचि निर्धारें ॥१५॥
निजभक्तांच्या प्रेमासाठीं । अवतार धरितो जगजेठी । मग आम्ही कैसे जाऊं उठाउठीं । सांगा पाहूं आतां पैं ॥१६॥
तुमच्याकरितांचि आमुचा अवतार । तेव्हां जाऊं कुठें भूवर । परी पाहिला निर्धार । भक्तजनांचा आम्हीं पैं ॥१७॥
आतां तुम्ही सुखानें शांत । रहा धरोनि नाम सतत । हृदयीं आठवा प्रभुवर समर्थ । भवानीशंकर तो पाहीं ॥१८॥
जें जें दिसतें तें तें सर्व । पहा सारा एकचि देव । ऐसा धरितां दृढभाव । पार करील तोचि पैं ॥१९॥
हातानें जें करितां काम । तें असावें शुद्ध उत्तम । तरी ती सेवा होय सुगम । परमेश्वराची पाहीं पां ॥२०॥
सर्वांठायीं भगवद्भाव । धरोनि करावा व्यवहार सर्व । तेव्हां होईल संतुष्ट देव । नसे संशय यामाजीं ॥२१॥
होतां संतुष्ट परमेश्वर । सहजचि होईल उद्धार । म्हणोनि धरा निरंतर । ध्यान त्या गुरुदेवाचें ॥२२॥
करितां ध्यान वारंवार । सारें जगचि दिसेल साचार । कीं भगवद्रूप खचितचि, निर्धार । धरा चित्तीं निजप्रेमें ॥२३॥
ऐसें तेव्हां ऐकतां वचन । श्रीसद्गुरूचें प्रेमळ भाषण । गुंगुनी गेले सकल सज्जन । प्रेमळ भक्त त्यावेळीं ॥२४॥
यावरी करोनि नमस्कार । निरोप घेऊनि सत्वर । गृहासी परतले नगराचे नर । धरोनि मानसीं गुरुमूर्ति ॥२५॥
यावरी करोनि सर्वीं विचार । सद्गुरु - आज्ञा घेउनी सत्वर । मठ बांधावया उत्तम सुंदर । केली सिद्धता त्या समयीं ॥२६॥
मग गेले नगरासी । संस्थानांतुनी बहुवसी । लांकुडें मठ बांधावयासी । राजाज्ञेनें मिळालीं ॥२७॥
मग बांधोनि सत्वर सुरेख । मठ तयार केला देख । आणि सद्गुरुस्वामींसन्मुख । प्रार्थना केली ती ऐका ॥२८॥
भवानीशंकर-देवासमवेत । येथेंचि राहावें आपण सतत । अवश्य म्हणुनी सद्गुरुनाथ । राहिले अत्यंत प्रेमानें ॥२९॥
मग करिती तेथें भक्त । गुरुमुखें श्रवण परमार्थ । ऐसें असतां सुखानें शांत । गेलीं कांहीं वरुषें तीं ॥३०॥
एके दिनीं भक्त मिळोनि । प्रार्थिती संनिधीं येवोनि । शिष्यस्वीकार करावा झणीं । कृपा करोनि आम्हांवरी ॥३१॥
पुढें गुरुपरंपरा अनुदिनीं । चालावी शाश्वत ऐसीच धरणीं । जरी आज्ञा द्याल कृपा करोनी । तरी आम्ही प्रयत्न करूं ॥३२॥
पाहुनी जनांचें भक्तिप्रेम । आनंदलें स्वामींचें हृदय परम । म्हणती शिष्यस्वीकार करूं, प्रेम । धरा त्या ठायीं मीचि असें ॥३३॥
ऐकुनी तेव्हां आनंदले चित्तीं । भक्तजन ते कार्या लागती । कोणता शिष्य करावा निश्चितीं । ऐसा श्री विचार चालविला ॥३४॥
तेव्हां एक हरिटेकार । यांचा वंशज परम पवित्र । कृष्णय्या शं गु कुलकर्णी यांचा पुत्र । मर्तु याजला निवडिला ॥३५॥
अंगीं असती बहुत सद्गुण । क्षमा शांति वसे पूर्ण । आणि भक्तिप्रेम बहुत जाण । ऐसा पुत्र तो देखा ॥३६॥
म्हणूनि तोचि शिष्य पटासी । योग्य ऐसें वाटुनी सर्वांसी । विचारिते झाले कृष्णय्यासी । काय तें आतां अवधारा ॥३७॥
म्हणती तेव्हां दहा लोक । कृष्णय्या तुमचा पुत्र देख । शिष्यपटासी योग्य सुरेख । म्हणोनि आलों मागावया ॥३८॥
यावरी बोले कृष्णय्या कुलकर्णी । ‘‘एकुलता एक पुत्र सुलक्षणी । तस्मात् द्यावया अंतःकरणीं । खेद वाटतो बहुतचि ॥३९॥
म्हणोनि मागतों संनिधीपाशीं । क्षमा करावी मजला ऐसी । प्रार्थना करितों निजभावेंसीं" । ऐकतां खिन्न झाले जन ॥४०॥
मग बोलती एकमेकांजवळी । करावें काय आम्हीं या वेळीं । ऐसें सुपात्र कोणत्या स्थळीं । मिळेल कैसें कळेना ॥४१॥
यावरी सकलांनीं करोनि विचार । नगर-संस्थानीं जनांसी सविस्तर । कळविली वार्ता लिहोनि पत्र । धाडिलें झडकरी त्या समयीं ॥४२॥
बघतां पत्र नगरींच्या सुजनीं । उत्तर दिधलें गोकर्णालागुनी । दहा जणांसी न लागतां क्षणीं । युक्तिपूर्वक तेव्हां पैं ॥४३॥
" कृष्णय्यासी घालावी समजूत । कीं तुम्ही देतां आपुला सुत । मठाचें आधिपत्य तुमच्याप्रत । देऊं सर्व आम्ही हो ॥४४॥
आणिक यापुढें तुमचाचि वंशज । शिष्य निवडुनी आणूं सहज । ऐसें सांगतां तरीच काज । होईल सारें निश्चयें" ॥४५॥
ऐसें पत्र पोंचतां गोकर्णीं । विचारण्या कृष्णय्यालागुनी । गेले सकलही धांवोनी । अति उल्हासें लगबगें ॥४६॥
भेटूनियां कृष्णय्यासी । म्हणती सकलही सांगतों तुम्हांसी । जरी मान्य होईल तुम्हांसी । तरी अंगीकार करा हो ॥४७॥
तुमच्या पुत्राऐसा सगुणी । धुंडितां मिळेना साऱ्या स्वजनीं । आतां द्यावा तोचि म्हणोनि । सांगतों गोष्ट ऐका ती ॥४८॥
आधिपत्य देऊं मठाचें सकल । तुम्हांसीच खचितचि ये वेळ । पुढेंही तुमचाचि वंशज निर्मल । निवडूं शिष्यपट द्यावयासी ॥४९॥
यावरी म्हणे कृष्णय्या जनांसी । ऐसीच इच्छा जरी तुमच्या मानसीं । देऊं पुत्र, सर्व कबूल मजसी । ऐकुनी आनंदले सकलही ॥५०॥
तेव्हां धाडिती पत्र नगराप्रती । आपुले जन जेथें असती । मग ते सकल गोकर्णा येती । अति आनंदें परियेसा ॥५१॥
तेव्हां करोनि करारपत्र । लिहिला विचार केला जो समग्र । त्याहुनी आणिक एक साचार । लिहिलें काय तें सांगूं पैं ॥५२॥
जरी कृष्णय्या यांच्या वंशजीं । न मिळे योग्यसा मुलगा सहजीं । तरी त्यांनींच दुज्या वंशामाजीं । शोधूनि दिला तोचि शिष्य करूं ॥५३॥
ऐसें एक करारपत्र । करुनी दिधलें कृष्णय्यासी शीघ्र । दहा जणांनीं तेव्हां समग्र । केली सिद्धता त्या समयीं ॥५४॥
मग पाचारुनी कृष्णय्या-सुतासी । 'मर्तू' या नामें बाहती ज्यासी । मिरवुनी नेला निजमठासी । मोठ्या थाटें त्या समयीं ॥५५॥
नंतर तयांनीं विधिपूर्वक । केलीं कर्में सकलही देख । विरजा - होमादि करुनी चोख । संपादिलें कार्य सर्वही ॥५६॥
सोळाशें बेचाळ शकामाझारीं । शार्वरी संवत्सर शनिवारीं । चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या अवसरीं । केला उपदेश गुरुनाथें ॥५७॥
एवं झाला शिष्य-स्वीकार । अभिधान देउनी 'शंकराश्रम' सुंदर । करिती सकलही महाथोर । उत्सव परम उत्कृष्ट तो ॥५८॥
स्वर्गींचे सुरवर सुमनवृष्टि । करिती गुप्तपणें आणि म्हणती । धन्य ते नर राहती जगतीं । सद्गुरुसंगें प्रेमानें जे ॥५९॥
यापरी समारंभ गोकर्णग्रामीं । जाहला मठामाजीं नामी । द्वितीय सद्गुरु शंकराश्रमस्वामी । साक्षात् अवतार विष्णूचा ॥६०॥
असो तेव्हां सकल मिळोनि । कृष्णय्यासी म्हणती आजिपासोनि । तुम्हां आणि संततीलागूनि । 'शुक्ल' भटजी हें नाम असो ॥६१॥
जैसा वाढे शुक्लपक्षींचा चंद्र । तैसा वाढो तव वंशसमुद्र । ऐसा आशीर्वाद सद्गुरुयतींद्र । देती तुम्हां निजमानसीं ॥६२॥
म्हणोनि 'शुक्लभट्ट' किताब तुजला । वंशपरंपरा असे पहा, दिधला । उपकार मोठा आम्हांवरी झाला । तुझा, कृष्णय्या धन्य तुझी ॥६३॥
ऐसें म्हणुनी कृष्णय्यासी । वचनापरी 'मणेगार' नेमला त्यासी । अर्थात् मठाचे आधिपत्य -कामासी । नेमिला सकल जनांनीं त्या ॥६४॥
मग गेले सकल  लोक । मनीं धरोनि सद्गुरु-विवेक । आपापुल्या ग्रामीं अनेक । नगरसंस्थाना परतूनि ॥६५॥
असो ऐसा हा कृष्णय्या कुलकर्णी । यांच्या पुण्य-संततीपासोनी । तीन शाखा पहा होवोनी । नांदती अद्यापि अवनीं या ॥६६॥
मंगलूर-शिराली-मल्लापूर- । ग्रामीं अद्यापिही नांदती थोर । 'शुक्लभट्ट' या नामें साचार । असो नमन तयांसी ॥६७॥
स्वामींचा जन्म ज्यांच्या वंशीं । तो वंशचि असे पुण्यराशी । काय वर्णावें ऐशा वंशासी । सद्गुरु जन्मले ज्यामाजीं ॥६८॥
विपुल पुण्य पाहिजे जाण । व्हावया ऐशा सद्गुरूचें दरुशन । म्हणोनि जेव्हां भेटे तो दयाघन । तत्काळ शरण जावें तया ६९॥
तोचि दावी खरा मार्ग । दिसे हें जें तें मिथ्या जग । आणिक येथील सर्वही भोग । असती मिथ्या ते जाणा ॥७०॥
ऐसा विचार न येई आम्हांसी । म्हणोनीच जावें सद्गुरूपाशीं । त्यांचे विचार घेउनी मानसीं । धरावे दृढतर ते पाहीं ॥७१॥
जातां त्यासी अनन्य शरण । तोचि उद्धरी आम्हांलागुन । परी करावा परम प्रयत्न । आपणचि जाणा तो पाहीं ॥७२॥
जरी न घेतला गुरु-उपदेश । गुरु न करी साधन- अभ्यास । आपणचि करावा प्रयत्न विशेष । फलदाता असे सद्गुरु तो ॥७३॥
बीज पेरितांचि झाड नुगवे । तयासी प्रयत्न बहुविध करावे । तरीच उगवोनि वाढे स्वभावें । फल लाभेल त्यानंतरीं ॥७४॥
घालुनी खत पाणी सर्व । आपणचि कष्ट करावे सदैव । तरीच फल देईल तो देव । नातरी काय करील तो ॥७५॥
तैसें येथे श्रीगुरुराव । देईल पहा ज्ञान अपूर्व । परी करावा प्रयत्न सर्व । साधन-अभ्यासेंकरोनि ॥७६॥
एवं सद्गुरु-देव एक । परम श्रेष्ठ असे व्यापक । स्वरूप त्याचें न वर्णवे देख । कवणाचेनि निधारें ॥७७॥
पुढील अध्यायीं शंकराश्रमस्वामींचें । सद्गुणवर्णन करूं साचें । आणि परिज्ञानाश्रमगुरूंचें । होय गमन निजधामा ॥७८॥
ऐशा सद्गुरुमाउलीप्रतिं । आठवितां लाभ ज्ञानविरक्ति । तेणें होय सहज प्राप्ति । निजस्वरूपाची तात्काळ ॥७९॥
आनंदाश्रम-सद्गुरु श्रेष्ठ । शिवानंदतीर्थ ब्रह्मनिष्ठ । एकचि यांच्या प्रसादें षष्ठ । अध्याय गुरुदासें संपविला ॥८०॥
स्वस्ति श्रीचित्रापुरः । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां येत सद्विचार । षष्ठाध्याय रसाळ हा ॥८१॥
अध्याय ॥६॥
ओंव्या ॥८१॥
ॐ तत्सत्- श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥    ॥छ॥    ॥छ॥
॥ इति षष्ठोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 19, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP