चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥१७॥
सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीशंकराश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ ॥ॐ॥
जय जय नमो सद्गुरुराया । निरसीं देवा मोहमाया । आणिक आतां तव पदीं बा या । दासालागीं दे थारा ॥१॥
काय लिहावें न कळे चित्ता । तूंचि देवा स्फुरवीं ताता । आणिक कवणा सांगूं आतां । तुजवांचोनि दयाळा ॥२॥
तव कृपेवीण न होय सर्वथा । कैंचेंही कार्य निश्चयें ताता । म्हणोनि दयाळा तूंचि आतां । पार घालीं मजलागीं ॥३॥
तुज काय अवघड बापा । न लगे उपमा तव स्वरूपा । आठवूं जातां कल्पनेच्या खेपा । सहजचि चुकती भक्तांच्या ॥४॥
ऐसें तुझें स्वरूप अपूर्व । बघतां अभक्तही ठेवी भाव । अगाध महिमा पाहुनी सर्व । धांवती तुझ्या संनिधानीं ॥५॥
असो आतां ऐका हो सज्जन । तुम्ही श्रोते सावधान । शंकराश्रम यांचें महिमान । आणिक बोलूं रसाळ तें ॥६॥
मागील अध्यायीं कथा सुंदर । निरूपिली श्रीशंकराश्रम गुरुवर । यांसी पेज न बाढितां थोर । चमत्कार सकलां दावियला ॥७॥
यावरी सकलां झाला ताप । कळवळोनि करिती विलाप । सायंकाळीं जाऊनि समीप । सद्गुरूलागीं प्रार्थिती ॥८॥
अहा देवा सद्गुरुराया । बहुत शिणविलें तुजला सदया । परी त्वां साहुनी कैसें हृदया । ठेविलें शांत त्या समयीं ॥९॥
आधींच ज्वर न रुचे अन्न । आणिक होसी महाक्षीण । ऐशा वेळीं आम्हीं पेज न । करविली, थोर अपराध हा ॥१०॥
तूंचि असतां श्रेष्ठ देव । तुजला प्रसाद कवणाचा अपूर्व । धरोनि आम्हीं मूर्ख भाव । उगीच शिणविलें तुजलागीं ॥११॥
तुज नाहीं द्वंद्वभेद । मग कैंचे विधि - निषेध । आम्हीं मूर्खीं धरोनि छंद । उगीच शिणविलें तुजलागीं ॥१२॥
सर्व अपराध घालोनि पोटीं । आमुच्यावरी करोनि कृपादृष्टी । द्यावी आम्हांसी ज्ञानदृष्टी । तूंचि तारक सर्वांसी ॥१३॥
यावरी बोलती सद्गुरुस्वामी । नका करूं खेद हो तुम्ही । नाहीं शिणविलें मजला हें मी । सांगतों असत्य न पाहीं ॥१४॥
ज्या ज्या वेळीं जो जो भोग । तो तो येई आपैसा चांग । यांत कवणाचा दोष तो मग । प्रारब्धचि ते जाणा हो ॥१५॥
तुमची भक्ति असे अपार । बघुनी चित्त आमुचें फार । संतुष्ट झालें हो साचार । नाहीं भय तुम्हांसी ॥१६॥
आतां आमुचे थोडे दिवस । राहिले असती सांगतों खास । द्यावें येथें तुम्हीं लक्ष । सारे विषय टाकोनि ॥१७॥
सद्गुरूसी द्यावें काय । तरी तयांसी असे जें प्रिय । तेंचि देतां संतोष होय । अन्य न मागती ते कांहीं ॥१८॥
संतांची इच्छा जनकल्याण । आणिक नको तयांलागून । देहरक्षणार्थ करिती भोजन । तेवींच इतर भोग तयांसी ॥१९॥
परी नसे त्याची चिंता । न धरिती ते अणुही स्वार्था । दिवसरातीं ते परमार्था । झिजविती देह आपुला हो ॥२०॥
तोचि प्रिय तयांलागीं । आणिक कांहीं न मागती जगीं । हेंचि करा तुम्ही संवेगीं । तरीच संतोष आम्हांसी ॥२१॥
न लागे धन आणि दौलत । काय कराया ती आम्हांप्रत । जरी घालाल आपुलें चित्त । परमार्थीं तें प्रिय आम्हां ॥२२॥
यावरी बोले एक भक्त । कैसें परमार्थीं घालावें चित्त । विषयामाजींच जाय सतत । न जाय तें परमार्थीं ॥२३॥
विषयचि गोड वाटती मजला । क्षणैक न शिवे माझ्या चित्ताला । परमार्थ - विचार, म्हणोनि त्याला । काय दयाळा करावें ॥२४॥
तेव्हां बोले सद्गुरुनाथ । तुवां प्रश्न केला यथार्थ । जें आम्हांसी प्रिय अत्यंत । तेंचि पुसिलें तूं बापा ॥२५॥
जो कां तुवां केला प्रश्न । परमार्थीं कैसें घालावें मन । देतों उत्तर तुजलागोन । चित्त देऊन अवधारीं ॥२६॥
विषयचि गोड वाटे मनासी । तेव्हां परमार्थ न घडे मजसी । ऐसें जरी तूं म्हणसी । तरी सांगतों तुजलागीं ॥२७॥
मन हें नसे आपुल्या स्वाधीन । न ऐके परांचेंही वचन । तेवीं असे चंचल पूर्ण । म्हणोनि धांवे जेथें तेथें ॥२८॥
तरी तयासी करावें काय । सांगतों तुजला एक उपाय । तैसें करितां मग तें जाय । परमार्थामाजीं सहजचि ॥२९॥
नलगे त्यासी करावें बंधन । जाऊं दे त्यासी विषयीं जाण । परी त्याचें करावें रक्षण । विवेकेंचि तें साध्य पैं ॥३०॥
यावरी सांगूं दृष्टांतसहित । न ऐकें सावध करोनि चित्त । सांगितल्यापरीच करितां त्वरित । लाभे परमार्थ सहजचि ॥३१॥
पहा असे एक बाळ लहान । तें न धरी एकचि ठिकाण । जिकडे तिकडे जाय धांवोन । जें जें का देखे तें उचली ॥३२॥
बरवें वाईट कुठें कांहीं । देखतांक्षणीं उचली पाहीं । अग्नीचे निखारेही घेई । अज्ञ बालक जाण तें ॥३३॥
भाजतां रडे आक्रंदोन । क्षण न लागतां विसरे जाण । पुनरपि जाय दुडदुडां धांवोन । रांगत रांगत तेथेंचि ॥३४॥
यापरी तें अज्ञ बाळ । अज्ञपणेंचि करी हळहळ । म्हणोनि त्याची माय ते वेळ । काय करी तें ऐकावें ॥३५॥
बहुत जपोनि करी पालन । जेथें जाय तें तेथें आपण । जाउनी सोडवी धोक्यापासून । तया बालका ती पाहीं ॥३६॥
एक काढितां घेई एक । इकडुनि तिकडे धांवे बालक । जें जें दिसे त्यासी सन्मुख । तें तें काढी त्वरेनें ॥३७॥
जरी तें कांहीं भलतेंच घेई । तरी माता करूनियां घाई । येर कांहींतरी घेऊनि जाई । आधीं हातीं द्यावयासी ॥३८॥
कीं तें बालक आपुल्या हातींची । वस्तु द्यावया रडेल बहुतचि । ऐसें जाणुनी देई त्या साची । अन्य कांहीं खेळावया ॥३९॥
म्हणे घेईं चेंडू तुजला । ऐसें म्हणूनि दावी त्याजला । तैं बालक धांवे बघुनी डोळां । हातांतील वस्तू टाकोनि ॥४०॥
त्यासी न देतां अन्य खेळाया । जरी घेईल हातांतील त्याचिया । तरी तें बालक रडोनियां । करील आकांत बहुतचि ॥४१॥
जरी मागाहूनि दिधलीं अनेक । खेळणीं खेळाया त्यासी देख । परी तिकडे न ढुंके बालक । तेंचि पाहिजे म्हणतसे ॥४२॥
म्हणोनि आधींच त्या दुजा खेळ । दावितां पूर्वीचा टाकी बाळ । न करितां कांहीं तळमळ । शांत चित्तें तें पाहीं ॥४३॥
तैसे येथें आपुलें मन । बालकापरी असे अज्ञ । जिकडे तिकडे धांवे जाण । विषयांमाजीं तें पाहीं ॥४४॥
चांगलें वाईट न बघे कांहीं । जो जो देखे तो तो घेई । त्यामुळें भोगी दुःख पाहीं । विषयासक्त होऊनियां ॥४५॥
जैसें बालक घेई निखारे । तैसें मन हें अज्ञ बिचारें । दुर्व्यसनीं जाउनी पड़े बा रे । आणि रडे बुडतांचि ॥४६॥
त्यामाजीं होतां त्रास बहुत । दुःख होय तयासी अमित । परी विसरूनि दुर्व्यसनांत । पडे जाउनी पुनरपि ॥४७॥
तेथें विवेक हा असावा एक । मनाच्या पाठीं निश्चयात्मक । तेणेंचि आणावें ओडूनि देख । जपावें त्यासी सर्वदा ॥४८॥
जेथें धांवे मन आपुलें । तेथें विवेकें जाउनी ते वेळे । शीघ्र पाहिजे सोडविलें । तरीच सुटेल तें पाहीं ॥४९॥
नातरी विषयांमाजीं बुडोन । जाय खचितचि रात्रंदिन । मग कैंचें समाधान । होय बापा सांगें तूं ॥५०॥
माय पाठीसी जाउनी बालका । जैसें रक्षी तयासी देखा । तैसें धरोनि परम विवेका । करावा बोध सतत त्या ॥५१॥
बोधिलें तरी नायके मन । परम दुस्तर असे तें जाण । नाना दुर्विषयीं जावोन । होय रममाण बालकापरी ॥५२॥
एकांतुनी वळवितां मन । जाय दुज्या विषयीं आपण । जैसें एक काढितां एक जाण । काढी बालक त्यापरी ॥५३॥
परी असावा विचार बळकट । जेथें तेथे होउनी धीट । माय बालका रक्षी नीट । तैसें मनासी आवरावें ॥५४॥
न करितां माय ताडन । कैसें युक्तीनें बालकाकडोन । चेंडू दावूनि घे उपटोन । भलती वाईट वस्तु ती ॥५५॥
तैसें करावें येथें आपण । विवेकें युक्तीनें वळवावें मन । चेंडूपरी मूर्ति सगुण । धरावी अंतरीं प्रेमानें ॥५६॥
धरितां मूर्ति हृदयीं सुंदर । कधीं न जाय विषयीं साचार। मन हें खचितचि निर्धार । मग सहजचि घडे परमार्थ ॥५७॥
आतां येथे कराल प्रश्न । मूर्ति कैसी येईल जाण । तेथें नच जाय माझें मन । विषयचि गोड वाटती त्या ॥५८॥
तरी ऐका उत्तर समूळ । माय खेळुनी चेंडूचा खेळ । दावी आधीं ती त्या सकळ । देखोनि बालक सुख पावे ॥५९॥
तैसें येथे करावें काय । लीला ऐकावी देवाची सुखमय । पुराण श्रवण करितां होय । सहजचि प्रिय देव तयां ॥६०॥
तरीही नको वाटे जीवा । विषयचि गोड वाटती सर्वां । पुनः पुनः दावुनी देवा । सोडवावें तेथुनी तयासी ॥६१॥
चेंडू बघतां जैसें बालक । धांवे सोडुनी हातांतील सकळिक । तैसें धरितां मूर्ति सुरेख । न जाय मन तें दुर्विषयीं ॥६२॥
जोंवरी न लागे येथील गोडी । तोंवरी तें विषय न सोडी । म्हणोनि तूं आठवीं तांतडीं । मूर्ति मानसीं ती पाहीं ॥६३॥
करूं नये मनासी बंधन । खुशाल जाऊं दे तें विषयीं पूर्ण । परी आवरावीं इंद्रियें आपण । मनापरी वर्तन करूं नये ॥६४॥
कैसें तें आतां सांगतों ऐक । वरील दृष्टांतावरीच देख । चित्त देऊनि, सकळिक । जन हो तुम्ही अवधारा ॥६५॥
जैसें बालका माता पाहीं । भलता पदार्थ घेई तरीही । घेऊं नेदी त्याजला कांहीं । न रडवितांचि ती जाण ॥६६॥
दावुनी आधीं चेंडू उत्तम । मग करी फत्ते काम । तैसी सुंदर मूर्ति परम । दावितां विषयां मन सोडी ॥६७॥
न दुखवितां मनासी जाण । घ्यावी मूर्ति सुंदर सगुण । ऐसें करितां सहजचि आपण । येई मन हें मूर्तीकडे ॥६८॥
जेथे जेथें जाय हें मन । तेथें तेथें विवेकें जाऊन । मूर्ति सुंदर धरोनि आपण । वळवावें मनासी त्या ठायीं ॥६९॥
ऐसें करितां क्रमें क्रमेण । सहजचि कळेल परमार्थ जाण । म्हणोनि आधीं करावा प्रयत्न । मूर्ति धराया हृदयीं ती ॥७०॥
हेंचि एक मुख्य साधन । यांत न करावें अनुमान । मग तुजला अधिकार पूर्ण । परमार्थाचा येईल पैं ॥७१॥
म्हणोनि धरीं मूर्ति सतत । करी तिजवरी प्रेम बहुत । ऐसें करितां मन हें खचित । सहजचि जाय ते ठायीं ॥७२॥
जरी म्हणसी नाहीं प्रेम । तरी धरीं तूं ऐसा नेम । की जपावें सतत नाम । प्रभु परमेश्वर याचें बा ॥७३॥
हस्तानें जरी करिसी काम । मुखीं धरीं तूं रामनाम । मग येईल मूर्ति सुगम- । रीतीनें आपुल्या हृदयीं ती ॥७४॥
तीचि तुझ्या अंतःकरणीं । सांगितल्यापरी धरीं तूं झणीं । आणिक साधन तुजलागोनी । नलगे निश्र्चयें बा वत्सा ॥७५॥
हरएक कार्या लागे साधन । कार्य न होय साधनावांचोन । दीप उजळावया पाहिजे जाण । वाती - तेल - समई ही ॥७६॥
एवं सकल कार्या पाहिजे साधन । त्यावीण न होय कार्य जाण । म्हणोनि सिद्ध करोनि साधन । लागावें मग परमार्था ॥७७॥
तरी आतां सांगूं सविस्तर । अवधारा चित्त करूनि स्थिर । तुम्हींही जन समग्र । पावाल शाश्वत कल्याणा ॥७८॥
एकानें केला प्रश्न म्हणोनि । त्यासीच हा बोध समजूनि । तुम्ही सारे न घ्याल कर्णीं । तरी होईल जन्म व्यर्थ ॥७९॥
असो आतां सांगतों आधीं । परमार्थाची करोनि वृद्धी । नित्य असावें निजानंदीं । तळमळ सर्वही सांडोनि ॥८०॥
कर्म-उपासना-ज्ञान । असती हीं कांडे तीन । न मिळे मोक्ष त्यांवांचोन । खचितचि जाणा निर्धारें ॥८९॥
कर्मानें होय पापनाश । उपासनेनें विक्षेप - दोष । जाउनी होय ज्ञान निर्विशेष । ज्ञानेंचि पावे मोक्षपदा ॥८२॥
ज्याचा होय विक्षेप - नाश । त्यासी होय आत्मप्रकाश । त्यालाच म्हणावें खास । परमार्थाचा अधिकारी ॥८३॥
म्हणोनि ध्यावी मूर्ति स्वमनीं । ऐसें सांगतों तुजलागोनी । तेव्हां अधिकार आलाचि म्हणोनी । समजावें मनीं निश्चयेंसीं ॥८४॥
कर्मानें होऊनि पापनाश । पुसावेंसें वाटलें तुजला खास । परमार्थ कैसा घडेल आम्हांस । ऐसा प्रश्न केला त्वां ॥८५॥
म्हणोनि तुजला उपासना । सांगितली आम्हीं जाणा । दृढ धरीं ती अंतःकरणा- । माजीं मूर्ति सुंदर ती ॥८६॥
जरी न जाय तेथें मन । तरी आणावें त्यास विवेकें जाण । परी नको आणूं त्यालागोन । जुलुमें कदापि जाण तूं ॥८७॥
श्रवण मनन करितां यथार्थ । भक्ति उपजेल ती अवचित । भक्ति उपजतां दृढावे चित्त । मूर्तीच्या ठायीं निरंतर ॥८८॥
ऐसा करितां दृढ अभ्यास । विक्षेपाचा होय नाश । मग होय निर्विशेष । ज्ञान त्यासी सहजचि ॥८९॥
जो असे तीव्र प्रज्ञ । त्यासी श्रवण - मननें होय ज्ञान । मंद बुद्धि ज्याची जाण । त्यासी मार्ग सुलभ हा ॥९०॥
न कळे कराया श्रवण मनन । त्यासी मुख्य हेंचि साधन । प्रभुपरमेश्वरमूर्ति सगुण । धरावी अंतरीं सततचि ॥९१॥
तेव्हांचि घडेल परमार्थ । आत्मज्ञान होईल यथार्थ । ना भीं तूं बा सद्गुरु समर्थ । असतां कैंचें भय तुजला ॥९२॥
यापरी केला तयासी बोध । प्रश्नाचें उत्तर देउनी बहुविध । ऐकुनी जाहला सकलां आनंद । सगुरुवचन ऐसें तें ॥९३॥
ज्यानें केला होता प्रश्न । त्यासी वाटलें समाधान । दुज्या दिनींच स्वामींकडोन । घेतला उपदेश तयानें ॥९४॥
सांगितल्यापरी प्रेमानें । करी तो शुद्ध अंतःकरणें । पावला निजवरूपा त्वरेनें । मग काय उणें त्याजला ॥९५॥
असो यापरी बहुत जनां । उद्धरिलें श्रीकेशवाश्रमादिकांना । आपुल्यासारखें करोनि त्यांना । मुक्त केलें कृपेनें ॥९६॥
ऐसें असतां सद्गुरुनाथ । शंकराश्रम परम विख्यात । ज्वरें पीडित होऊनि अत्यंत । क्षीण झाले ते पाहीं ॥९७॥
मग गोकर्ण - ग्रामासी जाती । आद्य गुरूंचे दरुशन घेती । माघारे येतां कुमठ्यासी । उत्तरती परिवारासमवेत ते पाहीं ॥९८॥
तेव्हां मल्लापुर - ग्रामांतील । जन येती पाचाराया सकल । म्हणती स्वामी गुरुराया, ये वेळ । यावें मल्लापुर - ग्रामासी ॥९९॥
कांहीं दिन तेथें राहुनी । बघावें कैसें हवा - पाणी । यावें आतां कृपा करोनी । आमुच्या सांगातीं गुरुराया ॥१००॥
ऐसी करोनि प्रार्थना थोर । बोलावुनी नेलें स्वामींसी सत्वर । कांहीं दिन राहती गुरुवर । परी न जाय ज्वर त्यांचा पैं ॥१०१॥
दिवसेंदिवस झाले क्षीण । केले नाना परी प्रयत्न । परी प्रारब्ध सरतां पूर्ण । प्रयत्न काय करितील ॥१०२॥
शके सतराशें सात । विश्वावसु-संवत्सर प्रख्यात । माघ शुद्ध तृतीयेसी सद्गुरुनाथ । शंकराश्रम मुक्त झाले ॥१०३॥
मग येऊनि जन समस्त । मिरवुनी पालखीमाजीं त्यांप्रत । विधिपूर्वक समाधि देत । मल्लापुरग्रामांतरीं ॥१०४॥
चोंहीकडे पसरली वार्ता । भक्तजन आले पहातां पहातां । तळमळ वाटे त्यांच्या चित्ता । आठवुनी सगुण स्वामींचे ॥१०५॥
सद्गुरु एक विश्रांतिस्थान । यांत किमपि नसे अनुमान । कैसें तें परिसा चित्त देऊन । तुम्ही सज्जन भाविक हो ॥१०६॥
कित्येक मानवां नानापरी । संकष्टें येती म्हणोनि अंतरीं । दुःख होय तयांसी निर्धारी । हें सकळां विदित असे ॥१०७॥
ऐशा समयीं सद्गुरु-मठासी। जातां तो विसरे आपुल्या दुःखासी । क्षणभरी कां होईना मनासी । विश्रांति वाटे खचितचि ॥१०८॥
जितुका वेळ राहूं संनिधीपाशीं । तितुकें तरी समाधान चित्तासी । वाटे हा अनुभव आम्हांसी । खचितचि जाणा निर्धारें ॥१०९॥
वारंवार घेऊनि दर्शन । करितां त्यांचा बोध ग्रहण । होय परिपूर्ण समाधान । नसे अनुमान यामाजीं ॥११०॥
एवं सद्गुरु हेंचि एक । विश्रांतिस्थान निश्चयात्मक । पुढील अध्यायीं सांगूं आणिक । मुक्त झाल्यावरील कथा ॥१११॥
आनंदाश्रम-परमहंस । आणि शिवानंद एकचि खास । यांच्या कृपाप्रसादें सप्तदश । अध्याय गुरुदासें संपविला ॥११२॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां पावे मोक्ष साचार । सप्तदशाध्याय रसाळ हा ॥११३॥
अध्याय १७॥
ओव्या ॥११३॥
ॐ तत्सत् - श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥६॥
॥ इति सप्तदशोऽध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 19, 2024
TOP