मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥१९॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥१९॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीशंकराश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ ॥ॐ॥
जय जय सगुरो करुणाकरा । तुजला करितों नमस्कारा । तूंचि देऊनि अभयकरा । करवीं ग्रंथविस्तार हा ॥१॥
केवीं करावें तुझें वर्णन । तुझ्या स्वरूपासी जाणेल कवण । कैसें करावें जाणिल्यावीण । वर्णन देवा तुझें तें ॥२॥
काय सांगूं चमत्कार । तुझ्या स्वरूपाचा न होय निर्धार । निर्गुण म्हणों की सगुण सुंदर । हेंचि नकळे मजलागीं ॥३॥
नको देवा निर्गुण - सगुण । तूंचि एक पाहिजे जाण । तुजवांचोन आणिक ज्ञान । कासया देवा दयाळा ॥४॥
तूंचि एक पुरे मजला । त्यामाजीं सारें आलें दयाळा । तीर्थयात्रा करणें कशाला । असतां तूं एक गुरुनाथ ॥५॥
गंगेचें करिती स्नान । करी ती गंगा पापक्षालन । म्हणोनि जाती सकल जन । गंगास्नान करावया  ॥६॥
चंद्रमा आपुल्या शीतल किरणें । बाह्य ताप हरी त्वरेनें । शांतता मिळे जनासी तेणें । चंद्रकृपेनें सकलांसी ॥७॥
कल्पवृक्ष इच्छिला जो भोग । तो देउनी काय करी मग । दीनतेचा करी भंग । एवं दैन्य हरी तो ॥८॥
तुझी संगति करितां देवा । पाप - ताप - दैन्य या सर्वां । हरूनि टाकिसी तूं करुणार्णवा । खचितचि जाण निर्धारें ॥९॥
 पापाचा न उरे लवलेश । अंतरबाह्य तापाचा नाश । करोनि आणिक दैन्य विशेष । हरिसी सारें निश्चयेंसीं ॥१०॥
म्हणोनि देवा तुझी एक । संगति मिळतां लाभ अनेक । मग कासया दुजें आणिक। ऐसें दैवत सांपडतां ॥११॥
असो आतां सद्गुरुनाथा । न विसंबें तुजला ताता । परी देईं तूंचि स्फुरण चित्ता । स्तवन कराया मजलागीं ॥१२॥
असो मागील अध्यायीं केलें कथन । शंकराश्रमवामी जाण । जरी झाले मुक्त दयाघन । तरी न लोपे महिमा त्यांची ती ॥१३॥
नरसोबावाडीच्या अर्चकासी । पाठवितां देवानें मल्लापुरासी । व्याधि जाऊनि निजग्रामासी । गेले दोघेही बापलेक ॥१४॥
एवं सद्गुरु झाले जरी मुक्त । कीर्ति त्यांची राहे सतत । 'अस्ति - भाति - प्रियत्वें' असत । सर्वत्र व्यापक ते पाहीं ॥१५॥
आतां कुणीही करितील प्रश्न । सद्गुरूचि कां व्यापक जाण । आम्ही सकलही व्यापक असोन । काय हें सांगतां विपरीत ॥१६॥
तरी ऐका त्याचें उत्तर । आम्ही व्यापक सर्वही निर्धार । तैसें आहे का आमुचे अंतर । तरीच बोलावें हें पाहीं ॥१७॥
सद्गुरूचें तैसेंच अंतर । त्यापरीच ते राहती निरंतर । कर्ता करविता तोचि साचार । म्हणोनि सर्व साध्य तयालागीं ॥१८॥
तयाहुनी नाहीं देव निराळा । सर्वांचा जाणता तोचि एकला । म्हणोनि तोचि सर्व जगाला । अधिष्ठान होय पां ॥१९॥
ऐशा त्या सद्गुरुस्वामींची । महिमा काय वर्णावी साची । आम्हां अज्ञांसी योग्यता कैंची । येईल कोठुनी सांगा हो ॥२०॥
जितुकें तो स्फुरवील आम्हां । तितुकेंचि सांगूं आतां तुम्हां । आणिक काहीं त्यांची महिमा । अवधारा प्रेमानें भाविक हो ॥२१॥
एके काळीं पांडुरंगाश्रम । आश्रम जाणा त्यांचा अष्टम । शिरालीहुनी मठासी उत्तम । मल्लापुर - ग्रामी आले ते ॥२२॥
घेऊनि समाधीचें दर्शन । कांहीं दिवस तेथे राहून । शिरालीसी जावया निघाले जाण । पांडुरंगाश्रम स्वामिराय ॥२३॥
मल्लापुर मठींचा घंटानाद । ऐकतां जनांसी होय आनंद । ऐसी उत्कृष्ट घंटा प्रसिद्ध । होती जाणा मठांतरीं ॥२४॥
ही घंटा शिराली - ग्रामीं । नेऊनि लावूं तेथें आम्ही । ऐसें म्हणुनी पांडुरंगाश्रमस्वामी । करिती सिद्धता नेण्याची ॥२५॥
 तेव्हां स्वामींसी तेचि दिनीं । झोंपतां रात्रीं पहा स्वप्नीं । समाधिस्थ शंकराश्रमस्वामींनीं । दर्शन देऊनि सांगितलें ॥२६॥
म्हणती बाळा पांडुरंगा । नेऊं नको घंटा ही गा । इजसी असो हिची जागा । ठेव येथेंचि ही पाहीं ॥२७॥
जरी पाहिजे शिराली मठासी । तरी सांगतों एक तुजसी । येचिपरी कुमठा - ग्रामासी । मिळेल घंटा तुजलागीं ॥२८॥
कुमठा - ग्रामीं असे एक । कांसार हुशार परम भाविक । तयाकडुनी करवीं देख । ऐसीच घंटा करील तो ॥२९॥
इतुकें सांगुनी श्रीगुरुनाथ । शंकराश्रम जाहले गुप्त । पांडुरंगाश्रम झाले जागृत । विस्मित मानसीं होती ते ॥३०॥
मग ती घंटा तेथेंच सोडुनी । गेले परिवारासहित तेथुनी । पांडुरंगाश्रम सद्गुणखाणी । कुमठा-ग्रामासी तेधवां ॥३१॥
तेथें जाउनी जनांपाशीं । कांसाराची केली चौकशी । ऐकतां खूण तेथील जनांसी । कळलें अमुकचि कांसार ॥३२॥
मग जाऊनि तया कांसारा । कथिला घंटेचा वृत्तांत सारा । मग त्यानें प्रेमानें त्वरा । केली घंटा उत्तम ती ॥३३॥
घेऊनि आला संनिधीपाशीं । दाविली घंटा अतिप्रेमेंसीं । बघुनि झाला हर्ष मानसीं । सकलांच्याही ते वेळां ॥३४॥
जैसा मल्लापुरांतील घंटेचा । नाद होतां आनंद साचा । त्यापरीच याही घंटानादाचा । आनंद वाटे सकलांसी ॥३५॥
तेव्हां जाहलें आश्रर्य सकलां । म्हणती शंकराश्रमवामींची लीला । अगाध आतां पाहिली डोळां । ऐकिली होती कानांनीं जी ॥३६॥
ऐसें बोलती परस्पर । स्वामींसही वाटला आनंद थोर । श्रीशंकराश्रम-गुरुवर । यांची लीला बघोनियां ॥३७॥
असो यापरी आणिक अमित । असती कथा त्यांच्या अद्भुत । परी आम्हांसी जितुक्या विदित । तितुक्या सांगूं आतां पैं ॥३८॥
पुन्हां कथा एक अद्भुत । सांगुनी करूं अध्याय समाप्त । श्रोते हो करा सावध चित्त । तुम्ही सज्जन भाविक हो ॥३९॥
शके अठराशें छत्तिसामाजीं । पांडुरंगाथम श्रीसद्गुरुजी । आले मल्लापुर - ग्रामीं सहजीं । भेटीसी एकदां मठांत ॥४०॥
तेव्हां केला थोर विचार । करावा येथें जीर्णोद्धार । समाधि आणि मठ समग्र । पुनरपि बांधावा सुंदर तो ॥४१॥
ऐसें म्हणोनि स्वामींनी । केली सिद्धता बांधावया झणीं । लाविले जन तये स्थानीं । कामालागीं त्या समयीं ॥४२॥
काढितां समाधीवरील दगड । आश्र्चर्य वाटलें सकळां उघड । बिल्व तुलसी गंधादि उदंड । यांचा परिमळ पसरला ॥४३॥
तेव्हां तेथें डोकावुनी । बघती सारे जन येउनी । देखिला तेथें त्यांनी नयनीं । चमत्कार तो ऐकावा ॥४४॥
तुलसी - बिल्वपत्र - पुष्पादि । वाहिलीं होती देतां समाधि । तीं टवटवीत दिसलीं संनिधीं । पाहुनी रोमांचित झाले सर्व ॥४५॥
आश्र्चर्य करिती सकल जन । म्हणती अघटित महिमान । शंकराश्रमस्वामीचें हें जाण । धन्य धन्य सारस्वत हे ॥४६॥
देवही येती स्वर्गींहुनी । धांवत विमानीं बैसुनी । पुष्पवृष्टि ते करिती झणीं । समाधीवरी प्रेमानें ॥४७॥
म्हणती देवा दत्तात्रेया । त्वां जाउनी धरणीं श्रीगुरुराया । सकळ जनांचा उद्धार करूनियां । वाढविली कीर्ति आपुली ॥४८॥
काय ते नर धन्य तेथील । असे तयांचे पुण्य प्रबल । तयांपुढे आदी देव सकल । परम दुर्बल निश्र्चयेंसी ॥४९॥
ऐशियापरी स्तविती देव । खचितचि त्यांचें बोलणें सर्व । परी ज्याच्या अंतरीं असे भाव । तोचि तरेल निर्धारें ॥५०॥
नसतां चित्तीं प्रेमभाव । त्यासी काय करील देव । वृथाचि देवा ठेविती नांव । महिमा नेणतां तयाची ॥५१॥
विचार करितां सद्गुरुवीण । नाहीं ताराया समर्थ कवण । म्हणोनि जातां त्यासीच शरण । तोचि सोडवी यांतुनी ॥५२॥
येथे करतील कुणी प्रश्न । कासया सद्गुरु आम्हां जाण । वाचितां पुस्तकें सर्वही ज्ञान । येईल आमुच्या हातीं पैं ॥५३॥
तरी याचे उत्तर अवधारा । काय करावा पुस्तक - पसारा । गुरुवांचोनि चित्ता थारा । न मिळे कदापि निश्र्चयेंसी ॥५४॥
खरें तत्त्व पुस्तकीं न मिळे । केलें तें सांगूं ये वेळे । लक्ष लावोनि येथे आपुलें । अवधारा भाविक श्रोते हो ॥५५॥
होता एका ग्रामीं एक । शेतकरी परम हुशार देख । काबाडकष्ट करोनि सुरेख । चालवी प्रपंच आपुला तो ॥५६॥
ऐसें असतां तयालागीं । व्याधि लागुनी दुःख भोगी । कंटाळला बहुत तो जगीं । शेतकरी आपल्या व्याधीसी ॥५७॥  
आयुष्य संपले त्याचें समग्र । जवळी नव्हता त्याचा पुत्र । लिहुनी ठेविलें एक पत्र । मरणसमयीं त्यानें पैं ॥५८॥
मग सोडिला त्यानें प्राण । लोकांनी केलें त्याचे दहन । ऐकोनि आला पुत्र धांवोन । लगबगें जाण त्या समयीं ॥५९॥
तेव्हां त्याने बापाचे पत्र । वाचुनी पाहिलें निरखुनी नेत्र । न करितां विचार क्षणमात्र । उठला झडकरी तो पाहीं ॥६०॥
पत्रामाजी लिहिलें काय । असे तो पाहीं कोणता विषय । येईल श्रोत्यांच्या चित्तीं संशय । सांगतों आतां अवधारा ॥६१॥
तुजकरितां कांहीं प्राप्ति । करोनि ठेविली नाहीं अंतीं । शेत आहे ठेविलें तुजप्रति । खणितां कष्टें प्राप्ति पैं ॥६२॥
ऐसें वाचितां पुत्र झडकरी । गेला थेट शेतावरी । सारे शेत खणुनी निर्धारीं । पाही त्यामाजीं काय असे ॥६३॥
परी न मिळे त्यासी कांहीं । शेतामाजीं द्रव्यादि पाहीं । तेव्हां घाबरूनि म्हणे काय ही । करणी विपरीत देवाची ॥६४॥
स्पष्ट लिहिलें माझ्या वडिलें । शेतामाजीं तुज ठेविलें । कष्ट करितां मिळेल तरी ये वेळे । काय झालें धन तें पैं ॥६५॥
सारे शेत खणुनी खणुनी । केलें सर्व रक्ताचे पाणी । तरीही न सांपडे त्यालागोनी । धन पाहीं अणुमात्र ॥६६॥
आतां ऐका सावधान । कां न सांपडे त्यासी धन । ठेविलेंचि नसतां जाण । कैसें सांपडे त्याला हो ॥६७॥
बापानें जें लिहिलें पत्र । त्याचा अर्थ न जाणतां पुत्र । खणूं लागला भूमि पवित्र । उगीच शिणला तो पाहीं ॥६८॥
तया पत्राचा ऐसा अर्थ । कीं शेत आहे तुजप्रत । बीज घालूनि करीं कष्ट सतत । पीक येईल तेव्हां पैं ॥६९॥
ऐसा त्याचा असोनि अर्थ । वाचिल्यानें न कळे त्याप्रत । तेंचि मुखानें सांगतां विवरोनि समस्त । कळलें असतें त्यालागीं ॥७०॥
तैसें येथें पुस्तकें वाचितां । न कळे तत्त्व आपल्या चित्ता । सद्गुरुवीण जनासी सर्वथा । म्हणोनि जावें शरण तया ॥७१॥
तूं नव्हे देह-मन-बुद्धि । ब्रह्मस्वरूप आहेसी इत्यादि । जरी पुस्तकीं त्याची प्रसिद्धि । तरीही न कळे गुरुवीण ॥७२॥
गुरुमुखें करी श्रवण । तरीच त्याची कळे खूण । तेव्हांचि होईल ब्रह्मज्ञान । आम्हां अज्ञान जनांसी ॥७३॥
असो आतां तया गुरुनाथा । सतत स्मरावें तरी चित्ता । होईल समाधान तें तत्त्वतां । आम्हां जनांसी निर्धारें ॥७४॥
आतां श्रीगुरुशंकराश्रम ।  असे हा प्रेमळ चतुर्थ 'आश्रम'। लावुनि जनांसी भक्तिप्रेम । उद्धरिलें जाण सर्वांसी ॥७५॥
यापरी करोनि प्रेमानें यांनीं । शके सोळाशें ब्याण्णवापासोनी । सत्राशें सात वरी जगीं राहोनि । स्वधर्मराज्य चालविलें ॥७६॥
पुढील अध्यायीं केशवाश्रम। स्वामी आमुचे जाणा पंचम । प्रेमानें चालवितील स्वधर्म - । राज्य सारस्वतवृंदाचें ॥७७॥
त्यांची कथा परम अद्भुत । एका भक्ताचा पुरविला मनोरथ । ऐकतां होईल संतुष्ट चित्त । अभक्तांचेही तें पाहीं ॥७८॥
आनंदाश्रम - पुण्यपुरुष । शिवानंदतीर्थ हे एकचि खास । यांच्या कृपाप्रसादें एकोनविंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥७९॥
खस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां भक्ति होय दृढतर । एकोनविंशाध्याय रसाळ हा ॥८०॥
अध्याय १९ ॥
ओंव्या ८० ॥
॥ श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥    ॥छ॥    ॥छ॥
॥ इति एकोनवींशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 19, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP