मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥२४॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥२४॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीवामनाश्रमस्वामीगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जया श्रीवामनाश्रमा । धरितां मानसीं तुझ्या नामा । ठाव न मिळे विषयकामा । ऐशी महिमा चरणाची ॥१॥
पुरे पुरे चरणचि एक। न लागती साधनें आणिक । सच्चित्सुखासी पोंचाया देख । वाट सुरेख हीच पैं ॥२॥
कैसे धरावे तुझे चरण । हेंचि न कळे मजला जाण । परी आठवतें एक वचन । साधुसंतांचें बा देवा ॥३॥
सद्गुरु - आज्ञा करितां पालन । मोक्ष होय आपुल्या आधीन । तेव्हां केवीं होतील चरण । दूर जाण मजलागीं ॥४॥
गुरु - आज्ञेहुनी श्रेष्ठ आणिक । नाहीं अन्य साधन देख । तीचि घट्ट धरितों एक । सद्गुरुनाथा दयाळा ॥५॥
तुझ्या आज्ञेमाजीं आन । वस्तु नाहीं तुजवांचोन । जगामाजीं तूंचि पूर्ण । भरला अससी व्यापक पैं ॥६॥
आज्ञा म्हणजे तुझें वचन । गोड तेंचि अमृताहून । त्यांत ब्रह्मानंदरस पूर्ण । भरला जाण निश्र्चयेंसीं ॥७॥
ऐसी ती आज्ञा न केलिया भान्य । सारें जग दिसेल शून्य । म्हणोनि नको मजला अन्य । आज्ञेविण सर्वथा ॥८॥
तीचि एक करितां पालन । सर्वत्र दिसेल सच्चिदानंदघन । आतां देवा बालकालागुन । आज्ञा-उल्लंघन नच करवीं ॥९॥
वेडे वांकुडे बोलिलों शब्द । कवणाही न होय त्याचा बोध । परी माझी माउली शुद्ध । जाणेल सर्व मम हेतु ॥१०॥
बालक बोले बोबडे बोल । ते अन्यासी सर्वही फोल । मातेसी कळे आपुलें बाळ । काय बोले म्हणोनियां ॥११॥
तैसी तूं मम प्रेमळ माय । तुज सर्व विदित होय । आतां देउनी मजला अभय । उद्धरीं गे करुणाळे ॥१२॥
असो आतां ऐका सज्जन । मागील अध्यायीं केलें कथन । वामनाश्रमस्वामी सघन । यांनीं घेतली समाधि ॥१३॥
दावुनी जनांसी चमत्कार । गेले आपुल्या स्थानीं सत्वर । परी राहिले येथेंचि सुंदर । कीर्तिरूपें जगांत ॥१४॥
जरी घेतली त्यांनीं समाधि । तरीही महिमा न जाय कधीं । सांगूं आतां तुम्हां आधीं । तेचि कथा परिसा हो ॥१५॥
वामनाश्रमस्वामींची समाधि । येथे प्रार्थितां परमावधि । झणींच कार्य होय तें आधीं । काय तें सांगूं आतांचि ॥१६॥
बंटवाळ या ग्रामामाजों । लाभादाय रामरावजी । सब - रजिस्ट्रार होता सहजीं । परम भाविक तो पाहीं ॥१७॥
त्या काळीं कल्ले मंजनाथय्या । नामें दस्तलेखक त्या समया । सारस्वत बंटवाळ ग्रामी या । होता एक सज्जन पैं ॥१८॥
त्यापासून एक हविक ब्राह्मण । दस्तऐवज घेत लिहून । तो नोंद करावयालागुन । दिला तालुक - कचेरींत ॥१९॥
ऐसा तो दस्तऐवजा कागद । लाभादाय रामरावासंनिध । आला करावयासो नोंद । फिरलें प्रारब्ध रामरायाचें तैं ॥२०॥
कायद्यापरी रामराय । चौकशीपूर्वक करी कार्य । 'रजिस्टर' करूनि देय । हविक ब्राह्मणालागीं पैं ॥२१॥
त्या ब्राह्मणाच्या भार्येनें । केला पतिसह कागद कपटानें । मंजनाथय्या हें नेणे । फसला रामरायही त्यामुळें ॥२२॥
रामराव आणि मंजनाथय्या यांनीं । केला खोटा कागद सामील होउनी । ऐसें एकानें मॅजिस्ट्रेटालागुनी ! कळवुनी फिर्याद गुदरली ॥२३॥
त्यानें 'डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट' । यांच्याकडे खटला पाठविला थेट । मॅजिस्ट्रेटें विचार करूनि झटपट । पाठविला तो सेशन - कोर्टासी ॥२४॥
आरोपींसी एक श्रेष्ठ वकील । तेवींच कांहीं जन सुशील । जामीन व्हाया सिद्ध झाले ते वेळ । नाहीं गुन्हा हें समजोनि ॥२५॥
परी मॅजिस्ट्रेट जज्ज हे अधिकारी । सोडुनी द्यावया त्यां जामिनावरी । कबूल नच होती अंतरीं । गुन्हेगार त्यां मानुनी ॥२६॥
ही वार्ता पसरली जनांमाजीं । बोलती जेथें तेथे तयावीण न दुजी । म्हणती परमेश्वराची मर्जी । कोण हें संकट ओढवलें ॥२७॥
ऐसे हळहळती सारस्वत जन । त्या समयींच स्वामी दयाघन । पांडुरंगाश्रम तेथें जाण । मंगळूर - ग्रामीं होते पैं ॥२८॥
वामनाश्रमस्वामीराय । यांच्या समाधीसंनिध सदय । राहिले होते तेचि समय । खटला होता यांचा तैं ॥२९॥
असो मग हे आरोपी जाण । भवानीशंकर - देवालागुन । प्रार्थना करुनी मग तेथोन । येती स्वामीसंनिधानी ॥३०॥
पांडुरंगाश्रमस्वामींप्रत । सांगती सकल वृत्तांत । आणि घातलें दंडवत । नम्रभावेंकरोनियां ॥३१॥
तेव्हां स्वामी सद्गुरुनाथ । वामनाश्रमस्वामी यांसी प्रार्थित । म्हणती आरोपियां देवा त्वरित । संकटमुक्त करावें ॥३२॥
आणिक तेथ करविती सेवा । आरोपी म्हणती वामनाश्रमदेवा । दयासागरा करुणार्णवा। रक्षीं रक्षीं आम्हांसी ॥३३॥  
तूंचि आम्हां बालकांलागीं । कृपा करोनि रक्षावें वेगीं । तुजवांचोनि अन्य ना जगीं । भक्तवत्सला गुरुराया ॥३४॥
तूं रक्षिलें बहुत जनांसी । तैसेंच आतां रक्षावें आम्हांसी । जरी आम्ही अज्ञ पापराशी । तरी नच आम्हांसी टाकावें ॥३५॥
ऐशियापरी करुनी प्रार्थना ॥ नंदादीप ठेविती जाणा । शहाळ्यांचा अभिषेक आणि नाना । उपचारें पूजा करिती पैं ॥३६॥
जरी घेतली त्यांनीं समाधि । कृपा त्यांची नच जाय ती कधीं । कैसें तें परिसा सांगूं आधीं । चित्त एकाग्र करूनियां ॥३७॥
पहा रेडिओमाजीं जाण । नानापरी ऐकतों आपण । वाद्यें कीर्तन गायन । मुंबई कलकत्ता येथीलही ॥३८॥
जो करितो तेथें गायन । तो न दिसे डोळियालागुन । परी ऐकूं येत स्पष्टकरोन । गान आणि वार्तां नानाविध ॥३९॥
जरी तो मनुष्य न दिसे येथ । तरी तो गातो हें असे सत्य । हवेंतुनी ऐकू येती त्वरित । शब्द सारे आपुल्यासी ॥४०॥
शब्द हा आकाशाचा गुण । म्हणोनि निघे पोकळींतून । परी असावें यंत्र शुद्ध पूर्ण । तरीच ऐकूं येई झणीं ॥५१॥
तैसे येथ सद्गुरुनाथ । जरी न दिसले आम्हांप्रत । त्यांची कृपा असे सतत । जिकडे भक्त तिकडे पैं ॥४२॥
रेडियो नसतां शब्द नायके । भक्त नसतां कृपा न फांके । जरी भावनायंत्र अणुमात्र चुके । तरी न होय ती कृपा कधीं ॥४३॥
ज्यासी रेडियोची पूर्ण माहिती । त्यासीच दावितां यंत्रे सारी तीं । दुरुस्त होती निश्चितीं । मग ऐकूं येत गायनादि ॥४४॥
तैसें येथें जे सत्पुरुष । भावना दृढ करिती बहुवस । मग होय कृपा खास । सद्गुरुनाथ यांची पैं ॥४५॥
काढुनी 'संशय व्हॉल्व' वाईट । 'निश्र्चय व्हॉल्व' घालोनि बळकट । भावना - यंत्र करिती नीट । भक्तहृदय - रेडियोचें ॥४६॥
तेव्हां कृपा होय झडकरी । सकाम - निष्काम भक्तांवरी । देह त्यांचा न दिसे जरी । कृपा होय सहज पहा ॥४७॥
तेव्हां कार्य होय सहज । इच्छित असे जें भक्तकाज । ऐसा तो सद्गुरुराज । काय वर्णूं महिमा ती ॥४८॥
जेथ येईल भक्तां संकट । तेथ धांव घेती ते थेट । निवारण करिती झटपट । नाहीं संशय यामाजीं ॥४९॥
तेवींच श्रीपांडुरंगाश्रम । रामराव - मंजनाथय्या यांचें प्रेम । बघुनी उत्तेजन देती परम । समाधिसेवा करावया ॥५०॥
तेणेंपरी करोनि सेवा । कृपा संपादिली धरूनि भावा । आणि म्हणती तूंचि देवा । रक्षीं आम्हां गुरुराया ॥५१॥
असो तेव्हां आरोपी यांनीं । जामिनावरी सोडावें म्हणुनी । केलें 'अपील' हायकोर्टालागुनी । पोहोंचला गुरुदेव त्यालागीं ॥५२॥
तेव्हां हायकोर्टाहुनी । यांसी सोडावें जामीन घेउनी । ऐसा हुकूम पाठविला तो झणीं । सद्गुरुकृपेंचि निर्धारें ॥५३॥
मग येथें चालविला खटला । डिस्ट्रिक्ट जज्जें सहजीं आपुला । आरोपियांवरी गुन्हा ठरविला । चमत्कार काय तो ऐका ॥५४॥
आरोपी मानसीं करिती प्रार्थना । प्रभो स्वामी कृपाघना । विसरूं नको आम्हां जाणा । वाहिला भार तुजवरीच ॥५५॥
जरी करतील आम्हां कैद । तरी होय कीं तुज आनंद । पुत्रासी होतां अमर्याद । मातेसीच ती लाज खरी ॥५६॥
म्हणोनि देवा तूंचि आतां । धांवुनी येईं झडकरी ताता । ऐसें आळविती दोघेही गुरुनाथा । वामनाश्रमस्वामींसी ॥५७॥
तोंच काय वर्तलें ऐका । खटला चालिला असतां देखा । हायकोर्टाहुनी तार ती निका । आली अवचित न्यायाधीशा ॥५८॥
कीं कन्यानुरासी केली बदली । लगेच जावें तुम्हीं त्या स्थळीं । ऐसा हुकूम आला ते वेळीं । न्यायाधीशासी अकस्मात ॥५९॥
तेव्हां न्यायाधीशानें त्यांसी । रिपोर्ट केला तेचि दिवशीं । कीं मी आतां कन्यानुरासी । जावया प्रतिबंध एक असे ॥६०॥
महत्त्वाचा खटला हातीं । धरिला असे आम्हीं निश्चितीं । त्याचा पुरता विचार रीतीं । करोनि जातों कन्यानुरा ॥६१॥
ऐसा रिपोर्ट हायकोर्टीं करित । त्यावरी तेथुनी पुनरपि त्वरित । तारेनेंचि हुकूम येत । काय तो परिसा श्रोते हो ॥६२॥
लगबगेंशीं जावें तेथ । उशीर न करीं आतां त्वरित । ऐकुनी जन झाले विस्मित । सारस्वत ब्राह्मण त्या समयीं ॥६३॥
मग खटल्याचें काम अर्धेंचि खास । टाकुनी तैसेंचि कन्यानुरास । मंगळुराहुनी न्यायाधीश । गेला लगबगें तात्काळ ॥६४॥
तेथें एक आला नवीन । न्यायाधीश मंगळुरीं जाण । आरोपियांनीं तयालागुन । केली अर्जी त्या समयीं ॥६५॥
अर्जापरी तेव्हां जाण । खटला - विचार प्रारंभापासून । नवीन न्यायाधीशें आपण । केला पुनरपि त्या समयीं ॥६६॥
तेव्हां तेथे कोर्टांतरीं । पुरावा दाखल झाला त्यावरी । आरोपी निर्दोषी निर्धारी । ऐसें ठरविलें न्यायाधीशें ॥६७॥
आणि तयां दोघांलागुन । सोडिलें तत्काळ सन्मानेंकरून । आरोपियांसी आनंद पूर्ण । झाला हें सांगावें नलगेचि ॥६८॥
खटल्याचा निवाडा होतां पूर्ण । पुन्हां आधींच्या न्यायाधीशा जाण । मंगळुरासी बदली करोन । पाठविलें तेथ तात्काळ ॥६९॥
आणि आला जो नवीन जज्ज । त्यासी पाठविलें होतांचि काज । दुज्या गांवीं धाडिलें सहज । कैसा चमत्कार झाला पहा ॥७०॥
आरोपियां सोडावयाकारण । सद्गुरुनाथेंचि कृपा करोन । पाठविलें दुज्या न्यायाधीशालागुन । मंगळुरासी त्या काळीं ॥७१॥
इतुकेंचि नव्हे आणिक ऐका । स्वल्पदिन जातां देखा । रामराव यालागीं निका । वरिष्ठ जागा दिधली पैं ॥७२॥
सबरजिस्ट्रार जागेवरूनी । डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार करुनी । मंगळूर या गांवींच झणीं । केली बदली त्याची पैं ॥७३॥
पहा कैसा चमत्कार । साधुसंतांचा न लगे पार । म्हणोनि न म्हणावें त्यांसी नर । साक्षात् ईश्वर ते पाहीं ॥७४॥
असो आतां सद्गुरु सदय । वामनाश्रम यांचें हें कार्य । यामाजीं नाहीं संशय । ऐसें बोलती जन सारे ॥७५॥
आणिक हे आरोपी भक्त । त्यांसी वाटलें समाधान बहुत । नाहीं विसरले चरणांप्रत । श्रीस्वामींच्या ते पाहीं ॥७६॥
ऐकुनी वृत्तांत सकल सारस्वत । अहा गुरुदेवा ऐसें म्हणत । काय महिमा तुझी अद्भुत । न कळे ती कवणाही ॥७७॥
असो आतां ऐशा गुरुनाथा । भजतां मुक्ति येईल हाता । येथें संशय नाहीं सर्वथा । सत्य वचन हें पाहें ॥७८॥
म्हणोनि सद्गुरु एकचि श्रेष्ठ । तेचि जनांसी करिती धीट । वृथा नव्हे आमुची वटवट । भजतां कळेल सकलांसी ॥७९॥
काय करावें त्यांसी भजुनी । न कळे कीं आम्हांलागुनी । त्यांसी आम्हांसी भेद ना म्हणुनी । ऐसा प्रश्न उद्भवतो ॥८०॥
तरी त्याचें उत्तर हेंचि । कीं सुवर्ण पितळ दिसे समचि । परी न ये कधींही साची । सुवर्णाची सरी पितळेसी ॥८१॥
आम्हांसारिख्या अज्ञजनांसी । न कळे त्याची परीक्षा परियेसीं । सराफ त्याची परीक्षा कैसी । करी आपुल्या बुद्धिबळें ॥८२॥
तैसें येथें आम्हां अज्ञजनां । सद्गुरु मनुष्य दिसे जाणा । खरा सद्भक्त याचिया नयना । सद्गुरु देव श्रेष्ठ दिसे ॥८३॥
सुवर्ण पितळ यांतील भेद । ज्यासी कळे तोचि आनंद । पावे बघतांचि सुवर्ण संनिध । करी उपयोग त्याचा तो ॥८४॥
तैसा जो अधिकारी भक्त । तो सद्गुरु देखतां धांवे त्वरित । त्यापासुनी लाभ घेत । आपुल्या खऱ्या स्वरूपाचा ॥८५॥
सुवर्णपरीक्षा न कळे ज्या माणसा । तोचि दवडील सुवर्ण परियेसा । मर्कटहस्तीं हिरा कैसा । राहेल सांगा तुम्ही हो ॥८६॥
जरी देखिली हिऱ्यांची रास । हर्ष न होय मर्कटास । मनुष्यें पाहिल्या त्या हिऱ्यांस । हर्ष वाटेल सहजचि ॥८७॥
तैसे आम्ही अनधिकारी । सद्गुरूसी पाहुनी दूरी । पळोनि जातों सत्वरी । न कळतां लाभ कोणता तो ॥८८॥
जरी असतील फळें सुंदर । त्यांपरी झडप घाली वानर । तैसे अनधिकारी नर । विषय -फळासी झोंबती ॥८९॥
विश्व-सुखाच्या गोडीसन्मुख । सद्गुरूसारिखें रत्न सुरेख । धिक्कार करिती त्याचा देख । मर्कटापरी अज्ञपणें ॥९०॥
अज्ञपणें ऐसें वर्तन । मर्कटापरी न व्हावें म्हणोन । पूर्वजांनी मठासी स्थापोन । केला उद्धार जनांचा ॥९१॥
जन्मापासोन सद्गुरुत्वामी । यांचे सद्गुणवर्णन नेहमीं । पडावें आमुच्या अंतर्यामीं । यासाठींच मठ केले ॥९२॥
सद्गुरुप्रेम ठसतां पूर्ण । सहजनि त्यांचे घेई दर्शन । दर्शनाने होय-पाप दहन । मग येई त्या अधिकार ॥९३॥
अधिकार आलियावरी देख । सद्भक्त होय तो परम चोख । तेव्हां सत्स्वरूपाचा रोख । अनुभव होय त्यालागीं ॥९४॥
म्हणोनि पूर्वजें केलें जें कार्य । तेणें आमुचें हितचि होय । नातरी ऐशी सद्गुरुमाय । कैसी लाभती आम्हांसी ॥९५॥
म्हणोनि ऐसी असतां सोय । न दवडावे त्यांचे पाय । जोंवरी असती चंद्रसूर्य । तोंवरी असावा मठ आमुचा ॥९६॥
ह्यापरी करितां वर्तन । सहजची होईल उन्नती जाण । धरोनि मठाचा अभिमान । भजावें तेथे प्रेमानें ॥९७॥
असो आतां स्वामी माउली । भक्तजनांच्या उद्धारा आली । वामनाश्रम - नामें उरली । कीर्ति त्यांची सतत पहा ॥९८॥
तया आश्रमा आमुचें नमन । तोचि आमुचें करील रक्षण । नेईल निजसुखधामीं त्वरेंकरून । सत्य सत्य त्रिवाचा ॥१९॥
वामनाश्रम षष्ठ आश्रम । यांनीं अवतारकार्य केलें उत्तम । जनांचा पुरवुनी काम । सांभाळिलें सकलांसी ॥१००॥
यापरी करोनि प्रेमानें यांनी । शके सत्राशें पंचेचाळपासुनी । एकषष्ठवरी जगी राहोनी । स्वधर्मराज्य चालविलें ॥१०१॥
पुढील अध्यायीं सप्तम आश्रम । श्रीकृष्णाश्रम सद्गुरु परम । सद्गुणी माउली चालवील स्वधर्म - । राज्य सारस्वत- वृंदाचें ॥१०२॥
त्यांची कथा परम रसाळ । अमृताहुनी गोड प्रेमळ । घ्या हो घुटका तुम्ही सकळ । भाविक सज्जन श्रोते हो ॥१०३॥
आनंदाश्रम परमहंस । शिवानंदतीर्थ एकचि प्रेमरस । यांच्या कृपाप्रसादें चतुर्विंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१०४॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां निवेल तळमळ समग्र । चतुर्विंशाध्याय रसाळ हा ॥१०५॥ अध्याय २४ ॥
ओंव्या १०५
॥ ॐ तत्सत् - श्रीसगुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति चतुर्विंशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 19, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP