मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥९॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥९॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


N/A॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीशंकराश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय जय जय श्रीगुरुराया । निर्गुण सगुण तुझिया पाया । भजतां येईल भक्ति हृदया । तूंचि दाता तियेचा ॥१॥
कैसें भजावें काय करावें । हेंही नाहीं चित्ता ठावें । त्वांचि शिकवुनी मजला द्यावें । भक्ति - ज्ञान - वैराग्य ॥२॥
तव गुणमहिमा न कळतां जाण । बळें धरुनी देहाभिमान । विसरलों तुजलागीं म्हणोन । भवबंधन लागलेंसे ॥३॥
न कळे मार्ग निज बालका । माय हातीं धरोनि त्या देखा । घेउनी जाई आपुल्या मुलुखा । तैसा तूं मज ने स्वपदीं ॥४॥
त्वांचि देउनी आतां बुद्धि । मजकडुनी करवीं ग्रंथवृद्धि । ऐसी प्रार्थना करितों तव पदीं । प्रभो सद्गुरो दयाळा ॥५॥
असो आतां श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं निरूपण । दिधलें  स्वामींनी दरुशन । निजभक्तांसी बंकीकोड्‌लीं ॥६॥
आणि त्या भक्ताचा बंधु । त्यानें केला अपराधु । म्हणोनि सद्गुरु करुणासिंधु । प्रार्थिला अनुतापें त्या समयीं ॥७॥
तेव्हां तयाचें स्वामीराय । समाधान करिती देउनी अभय । श्रोते हो सावध परिसा काय । सांगती वचन तें आतां ॥८॥
म्हणती शंकराश्रमस्वामी सदय । ना भीं चित्तीं धरीं अभय । सहजचि सद्गुरुकृपा होय । होतां अनुताप निजहृदयीं ॥९॥
अनुतापेंचि होय निरसन । पाप - ताप - दैन्य जाण । यांत किमपि नसे अनुमान । परी असावा दृढतर विवेक ॥१०॥
वरिवरी जरी अनुताप होय । तरी त्याचा उपयोग काय । क्षणांतचि त्याचा होत विलय । पुनरपि दोष घडतीच ॥११॥  
म्हणोनि जो खरा अनुताप । त्याचा न होय कधींही लोप। तेणेंचि जाईल सकल पाप । पुनरपि दोष घडतीना ॥१२॥
विवेकवैराग्यासहित अनुताप । जरी होईल हृदयीं अमूप । तरीच वाढेल भक्तीचा प्रताप । नातरी ढळेल सकलही ॥१३॥
पाया जर झाला बळकट । गृह तें होय ने परम उत्कृष्ट । पडेल ऐसें नाहीं तेथ । भय सर्वथा तें पाहीं ॥१४॥
नातरी नसतां पाया घट्ट । गृह बांधितां होय नष्ट । म्हणोनि मुख्य पाया श्रेष्ठ । तोचि बळकट असावा ॥१५॥
तैसा अनुताप हाचि मूळ । पाया असे येथें सबळ । असतां तो एक बळकट निश्चल । भक्तिभाव दृढ होई ॥१६॥
अनुतापाचा पाया खणुनी । वैराग्य माती घ्यावी त्यांतुनी । कालवावी प्रेमजळेंकरूनी । आणिक दगड आणावे ते ऐका ॥१७॥
विवेकाचे दगड आणुनी । पाया बांधावा घट्ट करोनी । त्यावरी भक्तीच्या विटा चढवुनी । बांधावें गृह सुंदर तें ॥१८॥
एवं वैराग्यसहित अनुताप -पाया। बांधितां घट्ट विवेकेंचि या । भक्ति ढळेल ऐशा ना भया । धरावें बापा निर्धारें ॥१९॥
पाया बांधुनी बळकट थोर । बांधितां त्यावरी सुरेख मंदिर । तेथे वास करील निरंतर । मालक जाणा सहजचि ॥२०॥
तद्वत् येथें विवेकासहित । अनुताप होतां न ढळे किंचित । परी विवेकावांचुनी व्यर्थ । अनुताप न ये उपयोगा ॥२१॥
दगडावांचुनी कैसा पाया । येईल सांग बांधावया । गृह बांधितां तैशा ठाया । पडेल सहजचि कांहीं दिनीं ॥२२॥
म्हणोनि येथे विवेकासहित । अनुताप-पाया व्हावा घट्ट । तेव्हां बांधितां भक्तीचे गृह तेथ । होय बळकट ते पाहीं ॥२३॥
जेथे असे भक्तिभाव । तेथें सहजचि वसे देव । म्हणोनि आपण करावी सदैव । भक्ति दृढतर निश्चयेंसीं ॥२४॥
जरी केलें वरिवरी ढोंग । काय त्याचा होईल उपयोग । भक्तिभाव नसतां सांग । कैसा लाभेल देव तो ॥२५॥
म्हणोनि विवेकासह होतां अनुताप । भक्तिप्रेम आपोआप । येईल तुझ्या अंगीं खूप । मग बसेल देव हृदयीं तुझ्या ॥२६॥
आतां तुला झाला ताप । गेलें सर्व तुझें पाप । नको करूं तूं दुःख विलाप । नामस्मरण करीं सदा ॥२७॥
वदतां वाचे  सदा नाम । उपजेल विवेक वैराग्य परम । उत्कृष्ट होउनी भक्तिप्रेम । निश्र्चल होय तें पाहीं ॥२८॥
मग कैंचें भय बा तुजला । सदा वास करितों मी बाळा । खचित तुझ्या हृदयींच प्रेमळा । सत्य वचन हें आमुचें ॥२९॥
येथें तूं राहुनी करिसी काय । अथवा आम्ही येतां काय होय । भक्तिप्रेमावांचुनी चिन्मय - । स्वरूप न लाभे कदापि ॥३०॥
कमळाच्या बुडासी बेडूक सतत । राहे परी त्या काय मिळे तेथ । मातीच सारी खाय तो बहुत । मकरंद सेवी भ्रमर पहा ॥३१॥
भ्रमर सेवी जैसा मकरंद । तैसा तूं बा आमुचा बोध । ग्रहण करोनि घे आनंद । कधीं कधीं येवोनि भ्रमरापरी ॥३२॥
बेडकापरी जरी तूं सतत । राहिलासि येथे आमुच्याप्रत । तरी न होय ज्ञान प्राप्त । खचितचि जाण निर्धारें ॥३३॥
म्हणोनि आम्हीं सांगितला जो बोध । जरी हृदयीं धरिसी शुद्ध । भ्रमरापरी तरी तें सिद्ध । होईल कार्य तुझें बा ॥३४॥
अर्थात् भ्रमर सेवी मकरंद । तैसा तुजला आमुचा बोध । ग्रहण करितां निजपद । होईल प्राप्त तुजलागीं ॥३५॥
संनिध राहुनी बेडकापरी । अभिमानरूप माती खासी जरी । काय उपयोग ऐसा विचार करीं । सूक्ष्म बुद्धीनें तूं बाळा ॥३६॥
म्हणोनि तूं भ्रमरासारिखा । मकरंद सद्गुरुबोधाचा देखा । घेशील जरी गोड घुटका । निश्चयें तृत होशील बा ॥३७॥
म्हणोनि हातानें करितां काम । मुखीं धरीं सतत नाम । तेव्हां उपजेल खरें प्रेम । भिऊं नको तूं सर्वथा ॥३८॥
 खरें प्रेम उपजतां अंतरीं । बोधग्रहण होय भ्रमरापरी । तेणें आत्मज्ञान निर्धारीं । होईल प्राप्त तुजलागीं ॥३९॥
असो आतां अखंड प्रेम । धरीं हृदयीं तूं निष्काम । जवळीच असें मी आत्माराम । कळेल तुजला निश्चयेंसीं ॥४०॥
यावरी स्वामी वडील बंधूसी । म्हणती तूंही धरीं मानसीं । सांगितला जो बोध तुम्हांसी । घेईं समजोनि न त्यागीं ॥४१॥
ऐसें बोलतां स्वामिराय । दोन्ही बंधु धरिती पाय । म्हणती शिरसावंद्य होय । आज्ञा आपुली आम्हांसी ॥४२॥
परी एक आमुची आर्त । पुरवावी देवा येउनी ग्रामांत । रहावें चार दिवस तेथ । सदनासी चरण लावावे ॥४३॥
आणिक तीन दिवसांनीं येथ । पाचारावया येतों खचित । करावें आगमन त्वरित । बंकीकोड्लग्रामासी ॥४४॥
यावरी बोलती सद्गुरुस्वामी । अवश्य येऊं तुमच्या ग्रामीं । सांगितला बोध जो आम्हीं । धरा अखंड हृदयांत ॥४५॥
यावरी दोघे बंधु म्हणती । आज्ञा मान्य असे आम्हांप्रती । ऐसें बोलुनी झडकरी जाती । बंकीकोड्‌ल ग्रामासी ॥४६॥
मग करोनि सिद्धता सर्व । नाना वाद्यें घेउनी अपूर्व । गोकर्ण - ग्रामासी घेतली धांव । दोन्ही बंधूनीं तेधवां ॥४७॥
पालखी परम सुंदर सजवुनी । तींत बैसविलें स्वामींलागुनी । आणिलें मिरवीत आपुल्या सदनीं । भक्तिपूर्वक त्या समयीं ॥४८॥
स्वामींप्रति एक मास । विनवणी केली रहावयास । उत्सव करिती प्रेमानें बहुवस । संतोषलें चित्त सकलांचें ॥४९॥
घेतला बंधूनीं उपदेश प्रेमें । करिती जपध्यानादिरु नेमें । निर्मल चित्त बहु निष्कामें । ध्याती सर्वदा गुरुमूर्ति ॥५०॥
असो मग स्वामी भंडिकेरी । मठासी आले त्याउपरी । काय महिमा तयांची भारी । कैसी वर्णावी कळेना ॥५१॥
परिसा आतां सावधान । शंकराश्रमस्वामींचे सद्गुण । आणिक एक चमत्कार सांगोन । अध्याय संपूर्ण करितों पैं ॥५२॥
गोकर्णग्रामीं एक द्विजवर । होता एक सारस्वत चित्रकार । नाना चित्रे करी निरंतर । परी तया कोणी पुसेना ॥५३॥
न मिळे पोटभरी खावया अन्न । परम दुर्बल द्रव्यहीन । कुणीही न पुसे त्यासी जाण । तूं कोण कोठील म्हणोनि ॥५४॥
जरी तो करी चित्रें सुरेख । तरी तयासी कवणही एक । न पुसे तयाच्या चित्रांनी सन्मुख । दाविलीं तरी धिक्कारिती ॥५५॥
दारिद्र्याने झाला पीडित । परी अंतर परम शांत । भक्तिभाव असे बहुत । अंगीं त्याच्या निष्काम ॥५६॥
शंकराश्रमस्वामी यांचा । परम भक्त नाविक साचा । मनन गुंतवी आपुली वाचा । नामस्मरणीं बहु प्रेमें ॥५७॥
सुंदरमूर्ति मनोहर । सद्गुरुस्वामींची निरंतर । चित्तीं धरोनि व्यवहार । करी सकळही आनंदें ॥५८॥
सदा मठासी जाउनी घेई । भेट स्वामींची भक्तीने पाहीं । परी एक तयाच्या हृदयीं । उपजली इच्छा उत्कृष्ट ॥५९॥
कीं स्वामी श्रीगुरुनाथ । यांसी एकदां आपुल्या गृहाप्रत । पाचारुनी आणावें तरी श्रीमंत । नव्हें मी आतां काय करूं ॥६०॥
तरी देवा सद्गुरुनाथा । आमुच्या गृहामी तूं बा येतां । काय काणिक तुजला ताता । देऊं दरिद्री मी असें ॥६१॥
काय वाढूं तुजला देवा। नाहीं पंच पक्वान्न मिठाई मेवा। कैसा मीं बा तुजला द्यावा । सन्मान थोर दयाळा ॥६२॥
सकळही नेती तुजला गृहासी । नाहीं मजला योग्यता तैसी । ऐनें म्हणोनि हळहळे मानसीं । चित्रकार तो भक्त ॥६३॥
मग रात्रीं निजतां जाण । देखिलें परम सुंदर स्वप्न । श्रीसद्गुरूंनी देउनी दरुशन । म्हणती ऐक मद्भक्ता ॥६४॥
मी येतों तुझिया सदनीं । नको काणिक मजलागोनी । देईं एक मन - वाणी । पुरे इतुकेंचि बा वत्सा ॥६५॥
इतुकें तया भक्तासी सांगून । अदृश्य जाहले नलगतां क्षण । मग हा इसम जागा होऊन । सांगे स्वम पत्नीसी ॥६६॥
येरु म्हणे मीही तेंच । स्वप्न देखिलें खचित आतांच । हेचि शब्द सांगितले साच । श्रीसद्गुरूंनी मजलागीं ॥६७॥
म्हणोनि मजला वाटे खास । स्वप्न नव्हे हें दृष्टांत विशेष । उदयीकचि आणूं तयांस । जावें आजि मठासी ॥६८॥
तेव्हां बोले चित्रकार । जाउनी येतों आतांचि सत्वर । ऐसें बोलुनी गेला तो नर । मठामाजीं त्या समयीं ॥६९॥
जाउनी भेटे सद्गुरुनाथा । म्हणे आमुच्या गृहीं ताता । यावें भिक्षेसी म्हणोनि माथा । ठेविला चरणीं प्रेमानें ॥७०॥
उदयीक भिक्षा आपुल्यासी । करवावी ऐसें आमुच्या मानसीं । कृपा करोनि आमुच्या गृहासी । लावावे चरण हे देवा ॥७१॥
ऐसें बोलतां दाटला कंठ । अश्नु लोटले प्रेमभरित । घातलें साष्टांग दंडवंत । मग स्वामी बोलती त्या ॥७२॥
म्हणती अवश्य येऊं तुझिया । सदनीं, घेऊं शिष्यराया । भिक्षा आनंदें, न घरी तूं भंया । कैसें होईल म्हणोनि ॥७३॥
नको मजला काणिक कांहीं । करीं अर्पण मन हें पाहीं । मिष्टान्नभोजन त्यामाजीं सर्वही । येई खचितचि निश्रयें ॥७४॥
तूं जें जेविनी तेंचि अन्न । इतुकेंचि वाढीं मजलागोन । कांहींच न करीं अनुमान । आज्ञा आमुची तुजलागीं ॥७५॥
ऐकतां श्रीस्वामींचें वचन । हरुषला चित्तीं बहुत जाण । मग गृहासी त्वरित जाऊन । सांग वृत्तांत पत्नीसी ॥७६॥
पहा कैसें सद्गुरूंचें मन । नाहीं तयांसी भेद जाण । दरिद्री श्रीमंत तयांसी समान । सारें जग ब्रह्मरूप ॥७७॥
न पाहती पैसा अडका । भाव एक बघती देखा । त्यावीण न ढुंकिती विशेषिका । श्रीमंती गरीबी ते पाहीं ॥७८॥
विद्या-गुण-शौर्य-कीर्ती । यांकडे सद्गुरु न बघती । ज्यासी प्रेळ भाव चित्तीं । त्याकडे ओळती कृपाचन ॥७९॥
असो मग तो चित्रकार । यथाशक्ति सिद्धता समग्र । करी उत्सुक होउनी साचार । दुज्या दिवशीं पहाटेचि ॥८०॥
गेला पाचारावया तयांसी । श्रीसद्गुरुस्वामी - मठासी । इकडे पत्नीनें सिद्धता कैसी । केली उत्तम प्रेमानें ॥८१॥
गुरुआज्ञेपरी केला पाक । सदा जेवितो तैसाचि देख । परी तो झाला उत्तम सकळिक । स्वयंपाक खमंग बहुत तो ॥८२॥
इतुक्यामाजीं आला घेऊनि । श्रीसद्गुरुस्वामींलागुनि । पाद्यपूजादि प्रेमें करोनि । ठेविली काणिक ती ऐका ॥८३॥
होतें तयाजवळी एक । चार आण्यांचें नाणें चोख । तेंचि दिधलें नाहीं आणिक । तयापाशीं द्रव्य कांहीं ॥८४॥
ती त्याची काणिक परम । घेतली स्वामींनी करोनि प्रेम । पाहुनी त्याची भक्ति निःसीम । जाहला संतोष तयांसी ॥८५॥
शक्तीपरी देतां काणिक । नच जरी स्वीकारी सद्गुरु देख । खचितचि भक्त तो पावे दुःख । म्हणोनि घेती ते पाहीं ॥८६॥
नातरी साधूंसी नाहीं  आशा । द्रव्याची अणुमात्र निश्रयें मानसा । जरी घेतला भक्तांचा पैसा । न करिती दुरुपयोग तयाचा ते ॥८७॥
सत्कार्यासी घालिती पाहीं । दानधर्म करिती सर्वही । म्हणोनि साधूंसी देतां न होई । अणुमात्र व्यर्थ तें द्रव्य ॥८८॥
असो मग सारुनी पूजा । भिक्षा वाढली सद्गुरुराजा । स्वीकारिली तेव्हां ती सहजा । सद्गुरुनाथें बहु प्रेमें ॥८९॥
जाहला आनंद सकलांसी थोर । घेती प्रसाद भिक्षेचा समग्र । पाक जाहला परम रुचिकर । बघुनी चिम्मित सर्वही ॥९०॥
काय महिमा गुरुरायाची । उपजल्यापासुनी न देखेंचि । इतुकी गोडी स्वयंपाकाची । म्हणोनि बोलती परस्पर ॥९१॥
असो मग स्वामींनी एक । दिवस ठेवुनी घेतलें देख । केला उत्सव परम सुरेख । भक्तिप्रेमें तयानें पैं ॥९२॥
भक्तीवांचुनी उत्सवासी । कराया द्रव्य ना त्यापाशीं । परी तो उत्सव सद्गुरूसी । परम प्रिय जाहला ॥९३॥
करोनि प्रेमानें नामाचा गजर । आरती दाविली मनोहर । हाचि उत्सव त्याचा थोर । वाटे कनवाळू सद्गुरूतें ॥९४॥
असो मग त्या ब्राह्मणामी । गुरुकृपें तिसऱ्याचि दिवशीं । बोलावुनी नेला परगांवासी । एका धनाढ्य पुरुषानें ॥९५॥
करविलीं कांहीं चित्रे सुंदर । दिधलें बक्षिस महाथोर । कार्य बघुनी याचें सुकुमार । धनाढ्य पुरुषें त्यालागीं ॥९६॥
सहस्र रुपये तबकीं भरोनि । दिधले तयासी जवळी आणुनि । येरु बोले मजलागोनि । इतुके रुपये कासया ॥९७॥
तेव्हां तो धनाढ्य पुरुष । म्हणे हें मीं तुजला बक्षिस । दिधलें पाहुनी कार्यसाहस । घ्यावेंचि त्वां हें प्रेमानें ॥९८॥
मग तो रुपये घेउनी ग्रामीं । आला शंकराश्रम - सद्गुरुस्वामी । यांचें दरुशन घेउनी म्हणे मी । करितों पूजा आजि पैं ॥९९॥
ऐसें म्हणोनि पाद्यपूजा । करूनि अर्पिलें सद्गुरुराजा । म्हणे आपुलेंचि द्रव्य हें समजा । घ्यावें दयाळा गुरुराया ॥१००॥
मग काय केलें गुरुरायें । त्यांतील घेऊनि पांच रुपये । प्रेमभरें  सदय - हृदयें । उरलें सकलही दिलें तया ॥१०१॥
म्हणती प्रमाद हा तुजला । दिला तो घेउनी जाय गृहाला । ऐसी आमुची आज्ञा निर्मला । करीं मान्य तूं बापा ॥१०२॥
मग तो गेला गृहालागुनी । सांग वार्ता पत्नीच्या कर्णीं । तेव्हां बोले त्याची पत्नी । गुरु-आज्ञेपरी वर्तावें ॥१०३॥
असो मग तो गुरुकृपें झणीं । प्रसिद्ध झाला साऱ्या अवनीं । जेथें तेथें त्यासी बोलावोनि । नेती चित्रें करावया ॥१०४॥
तेणें तो झाला बहु श्रीमंत । तेव्हां पुनरपि श्रीसद्गुरूप्रत । सदनीं नेउनी उत्सव करीत । परम थाटानें त्या काळीं ॥१०५॥
सगुरुकृपा जरी होय । तरी तयासी उणीव ती काय । गुरूसी देतां शतपट होय । हें सांगाया नलगेचि ॥१०६॥
तया चित्रकारें स्वामींसी काणिक । चार आणे भक्तीनें देख । अर्पितां तो परम भाविक । किती लाभ पावला पहा ॥१०७॥
त्याची भक्ति निष्काम खास । अणुमात्र कामना नव्हती तयास । म्हणोनि तयासी सद्गुरु महेश । पावला पाहुनी भक्तीतें ॥१०८॥
असो आतां सद्गुरुनाथ । लीला तयांची अगाध बहुत । निर्धनासी केले धनवंत । निजकृपेने हो पाहीं ॥१०९॥
पुढील अध्यायी सद्गुरुस्वामी । यांचे गमन आपुल्या धामीं । जन लाविले निजधर्मीं । बोधानि देह झिजविला ॥११०॥
सद्गुरु स्वामी - आनंदाश्रम। शिवानंदतीर्थ एकनि ब्रह्म । यांच्या कृपाप्रसादें नवम । अध्याय गुरुदासें संपविला ॥१११॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां लाभे गुरुकृपा थोर । नवमाध्याय रसाळ हा ॥११२॥
अध्याय ॥९॥
ओंव्या ॥११२॥
ॐ तत्सत्-श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥   
॥ इति नवमोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 19, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP