प्रथम नमन करु गणराजा ॥ वंदू ते सारजा हो वेदमाता ॥१॥
वेदमाता शक्ती गुरु योगिराजा ॥ लागतसे पाया हो कर जोडुनी ॥२॥
कर जोडुनि तुज केलेसें नमन ॥ देई वरदान हो अखंडित ॥३॥
अखंडित ध्यानी चिंतली गणराजा ॥ प्रगट सहज हो भक्ति योगे ॥४॥
भक्ति योगीं देव धरावा अंतरी ॥ बाह्य अभ्यंतरी हो एकभावे ॥५॥
एकभाव चित्ती मानसि संकल्प ॥ न करावा विकल्प हो भजनासि ॥६॥
भजन केलिया चुकतिल यमपाश ॥ ह्मणुनिया गणेश हो साहाकारी ॥७॥
साहाकारी होउनि दुष्ट निर्दाळिले ॥ जडजीव तारिले हो कलियूगी ॥८॥
कलियुगा युगी अवतार धरीला ॥ रहीवास केला हो मयुरक्षेत्री ॥९॥
मयुरक्षेत्रस्थळ पुराण प्रसीद्ध ॥ ऐसी वेद शास्त्रे हो बोलताती ॥१०॥
बोलती पुराणे प्रसिद्ध गणराजा ॥ शंकरासि सहज हो ध्यान तूझे ॥११॥
ध्यान निरंतर करिती सुरवर ॥ आणिक ऋषेश्वर हो मोक्षालागी ॥१२॥
मोक्षपद दाता उदार त्रयलोकीं ॥ पुरवी कौतुक हो मनोरथ ॥१३॥
मनोरथ सिद्धि चालवि आवलिला व्यापक सकळा हो देवा माजी ॥१४॥
देवा माजी देव विघ्नेश निधान ॥ यातायती जाण हो चुकवील ॥१५॥
चुकवील याती सत्य माना चिती ॥ द्वैतभाव चिंती हो नको धरु ॥१६॥
नको धरु प्राणिया पाप्याच्या संगति ॥ शरण गणपती हो जाई वेगी ॥१७॥
वेगी मोरेश्वर पाहे बा लोचनी ॥ मयूरवुर पट्टणी हो एकरुप ॥१८॥
एकरुप योगि मोरया गोसावी ॥ देवभक्त पाहे हो एकरुप ॥१९॥