मयुरपूर गांवीं रहिवास धरिला ॥ थोर भाग्य याचें जन उद्धरिला ॥
तया ठायासीं जा रे एक भावें ॥ देह अहंकार टाकूनियां धावें ॥१॥
येईं येईं तूं येई मोरेश्वरा ॥ तुजवीण नाहीं रे भक्त साहाकारी ॥धृ०॥
वाट वत्स जैसी धेनुची पाहाती ॥ तैसी आस तुझी लागली गणपती ॥
तनुमन ध्यान लावारे चरणीं ॥ फुकासाठीं तुह्मा सांपडली झणीं ॥२॥
सावध होऊनियां जावें तया ठायां ॥ मागील वासना टाका तुह्मी माया ॥
माय नको धरुं विषय सुखाची ॥ तेणें हीत कांहीं नोव्हे तुमचें जाणा ॥३॥
अंतःकाळीं तुज नयेती रे कामा ॥ शरण जाईं एका मोरयाच्या नामा ॥
भव बंधन कोण चुकवील ॥ देह अंतीं तुज कोण सोडवील ॥४॥
म्हणोनी धांवा धांवी करा संसाराची ॥ जोडी करा एका मोरया नामाची ॥
व्यर्थ म्हणसील तूं माझें माझें प्राण्यां ॥ सर्वही टाकूनीयां जाशील अज्ञाना ॥५॥
सकळीक राहातील आपुलाले ठाईं ॥ तेथें तुज कोण सोडविता आहे ॥
म्हणोनी धरा तुह्मी मोरयाची सोयी ॥ हीत कांहीं तुह्मी विचारारे देहीं ॥६॥
विनवी दास म्हणें चिंतामणी ॥ गर्भवासीं देवा शीणलों मी बहु भारी ॥
चरणा (पाया) पासून तूं न करीं मज दूरी ॥ ह्मणोनी चरण तूझे धरिले दृढ भारीं ॥७॥येई०