मयुरपूर क्षेत्रीं एक आहे दाता ॥ तेथें चला जाउं आतां रे ॥
दृढ भजन तूह्मी करा लवकरी ॥चुकविल तो संसारीं रे ॥
एकभाव धरुनि कामना टाकुनि पहा तया गणपती रे ॥
धाऊनी जाउं तयाच्या ठायां तेथें (नांदे) घेई विसावा रे खेळया ॥१॥
तुष्टेल तो देईल बहुत होईल प्राण्या तुझें हित रे ॥
दुष्टपणाचि होईल धुणी न करिसी तप दान व्रत रे ॥
न करावा सोस प्राण्या मायेच्या फुकट पडसील फाशा रे ॥
तुझेंच हित सांगतों बापा मोरेश्वर ध्याई आतां रे खेळया ॥२॥
नामाविण तुज कसें कर्मतें दिवस गेले तुझे व्यर्थ रे ॥
मी तूं पणाची करावी सांडी काम क्रोध नाडिले रे ॥
देह अहंकार टाका लवकरी याचा संग नका धरु रे ॥
याचेनें संगे होईल पतन म्हणूनी टाकी निरसून रे खेळया ॥३॥
मनोवृत्ति तुझी होती चंचल काय त्वां विचारिलें हित रे ॥
विचारी मना कोठूनी आलों कुठवर आहे जाणें रे ॥
ऐसा विचार तूं विचारी मना त्वरित ध्यांई गजानना रे ॥
तयाचें भजन तुम्ही करा लवकरी संसार तुमचा तारि रे खेळया ॥४॥
भाद्रपदमासीं जाऊं यात्रेसीं ॥ शरण जाऊं विघ्नेशीं रे ॥
विघ्नेश भजन ज्या प्राण्या घडलें ॥ तयाचें सार्थक झालें रे ॥
भजना तुम्ही अंतर न करावा संसार तुमचा नोव्हे रे ॥
चिंतामणी ह्मणें मज जोडी झाली गणराज पाऊलें रे ॥ खेळया ॥५॥