किती करसी मना अटाअटी ॥ व्यर्थ भोगिसी दुर्घट ॥१॥
व्यर्थ कां रे भ्रमलासी ॥ भजे मोरया पायांसी ॥धृ०॥
तूं ह्मणसील पुत्र कलत्र माझें ॥ हेचि नोव्हेती रे तूझें ॥२॥
ऐसें जाणतां तूं होसी मूर्ख ॥ दृढ धरी तूं विवेक ॥३॥
गेले कल्प आयुष्याचे ॥ चरण धरी मोरयाचे ॥४॥
न धरी द्रव्याची वासना ॥ सांडी मायेचें पडळ ॥५॥
जिहीं सांचिलें द्रव्य अपार ॥ त्यासीं पडली वेरझार ॥६॥
मना सांडी सांडी विषयाची गोडी ॥ आयुष्य जाय घडोघडी ॥७॥
वेंचिल्या द्रव्याच्या कोटी ॥ आयुष्य न ये क्षणभरी ॥८॥
ऐसें आयुष्य आहे अमोलीक ॥ व्यर्थ जाऊं न देअ पळ एक ॥९॥
बहुत संसारीं आहेत कष्ट ॥ चरणीं ठेवी मज निकट ॥१०॥
विनवी दास चिंतामणी ॥ पुरली संसाराची झणी ॥
व्यर्थ कां रे भ्रमलासी ॥ भजे मोरया पायासीं ॥११॥