गजानन माझा आहे मोरेश्वरीं ॥
तोचि तो पाहिला हो आजि डोळां ॥१॥
आहो भाद्रपद मास शुद्ध चतुर्थिसीं ॥
आनंदले भक्त हो येति तेथें ॥२॥
आहो त्या भक्तामाजी मोरया गोसावी ॥
आणिक दुसरा हो भक्त नाहीं ॥३॥
आहो देव भक्त तोही एकची हो जाणा ॥
हें गुह्य कवणा हो कळेना हो ॥४॥
आहो चिंतामणी देव तैसें तेंही रुप ॥
त्यासी तुचि भेद हो नाहीं जाणा ॥५॥
आहो आनंदें गर्जती मोरया ह्मणती ॥
यात्रेसीं हो जाती हो भाद्रपदीं ॥६॥
आहो भाद्रपद मास शुद्ध हाचि पक्ष ॥
चतुर्थिसी थोर हो आनंद हो ॥७॥
आहो ब्रह्मादिक देव शीव विष्णु तेही ॥
सकळीक येती हो आजि तेथें ॥८॥
आहो मोरया गोसावी चिंचवडीं आहे ॥
प्रतिमासीं जांई हो मोरेश्वरा ॥९॥
आहो यात्रेचा आनंद न माये गगनीं ॥
देव भक्त पाहे हो आजि डोळां ॥१०॥
आहो देव भक्त तेही तेथेंचि पहावे ॥
आनंदें गर्जती हो मोरया हो ॥११॥
आहो ऐसें तेंचि सुख चिंतामणी मागे ॥
समर्था तूं देंई हो क्षणमात्रें ॥१२॥