खंड १ - अध्याय १
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ ॐ नमः श्रीस्वानंदेशगणेशाय पूर्णयोगात्मने ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ अथ श्रीमन्मौद्गलपुराणप्राकृतानुवादप्रारंभ ॥
ॐ नमोजी गणपती । तैसी वाग्देवता सरस्वती ॥ तयांच्या कृपेने मन्मती । ग्रन्थानुवादीं दृढ होवो ॥१॥
गणेश गुरु माझे पिता । सरस्वती माझी माता । त्यांच्या पदकमलीं स्वचित्ता । सीताराम अर्पितसे ॥२॥
मुद्गलपुराण महासागर । माझी मती त्यापुढे पामर । सरस्वती गणेश वरद कर । ठेवोनि मजला तारितील ॥३॥
श्रीगणेश योगीन्द्रां नमून । भाष्य त्यांचें अभ्यासून । पुराण हें परम पावन । ओवीबद्ध करीतसें ॥४॥
सकल कवींसी माझें नमन । साधुसंतांसी वंदन । तैसें भाविकां भक्तां नमून । ग्रंथारंभ करीतसें ॥५॥
मुद्गलपुराणीं नवखंड । पहिल्या खंडीं वक्रतुंड । स्तविलासे जो उदंड । सुख शांति देई भक्तांसी ॥६॥
प्रथमखंडी अध्याय चौपन्न । वक्रतुंडचरित्राचें त्यात वर्णन । प्रथमाध्यायीं शोभन । शौनकसूत संवाद असे ॥७॥
प्रारंभीं गणेशाचें स्तवन । योगरुपाचें त्याच्या मनन । पुराणकर्ते करिती विवेचन । योगीशाच्या स्वरुपाचे ॥८॥
वेदांतीं जो स्तविला । सिद्धिबुद्धींचा ईश त्याला ॥ स्वनगर संरक्षकाला । योगीपददात्यासि त्या नमितो ॥९॥
दीनोद्धरणीं परम रत । सर्वजनहृदयीं जो स्थित । हरिहररविरुपें घेत । तयासी नमिता प्रज्ञा लाभे ॥१०॥
तैसेंचि मुनिश्रेष्ठा मुद्गला ॥ नमोनि अनुवाद आरंभिला । गणेशकृपा लाभण्याला । भाविकहो तुम्ही श्रवण करा ॥११॥
मुद्गल पुराणाचा अर्थ । प्राकृतीं कथितों परमार्थ । असतां पुराणें बहु किमर्थ । पुराण नूतन हें लिहिलें ॥१२॥
शिवविष्णू ब्रह्मदिपर । असती पुराणे अपार । परी मुद्गल पुराणीं रहस्य थोर । कोणतें तें परिसावें ॥१३॥
महावाक्यात प्रतिपादित । गणेशतत्त्व अमूर्त असत । गणेश अवयवधारी होत । हें कैसें शक्य झालें ॥१४॥
संशय ऐसा दूर करावा । तत्पदीं गजरुप पहावा । त्वंपदीं नर शोधावा । त्यांचा अभेद गणेशदेहीं ॥१५॥
जरी गणेश सावयव । तरी उत्पत्ति नाशादि भाव । त्यांचा असे अभाव । गणेशरुपी सर्वथा ॥१६॥
गणेश हा उपास्य असे । उपासकभावें तोचि विलसे । गणेशसायुज्य लाभतसे । उपासकातें निश्चयें ॥१७॥
कोणी पुराणपुरुष प्रथम । ध्यानात्मक मंगल गाई उत्तम । अखंड ध्यातों मी नाम । त्या गणेश ब्रह्माचें ॥१८॥
ऐकावें गणेश ब्रह्माचें महिमान । सर्वजन तारक साधन । पुराणपुरुषें केलें ध्यान । तें ऐकावें श्रोतृवृंदे ॥१९॥
सर्व सिद्धिदाता गणेश । ध्यायिला स्थिरमनें बुद्धिप्रकाश । योग्यांच्या हृदयीं जो ईश । विलसत असे सर्वदा ॥२०॥
अन्नप्राणादि उपाधियुक्त । नानारुपें ब्रह्म प्रकटत । तें सर्व जिंकूनि दावित । प्रभाव आपुला गजानन ॥२१॥
कंठाखालीं नराकृती । मुख कुंजराचें त्यावरती । सगुण निर्गुण दिसती । उभयरुपें देवाचीं ॥२२॥
भक्तांच्या रक्षणासाठी । अवतार घेती जगजेठी । निर्गुण असोनि सगुण दृष्टी । नाना भेद धारण करी ॥२३॥
नमन असो त्या गणेशाला । नरकुंजर रुप धराला । नररुपें जो सगुण झाला । गजमुख अंशें निर्गुण ॥२४॥
शिवरुपधरासी नमन । शांतस्वरुपासी वंदन । प्रभविष्णुरुपा प्रणाम लीन। विष्णुरुपधारकासी ॥२५॥
सूर्यशक्ती ज्याचें रुप । सदसदादी चत्वार रुप । विभाग करी आत्मस्वरुप । गणेशा त्या नमस्कार ॥२६॥
ब्रह्म शेषनाग नर । नारायणादी रुपधर । भावपूर्ण मी विनम्र । पुराणपुरुषा वंदितसे ॥२७॥
पुराणांचे ज्ञान व्हावें । रहस्य त्यांचें उमजावें । म्हणोनि शरण मी मनोभावें । देवां योगी महर्षींना ॥२८॥
शौनकादी विप्रजन । पूर्वीं कलिदोषभयें उन्मन । नैमिषारण्या वसतिस्थान । करिती आपुलें ते सकळ ॥२९॥
ब्रह्मदेवाच्या उपदेशांतून । आश्रयस्थान तें जाणून । मुनिधर्माचें आचरण । निर्विघ्न करिती त्या स्थानीं ॥३०॥
कलिदोषदाहक पुण्यप्रद । पुराण श्रवण असे विशद । नित्यनेमे करिती सुखद । जैसें कथिलें विधात्यानें ॥३१॥
एके दिनीं लोमहर्षणसूत । मुनींस भेटण्या आला अवचित । विचक्षण जो जाणत । पुराणग्रंथांचे सार ॥३२॥
नैमिषारण्यीं प्रवेश करित । शोभा तेथील पाहुनी विस्मित । म्हणे धन्य हें कलिदोषवर्जित । महा अरण्य हें सुंदर ॥३३॥
त्यानें पाहिलें प्रसन्नानन । मुनी जे धार्मिक उदार मन । स्वधर्माचरणीं जे निमग्न । नित्यनैमित्तिक कर्मे करिती ॥३४॥
मुनी जे पंचयज्ञ रत । वेदाध्ययनीं पारंगत । ब्रह्मानें जे असती युक्त । ज्वलंत अग्नीसम तेजें ॥३५॥
अस्त न पावती ऐसे रवी । शौनकादि महर्षी दैवी । तारक सर्वजनांस भवीं । अलंकार भूमंडळींचे ॥३६॥
महाभाग रोमहर्षणसूत । त्या सर्वांसी प्रणाम करित । मान लववूनि विधियुक्त । ओंजळ जोडी करांची ॥३७॥
सूत नंतर बोले वचन । मधुर स्वरानें विनवून । आदरभाव प्रकट करुन । मुनींप्रती त्या समयीं ॥३८॥
म्हणे माझा वंश धन्य । मातपितरें कुळ धन्य । विद्या व्रत तप धन्य । ज्ञान जीवन धन्य सारें ॥३९॥
मुनीश्वरांनो दर्शन । आपुल्या चरणकमळांचे पावन । जेणें अशुभ विनाशन । होय तत्काळ ऐसा महिमा ॥४०॥
देवगण मनीं इच्छिती । तुमचें पवित्र दर्शन जगतीं । भाग्यवंत तेचि लाधती । दृढ माझा हा विश्वास ॥४१॥
ब्रह्मवेत्ते ब्राह्मण जगतीं । साक्षात् ब्रह्मरुप असती । ज्यांच्या दर्शनमात्रें होती । कृतकृत्य प्राणिमात्र ॥४२॥
कृतार्थ झालों मी निश्चित । त्रिवार ऐसें सांगत । भवसागरीं झालों मुक्त । तुमच्या दर्शनमात्रें मी ॥४३॥
त्या रोमहर्षणसूतास । ब्राह्मण विनविती सोल्हास । होतें भक्तिपूर्ण मानस । त्या सर्व तपोजनांचें ॥४४॥
तुझिया दर्शनमात्रें प्रसन्न । आम्हीं झालों मुदित मन । व्हावें आसनीं विराजमान । उपकृत आम्हां करावें ॥४५॥
मुनींत जो श्रेष्ठ संत । शौनक नामा ऋषिवर्य असत । तो भृगुश्रेष्ठ विनवीत । आसनीं सूत बैसतां ॥४६॥
महाभागा आराधिला । कृष्णद्वैपायन तुम्हीं भला । अवतार जणूं तो झाला । नारायणाचा प्रत्यक्ष ॥४७॥
वेदव्यास मुनिकृत । वेदविभाग विख्यात । पुराणें समस्त ते रचित । त्यांचें उच्छिष्ट जग सारें ॥४८॥
तुम्हीं त्यांचे शिष्यवर । सर्वज्ञ तैसेचि सुखकर । म्हणोनि जाणसी समग्र । इतिहास तैशीं पुराणें तूं ॥४९॥
पुण्यवर्धना सर्वज्ञता ॥ प्राप्त झाली तुज आतां । कलिकल्मष पापग्रस्तां । सांप्रत आम्हां रक्षावें ॥५०॥
स्वायंभुवाची आज्ञा पालन । करितो आम्हीं वनीं राहुन । येथें धर्माचें परिपालन । यथाशक्ति करीतसों ॥५१॥
आमुच्या महद्भाग्यें करुन । पुराणप्रवक्ता पुण्यवर्धन । पुण्यवंत ऐसा तूं पावन । आलासि येथें सौख्यदाता ॥५२॥
जेथे पुराणांची गाथा । तेथें कलीची काय कथा । करुणा करोनि पुराणप्रथा । कथन करी लोमहर्षणा ॥५३॥
महासत्तमा तुझ्या दर्शनें । कृतार्थ झाली आमुची मनें । धन्य धन्य वाटे ज्यानें । ऐसें पुराण सांगावें ॥५४॥
सज्जनांचा शोक हरिसी । रोमहर्षक कथा तूं सांगसी । रोमहर्षण ऐशा नामासी । म्हणोनीच पावलासी ॥५५॥
शौनक महर्षी ऐसें विनवीत । तेणें सूत संतुष्ट चित्त । वचन बोले धर्मसंस्कृत । कृतकत्य मी आज झालो ॥५६॥
अनुग्रह तुमचा झाला थोर । स्मरलें मनीं पुराण समग्र । व्यासें कथिलें तें तें पुण्यकर । सांगेन तुम्हां मुनिजनांसी ॥५७॥
ऐसा आरंभ करुन । सूत करी पुराण वर्णन । सांगे अनेक कथा पावन । बहुसंख्य पुराणींच्या ॥५८॥
नाना आख्यानयुक्त । नाना धर्मसंस्कार सहित । पुराणें ऐसीं शुचितायुक्त । ऐकता दुःखे दूर होती ॥५९॥
सर्वार्थ साधन पुराणें । तैशीच सांगे उपपुराणें । इतिहासादी अनुक्रमें । पुरुषार्थप्रद पावन ॥६०॥
धर्मार्थकाममोक्षप्रद । ऐश्या कथा सुखद । ऐकूनि झालें विशद । हर्षयुक्त मन मुनींचें ॥६१॥
युग संपलें कथा न संपती । पुराणश्रवणीं आनंद अती । बहुविध मतांतरें ऐकती । म्हणोनि भरांती पडे त्यांना ॥६२॥
पुराणें इतिहास असंख्यात । उपपुराणें तैसीच बहुत । त्यांतील काय सर्व संमत । संशय ऐसा मनीं त्यांच्या ॥६३॥
म्हणोनि शौनक महामुनी । पुनरपि विनवी नमर होउनी । सूता संशय हरोनी । सत्य काय तें सांगावें ॥६४॥
ऐकोनि पुराणें अनेक । तैसीच उपपुराणें रंजक । इतिहास कथा मनोवेधक । भरांती उपजली मानसीं ॥६५॥
हें श्रेष्ठ हें कनिष्ठ ऐसें । सांगितलें तुम्ही बहुतसें । भिन्न भिन्न मतें तरी कैसे । सार आम्ही उमजावें? ॥६६॥
महाभागा कृपा करी । तेजयुक्ता तू कथन करी । सत्य तत्त्व काय तें सत्वरीं । जेणें चित्ती समाधान ॥६७॥
काहीं पुराणीं श्रेष्ठ शंकर । काहींत विष्णू होय थोर । काहींत शक्तीसी मान अपार । काहीं स्तविती गणेशातें ॥६८॥
कोणी इंद्र वा कुबेर मानिती । कोणी अग्नीसी पूजिती । कोणी नारायणा स्मरती । श्रेष्ठ ऐसीं मतांतरें ॥६९॥
कोणी सांगती ज्ञानयोग । कोणी प्रशंसिती कर्मयोग । आत्मा म्हणजे अन्न चांग । ऐसें कोणी सांगती ॥७०॥
एकदां कथिलें सांख्यमत । अन्यत्र स्वानंदवर्णन असत । म्हणोनि निश्चय नसे होत । तत्त्वाविषयीं मानसीं ॥७१॥
तरी आतां कृप करुन । संशय सारा हरुन । सर्वसंमत एक पुराण महान । वेदशास्त्रस्तुत सांगावें ॥७२॥
विनंती ऐसी ऐकून । सूत करी मनात चिंतन । व्यासांचा तो शिष्य महान । काय आतां वर्णावें ॥७३॥
श्रुतिस्मृतींचे सार । पवित्र तैसें मोक्षकर । आठवलें त्यासी संशयहर । श्रीमत् मुद्गल पुराण मनोहर ॥७४॥
सूत म्हणे श्रवण करा । मुनिजन हो संशया हरा । मुद्गलोक्त कथासारा । श्रुतिस्मृतींना जें मान्य ॥७५॥
आतां ऐकावी कथा सुरस । जेणें होईल भरमनिरास । हरील जी तापत्रयांस । मोक्षप्राप्ती होय जेणें ॥७६॥
पूर्वी दक्षयज्ञाचा विध्वंस । रुद्रगणें केला त्या क्षणास । होवोनि फार सायास । पराभूते देव झाले ॥७७॥
यज्ञांत आलें विघ्न थोर । वीरभद्रें छेदिलें दक्षशिर । धावे विध्वंस कराया उग्र । सर्व विश्वाचा त्या वेळी ॥७८॥
ब्रह्मदेव तेथें येऊन । महाप्रयासें करी सांत्वन । तेव्हां शंकरें कृपा करुन । जीवित केलें दक्षासी ॥७९॥
जीवदान मिळतां शोकार्त । यज्ञविध्वंसा पाहूनि होत । शापप्रभावे मोहित । दक्ष तेव्हां जाहला ॥८०॥
अज्ञान आवरण युक्त । त्यासी पडली मग भरान्त । तेव्हां तेथें भाग्यें येत । मुद्गल नामा महामुनी ॥८१॥
वेदशास्त्रार्थ तत्त्व ज्ञात । योगींद्र जणूं तो सूर्य उदित । भगवान मुद्गल भक्ति करीत । सर्वदा श्री गणेशाची ॥८२॥
सर्ववंद्य महायश । तपकर्यादींचा विधिज्ञ विशेष । गणेशभक्तांत अशेष । श्रेष्ठ कृति महती ज्याची ॥८३॥
त्याचें होतां आगमन । दक्ष आदरें सत्कार करुन । करी विन्म्रभावें नमन । आसनादी तया देई ॥८४॥
पंचोपचारें पूजा करुन । दक्ष प्रार्थी कर जोडून । भगवन् अंगिरा दुःख शमवून । जडभूता मज रक्षी तूं ॥८५॥
यज्ञविध्वंस जाहला । मनीं शोक माझ्या दाटला । उद्धरी आतां या जीवाला । कृपा करुनि दयाळा ॥८६॥
तेव्हां म्हणती मुद्गलमुनी । चिंता करुं नको मनीं । प्रजापालेन्द्रा दक्षा जीवनीं । विघ्नराजाचें स्मरण करी ॥८७॥
जो करी विघ्नराजपूजन । त्यासी जीवनीं काय न्यून । अति दुर्लभही सुलभ होऊन । सर्व सुखें प्राप्त होती ॥८८॥
ऐशा ह्या मुदगल पुराणांत । वेदपुराण मेरुमणींत । प्रथम खंडीं वक्रतुंड चरित । प्रथमाध्याय गोड हा ॥८९॥
इति श्री ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते शौनकसूतसंवादो नाम प्रथमोध्यायः समाप्तः । श्री गजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP