खंड १ - अध्याय ३५
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशानमः । परस्परांसी क्रोधयुक्त । महाबल जरी मारित । तरी कोणासी जय न लाभत । आश्चर्य ऐसें घडें तेव्हां ॥१॥
मुद्गल ऐसी कथा सांगती । आदरेंम ऐके दक्षप्रजापती । प्रल्हाद जाहला कुद्ध अती । बाणवृष्टी करी तेव्हां ॥२॥
अनलस्त्रानें अभिअमंत्रित । बाण तेव्हां बहु सोडित । महाअग्नि देव सैन्यात । उदभवला प्रलयानलासम ॥३॥
देवसेना जळूं लागली । असुरांची चित्तें तोषलीं । रणभूमी सोडून पळाली । देवसेना अग्निदग्ध ॥४॥
प्रचंड आण शत्रुसैन्यांत । प्रल्हाद ऐसी पसरवित । त्यामध्यें वाहनांसहित । जळूं लागले देववीर ॥५॥
दैत्य गण प्रल्हादा पूजिती । कार्य त्याचें अभिनंदिती । देवांचा नाश पाहून म्हणती । ‘वाहवा सुंदर फळ मिळालें’ ॥६॥
देवांची दैना पाहून । इंद्र आला सरसावून । मेघास्त्र अभिमंत्रून । धनुष्यावरी स्थापिलें ॥७॥
परी प्रल्हाद अति त्वरित । खड्गानें इंद्रधनु तोडित । तेव्हां त्याच्यावर टाकित । इंद्र क्रोधें वजर आपुलें ॥८॥
वजराचा महिमा अघटित । त्यानें प्रल्हाद विद्ध होत । रणभूमींत तो पडत । महावीर विकलांग ॥९॥
तेव्हां महिषासुर धावला । त्यानें इंद्रमस्तकीं प्रहार केला । आपुल्या गदेचा, मर्मभेदी जो ठरला । इंद्र पडला रणांगणीं ॥१०॥
देवेंद्र झाला मूर्च्छित । तोंडांतुनी रक्त ओकित । तेव्हां अग्नि देव कुद्ध होत । जाळण्या गेला महिषासुराला ॥११॥
महिषासुर जळरुप होत । अग्निज्वाळा शमवीत । तेव्हा एक अद्भुत शक्ती सोडित । अग्निदेव महिषावर ॥१२॥
आपुल्या तलवारीनें छेदित । ती शक्ती महिष क्षणांत । महिषरुपें शिंगांनी मारित । तेजोनिधी अग्निदेवासी ॥१३॥
अग्निदेव रणांत पडत । तेव्हां यमदेव सरसावत । दंडाघातें आपुल्या ताडित । महिषासुरा मस्तकावरी ॥१४॥
तो भयदायक असुर । पडता मूर्च्छित रणांगणावर । प्रतापी विरोचन उग्र । यमास मारी खड्गानें ॥१५॥
यम खड्गाघातें कोसळत । तेव्हां वरुण आपले पाश टाकित । विरोचनासी बद्ध करित । अंधक तेव्हां धावला ॥१६॥
अंधकें मोडिले विरोचनाचे पाश । गदघातें करण्या वरुणाचा नाश । युद्धभूमिवरती पडता त्वेष । वायुकुबेरासी आला ॥१७॥
दोघांनीं त्या प्रयत्न केला । वायूनें अंधकावारी वार केला । अंधकासुर अमिततेज पडला । खड्गाघातें धरणीवरी ॥१८॥
तेव्हां शंबर मुसळें मारित । वायू मूर्च्छित पडत । जो सर्वाधार जीवनदायी असत । तोवि झाला बेशुद्ध ॥१९॥
विरोचनही सावध होऊन । धनरक्षक कुबेरावरी गेला धावून । बाणौघ त्यावरती सोडून । मर्मस्थानीं हाणी तया ॥२०॥
कुबेरही रणांगणीं कोसळला । तेव्हां विष्णु तेथ आला । विरोचनासी । ताडिता झाला । गदाप्रहर करुनिया ॥२१॥
चक्रधराने छाती फोडून । मृततृल्य अंधकासीही करुन । बाणजाळ सोडून । शंबरास भूवरी पाडविलें ॥२२॥
आपुलें दारुणचक्र माधव । सोडून मारी दैत्यां केशव । कांहींस गदाघातें ठाव । दावीतसे मृत्यूसदनाचा ॥२३॥
तेवढ्यामाजी प्रल्हाद होत । सावधान क्रोधदापित । देवनाशी बाणवृष्टी तो करित । देव झाले छिन्नभिन्न ॥२४॥
देवदेवा केशवासह । गदायुद्ध करो सोत्साह । खड्ग मारुनी गरुडा दुःसह । मर्मभेदी प्रहार करी ॥२५॥
विष्णु त्यावरी चक्र सोडित । प्रल्हाद इतस्ततः धावत । बहुत दैत्यांची मस्तकें छेदित । बाहूउदर भुजही त्यांचे ॥२६॥
जेव्हां चक्र विष्णूचे प्रल्हादासमीप । तेजोमय जणू प्रदीप । जाळण्या गेलें देऊन ताप । तों त्यानें काय केलें ॥२७॥
धनुष्यावरी स्थापित । नारायणास्त्र त्वरित । जनार्दना मनांत स्मरत । सोडी शस्त्र अनिवार्य तें ॥२८॥
तेजोमय अमोघ भयंकर । जगताचे भस्म करण्या अधीर । नारायणास्त्रें विष्णुचक्र । झणीं प्रतिहत जाहलें ॥२९॥
तें महास्त्र सर्वत्र जाळित । अन्य देवांसी रणांत । हृदयीं प्रहार अवचित । करी विष्णुदेवाच्या तें ॥३०॥
जनार्दन रणीं मूर्छित । पडतां मदयुत । ओरडले हर्षसंयुत । प्रल्हादाची स्तुती करिती ॥३१॥
नारायणास्त्रें संदग्ध झाला । नारायण रणीं पडला । देवऋषि संघ झाला । व्याकुळ बहु मानसांत ॥३२॥
त्या वेळी शंकर क्षुभित । आपुलें पिनाक हाती घेत । देवरक्षार्थ धावत । पाशुपतास्त्र जोडी धनूवरी ॥३३॥
पाशुपत अस्त्र तें सुटत । नारायण अस्त्रावरी जात । उभय अस्त्रें त्वेषें लढत । देव मुनिगण पाहती ॥३४॥
ते सारे हर्षयुक्त होत । शंकरा महादेवा पूजित । पशुपति देव देव फेकित । कोधें त्रिशूळ दैत्यांवरी ॥३५॥
हजारों दैत्य मारिले । प्रल्हादाचे हृदय त्रिशूळें हाणिले । वाताहत वृक्षापरी कंपित झाले । महासुराचें सारे अंग ॥३६॥
प्रल्हाद रणांगणांत मूर्च्छित । पडला तेव्हां अवचित । कोलाहल दैत्य सैन्यांत । माजला अत्यंत त्या वेळीं ॥३७॥
त्रिशूळ वेगानें फिरत । तीक्ष्ण धार त्याई मारित । अनेक असुर तें पडत । शुद्ध हरपुनी भूमीवरी ॥३८॥
ऐसे समस्त असुर । पडले जेव्हां रणभूमवर । तेव्हां दोघे मत्सरपुत्र । क्रोधें धावले शंकाराप्रती ॥३९॥
सुंदरप्रिय विषयप्रिय । हृदयांत क्षुभित होते फार । शंकरासी बोलती उग्र । महाअसुर ते गर्वानें ॥४०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते शिवविजयो नाम पंचत्रिंशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP