मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ११

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ पार्वती म्हणे देवदेवेशा । माझ्या हृदयाच्या ईशा । सांगावें हो परेशा । कृपा करुनी मजलागी ॥१॥
वैराटानें स्थावरजंगम । कैसे रचिलें विश्व अनुपम । ध्यानमार्ग पुरातन अभिराम । जेणें गणेशकृपा लाभे ॥२॥
गणेश साक्षात्कार होत । जेणे निःसंशय या जगांत । त्या घ्यानमार्गाचें विस्तृत । वर्णन सांगा मजप्रती ॥३॥
मुद्‌गल कथाभाग सांगती । महादेवीचा प्रश्न ऐकती महादेव संतुष्ट होती । सांगती परमपुण्य कथा ॥४॥
दक्ष म्हणे गणेशकथा । ऐकून हरली माझी व्यथा । अन्तःकरणीं हर्ष सर्वथा । उत्पन्न झाला या वेळीं ॥५॥
तरी मुद्‌गला सांगावा मजला । शिवानें पार्वतीस सांगितला । तो कथाभाग पाहिजे श्रवण केला । तळमळ ऐसी मनाला ॥६॥
मुद्‌गल म्हणती धन्य अससी । गणेश कथामृतपान इच्छसी । आदरभावें प्रश्न करिसी । धन्य तूं एक संसारी ॥७॥
गिरिजेस प्रसन्न पाहून । शिवही तिजसी म्हणती वचन । धन्य तू महाभागे महान । मुळापासून ऐक तरी ॥८॥
गणेशाचें मनी ध्यान । करुन सृष्टिनिर्माण कार्य महान । प्रारंभिलें तेव्हां उत्पन्न । ब्रह्मा नाभींतून झाला ॥९॥
लोका पितामह निर्मिती । तदनंतर जगचालक विष्णूची उत्पत्ती । त्याच्या मुखांतून प्रीती । नेत्रांतून जन्मलों मी शंकर ॥१०॥
सृष्टीची उत्पत्ति स्थिति तैसा लय । आमुच्या त्रिरुपगुणें होय । त्या वैराटाच्या वामांगातून सावयव । पार्वती तू जन्मलीस ॥११॥
हे शक्ति मोहिनी उदित । सूर्य त्याच्या दक्षिणांगी त्वरित । साक्षात्कर्माधार जो होत । तैसेचि पंच देवही जन्मले ॥१२॥
ते भिन्न भिन्न स्वभावें नेणत । स्वतःसी तैसे वैराटा किंचित । अंधकारीं ते भटकत । बहुकाल प्रयासें ते खिन्न ॥१३॥
ते झाले परम दुःखित । कोठें जावे काय करावें अज्ञात । अज्ञानानें ते बहु आवृत । कोणापासून जन्मलों म्हणती ॥१४॥
त्या महाप्रभूस न जाणत । तेव्हां मानसी विचार येत । तप करावे सुनिश्चित । कोण मूलतत्त्व त्या नमन ॥१५॥
जे सर्वांचे मूलभूत । जैसे असेल ते असो पुनीत । त्यानें आत्मस्थित चिंतित । तप सुदारुण आचरिलें ॥१६॥
तेव्हां गणनाथ तुष्ट होत । तपानें त्यांच्या प्रकटात । पवित्र होऊन दृष्टी येत । हृदयीं स्फुरलें बीजरुप ॥१७॥
तें अद्‌भुत त्यांनी पाहिलें । एकाक्षर महामंत्रा लाधले । तेणें परम हर्ष पावले । त्या मंत्राचा जप करिती ॥१८॥
हे जगन्मये पार्वती । जेव्हां ते जो मंत्र जपती । त्या मंत्राच्या प्रभावें लाभती । सुनिर्मळ ऐसें ज्ञान ॥१९॥
दिव्य वर्षसहस्त्रें ऐसीं लोटत । तेव्हा भक्तिभावें संतुष्ट होत । गणेश त्यांच्या पुढे प्रकटात । तेजःपुंजरुपधारी ॥२०॥
अनंत कोटी सूर्यांचे ओजयुक्त । शुंडा दंड विराजित । चार बाहूधर विभूषित । लंबोदर स्वयं तो ॥२१॥
भूषण आयुधांनी युक्त । सिद्धि बुद्धि समन्वित । भक्तानंदकर महाद्युती दिसत । श्रीमान्‍ मूषकवाहन ॥२२॥
त्यासी पाहोन भयभीत । शंभुप्रमुख देव होत । काय हें प्रलयाग्नी सम अवचित । महातेज अवतरलें? ॥२३॥
हा कोण देव नकळे मात । आम्हांसी जाळील कीं त्वरित । हे विघ्नेशा करुणानिधे भक्त । आम्ही सारे तुझे जगीं ॥२४॥
तरी स्वामी विघ्न कां आलें । ऐसें त्यांनीं विनविलें । त्यांची प्रार्थना ऐकून घेतलें । सौम्यरुप गणेशानें ॥२५॥
तें सौम्य रुप पाहून हर्षित । सर्वही प्रणाम त्यासी करित । भावपूर्वक तेव्हां लाभत । गणेशदर्शनामुळें स्फूर्ती ॥२६॥
त्या महा अद्‌भुत शक्तीने ज्ञात । यथातथ्य तत्त्व मनांत । पंच देव ते आनंदित । स्तुति करिती गणेशाची ॥२७॥
भक्तिनमर मान लववून । काया रोमांचित होऊन । नयनीं आनंदाश्रू ओघळून । स्तुतिस्तोत्र तेव्हां तें गाती ॥२८॥
नमन विघ्नराजा तुला । विघ्नहर्त्या अभक्तां विघ्नकर्त्याला । गणेशाला हेरंबाला । ढुंढिराजा तुला सदा ॥२९॥
विनायका तुला नमन । ब्रह्मानायका देवा वंदन । लंबोदरा सिद्धेशा मनापासून । गजाननधरा प्रणाम ॥३०॥
शूर्पकर्णा गूढा चतुर्हस्ता । लंबौष्ठा सर्वेशा एकदंता । गणधिपा धरणीधरा आता । अनंत महिमाधरा नमन ॥३१॥
नमन मायामया तुला । तैसेचि मायाहीनाला । मोददात्या मोहहंत्याला । नमोनमः । पुनरपि ॥३२॥
अन्नासी अन्न पतीला नमन । अन्नान्नासी वंदन । प्राणासी प्राणनाथा नमन । वंदन प्राणरुपासी ॥३३॥
चित्तास चित्तहीनास । चित्तदात्यास विज्ञानास । विज्ञानपतीस द्वंद्वधारकास । नमन आमुचें पुनःपुन्हा ॥३४॥
विज्ञानासी स्वविज्ञान । देई त्यासी आमुचें नमन । आनंदा तुज वंदन । आनंदपते आनंददात्या ॥३५॥
कारणासी चैतन्यासी । तैसेची चेतनाधार कासी । चैतन्या स्वचैतन्यदात्यासी । नादरुपा नमस्कार ॥३६॥
बिंदुमात्रा बिंदुपतीस । प्राकृतासी भेदाभेदमयास । ज्योतीरुपास सोऽहंमात्रास । शून्यासी वंदन मनोभावें ॥३७॥
शून्यरुपा पुरुषास । ज्ञानास बोधनाथास । बोधासी बोध करणारास । मनोवाणीविहीनाला ॥३८॥
सर्वात्मकासी विदेहासी । विदेहधारका तुजसी । विदेहांच्या विदेहासी । नमोनमः भक्तिभावें ॥३९॥
सांख्यरुपा तुला नमन । नाना भेदधरा वंदन । अनेकादि मूर्तीस मनोमन । प्रणाम आमुचा करीतसों ॥४०॥
असत्तत्त्वानंदरुपास । शक्तिरुपा अमृतास । सदा अखंड भेदाभेदवर्जितास । सूर्यरुपधरा नमन ॥४१॥
नमन सदात्मरुपासी । सत्यासत्यविहीनासी । समस्वानंदमूर्तीसी । आनंदानंदकंदा नमन ॥४२॥
विष्णूस अव्यक्ता परेशास । नेतिनेतिमयास । शिवा शाश्वता मोहहीनास । स्वानंदा मौनभाव प्रदायीला ॥४३॥
संयोगें सर्वत्र समाधीस । रुपधारीस आयोगास । निरालंबस्वरुपा मायाहीनास । देवा असमाधी तुला नमन ॥४४॥
वंदन शांतिदात्यासी । पूर्ण शांतिप्रदात्यासी । योगपतीसी योगरुपासी । गणेशाला वंदन ॥४५॥
परेशाला अपारगुणकीर्तीला । योगशांतिप्रदात्याला । महायोगा वेदकारकाला । गुणांत ज्याचा अगम्य ॥४६॥
वेदांनींही केलें नमन । त्याचे कैसें करावें स्तवन । यथामति केलें गायन । महात्म्याचें गणेशाच्या ॥४७॥
ह्या स्तोत्रें चिंतामणि प्रसन्न । भगवान देव गजानन । होऊन त्राता आमुचा महान । परम गती आम्हां देवो ॥४८॥
ऐसें स्तोत्र हें गाऊन होत । तें पंच देवेश शान्त । हे पार्वती, गणेशही सुप्रीत । हृष्ट प्रसन्न त्यासी म्हणे ॥४९॥
पंचदेवांनो मी प्रसन्न । महाभागांनो तपें करुन । तुमच्या भक्तिभावें महान । वांछित वर मागावा ॥५०॥
आपण रचिलेलें हें स्तोत्र । परम आल्हादवर्धक पवित्र । माझ्या प्रीतीस सदा पात्र । भक्तीनें फलप्रद हें होय ॥५१॥
जो भावपूर्ण मनें हें वाचील । धर्मकामअर्थमोक्ष लाभेल । पुत्रपौत्रयुत तो नांदेल । अन्तीं स्वानंद तया प्राप्त ॥५२॥
एकवीस दिवस सातवेळ वाचितां । कारागृहांतून मुक्तता । प्रतिदिनीं एक दिन वा त्रिकाळ वाचितां । देवादिकां वंद्य होय ॥५३॥
एकवीस वेळां करितां पठन । दूर होय मारण उच्चाटन । एकवीस दिवस करितां वाचन । भयमुक्त जगीं होय ॥५४॥
धनध्यानदिक पशुसंपत्ती । सर्व आरोग्याची प्राप्ती । जो जें चिंतील स्वचितीं । तें तें लाभेल निश्चित ॥५५॥
शिव म्हणे पार्वतीला । ऐकून ऐशा गणेशवचनाला । विष्णूआदी देवसंघ जाहला । हृष्ट आपुल्या मानसीं ॥५६॥
प्रणाम करुन गणाधीशास । हात जोडून विनविती तयास । आज सनाथ जाहलों खास । प्रभू तुमच्या आगमनानें ॥५७॥
गणाधीशा वर देई । तुझी भवती दृढ होई । माया न बाधे भीती जाई । देव मानवा सर्वांची ॥५८॥
त्यासाठी काय करावें । तें प्रभो आज्ञापावें । सामर्थ्य विविध आम्हां द्यावें । भजकांसी कामपूरक ॥५९॥
सदानंद नाम दे स्थान । नाथा तुजला आमुचें नमन । तेव्हां गणेश बोले वचन । कर्तव्य सांगे देवांसी ॥६०॥
चतुर्मुखा महाबाहो रजोगुणउत्पन्ना । सृष्टिकर्ता हो तूं महामना । महाद्युते ब्रह्मा नामभिधाना । सत्यलोकीं निवास करी ॥६१॥
हंसवाहन तूं होशील । वेदादिज्ञान जाणशील । सर्वांचा पितामह ख्यात अमल । आदरणीय सर्व देवां ॥६२॥
देवा तू सत्त्वसमुद्भव । विष्णू नांवे आविर्भाव । चतुर्भुज तूं पालक भाव । जगताचा धारण करी ॥६३॥
तुझी वसती वैकुंठांत । गरुड वाहन तुझें ख्यात । नाना अवतारधारी बलयुक्त । ऐसें तुझें रुप होय ॥६४॥
हे पंचवक्त्रा तमोगुणसमुद्भवा । संहार तूं जगतीं करावा । हरनामें तेजोद्भवा । कैलास लोकीं वास तुझा ॥६५॥
वाहन वृषभ तुझें ख्यात होईल । तृतीय नेत्रें भस्म करशील । म्हणोनी जगीं तुज म्हणतील । महादेव सर्व लोक ॥६६॥
सहस्त्रकिरणां तूं सूर्य नावें ख्यात । षड्‌ ऋतुधर्मांचा चालक पुनीत । त्रिगुणांच्या अहंभावांतून संजात । कर्मचालक प्रकाशक ॥६७॥
रथ अश्वालंकृत वाहन । सौरलोकीं निवास करुन । ग्रहराज तूं प्रतापवान महान । वृष्टिकारक तेजोराशी ॥६८॥
चतुर्भुजे महाशक्ति तू संजात । त्रिदेहापासून प्रख्यात । नाना विषय भोगार्थ युक्त । संदेह मोहकारिणी ॥६९॥
शक्तिनामा महामाया होशील । भुक्तिमुक्तिभरम निर्मिशील । द्विधा मोहदात्री पावशील । सिंहवाहन शक्तिलोक ॥७०॥
शक्तिलोकीं राहून । नाना भोगाविमोहें करुन । जगासी तू मोहवून । कार्य आपुले करशील ॥७१॥
महाकार्य उत्पन्न होत । तेव्हां प्रत्यक्ष मीं प्रकटात । माझ्यासम केलें निश्चित । पंच देवांनो तुम्हांसी ॥७२॥
ऐसें सांगून पंचदेवांस देत । आयुधें भूषणें अद्‌भुत । श्रेष्ठ जी नाना सामर्थ्ययुक्त । संकल्प सिद्धता तैसीच ॥७३॥
शिव म्हणती पार्वती । ऐसे वरदान गणेश देती । नंतर अंतर्धान ते पावती । पंचदेव कृतकृत्य ॥७४॥
मानसीं आनंदित झाले । स्वतःसी धन्य मानिलें । भक्तिभावें भजता केले । परमेश्वर आम्हां गणेशानें ॥७५॥
त्या गणपाच्या प्रसादें प्राप्त । शक्ति सामर्थ चित्तांत । आमुचे मनोरथ पूर्ण होत । अधिकारपदही लाभलें ॥७६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते पंचदेववरप्रदानं नाम एकादशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP