खंड १ - अध्याय १३
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । शिव म्हणती पार्वती ऐकावी । पुढील पुण्य कथा बरवी । गणेशप्रीती जेणें वाढावी । ऐसें माहात्म्य तियेचें ॥१॥
विष्णूचें गर्वयुक्तवचन । पितामह ब्रह्मा ऐकून । म्हणे विष्णू तू माझा पालक महान । पाही माझा प्रभाव ॥२॥
वेदकर्ता भगवान ब्रह्मा म्हणत । माझ्या उदरीं प्रवेश करुन त्वरित । हे जगद्गुरो प्रभाव अनंत । अनुभवावा स्वयें तूं ॥३॥
ब्रह्मदेवाचें ऐकून वचन । शिरला त्याच्या उदरीं जनार्दन । योगीश योगमायें करुन । पाहिली ब्रह्मांडाची रचना ॥४॥
नानाविध परा रचना पाहत । नाभिकमलयुक्त स्वरुप अवलोकित । हृदयीं झाला मोहें विस्मित । म्हणे हे अद्भुत काय महा ॥५॥
त्या ब्रह्माडांचा अन्त । जेव्हां विष्णूस न लागत । तेव्हां देहामधून बाहेर पडत । प्रणाम करी विधीला ॥६॥
ब्रह्मदेवासी वंदन म्हणत । तव रुपाचा न कळे अंत । तुझ्या उदरीं प्रवेशता दिसत । प्रभाव तुझा ब्रह्मदेवा ॥७॥
तूं सर्वेश स्वप्रभावें निर्मिसी । चराचर या विश्वासी । जगद्गुरु पितामह अससी । ह्यांत संदेह ना उरला ॥८॥
आतां तूंही भगवंता । माझ्या उदरींची स्थिती आतां । प्रवेश करी योगेशा तत्त्वता । जाण माझ्याही प्रभावा ॥९॥
नारायणाचें ऐकतां वचन । ब्रह्मा झाला विस्मितमन । योगाच्या प्रभावें करुन । प्रवेशला उदरीं विष्णूच्या ॥१०॥
तेथ ब्रह्मदेव पहात । ब्रह्मांडे विविध लोकांसहित । अन्य ब्रह्मदेवही तेथ स्थित । पाहून विस्मित जाहला ॥११॥
ब्रह्मयासी न कळे अन्त । पहात राहिला तें अद्भुत । बाहेर पडण्या इच्छित । मार्त्ग त्याला दिसेना ॥१२॥
विष्णूनें मार्गावरण केलें । मायेनें दरवाजे बंद झाले । ब्रह्मदेवें त्या वेळीं अनुभविलें । अस्वास्थ्य अत्यंत मानसीं ॥१३॥
ब्रह्मा भटकत राहिला । परी मार्ग न सांपडला । तेव्हा विष्णूच्या नाभिकमळीं प्रवेशला । बाहेर पडण्या तत्पर ॥१४॥
त्या नाभिकमलाचा नाल तोडून । त्वरित बाहेर पडून । आपुल्या योगबळें सुटून । विष्णूस बोले रागानें ॥१५॥
मजला करुनी वश । स्वच्छंदे आपुल्या केलें विवश । परी योगमाया प्रभावें विनाश । केला कारावासाचा मी ॥१६॥
तू कां दारें बंद केलीस । ऐकून बोले त्याच्या वचनास । विष्णू महायश हासोनी खास । स्नेहयुक्त ऐशापरी ॥१७॥
जगद्गुरो तुज वश करावा । ऐसा विचारही मज न ठावा । केवळ क्रीडार्थ देखावा । दाखविला द्वारें बंद करुनी ॥१८॥
परस्परें प्रभाव जाणण्या करित । जें जें कौतुक तें क्षम्य होत । पितामहा अपराधाची मागत । क्षमा येथ मी विनम्रभावें ॥१९॥
तेव्हा ब्रह्मा प्रसन्नचित्त । म्हणे विष्णो मज न ज्ञात । गंमत केली तूं क्षणांत । जठरांत मज बंद करुनी ॥२०॥
अज्ञानें मी क्रोधयुक्त । अप्रिय भाषण केलें अनुचित । त्याची अता क्षमा मागत । अनन्त तुझी माया असे ॥२१॥
तुझिया जठरीं जेव्हां स्थित । तेव्हां नकळत त्याचा अंत । तूंच श्रेष्ठ गुरु साक्षात । यास संशय ना उरला ॥२२॥
आतां आपणा गर्व न वाटत । प्राज्ञ श्रेष्ठ सर्वेश्वर जगांत । परमेश हा सिद्धान्त । ऐसें ब्रह्मदेव बोलिला ॥२३॥
शंभू शक्ती सूर्य होत । तत्क्षणीं सारे गर्वयुक्त । स्मरणमात्रें ते कटत । क्रमें विधि विष्णू समोर ॥२४॥
प्रथम शूलधर शंकर प्राप्त । माझें स्मरण कां केलें म्हणत । तेव्हां हरि ब्रह्मा सांगत । ऐका शंकरा कारण ॥२५॥
तुझें ऐश्वर्य केवढें असते । तें सदाशिवा दाखवि त्वरित । तें ऐकून गर्वयुक्त । क्रोधें बोले शंकर ॥२६॥
मी तुम्हां उभयतांचा कर्ता । सर्वांचा मी संहारकर्ता । मजहून कोणी सर्व भावता । श्रेष्ठ नसे जगतांत ॥२७॥
ऐसें बोलून शंभू दाखवित । शरीर ज्योतीरुप जें असत । महालिंग रुपें संस्थित । सर्वत्र परम श्रेष्ठ जें ॥२८॥
तें पाहून विधि माधव विस्मित । खालीं वरतीं पुढयांत । पाठीमागें डावे उजवे संतत । अस्तित्व होतें जयाचें ॥२९॥
तेव्हां ब्रह्मा मधुर स्वरांत । म्हणे विष्णो तूं जाई तळांत । मी ऊर्ध्वभागीं जात । पाहूया अंत शिवाचा ॥३०॥
म्हणोनी आतां त्वरा करी । तेव्हा प्रार्थना करितो हरी । ब्रह्मदेवा वर देई सत्वरी । जेणें उत्साह वाढेल ॥३१॥
ब्रह्मदेव जाहला भरान्त । म्हणे वर माग तूं त्वरित । देईन जें जें तव वांछित । ह्यांत संदेह कांहीं नसे ॥३२॥
तेव्हा विष्णू बोले विधीप्रत । माझा तूं होई सुत । हें वरदान मी वांछित । पुरवावें आपण प्रीतीनें ॥३३॥
त्याचें तें वचन ऐकून । ब्रह्मदेव म्हणे विस्मित होऊन । फसविलें तूं मोहवून । सत्यवचन मी असे ॥३४॥
मी पुरवीन तव इच्छित । तुझा पुत्र होईन निश्चित । सृष्टि उत्पत्ती जेव्हां होत । नाभींतून कमळ उगवेल तव ॥३५॥
त्या कमळांत जन्मेन । तुझा आत्मज मी होईन । ऐशा प्रकारें पुरवीन । मनोरथ मी तुझा ॥३६॥
ऐसा वर लाभता हरी । ब्रह्मदेवा प्रणाम करी । शिवाच्या अंगीं प्रवेश करी । अधस्तात् पार जावया ॥३७॥
ब्रह्माही प्रवेशला त्वरित । ऊर्ध्वभागीं तो जात । परी शिवशरीराचा पार न लागत । पितामहा त्या वेळीं ॥३८॥
विष्णू शंकराचा पार न जाणत । तेव्हा विधीविष्णू परतत । दोन्ही जाहले खिन्न मनांत । शंकरस्तुती दोघे करिती ॥३९॥
हातांची ओंजळ जोडित । स्तोत्र गाती तेव्हां पुनीत । शंकरा तुज प्रणाम करीत । शूलपाणी तुज नमन ॥४०॥
रुद्रा कालरुपा नमन । त्र्यंबका उमापते तुज वंदन । तूं वृषभेश्वर । वाहन । आदिदेवा महादेवा ॥४१॥
हे शंभो प्रसाद करावा । तुझ्या शरीराचा अंत ना ठावा । कोणतें रुप स्वभाव जाणावा । हे सर्वथा समजेना ॥४२॥
आपुलें रुप देवा दाखवी । महेश्वरा तूं कृपा करावी । जनांस निर्भयता द्यावी । तुझ्या भजनें जगतांत ॥४३॥
त्यांची प्रार्थना ऐकत । शंभू आपले रुप दाखवित । डाव्या बाजूस विष्णू स्थित । उजवीकडे पितामह विधी ॥४४॥
चराचर विश्व होते संस्थित । पाहती तेव्हां शिवलिंगांत । त्याचा महिमा अगम्य असत । आदरें प्रणाम दोघे करिती ॥४५॥
म्हणती हें विश्वरुप आवरावें । तूंचि परम तत्त्व बरवें । आतां मूळचें रुप घ्यावें । विनविती विधी हरि शंभूला ॥४६॥
त्यांचीप्रार्थना ऐकून । शंकर तेव्हां होत प्रसन्न । पूर्वरुप धरी भगवान । वृषभध्वज तो जगत्प्रभू ॥४७॥
महादेव त्या दोघांसी म्हणत । वर मागा जो असेल ईप्सित । तुमच्या स्तोत्रें प्रसन्नचित्त । भक्तिभावें तोषलों मी ॥४८॥
जो हें स्तोत्र वाचील । त्याचे सर्व काम पुरतील । मजला तो प्रिय होईल । अंतीं लाभेल कैलासवास ॥४९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गलमहापुराणे प्रथमे खंडे वक्रतुंडचरिते पंचदेवविवादो नाम त्रयोदशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP