मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय २५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल म्हणती महाभागा ऐकावी । दक्षा ही पुढती कथा बरवी । पाप प्रणाशिनी मनीं घ्यावी । वक्रतुंड अवताराची ॥१॥
दैत्य सारे मिळून जाती । शुक्र महामुनींसी स्तविती । साष्टांग दंडवत त्या घालिती । मत्सरासुरसहित ते ॥२॥
शुक्र त्यांचा समान करित । म्हणे तुम्ही कां आलांत । तुमच्या कार्यभागांत । साहाय्य यत्नें करीन मी ॥३॥
कार्यसिद्धी जेणें होईल । ऐसें असे माझें बल । मिळेल तुम्हां यश अमल । सांगा काय जें मनीं तुमच्या ॥४॥
अमृतासम तें वचन ऐकून । हर्षित झाले असुर प्रसन्न । शुक्रासी प्रणिपात करुन । सांगती आपुलें मनोगत ॥५॥
तुमच्या प्रसादें स्वामी, लाभला । आम्हांते मत्सर कुलधारल भला । आमुच्या भाग्यवृक्षाला । अमृतासम फळ जणू तें ॥६॥
वर मिळवुनी महान । हा महाबाहू शोभन । आमुच्या पक्षांत येऊन । हितार्थ झटतो आमुच्या हा ॥७॥
दैत्यदानवांचा राजा मानित । आम्ही सारे त्यास वंदित । त्याच्या राज्यभिषेक सोहळ्यांत । माननीय तुम्ही यावें ॥८॥
आमुचे एकमेव आश्रयस्थान । मुनिसत्तमा तुम्हीच महान । शुक्राचार्य तें ऐकतां आश्वासन । देती तेव्हां दैत्यदानवां ॥९॥
मत्सराच्या राज्यभिषकोत्सवांत । शुक्र स्वयं होता उपस्थित । सर्व दैत्य दानव राक्षसगण होत । महोत्सवीं दंग तेव्हा ॥१०॥
त्या दैत्यदानव महाभागांत । मुख्य मुख्य जे असत । प्रजापती त्यांची तुज सांगत । संक्षेपानें नामावली ॥११॥
नमुचि शंबर शुंभ निशुंभ । कालभैरव विरोचन अग्निप्रभ । विप्रचित्ति प्रल्हाद महिषासुरानिभ । अंधकासुर समदैत्य ॥१२॥
इत्यादि प्रतापवंत बहु दैत्यदानव । मिळून करिती उत्सव । यथाविधि राज्याभिषेक गौरव । ब्राह्मणांकडून करविती ॥१३॥
ऋग्‌यजुः साम मंत्रांनी अभिषिक्त । ब्राह्मणे करितो वेदपारंगत । त्या वेळी मत्सरासुर प्रमुदित । राज्याभिषेकीं निमग्न ॥१४॥
त्या सर्व वेदपारग ब्राह्मणांत । उशना सर्वकर्ता असत । प्रतापवन्त श्रेष्ठ महाभक्त । गणेश योगी महामुनी ॥१५॥
ऐशियापरी मत्सर होत । दैत्यादींचा राजा बळवंत । परवीर हा तेजस्वी शोभत । मध्यान्हीच्या सूर्यासम ॥१६॥
प्रजापते तेव्हां वन्दन करिती । सारे दैत्यदानव शुक्रा स्तविती । सनाथ झालों कृपाप्राप्ती । आपुली आम्हां लाभली ॥१७॥
ऐसें बोलून स्वगृहा परतले । नंतर कांहीं दिवस गेले । ब्रह्मांड विजयाचे विचार रुजले । मत्सराच्या मनांत तें ॥१८॥
तेणें सकल असुर बोलाविले । तेही त्वरेनें सर्व आले । मानदा कोणतें कार्य संभवले । तें सत्वर सांगावें ॥१९॥
त्यासी म्हणे जयेच्छु मत्सर । त्रैलोक्य माझ्यावर निर्भर । व्हावें ऐशीं अनिवार । माझ्या मनीची आकांक्षा ॥२०॥
त्याची मनीषा ऐकून । हृष्ट सगळे असुर होऊन । मेघ गर्जनेसम गर्जून । काळासम ते सज्ज झाले ॥२१॥
प्रभावी शस्त्रास्त्रें हाती । घेऊन ते वाहनीं बसती । सर्व भावें सज्ज होती । चतुरंगसेना सिद्ध करुनी ॥२२॥
पायदळीं असंख्यात । नाना शस्त्रधारी चालत । पर्वतवृक्ष पाषाण हातांत । हातीं घेऊन निघाले ॥२३॥
भालावरी सिंदुराची लाली । मुक्तकेश ते महाबली । उड्डाण करिती पावलो पावलीं । युद्धशास्त्रीं पारंगत ॥२४॥
शस्त्रयुद्धांत मल्लयुद्धांत । विशारद गदायुद्धांत । अस्त्रयुद्धीं विचारज्ञ असत । निघाले सारे प्राप्तधारक ॥२५॥
त्यांच्या पदाधातें धूळ उडाली । त्यामुळें सूर्यप्रभा निस्तेज झाली । दैत्यसेनेच्या पुढे वाटली । भूषणसमान ती ॥२६॥
हत्ती सहस्त्र हजार पुढें जाती । विविध धातूंनी रंगले यूथपती । नानाविध चित्रांकित असती । शरीरें त्यांची अजस्त्र ॥२७॥
त्या गजसेनेचे भाल । सिंदूरचर्चित होते लाल । त्यांच्या गंडस्थलांतून अमल । वहात होते मदबिंदू ॥२८॥
घंटा बांधिल्या गळ्यांत । त्यांचा ध्वनी निनादात । महावीर त्या गजांवरी बसत । काठया हातीं घेऊन ॥२९॥
अस्त्रें वीर करी धरिती । गज तेव्हां गिरिसम शोभती । ते गज पर्वतांसी भेदिती । दंताग्रांनी क्षणांत ॥३०॥
प्रजापति दक्षा ते दन्ती । वृक्षांचे समूह सोंडेनें उपटती । मदसिक्त त्यांचे भाल अती। भ्रमर गुंजनें युक्त जे ॥३१॥
शत्रुसहस्त्रांचा विनाश रणांत । करिती ऐसे सामर्थ्ययुत । नगरांतून निघाले डोलत । सेनेची शोभा वाढविती ॥३२॥
दैत्य भयंकर आरुढले । गजसैन्य युद्धा निघालें । त्या मागून अश्वदल निघालें । बलशाली संघटित जें ॥३३॥
अश्व चंचल वायुगती । पूर्ण भूषणें युक्त असती । चामरें डोक्यावरी डोलती मनो वेग ते महाबळ ॥३४॥
आकाशांत वायूसम धावती । हवेत जणूं ते उड्डाण करिती । खुराघातांनी विस्फुलिंग जती । सर्वत्र उडविती वेगांत ॥३५॥
त्या घोडयांवरी स्वार होत । नाना शस्त्रधर दैत्य उन्मत्त । ढगांपरी ते विलसत । ऐसे दृश्य मनमोहक ॥३६॥
काळासही भय वाटावें । ऐसे दैत्य वीर आघवे । दारुण पाप निश्चय स्वभावें । ऐसे सारे निघाले ॥३७॥
जेथ काही महा दैत्य बसत । गाढवांवरी अति त्वरित । कांहीं बसले बोकडांच्या गाडींत । बैलगाडींत दुसरे ॥३८॥
रेडयांवरी कांहीं आरुढ झाले । दुसरे वाघांवरी बैसले । कांहींनीं सिंह शार्दूला केलें । वाहन तैसे खगांनाही ॥३९॥
ऐश्यापरी चित्रविचित्र वाहनांत । सारे असुर विराजित । निघाले निश्चय करुन मनांत । यमास गिळण्या जणू जाती ॥४०॥
त्यानंतर रथारुढ अपर । खंदिरांगारासम लल नेत्र । ऐसे रथी निघाले सत्वर । भयंकर उग्रमूतीं ॥४१॥
त्यांच्या रथांचे अश्व अलंकृत । मणिमीत्यांदींनी अर्त्यत । नाना शास्त्रसंभारानें युक्त । मेघांसम गर्जती ते ॥४२॥
ध्वजालं कृत रथ होते । शीघ्रगती अश्व धावते । चतुर सूत त्यांसी आवरते । महावीर बैसले रथांत ॥४३॥
कांहीं रथ गाढवें ओढिती । कांहीं लांडगे वाहती । अस्वल सिंह बैल हत्ती । नाना पशुजुंपले होते ॥४४॥
वजरांग शत गर्दभ जोडल्या रथांत । मत्सर दैत्य आरुढ होत । रथ होता अलंकृत । पुढे महावीर चालती ॥४५॥
मत्सरासुराचे दोन सुत । अश्वारुढ पुढें चालत । विरीचनादी दैत्य जात । समवेत युद्धभूमीवरी ॥४६॥
पृथ्वीवरी ते सैन्य मासत । दुसरा सागर जणुं उसळत । महारथ महावीर युक्त । युद्धभूषणें सुभाषित तें ॥४७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते मत्सरासुरसेना वर्णनं नामपंचविंशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP