खंड १ - अध्याय २७
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । असुर जयशोभालंकृत । आले वरुणालयाप्रत । वरुणसभेत पाठविला दूत । असुर प्रमुखांनी तदा ॥१॥
वरुणाच्या सभेत । दूत म्हणे गर्ववचन । ऐक तोयेंद्रा माझें वचन । मत्सर राजानें मज पाठविलें ॥२॥
माझ्या वश होऊन रहावें । वरुणा स्वस्थानींतू नांदावें । नाहींतर युद्धभूमीवर यावें । मारीन तुजला देवांसह ॥३॥
दूताचा निरोप ऐकून । वरुण झाला क्रोधायमान । संग्रामार्थ सज्ज होऊन । भयानक रुप दिसे त्याचें ॥४॥
मगरावर आरुढ होत । पाशादी अस्त्रे हातीं धरित । देव जलचरासहित । निघाला बाहेर नगराच्या ॥५॥
वरुणाचा सर्व वुत्तान्त । दूतें सांगितला साद्यंत । मत्सरदैत्येय युद्धोद्यत । युद्धासि सत्वर निघाला ॥६॥
देवांची तैसी असुरांची जात । सैन्यें परमदारुण रणभूमींत । परस्परांवरी । आक्रमणोद्यत । उभय सैन्ये त्या वेळीं ॥७॥
देवांचे सैन्य अति उग्र पाहत । विरोचन तेव्हां आव्हान देत । तारस्वरें तो गर्जना करित । अन्य असुर तें सरसावले ॥८॥
महिषासुर शुंभ तैसा अंधीकासुर । धावती रणांत ते सर्व । वधिती साहसें अनेक सुर । रणभूमीवर त्या वेळीं ॥९॥
देद दैत्य परस्परजयोद्यत । एकमेकांसी त्वेषपूर्ण लढत । शस्त्र अस्त्र वृक्ष पाषाणांनी हाणित । वीर अनेक घायाळ झाले ॥१०॥
देवदैत्यांचा संहार होत । तुमुल युद्ध तें चालत । तीन दिवस महाघोर सतत । संगर चाललें भयंकर ॥११॥
तेव्हां दैत्य झाले भग्न । मनांत अति उद्विग्न । देव होते जलमग्न । गर्जना भैरव करिती ते ॥१२॥
दैत्यभूप झाले मूर्छित । विरोचन प्रमुख व्याकुळचित्त । त्यांसी कवि शुक्राचार्य करित । सावधान स्वतेजें ॥१३॥
सर्व दैत्य वीर तें उठले । त्यांनीं युद्ध केलें । महा क्रोधे त्यांनीं मारिलें । महाबळी देवांसी ॥१४॥
अतिभयानक युद्ध चालत । पुनरपि त्या देवासुरांत । जलनिवासी देव करित । अहोरात्र युद्ध त्या वेळी ॥१५॥
परी जलचर निवाश्यांचे गण । भग्न मृत होत प्रचूर्ण । भय ओढवलें दारुण । पळाले देव दशदिशांत ॥१६॥
विरोचनें वरुणासी पकडिलें । बलवंता त्या निष्प्रभ केलें । तो वृत्तान्त ऐकून पळाले । जलौकस सैरावैरा ॥१७॥
कांहीं मेले कांहीं पडले । कांहीं जखमा होऊन रंजले । कांहीं दैत्यासी शरण गेले । पराजय दारुण देवांचा ॥१८॥
उच्चरवे जयघोष करिती । दैत्य तेव्हां हर्षित अती । पाताळ जिंकुनी उत्तरेसजाती । जलमार्गे कुबेरा जिंकाया ॥१९॥
वरुण लोकींचा वृत्तान्त । कुबेरें ऐकून अतित्वरित । पलायन करुन जात । कैलासीं श्रीशंकरा शरण ॥२०॥
कुबेराचें पलायन ऐकून । दैत्य अलकानगरींत प्रवेशून । जयशाली स्वामी होऊन । जिंकिला सारा कुबेरलोक ॥२१॥
वरुण कुबेरांसी जिंकल्यावर । धर्मराजास जिंकण्या आतुर । मृत्युलोकीं जाती सत्वर । दैत्य सारे त्वेषानें ॥२२॥
दूताकरवी वर्तमान ऐकतां । यमराजे केले युद्धाची सिद्धता । महिषावरी आरुढ होता । दंड करांत धरियेला ॥२३॥
महामृत्यूसह रणभूमीवर । गेला यम तेव्हां उग्र । मृत्यूरोगांदींनी समग्र । वेढिला होता त्या वेळीं ॥२४॥
दैत्य क्रोधसंयुक्त । त्यांच्यावरी हल्ला करीत । देव दैत्यांचे वीर लढत । बहुकाळ तें परस्परांसी ॥२५॥
आव्हान देऊन परस्परांसी । ललकारिती उच्च रवेसी । नाना प्रहारें ताडनासी । करिती तेव्हा दोघेही ॥२६॥
ऐसे महा अद्भुत । युद्ध चाललें अविरत । दारुणरुप पांच दिवसपर्यत । देवदानव विनाश होय ॥२७॥
यमदूतांनी दैत्य चिरडिले । कोणी मेले कोणी पळाले । कोणी त्या वेळीं व्रणांकित झाले । मृत्यू संताप संत्रस्त ॥२८॥
विषयप्रिय एवढयांत । मत्सरासुराची तो पुत्र येत । तो मृत्यूसह लढत । प्रेरणेनें मत्सराच्या ॥२९॥
नरांच्य हृदयीं ताडन । अस्त्र शस्त्रांनी परमपीडन । तेणें रोगादी यमसेवक भिऊन । पलायन करते झाले ॥३०॥
यमासह दारुण युद्ध केलें । महिषास त्याच्या मूर्च्छित केलें । यमराजासी पाडविलें । धरणीतलावरी झणीं ॥३१॥
धर्मराज सत्वरी उठला । कालदंडें दैत्यपुत्र ताडिला । तेव्हां तो क्रोधे ओरडला । विषयप्रिय शक्तिमंत ॥३२॥
कालदंड त्यास पाहून । धरणीतलावर पडला उन्मन । तेव्हां दैत्यपुत्र त्वरा करुन । पकडी यमासी स्वप्रतापें ॥३३॥
त्या असुरपुत्राचें तें महाकर्म । दैत्यप्रमुख स्तविती वर्म । धर्मासी धरुनी नेती अधर्म । दैत्येय अमरावतीसी ॥३४॥
इंद्र देवसंघासहित । वैरभावें सज्ज होत । अग्नि वायूही बलयुक्त । देव अन्यही तेथ आले ॥३५॥
महाभागा आपापल्या लोकांतून । देव आले सज्ज होऊन । विश्वेदेव साक्ष्य रुद्र वसू पावन । गंधर्व यक्ष विद्याधर ॥३६॥
ग्रह चंद्र सूर्य आदित्य येते । बलवतर वज्रधराप्रत । आदरें तेव्हां सर्व देवगणांसहित । इंद्र गेला रणभूमीसी ॥३७॥
ऐरावती आरुढ झाला । वज्रपाणी युद्धा पातला । दैवसैन्यावरी घाला । दैत्यगण तें घालिती ॥३८॥
सुसन्नद्ध देवांवर । करिती असुर शस्त्र प्रहार । देवही उत्तर देते सत्वर । शस्त्रांनींच परम क्रोधें ॥३९॥
ऐसें तुमुल युद्ध परस्परांसी चालले । दैत्य बहुत मरुन पडले । शस्त्राघातें त्यांसी ताडिलें । देवांनी त्यासी जेव्हां ॥४०॥
दैत्यांनी जे देव मारिले । ते छिन्न विछिन्न पडले । कोणी मूर्च्छित होऊन पडले । ऐसे युद्ध उभयनाशक ॥४१॥
सात रात्रींपर्यंत झालें । युद्धांती असुर पळाले । विरोचनादी सर्वही पडले । मूर्छा येऊन धरणीवरी ॥४२॥
जयवंत सुरेंद्र हर्षित । एकमेकांचे अभिनंदन करित । तेवढ्यांत महदाश्चर्य घडत । सुंदरप्रिय तेथ आला ॥४३॥
मत्सराचा ज्येष्ठ सुत । सर्व देवांशी धैर्येलढत । शस्त्रास्त्रांनीं मल्लयुद्धांत । मर्दन करी देवांचें ॥४४॥
देवसैन्य सर्व दिशांत । पळाले तेव्हां भयभीत । रुधिराच्या सरिता वाहत । रणभूवर हे प्रजापती ॥४५॥
इंद्रही लढला दैत्यपुत्रासी । वज्राघातें मारी दैत्यासी । तो न हाले तेव्हां इंद्रासी । आश्चर्य मनीं वाटलें ॥४६॥
परी दैत्यपुत्र पुनरपि उसळत । खड्गानें ऐरावता हाणित । इंद्रासी मूर्छित करित । मर्दन करी तयाचें ॥४७॥
सुरेशातें स्ववश करुन । नंतर त्या पुरंदरा पकडून । स्वस्थाना परते हर्षित मन । दैत्य तया पूजिती ॥४८॥
महाबळवंत पराक्रमयुत । सुंदरप्रिय मत्सरसुत । तेव्हां अति प्रहर्षित । परी देवांचा विनाश ओढवला ॥४९॥
कोणी पकडले गेले । कोणी तेथ मूर्छित पडले । कोणी तेथून पलायन केलें । कोणी झाले पूर्ण भग्न ॥५०॥
ऐशियापरीं स्ववश केलें । सबळ सगळे देव हरले । मत्सरासुरालाच लाधलें । स्वर्गाधीशत्व त्या वेळी ॥५१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खंडे वक्रतुण्डचरिते मत्सरासुरविजयैंद्रपराजयो नाम सप्तविंशतितमोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP