मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय २९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । इंद्रासी बंदी करुन । मत्सर आनंदपूर्ण मन । ऐरावतावर बसून । अमरावतींत प्रवेश करी ॥१॥
विरोचनादी वीरांसहित । शोभला प्रभावें बलवंत । इंद्रासनीं तो बैसता विनत । अप्सरागण त्यासी वंदिती ॥२॥
गंधर्व चारणादी भयभीत । होते उभे आसमंतात । महाभाग मत्सराची सेवा करित । आपापल्या विद्येनें ते ॥३॥
देवांच्या सर्व उद्यानांत । मत्सरासुर संचार करित । देवभोग भोगी असंख्यात । कुशल तो विजयी मदोन्मत ॥४॥
देवस्थानें सर्व मोडून । दैत्यांसी दिलीं तीं विभागून । त्या त्या स्थानीं विराजमान। मुख्य मुख्य असुर झाले ॥५॥
अतिदर्पं युक्त ते सेविती । मत्सरासी एकमती । एके दिवशीं तयांप्रती । मत्सर म्हणे गर्वानें ॥६॥
इंद्रासनीं तो विराजमान । म्हणे असुरांसी हांसोन । विरोचनादींस बोलावून । ब्रह्मादि देव कां न आले? ॥७॥
माझ्या दरबारीं उपस्थित । देव न येती मत्सरान्वित । त्यांचा मद हरीन त्वरित । यात संशय कांहीं नसे ॥८॥
मत्सराचें उन्मत्त वचन । ऐकून दैत्यदानव आनंदून । दूत पाठवी संतप्त मन । मत्सर त्रिमूर्तीप्रती तत्क्षणीं ॥९॥
दूता सावधान मनें जाऊन । ब्रह्मादींना सांग वचन । सर्व देवांसह दर्शन । माझें घ्यावें अवलंबित ॥१०॥
अन्यथा मत्सर दैत्यराज करील । शासन तुम्हां भयंकर । दूत ऐकोनि निरोप तत्काल । निघाला ब्रह्मादि देवांप्रत ॥११॥
अंधक नामा तो दैत्येंद्र जात । मत्सराचा दुष्ट दूत । ब्रह्मदेव विधाता सत्यलोकांत । भेटला नाहीं तयासी ॥१२॥
सत्यनगरीं शून्य पाहत । तेव्हां तो वैकुंठी जात । तेथेंही सर्व शून्याकार असत । म्हणोनि गेला कैलासी ॥१३॥
तेथ देव ऋषि आनंदित । पाहतां झाला एकत्र दूत । शिवगण त्यासी सभेंत । नेती तेव्हा अवलंबित ॥१४॥
सर्वे आसनी बैसविला । कैलासवैभवें विस्मित झाला । आनंदमय धन्य तो तो झाला । स्वचित्तांत त्या समयीं ॥१५॥
शंकरें विचारितां आगमन कारण । महेशासी मानूनी तृण । बलगर्वित अंधक बोले वचन । जैसें मत्सरें सांगितलें ॥१६॥
सुरसतमहो ऐकावा । मत्सर राजांचा निरोप बरवा । जगदीश्वर झालों देवनाथ नवा । इंद्रासी मी जिंकून ॥१७॥
म्हणोनि माझ्या दर्शना यावें । ब्रह्मा विष्णु रुद्रांनी वंदावें । अनुगांसहित स्तवन करावें । माझ्या सभेंत येऊन ॥१८॥
तुम्ही सर्वांनी आजची चलावें । माझ्यासवें दर्शनार्थ यावें । मत्सरासुरा तोषवावें । जीविताशा जरी तुम्हां ॥१९॥
अंधकाचें वचन ऐकत । शिव तें क्रोधें प्रज्वलित । मुखांतून अग्नी ओकित । म्हणे निर्भय त्या दैत्यासी ॥२०॥
अरे पापिष्ठा काय बोलसी । तृणासम मानुनी मजसी । मीच वर दिला मत्सरासी । जेणें विजयी तो झाला ॥२१॥
परी जर का क्रोधसंयुक्त । झालों त्वेषानें अपमानित । तरी करी असुरांसहित । भस्म मत्सरासुराचें त्या ॥२२॥
अरे असुराधमा तूं दूत । मूढा म्हणोनि तुज सोडित । मत्सराज्ञा काय मज प्रत । सिंहापुढें जंबुक काय करीं ॥२३॥
जाऊन सांग मत्सरास । माझ्या या सर्व वचनांस । आठवून स्मरी धर्मास । नाहीं तर भस्मसात्‍ करीन मी ॥२४॥
शिवाचें वचन ऐकत । अंधक परतून जात । मत्सरसुरा तें कथित । दैत्यसभेंत सविस्तर ॥२५॥
कैलासाचें वैभव वर्णित । ब्रह्मांडांत तें अतुल असत । अंधकाच्या वचनें संतप्त । विरोचनादी दैत्य म्हणती ॥२६॥
मत्सरेश्वरा स्वस्थ कां बसतां । आपुली आज्ञा आम्हां मिळतां । देवत्रयासे जिंकू क्षण न लागतां ॥ आपुल्या कृपाप्रसादानें ॥२७॥
दैत्याचे वचन ऐकून । मत्सर तेजोयुक्त बोले वचन । हर्षवी त्या असुरा कुमन । मदोन्मत्त होऊनिया ॥२८॥
तपप्रभावें केलें प्राप्त । मी तेज महा अद्‌भुत । तेथ शंभूं वृथा गर्व करित । आपुल्या आत्मसामर्थ्याचा ॥२९॥
जरी तो ब्रह्मांडाचें राज्य देत । तपोहीनासी कोणाप्रत । तरी जगदीश त्यासी मी मानित । अन्यथा तो मज अमान्य ॥३०॥
म्हणोनि शंभूस जिंकीन । तपतेजाच्या प्रभावें करुन । त्याचा दर्प सारा हरीन । वृथाचि मानी ब्रह्म स्वतःला ॥३१॥
वेदांतांत ब्रह्म उक्त । निर्विकल्पक जे असत । तेंच जगदीश रुपें विलसत । हें रहस्य मज ठावें ॥३२॥
सकाम कर्म करितां प्राप्त । मनुजा होते सर्वहि जगांत । ब्रह्मार्पण करितां समस्त । मुक्ति लाभे मानवांना ॥३३॥
सर्व कांहीं कर्मे निर्मिलें । कर्मबलें त्याचें पालन झालें । कर्मयोगेंच तें नष्ट झालें । प्रभाव काय त्रिमूर्तींचा ॥३४॥
कर्मबळें मी निर्मित । कर्मबळानें पालन करित । कर्मप्रभावें संहारित । कर्माधीन जग सारें ॥३५॥
देव असुर मनुज जगांत । कर्माधीन सारे असत । ऐसी दर्पोक्ती करुन निघत । कैलासा जावया तत्क्षणीं ॥३६॥
विरोचन प्रमुखांसहित । नाना शस्त्रास्त्रधारायुक्त । कैलासीं जाउनी अवलंबित । मारिले गण शिवाचे ॥३७॥
कैलास लोकाचे द्वारपाल । मत्सरें केले विहवल । तेव्हां ते पळाले अबळ । छिन्न भिन्न अंग त्यांचें ॥३८॥
शंकरा संनिध ते जाती । आपुली विवश स्थिती वर्णिती । मत्सरासह दैत्य येती । कैलासीं जिंकण्या महादेवा ॥३९॥
ओमिति श्रीमदांत्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते शिवमत्सरासुरसमागयो नाम एकोनत्रिंशोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP