खंड १ - अध्याय १४
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । शिव म्हणती पार्वती सांगेन । ऐक जें चरित्र अद्भुत महान । गणेशमाया मोहेंकरुन । मोहितांचे चरित्र हें ॥१॥
शिवाचें वचन ऐकून । विष्णू ब्रह्मदेवा सांगे वचन । वर माग ऐसा जेणें करुन । शंकर होईल पुत्र तुझा ॥२॥
शिव होता तुझा पुत्र । तो होईल माझा पौत्र । आपणा उभयतांचे सुपात्र । सफल होईल मनोरथ ॥३॥
विष्णूचें वचन ऐकत । विधी शंकरासी म्हणत । माझा पुत्र तूं होई सुहित । हाचि वर मी मागतसें ॥४॥
विष्णु ही संमती देत । तेव्हा शंकर तथास्तु म्हणत । ब्रह्मदेवा भालापासून पुनीत । रुद्ररुपें मी जन्मेन ॥५॥
तुझ्या अंशापासून । ऐशा प्रकारें मी प्रकटेन । विधीमाधव संतोषून । शंकरा प्रार्थिती स्नेहानें ॥६॥
भावपूर्वक त्यासी म्हणती । पाहावें आमुचें ऐश्वर्य जगतीं । निरनिराळे भावभक्ती । तेणें संतोष आम्हांसी ॥७॥
तेव्हां महादेव पहात । ज्ञानचक्षूनें ऐश्वर्य अनन्त । विधिमाधवांचे त्यासी सांगत । अपार शाश्वत महिमा तुमचा ॥८॥
आपण तिघे ईश्वर प्रख्यात । त्या वेळीं दिवाकर उपस्थित । तेजोराशी सदात्मा समाहित । म्हणे स्मरण कां मम केलें ॥९॥
मी स्नेहपूर्वक येथ आलों । तुमच्या आदरें तोषलों । सांगावें वांछित प्रसन्न झालों । तेव्हा तीन देव त्या सांगती ॥१०॥
हे प्रभो प्रसन्नभावें दाखवावें । ऐश्वर्य आपुलें अतुल आघवें । तेव्हां सूर्यदेव संतोषले । दाखविती स्वरुप तेजोमय ॥११॥
चराचरमय महान । सूर्यतेजें निष्प्रभ होऊन । विधि माधव शंभू उन्मन । भांबावे दृष्टी तयांची ॥१२॥
ते तिघे पाहूं न शकत । ज्ञानदृष्टीनें तें पाहत । चराचराच्या आधाराप्रत । प्रार्थिती विनमर स्नेहभावें ॥१३॥
अपाररुप तुझें उज्ज्वल । परी तें पाहण्या नसे बल । सौम्य रुप तव अमल । धारण करी पूर्वीचें ॥१४॥
तेव्हा सौम्य रुप धारण करित । सूर्यास ते तीन देव म्हणत । तुमचा पाहू शकलों न अन्त । आतां आमुचेंही ऐश्वर्य पहा ॥१५॥
सूर्य संतुष्ट होऊन । ज्ञानदृष्टीनें तें पाहून । त्यांचें ऐश्वर्य अति महान । प्रणत होऊन म्हणाला ॥१६॥
तुम्ही तिघेहि महान । तुमचें रुप अनंत पावन । अद्भूत ऐश्वर्य बलवान । पाहिलें मी प्रत्यक्ष ॥१७॥
तरी आपण सर्वही भगवंत । सनातन समभावें युक्त । न्यूनाधिक कांहीं नसत । ऐसा सिद्धान्त हा माझा ॥१८॥
त्याच समयीं शक्ती प्रकटात । मोहिनी परा ती विचारित । माझें स्मरण कां केलेत । सांगावें प्रसन्न मी आहे ॥१९॥
तेव्हां ते चार देव सांगत । स्नेहभावें जे होते युक्त । महादेवी ऐश्वर्य अद्भुत । किती तुझें तें दाखवावें ॥२०॥
आपुलें स्वरुप दाखवी शक्ती । स्थूलसूक्ष्म युक्त जें जगतीं । चराचरमय सुंदर अती । पाहून भरांती चार देवां ॥२१॥
ते चारही शरण जात । शक्तीस तेव्हां ते म्हणत । तव रुप असे अनन्त । मूळ रुप धारण करी ॥२२॥
आमुचेंही ऐश्वर्य पहावें । आम्ही कैसे तें जाणावें । त्यांचें भाषण ऐकून स्वभावें । ज्ञानदृष्टी लाविली ॥२३॥
तेव्हां त्यांच्या रुपाचा अंत । शक्तीस जेव्हां न लाभत । त्यांच्यापुढें ती प्रणत । अंत न लागे रुपाचा ॥२४॥
आपण सारे ईश्वर । पूर्णभावयुत महात्मे उदार । समान आपण न अंतर । असे आपणा पाचांत ॥२५॥
आपणांहून समर्थ देव । कोण असेल याचा ठाव । न लागे निश्चित हा चित्तीं भाव । गणेशमाया प्रभावानें ॥२६॥
परस्परांसी म्हणती भरांत । वेद म्हणती प्रभू एक असत । सर्वत्र तरी आपण समस्त । कोणापासून जन्मलों ॥२७॥
कोण असे आमुचा प्रभू । शास्त्रसंमत जो विभू । विवाद चाले तें स्वयंभू । आद्यज्ञान विसरले ॥२८॥
गणेशाचें मूळ ज्ञान विस्मृत । वरती खालीं शोध करित । तैसेचि भटकती दश दिशांत । परी कांहीं त्या न दिसे ॥२९॥
तेव्हां ते पंच देव एकत्र स्थित । योगमार्गे चित्तीं ध्यात । तेव्हां अभेदस्वरुपें रमत । एकीभूत योगभावें ॥३०॥
शांति तयासी होत प्राप्त । तेव्हां योग्यांचे ध्येय त्या दिसत । उत्तम रुप ज्याचें युक्त । स्वरुप गणराजाचें ॥३१॥
विराजले गणेश हृदयांत । चतुर्भुज त्रिनेत्र शुंडादंडयुक्त । शूर्पकर्ण वक्रतुंड एकदन्त । महोदर रक्तवर्ण ॥३२॥
महाकाय सिंदूरालिप्त । किरिटादी भूषणें शोभित । नाभिशेष सिद्धिबुद्धियुत । विभूतींनी तुला दिलेला ॥३३॥
चिंतामणि पूर्ण हॄदयांत । मणी तो शुभ धारण करित । पंचदेव तें झाले विस्मित । भक्तानुग्रहा पाहून ॥३४॥
प्रसन्नवदन तो आविर्भूत । शंकरांच्या हृदयीं प्रकटत । शंभू त्यासी तें विचारित । हे प्रभो कोण आपण? ॥३५॥
शांतियोगें संप्राप्त । ब्रह्मपती परम तूं वाटत । सांगावें महाभागा त्वरित । स्वरुप नाम आपुलें तूं ॥३६॥
मी न जाणतो तत्त्वता । तव रुपनामाची महत्ता । ऐसी प्रार्थना ऐकतां । काय म्हणाले गणराज ॥३७॥
तें पुढिले अध्यायीं सांगत । शंकर प्रियेसे भक्तियुत । ऐकतां समाधान चित्तांत । उपजेल भाविकाच्या ॥३८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते गणेशप्रादुर्भावो नाम चतुर्दशोऽध्याय समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP