खंड १ - अध्याय २१
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । शौनक म्हणती सूतासी । मुद्गल करिती स्तुतीसी । महात्म्या गणेशाची तेव्हां कैसी । तें सांगावें महाभागा ॥१॥
ज्ञाते तुज सर्वज्ञ मानिती । तेव्हां सूत सांगती मुनींप्रती । भावयुक्त मनें तुम्हांप्रती । मुद्गलकृत स्तुती सांगेन ॥२॥
मुद्गल म्हणती तुज स्तवितों । गणाध्यक्षा मी जाणतों । वेदांसही तव स्तुति प्रयत्न होतो । अशक्य ब्रह्मादिकां योगींद्रा ॥३॥
तथापि स्तवितो यथामती । तुझ्या दर्शनाची ही महती । तुझ्या अनुग्रहें समर्थ होती । सर्वही तुझ्या स्तुतिणानीं ॥४॥
सर्वादि भूमन ईशासी । वेदातिगा परेशासी । मायिकांसी, मोहदात्यासी । गणेशा तुला नमन माझें ॥५॥
अगण्या गण्या तुला नमन । पुराणादिशास्त्रस्तुता वंदन । शिवादि देवांनी कृत स्तवन । सर्वेश्वरा नानामया ॥६॥
आदि अंत मध्य भेदहीनाला । लक्षवेदाष्टयोनी प्रचार तदाकाररुपाला । योग्यास अनभूताला । सर्वाकारा नमन असो ॥७॥
काल अनंत रुपाला । पुष्टिप्रदा भूमिरुपाला । नाना प्रभेद धारकाला । धारका नित्या वंदन ॥८॥
जलाधि स्वरुपाला । तृप्तिप्रदा तदाकारहीनाला । सारासी तेजद्योत रुपाला । ढुंढीस प्रकाशका नमन ॥९॥
भोक्त्यास सर्व स्थिताला । वायुरुपासी चालकाला । प्रचार स्वरुपाला भिन्नाला । स्वस्वरुपा प्रणाम असो ॥१०॥
दीप्तासी पूर्ण प्रकाशाला । भूतादींसी ब्रह्मदात्याला । स्थूल भोग स्वरुपाला। जाग्रन्मया नमन माझें ॥११॥
प्रभूस राजसा स्वप्न मायाधरा । सूक्ष्मस्वरुपा सर्वांतरा । अभय ब्रह्मदा कारणा उदारा । सुषुप्तिभोगिन् तुज नमन ॥१२॥
मायासहितासी चेतना आधाराला । प्रयत्न प्रदासी त्रिभोगप्रदाला । गुणेशासी चैतन्यधाराला । नादरुपा तुला नमन ॥१३॥
कालासी आत्मस्वरुपासी । बिंदुरुपा वक्रानना तुजसी । देहमायाविहारकासी । चित्स्वरुपा तुज वंदन ॥१४॥
सोऽहं प्रदासी । निराकार देहि स्वरुपासी । जन्मातिगा एकदन्तासी । शून्या दैत्यांतका नमन ॥१५॥
परासी मदादींच्या शत्रूसी । महारखुध्वजा अनादिसिद्धासी । आदिसिद्धा मायाधरासी । ज्ञानरुपा तुला प्रणाम ॥१६॥
नाना विहार प्रदायकासी । पूर्ण सर्वत्रगा बोधरुपासी । मायि मायादि भेदकारासी । महात्म्या तुला सदा नमन ॥१७॥
सांख्यरुपा तुला नमन । देहींच्या परासी वंदन । स्वसंभोगहीनासी नमन । सदा केवल ब्रह्मभूतासी ॥१८॥
ज्ञानहीनासी मेधामयासी । स्वस्वरुपा आनंदासी । समाधिस्वरुपा मौनात्मकासी । स्वसंवेद्ययोगें लभ्या तुला ॥१९॥
विनात्मप्रबोधा सर्वाधिपासी । पंच पंचादि मायाकरासी । चतुर्धा विभिन्नासी । असद्रूपका तुला नमन ॥२०॥
धर्मासी शक्त्यात्मकासी । अभेदभेदादि नानात्मकासी । सत्स्वरुपा सूर्यात्मकासी । सदात्मप्रबोधा मायाधरा ॥२१॥
नमन अखंडामृताला । अद्वितीयासी कालकालाला । मोक्षप्रदा विष्णुरुपाला । आनंददा माया सहितासी ॥२२॥
स्वमायासंजातासी । अनंतासी भेदादिहीनासी । बहुरुपा विपुला भेदरुपासी । सर्वात्मका वंदन सदा ॥२३॥
शंभुरुपा नेतिप्रदाला । सदा मोहहीनासि त्र्यंबकाला । मायेनें त्रिविध भासणार्याला । तूर्यस्वरुपा धूम्रवर्णा ॥२४॥
परब्रह्मरुपा संयोगकर्त्याला । स्वसंवेद्य भावें विघ्नाधिपाला । चारांच्या अभेदाला । स्वभक्तपक्षीं संस्थितासे ॥२५॥
गणीधाशासी नमन । महादैत्यसंहारकर्त्याचें चिंतन । कर्मरुपा कर्मादिकर्त्यासी वंदन । ज्ञानरुपा निःसंगासी ॥२६॥
लोकांसी स्वकर्मफळाचा दाता । कर्महीन केवल समान प्रदाता । समरुप योगसाधनें आनंददाता । संतोष दाता त्रिहीन ॥२७॥
सहज ब्रह्मभूय प्रदाता । त्रिधाम चार स्थितींचा पालनकर्ता । निजात्म स्वरुप संयोगकर्ता । ऐशा हेरंबा नमस्कार ॥२८॥
चार समूहांच्या अधीशाला । अयोगा मायाविहीनाला । निरानंदनरुपा नित्याला । निवृत्तिस्वरुपा तुज नमन ॥२९॥
भिन्नास योगरुप समाधिस्थितास । योगशांतिस्वरुपास । शांतिप्रदास गणेशास । योगरुपास वंदन ॥३०॥
ब्रह्मदात्या अखिलेशाला । ज्येष्ठराजासी गणांच्या पतीला । सृष्टिकर्त्या ब्रह्मयाला । सदा रजोधारकासी ॥३१॥
वेदशास्त्रादींचा जो कर्ता । सदा सृष्टिहीन मायी साम्यरुपता । मायी मध्य स्थितिस्थिता । नमन त्या सत्त्वरुपासी ॥३२॥
विष्णुप्रभेदें जग पालन करी । मायाधर सत्त्वहीन विघ्नें हरी । सर्वातिग कवींचा पति संहारी । तामसरुपें त्रिनेत्र धर ॥३३॥
शक्तिधर कालरुप कैलासप्रद । तमोहीन रुप लंबोदर । कर्मांचे मूलबीज सुखद । धारण करी त्यास प्रणाम ॥३४॥
भानुरुपा तेजोमयासी । त्रिकालादि बोधा सूर्यासी । बहुला प्रकाश हीनासी । हेरंबा तुज नमन माझें ॥३५॥
शक्तिरुपा मोहप्रदा । क्रियाधारभूता सिद्धीशा सुखदा । अनंतस्वरुपा नाना भरमकरा । लीलाधरा शक्तिहीना ॥३६॥
चंद्ररुपा पुष्टिप्रदासी । सुधाधारका अन्नहीनासी । नमन ढुंढे सदा तुजसी । नक्षत्रकादीसे तूं प्रकाश देसी ॥३७॥
त्रैलोक्यांत भूतादिकांसी । स्वकलांनी तोषविसी । कामरुपा कामदाहका तुजसी । गजाकारतुंडा वंदन ॥३८॥
हरि इंद्रादि देव संस्तुता । शुक्रादि सर्व मुनि वंदिता । अनित्या नित्या देवेशा प्रभुता । तुझी सर्व विश्वावरी ॥३९॥
देवा सकामा निष्कामा । सदा सर्वपूज्या अभिरामा । सर्वाधिपा संस्तुता पावना । जलेशेंद्रे शेषादिकांनी ॥४०॥
काश्यपा कपिलासी नमन । वरेण्यपुत्रा पाराशरा वंदन । शंभुपुत्राचें चिंतन । पार्श्वात्मकाचें सर्वदा ॥४१॥
भक्तिभोक्त्या गणाधीशा । माधवस्त्रीसुता ईशा । सर्वांचा माता पिता ऐशा सर्वेशा । सर्वपुत्रा सर्वात्मका ॥४२॥
सर्वसर्वा नानामया सृष्टिधारका । पाशधरा दंतधारका सुखदायका । सदानंददा राज्यप्रदायका । पुत्रपौत्रादिकांसी ॥४३॥
भुक्तिमुक्तिप्रदा तुज नमन । अनंतशक्ते गुणाधीशा वंदन । मयूरेशा योगेशा चिंतन । गजाकारा सदा तुझें ॥४४॥
रुप तुझें अव्यक्त व्यक्त । साकार मोहमय एकदंत । एकरुप नाना प्रभेदादियुक्त । शुंडाधर देवनाथा ॥४५॥
अनाथ देवादिकांचे निवासंस्थान । तूंची सर्वात्मा महान । त्वंपदाकारा तत्पदाकारा वंदन । त्वंपद तत्पद एकरुपा ॥४६॥
असिरुप प्रयुक्त शरीरासी । साक्षात् सुधाम्ने तुजसी । वामभागीं सिद्धी स्वरुपासी । मोहमाया निर्मिते जी ॥४७॥
दक्षिणांगी बुद्धिरुपा असत । पुंस्त्रीस्वरुपा मी वंदित । त्वंपदाधारा भरामरी वसत । अतु शक्ती कामदात्री ॥४८॥
सदा तत्पदा अभेदा असत। भरामरी कामदात्री ऐक्य होत । तेथ स्वसंवेद्य नामक पुरांत । मस्तकांत वास त्यांचा ॥४९॥
जेथ अखंड अमृत । तोय सुतामर समुद्रांत । इक्षु नामक असत । त्याच्या पानें अद्भुत लाभ ॥५०॥
पुंस्त्रीप्रदा खेलकरा । तीन अक्षर नामें सुखकरा । गणेशा आनंददात्या उदारा । जन्ममृत्युकारक तूं ॥५१॥
एकदाही तुझें नाम जपती । ते जन्म मृत्यू तरती । ढुंढीश्वरा अपार प्रधामा जगतीं । उपासक तुझे धन्य ॥५२॥
सुरेंद्रादि पूज्या गणेशा नमन । गणेशस्वरुपा तुझें चिंतन । ब्रह्मभूता आश्चर्य न । केवल स्पर्शे ब्रह्मद तूं ॥५३॥
सूत म्हणती ऐसी स्तुती । करुन मुद्गल मौन धरिती । गणेशाच्या पायां पडती । साष्टांग नमन करिती तें ॥५४॥
स्वभक्तासी तेव्हां उठवून । परम आदरें आलिंगून । म्हणे प्रसन्नात्मा गजानन । महामुनींस त्या वेळीं ॥५५॥
स्तोत्र हें तूं रचिलेलें । जगती प्रख्यात होईल भलें । माझ्या सान्निध मम स्तुतिपर झालें । प्रसन्न ह्यानें मी झालों ॥५६॥
ह्या उत्तम स्तोत्रें मज स्तवील । त्यासी भुक्तिमुक्ती लाभतील । दृढ भक्तियुक्त तो होईल । प्रेममय भक्त माझा ॥५७॥
त्या नरोत्तमा न संकट येईल । रोगपीडा दूर होईल । पुत्रपौत्रांसह नांदेल । धन-धान्य युक्त तो ॥५८॥
मारण उच्चाटनादी दूर होतील । हया स्तोत्रपाठें भय जाईल । एकवीस दिवस एकवीस वेळ वाचील । कारावासमुक्त तो ॥५९॥
तैसीच अन्य पीडा निरसेल । मनीं वांछित तें तया लाभेल । मला परमप्रिय होईल । स्तोत्र नेमें वाचील जो ॥६०॥
तूं वर भाग त्वरित । मुद्गला मी त्वद्भक्तितयंत्रित । तुजसम भावज्ञ नसत । तुझ्या वश मी सर्वदा ॥६१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते गणेशस्तोत्रोत्तमवर्णने एकविंशतितमोऽध्याय समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP