मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय १८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । हे सूता महाभागा कथिलें । गणनाथाचें चरित्र भलें । तेणें सर्वही तृप्त झाले । ऋषिगण हे येथील ॥१॥
शिवशक्तीचा संवाद ऐकतां । कथाश्रवणीं वाटे चित्ता । अधिक तृष्णा म्हणोनि तत्त्वता । गणेशकृती पुन्हा सांगा ॥२॥
सूत म्हणती शौनका सांगत । दक्ष महामुनी तेव्हां वदत । सत्कथामृतपानीं आकृष्ट होत । मुद्‌गलासी विनवीतसे ॥३॥
शक्ति-शंकरांचा संवाद मनोरम । ऐकून बोले मुनिसत्तम । माझे पुरातन पुण्य अभिराम । त्याचें फळ कथामृत पान हें ॥४॥
मुद‌गला तुमच्या मुखांतून । ऐकिलें गणेशमाहात्म्य पावन । धन्य तूं कृतकृत्य भक्तिमान । गणेशाहून श्रेष्ठ अन्य नसे ॥५॥
हें तव कथनांतून । माझ्या मनीं बिंबलें महान । माहात्म्य गणपतींचे शोभन । ऐकिलें तरी तृप्ती नसे ॥६॥
हे महायोग्या ब्रह्मामृत । पुनरपि सांगावें अद्‌भुत । शिवशैलसुता संवादांत । आठ अवतार गणेशाचे ॥७॥
ह्या अवतारांचें चरित । माहात्म्य फलदायी अयुद्‍भुत । योगीशा ऐकावें ही चित्तांत । वांछा उपजली पूर्वपुण्यें ॥८॥
तरी आतां दया कर । कां घेती गणराज अवतार । हा ब्रह्मभूयमय देव उदार । तें सांगावें महामुने ॥९॥
परोपकारार्थ मुनिसत्तमा करित । तुमच्यासारखे भरमण जगांत । पतितांसी सुखप्रद वाटत । दर्शनमात्रें पवित्र करिती ॥१०॥
तुमच्या स्पर्शानें पुनीत । भाषण करितां पावन पतित । सर्व जनांसी सम आचरित । साधू समदर्शी जे ॥११॥
सूत म्हणती दक्षवचन । मुद्‌गल प्रहृष्ट झाले ऐकून । म्हणती महात्म्या भावयुक्त मन । गणेशभक्तींत तव झालें ॥१२॥
तूं महाभागा धन्य अससी । म्हणोनी गणनाथकथा विचारिसी । पाप्यांस नास्तिकां दांभिकासी । सत्कथामृतपानी इच्छा नसे ॥१३॥
द्वंद्वभावाचा विचार करिती । सहनशील सम आचरिती । सर्व भूतमात्रांप्रती । संसारतारणी जे रत ॥१४॥
परोपकार कार्यांत । ज्यांची बुद्धि सदैव रत । ऐसे महाभाग गणेशभक्तीत । आदरयुक्त असते सदा ॥१५॥
ते गणपतीच्या कथा ऐकती । नित्यनेमें स्वयं वाचती । तैसेचि लोकांसि सांगती । भक्तिभाव समन्वित ॥१६॥
म्हणून तूं सादर मनें ऐकसी । प्रश्न विचारुन वाढविसी । गणेशाच्या शुभ कथामृतासी । सांगेन आतां पूर्ववृत्त ॥१७॥
तुझा संशय जेणें फिटेल । ऐशा अवतारकथा ऐकशील । भक्तिमंता पावशील । अन्तीं गणराजपदासी तूं ॥१८॥
मी घेऊन शिलोञ्छा व्रत । घोर तप होतों आचरित । दशम पंचम दिवसांनीं येत । द्वादशीला पारणा ॥१९॥
द्रोणमात्र अन्न गोळा करित । उपोषणी मी समन्वित । त्या अन्नानें आचरित । यथान्याय पंच याग ॥२०॥
ऐसियापरी बहुकाळ लोटत । मी तपश्चरणीं मग्न असत । देव सर्वही भयभीत । कय हा मिळवू इच्छितो ॥२१॥
इन्द्रपद अथवा विधातृपद । वैष्णव अथवा शैव संपद । काय वांछी हा महाभाग विशद । आम्हां कांहीं कळेना ॥२२॥
म्हणोनि सर्वार्थकोविदा मुनीस । पाठविती देव दुर्वासांस । माझ्या आश्रमीं कोपिष्ठास । परीक्षा माझी पहावया ॥२३॥
नग्न उन्मत्ततुल्य तो येत । पारणाकाळ तें मम असत । म्हणे भिक्षा मज देई त्वरित । जेणें तृप्ती लाभेल ॥२४॥
त्यानें ऐसें म्हणतां दिलें । अन्न जें होतें शिजविलें । मुनिमुख्य दुर्वास आले । माझ्या घरीं हें मज अज्ञात ॥२५॥
तें सर्व अन्न खाऊन । द्रोणमात्र अंगीं उच्छिष्ट लिंपून । विकल मनें गेला परतून । मानसीं महानंद माझ्या झाला ॥२६॥
हे दक्ष प्रजापती मज वाटले । माझें तप धन्य जाहलें । सर्वान्नभुक्‍ जन जाहले । तृप्त माझ्या आश्रमांत ॥२७॥
उपोषण मी न सोडिलें । व्रत पुढें चालू ठेविलें । तपाचें आचरण केलें । पुनरपि आली द्वादशी ॥२८॥
पुनरपि दुर्वास मुनी येत । वेष घेऊनी तैसाचि म्हणत । भिक्षा देई मज त्वरित । तें ऐकोनी आनंदलो मी ॥२९॥
हर्षयुक्त मनें पूजित । महामुनीला त्या भावयुक्त । सर्व अन्न त्यानें भक्षिलें क्षणांत । ऐसें जाहलें सहा वेळां ॥३०॥
माझी भाव परीक्षा पहात । तपाचें खंडण करुं इच्छित । परी पूर्वपुण्य प्रभावें न च्युत । अल्पांशही मी व्रताचरणीं ॥३१॥
तीन महिने उपवास घडत । परी भावबळें मी सहन करित । तेव्हां अन्तीं संतुष्ट होत । सत्यरुप आपुलें दाविलें ॥३२॥
योगरुप महाअद्‌भुत । महामुनी मजला दावित । म्हणे मुद्‌गला तूं शुद्धियुक्त । यांत संशय तिळही नसे ॥३३॥
तूं स्वर्गी महाभागा जावें । तेथ अक्षय सुख भोगावें । ऐसें तुझें पुण्य बरवे । जिंकलासी स्वर्ग तूं ॥३४॥
अक्षय्य प्रकाशक जे असत । ते लोक तूं समस्त । जिंकलेस तेथ जाई त्वरित । मुद्‌गला आपुल्या शुद्धभावें ॥३५॥
धन्य तुझें तप भाव बळ । ऐसे बोलून त्या वेळ । स्वाश्रमीं परतला तपोबळ । महामुनी दुर्वास तें ॥३६॥
तत्क्षणीं विमान स्वर्गांतून । आलें माझ्या आश्रमीं महान । दिव्य भूषण कांतिमान । पुरुष त्यांतून उतरला ॥३७॥
तो पुरुष मज समीप आला । मनोभावें मीं पूजिला । बोले मधुर वाक्य मजला । माझ्यासवें चलावें तूं ॥३८॥
मुद्‌गला मी स्वर्गांतून । आलों इंद्राज्ञा मानून । तुझ्यासाठीं स्वामी विमान । पाठविलें हें देवेंद्रें ॥३९॥
बृहस्पतिपुरस्सर इंद्रे पाठविलें । प्रतापवान देवें सांगितलें । म्हणोनि तुज पाहिजे आलें । विमानांतून त्या स्वर्गांत ॥४०॥
तो स्वर्ग नानाभोगें युक्त । सुभग सौख्यद मोदयुक्त । देवदूतवचन ऐकून म्हणत । विनयें वाकून मुद्‌गल मुनी ॥४१॥
सूत म्हणे मुद्‌गलवचन । देवदूत ऐके आदरें करुन । सांग दूता कोणते गुण महान । स्वर्गी अथवा अन्य लोकीं ॥४२॥
तेथें दोष कोणते असती । ते सांगावे मजप्रती । तदनंतर त्वरा करुन सांगाती । तुझ्या येईल मी झणीं ॥४३॥
सूत तेव्हां उत्तर देत । मुद्‌गलाच्या विनयें तृप्त । संतुष्ट चित्तें यथातथ्य सांगत । विभागशः वर्णन तें ॥४४॥
पृथ्वी ही कर्मभूमि जाणावी । स्वर्ग ही भोगभूमि बरवी । कर्मांचे फळ देववी । चित्रगुप्त जेथें प्राण्यांसी ॥४५॥
त्या स्वर्गाचीं गुणसंपदा । मोजिता न ये ती सुखदा । ईप्सित सारें लाभून सर्वदा । चिरयौवनीं स्थिती होय ॥४६॥
थकवा घाम इत्यादि न येत । शीतोष्णाचा त्रास नसत । अप्सरांसंगे विहार इच्छित । स्वैरगती विहार तेथें ॥४७॥
स्वकर्मानुसार भोगती । सर्वभावें भोग प्रीती । जे जे देहधारी बांछिती ते ते सरे भोग तेथें ॥४८॥
जी भोगभूमि ऐसी ख्यात । स्वर्गरुपा महामुने असत । तेथ न्यून काय संभवत । ज्याविषयीं तूं विचारिसी ॥४९॥
मुने तूं नानाविध कर्म केलें । तप उग्रही आचरिलें । म्हणोनि स्वर्गलोकीं भोग जाहले । तुज अक्षय प्राप्य सदा ॥५०॥
ऐसा स्वर्ग गुणयुक्त । परी तीन दोष तेथ असत । महामुने ते मी कथित । सावधान ऐकावे ॥५१॥
येथें शुभ कर्माचें फळ मिळत । परी तैसे न होय स्वर्गांत । तेथले कर्म फलहीन होत । म्हणोनि प्राणी दुःख करिती ॥५२॥
या सुखोपभोगानंतर । कर्मफळ संपतां सत्वर । पुढे काय स्थिती होणार । चिंताग्रस्त जीव होती ॥५३॥
मी एवढें पुण्य केलें । म्हणोनि एवढे भोग भोगले । स्वर्गंवासाचे दिन उरलें । इतुकेचि ऐसे मोजिती ॥५४॥
हा महान दोष असत । मुनिसत्तमा दुसरा कथित । नाना मित्र प्रीतियुक्त । जरी जोडिले स्वर्गांत ॥५५॥
महाभागा देवांसहित । जरी प्राणी तेथा नांदत । सत्कर्म संपतां खाली टाकित । अत्यंत निष्ठुर होवोनी ॥५६॥
एक क्षण ते न थांबती । जीवावरी स्नेह न करिती । स्वर्गांतून पतनाचें भय चित्तीं । सदैव वसते जीवांच्या ॥५७॥
तिसरा दोष ऐसा असत । सत्कर्मपुण्यें जीव येत । नानाविध तेथ पाहत । स्पर्धा तेणें संभवे ॥५८॥
माझ्याहून अधिक सुखांत । हे दुसरे प्राणी विहरत । धिक्कार माझा पूर्व आयुष्यांत । अल्प पुण्य मीं केलें ॥५९॥
महापुण्यकरा पाहत । जीव तेव्हां जळे चित्तांत । सदैव ईर्षा द्वेष वाटत । तापात्मक हा दोष तिसरा ॥६०॥
अन्यथा अनंत गुणयुक्त । स्वर्ग असे त्रिदोषयुक्त । तूं जिंकलास स्वर्ग क्षणांत । आतां भोग भोगी अतिसुंदर ॥६१॥
माझ्यासवें चल सत्वरी । ऐसी देवदूत विज्ञप्ती करी । मुद्‌गल काय म्हणाले उत्तरीं । कथिले तें पुढिले अध्यायीं ॥६२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते मुद्‌गलदेवदूतसंवादो नामाष्टादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP