मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ३२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल म्हणती दक्षा ऐकावें। महाप्राज्ञा कार्य बरवें । देवांचे जें स्वभावें । संक्षेपें मी तुज सांगतों ॥१॥
दत्तात्रेय मुनि गेल्यावर । शंकर मानसीं करिती संचार । गणेशाचा मंत्र थोर । त्याचा जप करीन मी ॥२॥
नंतर गणेशाचें हृदयीं चिंतन । करुन ब्रह्मदिकां म्हणती वचन । विष्णु सर्व देव तापसांनो । ऋषींनो वचन ऐकावें ॥३॥
हितकारक दुःखनाशक । दत्तात्रेयें कथिलें तारक । एकाक्षर व्रत जें अमोलिक । करुन विघ्नपा तोषवावें ॥४॥
शंभूचें वचन ऐकून । मुनी देवनायक प्रसन्नमन । वाहवा सुंदर हा विचार पावन । ऐसे उद्‌गार काढिती ॥५॥
तदनंतर एकाक्षरमंत्रें उपासिलें । त्या सर्वांनी गणेशा स्थापिलें । देव मुनींनीं वंदिलें । आदरपूर्वक सर्वनायका ॥६॥
कोणी पद्मासन घालून बैसले  । कोणी विरासन घातलें । कोणी स्वस्तिकासनीं विराजले । नाना आसनीं ऐसे स्थित ॥७॥
कोणी निराहार राहिले । कोणी पानें खाऊन जगले । कोणी वायु भक्षण केलें । अन्य करिती प्राणायाम ॥८॥
पाणी पिऊन कोणी राहती । पादांगुष्ठाकडे पाहती । कोणी दॄढासनीं बसती । कोणी मानसपूजामग्न ॥९॥
कोणी विविध फुलांनी पूजिती । कोणी प्रदक्षिणा घालिती । ऐसें नानाविध आचरती । व्रतप्रकार सकल देव ॥१०॥
ऐंश्यापरी तप करिती । विधिपूर्वक मंत्र जपिती । एक चित्तें आराधिती । नमरपणे भक्तिपूर्ण ॥११॥
एक हजार वर्षे तप आचरिलें । दिव्य एकनिष्ठ तेव्हा भलें । तेणें वक्रतुंड प्रसन्न झाले । महातेजस्वी प्रतापवंत ॥१२॥
देवऋषींच्या पुढें प्रकटत । ब्रह्ममय देव वेदस्तुत । तेजाचा पुंज तो विलसत । निर्गूण असुनी सगुण झाला ॥१३॥
सिंहवाहन गजवक्त्र दिसत । शूर्पकर्ण महोदर चतुर्बाहुयुक्त । पाशांकुश वरद अभयकर धृत । वामांगी सिंद्धी उभी त्याच्या ॥१४॥
दक्षिणांगी बुद्धी विलसत । नाभीवरी शेषनाग रुळत । मुकुट कुंडल कटकान्वित । चिंतामणी त्याच्या वक्षावरी ॥१५॥
सर्पायज्ञोपवीत युक्त । नानाभूषणें शोभिवंत । महातेजें जो प्रज्वलित । करांत क्रीडाकमल होतें ॥१६॥
त्याचें तें रुप अपरिचित । म्हणोनि देव विप्र भयभीत । काय हें तेज अद्‌भुत । प्रकटलें सम प्रलयाग्नीच्या ॥१७॥
हा गणराज येथ आला । कीं भावी प्रळयकाल दैवें निर्मिला । ऐसा तर्ककुतुर्क चालला । देवमुनींच्या चित्तांत ॥१८॥
तेव्हा मेघगंभीर वचन । बोलिला वक्रतुंड गजानन । देवांनो मुनिगणहो प्रसन्न । मीच तो गणेश्वर प्रकटलों ॥१९॥
ज्याचें ध्यान करता अविरत । तपप्रभावें मंत्रराज जपत । तेणें परितुष्ट मी मुदितचित्त वर द्यावया आलों तुम्हां ॥२०॥
मुद्‌गल सांगती दक्षासी । ऐकुनी वक्रतुंडवचनासी । विनम्र भावें प्रणाम त्यासी । हर्ष निर्भर सारे करिती ॥२१॥
अमरगण ऋषिगण प्रार्थिती । सौम्यरुप दाखवा आम्हांप्रती । या दुर्धर तेजें विहवल चित्तीं । वक्रतुंडा आम्ही सर्व ॥२२॥
त्यांची प्रार्थना ऐकून होत । गणेश प्रभू सौम्य तेजयुक्त । तेणे चर्मचक्षूंनी सुखें पाहत । मुनिजत देव सारे तया ॥२३॥
ती सौम्य मूर्ती पाहती । प्रणाम करुन म्हणती । प्रभू धन्य धन्य आम्ही जगतीं । तुमचे दर्शन आज झालें ॥२४॥
स्नेहभावें तदनंतर । अर्पितो सारे षोडशोपचार । यथाविधि ते महेश्वर । मंगल स्तवन त्याचें गाती ॥२५॥
करांजली जोडून विनमर । ते सर्वही भक्तिनम्र कंधर । आनंदाश्रू नयनीं सुखकर । रोमांचयुक्त अंगे त्यांची ॥२६॥
त्याच्या दर्शनें महोत्सव वाटत । यथाज्ञान यथान्याय पूजन करित । वक्रतुंडास महाओजस्वी देवास । स्तोत्र पूजा अर्पिती ॥२७॥
शंभुरुपा आम्ही नमितों । विष्णुरुपा तुला वंदितो । सूर्यरुपा तुला ध्यातों । शक्तिमया तुला ॥२८॥
वक्रतुंडा तुला नमन । गजवक्त्रा तुला वंदन । एकदंता देवा चिंतन । सर्वाधिपते सदा करितों ॥२९॥
निर्गुणासी निस्तपासी । चतुर्बाहुधरा तुजसी । सिंहवाहना नागपते नाभिबंधासी । अनंतासी नमन आमुचें ॥३०॥
अपारा दुर्लक्ष्या पाशांकुशधरा । नागयज्ञोपवीतधरा । वरद अभयकरा सिद्धिबुद्धिवरा । ब्रह्मभूता ब्रह्मदायका ॥३१॥
दैत्यदानवावरुपा देवरुपधरा । पक्षिस्वरुपा शुकरुपधरा । ग्रहनक्षत्ररुपा ईश्वरा । नमन लतावृक्ष स्वरुपा ॥३२॥
पर्वता सरितासागररुपा नमन । जलजंतुस्वरुपा तुज प्रणाम । सर्परुपा तुला वंदन । चौरांयशी लक्ष योनि संस्था ॥३३॥
चराचरमया अभिवादन । नानाप्रभेदपरासी वंदन । कर्माकर्मरुपा नमन । विकर्मपर देवासी ॥३४॥
ज्ञानयोगासी स्वात्मरुपधरासी । स्वसंवेद्यरुपा योगमयासी । नाना आधारप्रधारासी शब्दब्रह्ममया नमन ॥३५॥
मायारुपधारकासी मायामयासी मायाहीनासी । मायिका मोहदात्यासी । सर्वकारासी वंदन ॥३६॥
स्थूल सूक्ष्मादि भेदासी । भेदाभेदमया भेदहीनासी । अनंतपारा भक्तां वरदात्यासी । भक्तसंरक्षका प्रणाम ॥३७॥
नमो नमः परेशाला । अव्ययाला गणेशाला योगाधीशा गजानना तुला । पुनःपुन्हा नमस्कार ॥३८॥
षडंग वेदही जेथ थकले । ज्याची पूर्ण स्तुती करुन न शकले । तेथ आमुचें बळ तें कसलें । गणेशा तुझ्या स्तुतिगानीं ॥३९॥
वक्रतुंडस्वरुपा तुझें स्तोत्र । रचण्यासी आम्ही न पात्र । परी भक्तिभावें सुपात्र । तुझ्या कृपेनें जगी होऊं ॥४०॥
मायादुःख सर्वांच्या मनांत । ज्ञानकारक ब्रह्म निर्मित । म्हणोनी ज्ञानहीन वक्त्र म्हणत । ब्रह्मां बुधजन संकेते ॥४१॥
माया ब्रह्मतुंडाचा योग होत । योगशांती उपजे पुनीत । योग्यांच्या हृदयीं जी संस्थित । तिचा महिमा अगम्य असे ॥४२॥
माया तुझें देह स्वरुप । ब्रह्म तें वस्त्र आत्मरुप । उभयतांचा योग होतां स्वरुप । वक्रतुंड प्रकटतसे ॥४३॥
त्या वक्रतुंडा तुज पाहिलें । साक्षात्‍ योगमया मन धालें । धन्य आम्हीं गणाध्यक्षा स्तविलें । प्रणत तुमच्या चरणांवरी ॥४४॥
धन्य जन्म धन्य नयन । धन्य संपदा तैसेंचि ज्ञान । धन्य सप आमुचें पावन । ज्यांनी गजानना पाहिले ॥४५॥
प्रसन्न देवेशा जरी अससी । आम्हां शुभद वर देसी । तरी तुझ्या पदांबुजी दृढ भक्तीसी । देई आम्हां सर्वकाळ ॥४६॥
तूं चिंतिला अर्थ देसी । म्हणोनि करितों पार्थनेसी । मत्सरासुराच्या विनाशाची । करी सत्वर वक्रतुंडा ॥४७॥
प्रभो हें सारें जगा पीडित । विघ्नपा तो असुर गांजित । महाबला दैत्या मारावें त्वरित । उपकारास्तव सर्वांच्या ॥४८॥
ऐसी स्तुती प्रार्थना करुन । तैसेंचि त्यासी पूजन । त्याच्या पुढें साष्टांग नमन । देव ऋषि सर्व करिती ॥४९॥
त्यांना उठवून वरती । वक्रतुंड साक्षात्‍ सांगती । तुमचें हें स्तोत्र जगतीं । सर्वसिद्धिप्रद होईल ॥५०॥
ईप्सित अर्थ प्राप्त होईल । भुक्तिमुक्ती यानें लाभेल । जो हें स्तोत्र वाचील । भक्तियुक्त मनानें ॥५१॥
तुमच्या भक्तियोगें प्रसन्न । करीन मत्सरासुराचें हनन । तुमचें दुःख दैन्य दूर करीन । आश्वासन हें माझें ॥५२॥
पंचभूतमय जग त्रिगुण असत । ब्रह्मांड अष्ट आवरणें युक्त । त्या आठ आवरणीं वसत । देव सर्वही मानव ॥५३॥
नाग चराचर विश्व त्यांत । त्यापासुनी मत्सरासी भय नसत । म्हणोनी मत्सरा नाश वाटत । अतीव कठिण असंभव ॥५४॥
परी द्विजांनो हित करीन । प्रिय तुमचें देवहो प्रसन्न । यांत संशया नसे स्थान । वक्रतुंडाचें वचन हें ॥५५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमनौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते वक्रतुण्डप्रादुर्भावी नाम द्वात्रिंशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP