खंड १ - अध्याय १७
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । शिव सांगती कथा पावन । गणेशगीतासार ऐकून । ते पंचदेव विस्मित होऊन । प्रणाम करिती गणनायका ॥१॥
ते गणेशासी सांगती । भगवन्ता तुमची उक्ती । सर्वसार पूर्ण ओघवती । तेणें तृप्त झालों झणीं ॥२॥
मोहशून्य आम्हां केलेस । तुझिया दर्शनमात्रें स्मरणास । पूर्वींच्या सर्व कृतीस । गुणरुप आम्ही सारे ॥३॥
ढूंढे आम्ही ब्रह्ममय । तरी कैसे तें सांगा योग्य । त्यांचें वचन ऐकून सौभाग्य । महाप्रभू त्या सांगत ॥४॥
भक्तवत्सल गजानन । बोले संतुष्ट होऊन । जगदीश्वर तुम्हीं परम पावन । स्वपदीं या जगतांत ॥५॥
गुणयुक्त भिन्नभावांत । मीच तुम्हांसी करित । चतुर्विध भावें चित्र खेळत । तुमच्या रुपीं हें जाणा ॥६॥
तेथे बिंब जें पडत । क्रीडेंत पंचविध मी होत । बहुविध विलासांत । त्या त्या भावांत देवांनो ॥७॥
तुम्हीं सारे माझ्या अधीन । निःसंशय करा मन । ह्या भिन्न विहारांत पावन । रजः सत्त्व तमोमय ॥८॥
ब्रह्मा हरी शंभूस निर्मिलें । मायेनें मी सामर्थ्य दिलें । त्यांच्या अहंकारासी सृजिलें । सूर्यासी मोहमयीस ॥९॥
त्रिगुण सिद्धीसाठी शक्ती । निर्मिली मी ह्या जगती । पंचदेवांची तैशी निर्मिती । मीं केली मायेनें ॥१०॥
येथ अंशमात्रें मी स्थित । वक्रतुंड नामें ख्यात । बिंदु ब्रह्ममय साक्षात असत । भिन्न भाव प्रकाशक ॥११॥
माझे जे तुरीयरुप केले । गुणपते देवांनो झाले । बुद्धिरुप दक्षिणांग भलें । ऐसें तुम्हीं जाणावें ॥१२॥
पंचदेव विराट नामें ज्ञात । वामांग माझे सिद्धियुक्त । होऊनी सिद्धिबुद्धियुत । बिंदुमात्रात्मक झालों ॥१३॥
भक्तांना जें विघ्नरुप जगांत । देव त्यांसी वक्र म्हणत । त्या वक्रांसी मी मारित । शुंडाप्रहारें सत्वरी ॥१४॥
म्हणोनी वक्रतुंड नामें स्मृत । माझ्या मायामय जीवापासून असत । वक्र ब्रह्ममुख म्हणोनी ख्यात । वक्रतुंड या नावानें ॥१५॥
उन्मन जनांसी मी लाभत । तुमच्या कार्यसिद्धीसाठी होत । विहारास्तव बिंदुरुप जगांत । मायेने मी भावपूर्वक ॥१६॥
विसराल माझें स्मरण जरी । मायामोहें संभरान्त तरी । महेश्वरांनो हृदयांतरी । स्मरण करा सतत माझें ॥१७॥
दैवकार्यांत पितृकार्यात । आघीं पूजनीय मीं असत । मम पूजनें सिद्धियुत । सर्वही व्हाल निःसंशय ॥१८॥
ऐसे बोलून अंतर्धान । पावलें गणपालक गजानन । शिव म्हणती ध्यानमार्ग पुरातन । देवी असे ऐसा हा ॥१९॥
त्या गणेशा ब्रह्मनायका ध्यात । विराजला जो मम हृदयांत । त्या गणपाच्या आज्ञेनें निर्मित । ब्रह्मा अखिल चराचर ॥२०॥
विष्णु नाना अवतारधारी । जगताचें पालन करी । मी शिव त्याचा संहार करी । गणपाच्या आज्ञेनें ॥२१॥
कर्माचा चालक सूर्य होत । कालप्रभावें जगांत । हिमाचलाची सुती संजात । तूं विसरलीस त्या देवा ॥२२॥
गणपबोधकर ज्ञान । तुझिया हृदयांत असून । अखिल विसरलीस म्हणून । आठवण तुज करुन देतों ॥२३॥
हे शुचिष्मिते सर्व आठव । तूं महामाया पाही देव । हृदयांत गणप सर्वभव । त्याचे अवतार कथितों तुला ॥२४॥
संक्षेपें आठ अवतार । त्याचें भजन तूं कर । जेणे दुर्लभ होय सुकर । योगमार्ग जगतांत ॥२५॥
पहिला वक्रतुंड ‘त्वं’ पद असत । दुसरा तत्पद ब्रह्म एकदंत । महोदर तिसरा ब्रह्मासि पदयुक्त । गजानन चवथा सांख्यरुप ॥२६॥
लंबोदर नामक ब्रह्म ख्यात । जो महेश्वरी तुझ्यांत स्थित । सहावा विकट नामा असत । सद्ब्रह्मात्म परम सूर्य ॥२७॥
विघ्नराज स्वयं विष्णु सातवा । धूमरवर्ण शंभू अव्यक्त आठवा । ह्या आठ ब्रह्मांत जाणावा । कला रुपधर पालक संघ ॥२८॥
ऐसे हें गणप अवतार । गणराजाचे समग्र । स्वसंवेद्यमय ब्रह्य अपार । त्यांचा खेळकर गणेश असे ॥२९॥
अयोगाचे अवतार नसत । खेलनादी तया न संभवत । स्वानंदवासी खेलक असत । ऐसें जाण प्रिये तूं ॥३०॥
गणाधीश पूर्ण योग असत । स्वानंद अयोग वर्णित । योगसेवनें योगियां लाभत । तेथ शांती सर्वदा ॥३१॥
देवी तूं जें विचारिलें । तें सर्व मी कथन केलें । म्हणोनि आतां पाहिजे पूजिलें । ह्याच विधीनें गणेशाला ॥३२॥
आपुला कुलदेव गणेश । चिंतामणि विनायक ईश । ह्यांत संशय ना लवलेश । नित्य पूजितो मी तया ॥३३॥
पांच चित्तवृत्तींचा प्रकाशक । म्हणोनि चिंतामणि सुखकारक । गजानन तो हितकारक । गजवक्त्र मूर्ती धरी पहा ॥३४॥
त्याची मणिरत्नमयी मूर्ती । पूजितों मीं भावभक्ती । इतुकें म्हणौन सदाशिव प्रियेप्रती । ध्यानस्थान आपलें दाखवी ॥३५॥
ते पाहून एकांतांत । देवी पार्वती झाली विस्मित । शंकरा करुणानिधीस विचारित । मुद्गल सांगती ती कथा ॥३६॥
तामस स्वभावा तुझी मी कांता । मोहसंदात्री सर्वांस आता । कैसी झालें एकभाग स्थिता । तें सर्व सांग मज ॥३७॥
हा माझा संशय फेडावा । तुझ्या वाचुनी नसे विसावा । संशय दूर करण्या बरवा । अन्य कोण सर्वज्ञ असे? ॥३८॥
पार्वतीचें वचन ऐकून । शिव झाला मनीं प्रसन्न । बोलला मधुर वाक्य हर्षून । ऐक देवी पूर्वेतिहास ॥३९॥
तूं माझी प्रिया कशी झालीस । कथा भाग ती अति सुरस । सुखप्रद सांगेन निरास । संशयाचा तव करीन ॥४०॥
पंचदेवांची स्पर्धा होत । पूर्वी विवाद त्यातून घडत । तेथ तुझें अद्भूत । ऐश्वर्य मीं पाहिलें ॥४१॥
पंच देवांसी बोध करुन । गणेश पावला अंतर्धान । यथान्याय उपदेश देऊन । ब्रह्ममय तो महा प्रभू ॥४२॥
नंतर मी तप आचरित । तुझ्या प्राप्तीसाठी कष्टत । माझ्या भक्तिभावें संतुष्ट होत । तूं जन्मलीस शतवर्षांनी ॥४३॥
माझ्या जवळीं येऊन म्हणत । वर माग जो असेल इच्छित । प्रसन्न असे महादेवा मनांत । तेव्हां नमूनी केली स्तुती ॥४४॥
स्वस्वरुपांनी कार्यरत । तुझी महती स्तुतीत गात । तेणें परम तुष्टी होत । जगदीश्वरी तव झणीं ॥४५॥
मी वरदान मागत । देवी तू मम पत्नी हो म्हणत । जगदीश्वरी द्यावा मनोवांछित । हाचि वर मजलागीं ॥४६॥
माझें वचन ऐकून सस्मित । भावपूर्वक तूं म्हणत । ‘तथास्तु’ हे वरदान उचित । अंतर्धान नंतर पावलीस ॥४७॥
म्हणोनी तूं प्रिया झालीस । वरदान प्रभावें माझी सुरस । तुझ्या वामांगापासून लक्ष्मीस । नारायणप्रियेस निर्मिलें तूं ॥४८॥
तुझ्या दक्षिणांगापासून उद्भूत । सावित्री ब्रह्मदेवप्रिया जगांत । तुझा हृदयापासून जन्मत । सूर्यपत्नीं संज्ञाही ॥४९॥
शिवानें जो गणेशयोग कथिला । तो एकांतांत आचरिला । तेणें महाभाग परम शांतीला । अल्प काळें लाभली ॥५०॥
पूर्व संस्कार सुफलित । म्हणोनि शिवसन्निध प्राप्त । पार्वती जाहली शांतियुक्त । ऐसें कर्तृत्व गणपाचें ॥५१॥
म्हणोनी मुदगल म्हणती । दक्षा तूंहीं भज चित्तीं । सर्वभावें करी गणेश भक्ति । ब्रह्मनायकाची तूं सदा ॥५२॥
तेणें तूंही विघ्नहीन । होशील यांत संशय न । सर्वमान्य महायोगी होऊन । जगद्गुरु तूं शोकहीन ॥५३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खंडे वक्रतुण्डचरिते शिवपार्वतीसंवादसमाप्तिर्नाम सप्तदशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP