खंड १ - अध्याय ३९
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशायनमः । मत्सर शांत तेव्हां झाला । देव ऋषीस आनंद वाटला । त्यांनीं देव गजानन स्तविला । स्तोत्ररुपें त्या वेळीं ॥१॥
सदा ब्रह्मभूत विकारविहीन । विकारादिभूत महेशादींस वंद्य पावन । अपार स्वरुप स्वसंवेद्य रोचन । सदा वक्रतुंडा त्या भजतों ॥२॥
अनंत स्वरुपा सदानंदकंदासी । प्रकाश स्वरुपा सदा सर्वगासी । अनादि गुणादीस गुणाधारभूतासी । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥३॥
धरा वायुतेजोमयास । तोयभावास सदाकाररुपास । महाभूत संस्था अहंकारधरास । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥४॥
तमोमात्र संस्थितास । सर्व देवांच्या प्रकाशकास । सर्व देवाधिरुपा दिशाबोधकास । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥५॥
रवि प्राण विष्णु प्रचेत । यम ईश विधाता मागत । वैश्वानार इंद्र प्रकाश ज्याप्रत । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥६॥
उपस्थ त्वचा वाणीस । जो देई प्रकाशास । करांघ्रि स्वरुपा कृतघ्राण जिव्हास । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥७॥
गुदस्थ मूलाधारस्थितास । श्रुतिस्था महास्वप्रकाशास । रजोरुप सृष्टि प्रकाशास । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥८॥
विधिरुपास केशवरुपास । निर्मिति पालन करणारास । तमोरुपधर संहारक हरास । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥९॥
दिशाधीशरुपा सदाशास्त्ररुपास । ग्रहादि प्रकाशा खगस्थ धरुवादीस । अनंत क्षत्ररुपा तदाकारहीनास । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥१०॥
महत्तत्त्वरुपा प्रधानरुपास । अहंकारधारका त्रयी बोधकरास । अनादि अनंत मायिका तदाधार पुच्छास । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥११॥
कर्मधारा फलहेतुरुप स्वर्गदायकास । तमकर्म प्रकाशका मुक्तिप्रदा । विमर्कादींनी यातना आधारभूतास । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥१२॥
अलोभस्वरुपा लोभधारकास । जनज्ञानकरा जनाधीशपालास । नरांसी सिद्धिदात्या मानवस्थास । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥१३॥
लता वृक्षरुपा पक्षिरुपास । धनादि प्रकाशा धान्यरुपास । प्रसूपुत्रपौत्रादि नानास्वरुपास । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥१४॥
खगेशस्वरुपा वृषादि प्रसंस्थास । मृगेंद्रादिबोधा मृगेंद्ररुपास । धराधर हेमाद्रि मेरुस्वरुपास । सदा वक्रतुंडास त्यां भजतों ॥१५॥
सुवर्णादि धातूंत सद्रंगसंस्थास । समुद्रादि मेघरुपा जल-स्थास । जळांत जंतु मस्त्यादि नाना विभेदास । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥१६॥
शेषनागादि स्वरुपास । नागभूषणा लीलाकरास । सुरारि स्वरुपा दैत्यादिभूतास । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥१७॥
पाशधारका भक्तपोषकस । महापौरुषयुक्ता मायिकास । सिंहसंस्था चतुर्बाहुधरा विघ्ननाशकास । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥१८॥
गणेशास गणेशादिवंद्यास । सुरेशास सर्व पूज्या सुबोधादिगम्यास । महावाक्य वेदांतवेद्या परेशास । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥१९॥
अनंत अवतारधरास । जनीं स्वधर्म निष्ठा निर्मात्यास । सुर दैत्यपवंद्या पालकास । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥२०॥
या महादैत्यास बोध करुन । ज्याने केली शांति प्रदान । विश्वांत सुखानंद शांति भरुन । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥२१॥
ज्याला वेद वेदज्ञ मर्त्य न जाणती । शास्त्रशास्त्र भूपती । योगयोगीशकादी नमिती । सदा वक्रतुंडास त्या भजतों ॥२२॥
वेदांनी देवेंद्र मुख्यांनी ना जाणिलें । योगींद्र मुनींद्रही जेथ थकले । तेथ आमुची मती काय चाले । परी वक्रतुंडास भावें भजतों ॥२३॥
ऐशियापरी करुनी स्तुती । देव ऋषी करांजली जोडिती । उभे राहिले शांत स्थिती । स्तुतीनें प्रसन्न गणेश जाहला ॥२४॥
प्रमुदित होऊन गजानन । देव मुनींना म्हणे वचन । आपण केलें हें स्तोत्र पावन । प्रीतिवर्धक मज आनंदप्रद ॥२५॥
या स्तोत्राने माझी स्तुती । करील नित्य जो भावभक्ती । त्याची करीन कामनापूर्ती । बहुविध संपदा देऊनी ॥२६॥
नानाविध भोग देईन । पुत्रपौत्रादींनी युक्त त्या करीन । जें जें वांछील ते तें देईन । यात संशय कांही नसे ॥२७॥
भुक्तितमुक्तिप्रद ब्रह्मभूयकर । नानासिद्धिप्रद बुद्धिप्रकाशकर । सुरेंद्र वंद्यता पावेल नर । या स्तोत्रें जो मज स्तवील ॥२८॥
सहस्त्र आवर्तनें याची करित । कारागृहांतून तो होत मुक्त । अपराध शतयुक्त असत । क्षमा त्यास हें स्तोत्र वाचता ॥२९॥
एकवीस वेळां एकवीस दिवस । वाचील जो हें स्तोत्र सुरस । त्यांच्या सर्व चिंतितार्थास । पुरवीन मी निःसंशय ॥३०॥
माझ्या स्तुतिपर एकवीस श्लोक । रचिले तुम्ही आनंददायक । मुनींनो देवांनो विगत शोक । तुम्ही सर्व झणीं व्हाल ॥३१॥
विघ्न तुमचें निरसेल । स्वधर्मीं रुची दृढ होईल । भुक्तिमुक्तिप्रद होतील । एकवीस श्लोक मम स्तुतीचे ॥३२॥
या स्तोत्रें मी संतुष्ट चित्त । वर मागा मनीं वांछित । तो मी पुरवीन क्षणांत । तेव्हा सुरगण मुनी म्हणती ॥३३॥
ते सारे देव वंदिती । मुनिगणही प्रणाम करिती । त्या महाबला वक्रतुंडा प्रार्थिती । देई एवढे वरदान ॥३४॥
तुझी अचल भक्ती दयानिधी । आम्हां दे, नको अन्य उपाधी । तुझी भक्ती प्राप्त होतां सिद्धी । सर्वही सुलभ होतील ॥३५॥
म्हणोनि महाभागा विघ्ननायका । तुझी भक्ती सुखदायका । देई आम्हां जी तृप्तिकारका । राहूं तुझ्या चरणाश्रित ॥३६॥
त्यांचे तें वचन ऐकून । ज्ञानी जनप्रिय गजानन । भाव गंभीर अमृतायमान । वचन तेव्हां बोलला ॥३७॥
तुमच्या मनांत अचल । माझी दृढ भक्ती राहील । भावयुक्त तुम्ही असाल । देवर्षीनो सर्वदा ॥३८॥
ऐसें वरदान देऊन । अंतर्धान पावला गजानन । मुनि देवांसमक्ष सुमन । स्वानंदी मग्न तो झाला ॥३९॥
खिन्न ऋषि मुनी झाले । आपापाल्या स्थळा गेले । त्या सिद्धिद वक्रतुंडाचें केलें । ध्यान त्यांनी मनांत ॥४०॥
मत्सरासुरही जात । तेव्हां होऊन मनीं शांत । सर्व दैत्यांसमवेत । आपुल्या स्थानी अविलंबित ॥४१॥
आपुल्या पदाचें पालन । करण्या उत्सुक त्याचें मन । दैत्यसंघही परतून । आपापल्या घरीं गेला ॥४२॥
ऐसा मत्सरासुराचा महिमा । वक्रतुंडे दाखविला सुरोत्तमां । त्याच्या प्रभावा नाही उपमा । कर्ताधतां संहर्ता जो ॥४३॥
आदि मध्य अन्तातीत । नाना अवतार जगीं घेत । स्वस्वधर्मी रत करित । सुरां असुरां मानवांना ॥४४॥
त्याचे अवतार अनंत । अखिल वर्णन करण्या असमर्थ । ब्रह्मा षण्मुख विष्णु होत । शंकर शेष मुनिगण वेद ॥४५॥
तेथ मी किती सांगणार । वक्रतुंडाचे चरित्र । दिवोदासाच्या शमार्थ अवतार । शिवपुत्र ढुंढीचा तो घेई ॥४६॥
वामनासी वर देण्यास । प्रकट झाला गणनायक त्यावेळेस । भक्तपालक महातेजस्वी सुरस । भक्तसंरक्षक श्रीगणेश ॥४७॥
मुद्गल दक्ष प्रजापतीसी सांगती । ऐसे नाना अवतार घेती। भक्तांचे संरक्षण करिती । त्यांचें चरित्र ऐकू तूं ॥४८॥
एकदा सृष्टिरचना करित । ब्रह्मदेव वक्रतुंडासी न स्मरत । तेव्हां मत्सर त्याच्या मनांत । त्वरित प्रवेश करता झाला ॥४९॥
तेव्हां असुर स्वभावें पीडित । विधिपीडित विघ्नयुक्त । सृष्टिरचना करुं न शकत । तेव्हा बोध त्या आठवला ॥५०॥
ब्रह्मदेव वक्रतुंडा शरण जात । त्याचें ध्यान करी चित्तांत । तेव्हां विघ्नविहीन होत । निर्मिलें सकल जग त्यानें ॥५१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खंडे वक्रतुंडचरिते वक्रतुण्डान्तर्धानें नामैकानचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP