मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय २२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाला नमः । सूत म्हणती तें मुद्‌गलमुनी । गणेशवचन ऐकूनी । भक्तिभावपूर्ण मनीं । प्रणिपात करुन प्राथिती तया ॥१॥
पूर्ण मानस होतें । गणेशासी म्हणती ते । कां लोभ दाविसी मातें । ढूढें वरदान मज नको ॥२॥
मज कांही न्यून नसत । परी तुझा आग्रह असत । म्हणोनि मी वर मागत । दृढ भक्ति देई तुझी ॥३॥
ती भक्ति राहो अखंडित । संपूर्ण प्रेमपूर्ण मम मनांत । जेथें जेथें असेन जगांत । तेथें गणेशा तव ध्यान॥४॥
मुद्‌गलाचें वचन ऐकून । संतोष पावला गजानन । म्हणे माझी भक्ति अन्यून । अचल संपूर्ण तव चित्तांत ॥५॥
सदैव राहील निश्चित । तुजसम नसे भाग्यवंत । कोणीही या त्रैलोक्यांत । माझ्या भक्तींत रममाण ॥६॥
ती भक्ति नवविधा असत । विप्रा तुझिया चित्तांत । रसदायिका एकच वसत । दहावा प्रकार त्यांत नसे ॥७॥
श्रवण कीर्तन पादसेवन । अर्चन वंदन दास्य उपासन । सख्य देहनिवेदन । ऐसी नवविधा भक्ति असे ॥८॥
नवचिन्हांकित सांगेन । भक्ति महिमा तुज पावन । तेणेंच जनांस भक्ति लाभून । कल्याण त्यांचें होईल ॥९॥
माझ्या गुणांचें श्रवण । ऐकल्यावरी त्यांचें मनन । त्यानंतर तत्सम आचार करुन । अनुभव प्रत्यक्ष प्रत्यक्ष लाभेल ॥१०॥
रसोत्पतींचा अनुभव घेऊन । नंतर करावें गुणांचें श्रवण । तेणें जंतू होय पावन । अनन्य रस अनुभवितां ॥११॥
दुसरें कांहीं ऐकण्यास । जेव्हां न रुचे मनास । तेव्हां श्रवणात्मिका भक्तीस । संपूर्णता प्राप्त होते ॥१२॥
ऐशा भक्ताच्या कानांत । मी वसतों अविरत । त्याच्या भक्तीने मुग्ध होत । ऐसी जाण श्रवणभक्ती ॥१३॥
माझ्या गुणांचे कीर्तन । सदैव रसदायक करितां मन । अन्य कीर्तनी भाव न  राहून । रसनिर्मिती मनीं होय ॥१४॥
तेव्हां कीर्तनात्मिका भक्ति होत । सुसंपूर्ण प्रेमयुक्त । ऐशा भक्ताच्या जिव्हाग्रीं वसत । सदैव मी मुद्‌गला ॥१५॥
तदनंतर स्मरणरुपा भक्ति करीत । माझ्या कार्याची स्मृति सतत । व्रत पूजादिकांत । सावधान सर्वकाळ ॥१६॥
ऐशा भक्ताच्या स्मरणीं वसत । भक्ती भोगार्थ मीच सतत । माझे चरणकमल सत्य वाटत । अन्य सारे असत्य त्यासी ॥१७॥
माझ्या चरणांचा आश्रय घेत । मुद्‌गल मुने जो जगांत । पादसेवनरुपी उपजत । भक्ति तेव्हां चित्तांत ॥१८॥
त्याच्या आळसरहित देहांत । मी निश्चल राहत । तदनंतर सांगो पांग तो करित । माझें कर्मे प्रेमानें ॥१९॥
अर्चनात्मिका भक्ती प्राप्त । ऐशा भावें नरास होत । त्याच्या भक्तिभावें प्रभावित । माझा निवास तेथ होय ॥२०॥
वेदादींचा विचार करितां । माझ्या सम दुजा नसतां । मीच श्रेष्ठ हा विचार पटतां । वंदनभक्ति सिद्ध होते ॥२१॥
माझाविना ज्याच्या चित्तांत । अन्य कोणीही न प्रतिष्ठित । त्याच्या त्या श्रेष्ठ भावांत । सदैव मीच राहतसे ॥२२॥
भक्तिभोक्ता होऊन । अन्यत्र श्रेष्ठत्व दूर करुन । गाणपत्य सांप्रदायीं अभिमान । यथाकाल मी निर्माण करी ॥२३॥
गणेश उपासनामार्ग शास्त्रांत । वर्णिला असे अद्‌भुत । तो जाणून तत्सम होत । गणेशभक्त तदनंतर ॥२४॥
स्वभावतः मला भजत । गणेश मी हें मनीं जाणीत । तेव्हां दास्यभक्ती सुफलित । होते निश्चित भक्तिमार्गी ॥२५॥
गाणपत्य स्वभावांत । मीच त्यास दृढ करित । दास्यभक्ति तेणें होत । एकनिष्ठा प्रकाशित ॥२६॥
जैसे मित्राजवळी गौप्य नसत । ब्राह्यांतर सारे मित्र जाणत । तैसा बाह्यांतरीं दंभहीन होत । माझ्या भजनीं रत सदा ॥२७॥
ऐशा भक्ता सख्य प्राप्त । माझें सदैव या जगतांत । गणेश्वर सर्वही जाणित । जें जें माझ्या मनीं असे ॥२८॥
सर्वांच्या हृदयीं तो वसत । सर्व भाव तो जाणित । ऐशा विचारें भययुक्त । भक्त न करी अविचार ॥२९॥
अनन्यभावें मज भजत । भक्तिलोलुप मी तदा होत । त्याच्या कृतीनें मोहित । मैत्रींत त्याच्या दृढ राहे ॥३०॥
पंचधा चित्तभूमी असत । तिचा तेव्हां त्याग करीत । मीच गणेश ऐसा निश्चित । निश्चय जेव्हां होत असे ॥३१॥
अहंभाव विहीन होता  भक्तिभावाची होय सांगता । तेव्हां अभिन्नता चित्ता । येई ऐसें जाण म्हणे ॥३२॥
ऐसी नवविधा भक्ति करित । जो भक्त माझी रसयुक्त । माझ्या रसावांचोन चित्त । क्षणमात्रही तद अन रमे ॥३३॥
ऐशी स्थिती होतां प्राप्त । मझा संपूर्ण भक्त होत । त्याच्या मोहें संयुक्त । सदैव राहे त्या जवळी ॥३४॥
एक क्षणही त्याचा विरह । होता मम चित्ता होय दाह । धन्य होय तो विदेह । सदैव त्याचें रक्षण करी मी ॥३५॥
भक्तीसारखा भाव नसत । मज आवडता जगतांत । भक्तिभावें बद्ध होत । राहतों भक्तहृदयीं मी ॥३६॥
नानाविध नर मला भजती । नवविध भक्त जगीं असती । जेथ ज्याची अधिक आसक्ती । त्या भक्तींत थोर तो ॥३७॥
ज्या भक्तींत रसोत्पत्ती । अधिक उपजे स्वचित्तीं । त्या भक्तीची मुख्यत्वें प्रचीती । नवविधा भक्तींत जाणावी ॥३८॥
ऐशा नवविधा भक्तींत । भक्तराज जे प्रख्यात । त्यांची नावें मी कथित । महाभागा ऐक आता ॥३९॥
माझ्या गुणांच्या श्रवणांत । ज्याला अधिक रस वाटत । ऐसा भक्तराज कार्तिकेय प्रख्यात । माझ्या भक्तींत रममाण ॥४०॥
सर्व जीवांचा आत्मा असत । सूर्यदेव जो तेजयुक्त । तो माझ्या कीर्तनभक्तींत । अधिक रमला भक्तिभावें ॥४१॥
रामचंद्र स्मरणभक्तींत । पार्वती पादसेवनभक्तींत रत । महाविष्णु स्वयं रमत । अर्चनाभक्तींत माझ्या सदा ॥४२॥
वंदनभक्ति सर्वभावें करित । भक्तराजेंद्र शंकर अविरत । भक्तिधिप परशुराम होत । दास्यभक्तींत मग्न सदा ॥४३॥
सख्यभक्ति चतुर्मुख करित । भक्तांचा जो अग्रणी असत । वैय्यासकी शुकाचार्य प्रख्यात । आत्मानिवेदन भक्ति करी ॥४४॥
हे सर्व भक्तराज कथिले । ते सर्वही अंतराय विहीन झाले । तथापि मज ना विसरले । ब्रह्मभूत परी भजती मज ॥४५॥
त्या सर्वांचा राजा तूं असत । मुद्‌गला पूर्णभक्ती स्वभाव युक्त । तूं भजशील मज निश्चित । यत्नपूर्वक सर्वदा ॥४६॥
नवविधा भक्तिभावांत । विशेष स्थान तुज प्राप्त । माझा भक्तेश पूर्ण भक्त । आजपासुनी तुज केलें ॥४७॥
तुज सम न झाला न होईल । माझा भक्त ऐसा विमल । भक्तीचें बळ अतुल । अधीन तुझ्या मी सर्वदा ॥४८॥
तुझ्या शरीरावरुनी वाहत । वारा तोही पावन असत । तुझ्या दृष्टीनें जगतांत । स्पर्शानें पावन होत प्राणी ॥४९॥
ब्रह्म बुद्धियुत ते होतील । पीडा त्यांची सर्व निरसेल । ऐसें वरदान अमल । देऊन पावले अंतर्धान ॥५०॥
सूत म्हणती ब्रह्मनायक । गणेशभक्तांसी सुखकारक । त्याच्या वचनें मानिती लोक । सर्वश्रेष्ठ मुद्‌गलासी ॥५१॥
मुद्‌गलाचें चरित्र ऐकेल । अथवा जो हें वाचील । भावभक्तीनें ऐकवील । श्रद्धायुक्त जगीं जो ॥५२॥
त्यास सर्व अर्थसिद्धी प्राप्त । अखिल भोगही जगतांत अंतीं ब्रह्ममय तो होत । ऐसी कृपा विघ्नेशाची ॥५३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्‌मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते मुद्‌गलवरप्रदान नाम द्वाविंशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP