मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ४३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । देवेंद्राचें वचन ऐकत । चतुर्मुख चिंतातुर होत । देवरक्षणाचा विचार करित । परी उपाय सुचेना ॥१॥
तेव्हां झाला चिंतामग्न । देवांसि म्हणे कमलासन । आपण सारे मिळून गजानन । प्रार्थूंया भक्तिभावानें ॥२॥
तो सर्व विचारज्ञ असत । देवांचे सदैव शुभ करित । म्हणोनि ध्यानकौशल्यें स्वचित्तांत । आठवूया विनायकासी ॥३॥
एकाक्षर मंत्र विनानयुत । आहुती देऊया यज्ञांत । तरी तो सर्व देवांसी होत । शरणदायक निःसंशय ॥४॥
मुद्‌गल म्हणती देवगण । तैसेचि सारे मुनिगण । ब्रह्मदेवाचें वचन ऐकून । वक्रतुंडाचें पूजन करिती ॥५॥
विधिपूर्वक अव्यग्रपणें पूजिती । ब्रह्मदेव त्याचें ध्यान करिती । ऐसें ते विघ्नपासि तोषविती । देवऋषिही त्या समयीं ॥६॥
पूर्वी दिसलें रुप चित्तांत । सिद्धिबुद्धींच्या जें सहित । शंभर वर्षे तप आचरित । पुनरपि तें ब्रह्मम्यासि दिसे ॥७॥
साकार गुणसंयुक्त । मधुर मंजुळ ते बोलत । तें रुप पाहून विस्मितचित्त । गणेश प्रभूस विधि प्रार्थी ॥८॥
त्या क्षणीं सिद्धिबुद्धियुक्त । तो गजानन बाहेर प्रकटात । ब्रह्मयासी तें बोध करित । महाबळी वक्रतुंड ॥९॥
सुप्रसन्न तपप्रभावें झाला | म्हणोनि म्हणे ब्रह्मदेवाला । पितामहा माना पुत्र आपुला । गणाधिपा उत्पन्न तुझ्या ॥१०॥
पूर्वीं तपकाळीं तुम्ही चिंतिलें । माझें पुत्रत्व तें आज केलें । सफल ऐसें सांगितलें । ब्रह्मदेव तें आनंदला ॥११॥
सिद्धिबुद्धि विराजित । गणेशातें जेव्हां पहात । त्या वक्रतुंडा गजानना करित । प्रणाम साष्टांग ब्रह्मदेव ॥१२॥
सिद्धिबुद्धींचेहे विधानपूर्वक । पूजन केले अलौकिक । तें दृश्य पाहून आश्चर्यकारक । विस्मित झाले देव सारे ॥१३॥
देव ऋषि भक्तिभावानें । करिती प्रणाम त्यास प्रेमानें । विधीच्या मानसपुत्रा पाहून मनें । आनंदिलीं सर्वाचीं ॥१४॥
करुनी तयांचे पूजन । उद्युक्त झाले करण्या स्तवन । भार्यासहित वक्रतुंडाचें पावन । देव ऋषि ब्रह्मदेव ॥१५॥
ब्रह्मभूता वक्रतुंडास । साक्षी सिद्धिबुद्धियुतास । विघ्नेशास निगुर्णास । गुनात्म्यासी नमन असो ॥१६॥
अनादीस सर्वज्ञास । पालकास सर्वरुपास । सर्वाध्यक्षा श्रीमंतास । साक्षात्‍ देवासी वंदन ॥१७॥
आदिमध्यांतहीनासी । अमेय शक्तीस मायिकासी । मोहदात्यासी मायाधारासी । अमायिकासी नमो नमः ॥१८॥
सत्यास सत्यरुपास । सत्यपालका रक्षकास । ज्ञानास ज्ञानदात्यास । ज्ञानगम्यास नमस्कार ॥१९॥
लंबोदरास देवास । गणांच्या पतीस गणेशास । गुणाधारास हेरंबास । नमस्कार आमुचा पुनः पुन्हा ॥२०॥
तुज स्तवण्या न समर्थ । शास्त्रसमन्वित वेदार्थ । योगींद्र देवमुख्यही असमर्थ । तेथ माझा काय पाड? ॥२१॥
यथामति आनंदानें स्तविलें । गजानना तें तुज आवडलें । लंबोदरा तेणें झालें । सफल सर्वही मम जीवन ॥२२॥
अनंत ब्रह्मांडांचा कर्ता । तू पुत्रता घेऊन मज उद्धती । सिद्धिबुद्धि समन्विता । आलासि मम गृहा हें आश्चर्य ॥२३॥
सिद्धिबुद्धियुत ब्रह्मा ध्यायिलें । मीं माझ्या हृदयांत चितिलें । तेच बाहेर प्रकटलें । मज तारण्यासी निःसंशय ॥२४॥
ऐसें बोलून ब्राह्मणां बोलावित । पुत्राचें जातकर्म करवित । परमानंद भरला मनांत । ब्रह्मदेवाच्या त्या वेळीं ॥२५॥
अकराव्या दिवशीं ठेवित । सिद्धिबुद्धिपति हे नाव उचित । बालभावोचित खेळत । विनायक ते बहुत क्रीडा ॥२६॥
सावित्री त्यासी स्तनपान देत । दिवसे दिवसीं बाळ रमत । शुक्ल पक्षींच्या चंद्रासम वाढत । मातापित्यासी आनंदवी ॥२७॥
सिद्धिबुद्धिसहित दक्षा होत । जेव्हां तो दोन वर्षांचा सुत । तेव्हां विधात्यास विचारित । विनयपूर्वक प्रश्न असा ॥२८॥
ताता तुम्ही मुनींसहित । का राहता वनवासांत । देवांसहित परम दुःखार्त । मज कां प्रभो भासता तुम्हीं? ॥२९॥
त्यांचें तें वचन ऐकुन । ब्रह्मा हर्षयुक्त होऊन । गणपासी सांगे वृत्तान्त उन्मन । दैत्य करणी अति दारुण ॥३०॥
तें ऐकून कोपदीप्त । वक्रतुंड त्यासी म्हणत । मेघगंभीर स्वरें उदात्त । आनंदवीत देवविप्रांसी ॥३१॥
दंभासुरा महावीरा मारीन । देव ब्राह्मणां स्वपदें देईन । हें माझें आश्वासन । संशय यांत अल्प नसे ॥३२॥
ऐसें बोलून आरुढ होत । सिंहावर शस्त्रधर सिद्धिबुद्धियुत । असुरांच्या सदनीं जात । वक्रतुंड तक्षणीं ॥३३॥
असुरांच्या नगरप्रांतीं संस्थित । देव मुनी त्यासी अनुसरत । इंद्रासी दूतभावें पाठवित । गणेश संदेश देऊनियां ॥३४॥
दैत्येंद्रा राही स्वधर्मांत । नाहीतर संहारीन तुज क्षणांत । इंद्र जाऊन असुर सभेंत । महादैत्या त्या तैसें सांगे ॥३५॥
ब्रह्मचा पुत्र झाला प्रख्यात । सनातन ब्रह्म अनादि अनंत । सिद्धिबुद्धिपति ध्यानतुष्ट प्रकटत । त्यास जाणावें असुरा तूं ॥३६॥
तोच मुनिदेवांसह आला । वक्रतुंड देव या क्षणाला । त्यानें दूतभावें पाठविला । मजसी सामोपचार्थ ॥३७॥
तूं स्वधर्म रहावें । देवासी हविर्भाग मिळावे । वर्णाश्रम धर्म पाळावे । निर्भयचित्तीं लोकांनी ॥३८॥
इंद्राचें ऐकून वचन । दंभासुर झाला क्रुद्ध मन । शरीरदाहक बोले म्हणून । अरे इंद्रा ऐक संदेश ॥३९॥
दूतरुपें मम सदनासी । या क्षणीं तूं आलासी । काय करावें नाहीतर तुजसी । टाकिले असतें बंदींत ॥४०॥
इंद्रा महाभागा जाई परत । माझा संदेश ने गणनायकाप्रत । पाचवे दिवशीं युद्धास येत । आजपासुनी त्यासवें मीं ॥४१॥
सांगे सिद्धिबुद्धिपतीस । इंद्र परतोनी वृत्तांतास । तो ऐकून म्हणे तयास । देवपते तूं योग्य केलें ॥४२॥
दंभासुराचा संदेश ऐकतां । परम प्रमोद माझ्या चित्ता । पांचवे दिवशीं पहा आतां । माझा विशेष पराक्रम ॥४३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खंडे वक्रतुण्डचरिते दंभासुरदूतसंवादो नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP