मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । शिव म्हणती ऐक आतां । देवी, गणेश जो पापहर्ता । स्मरणें जो सिद्धिदाता । भुक्तिमुक्तिप्रद होई ॥१॥
गजानन प्रसन्न होत । भक्तानंदकर भक्तिभावित । परमात्मा म्हणत । वर मागा तत्त्वांनो ॥२॥
तपानें तुमच्या संतुष्ट असत । भक्तिस्तोत्रें प्रभावित । तुमचें हें स्तोत्र होत । अति प्रीतिकार मजलागीं ॥३॥
जो हें स्तोत्र वाचील । अथवा जो हें ऐकेल । तो सर्व इच्छित पावेल । वरदान माझे ऐसे असे ॥४॥
विद्यार्थ्यास विद्या मिळेल । धनकाम्यासी धन लाभेल । स्त्रीकाम्यासी स्त्री मिळेल । पुत्रकाम्यास सुपुत्र ॥५॥
मुक्तिकाम्यास मुक्ती लाभेल । जय वांछी तया जय मिळेल । ह्या स्तोत्राच्या वाचनें मिळेल । जें जें वांछित तें तें सदा ॥६॥
शिव म्हणती तें गणेशवचन । ऋषिजन घेती ऐकून । भक्तीनें मान लववून । हृष्टचित्तें प्रार्थितो ॥७॥
आदिऋषि ते स्तविती । भगवान जरी प्रसन्न असती । तुमची अचल राहो भक्ती । आमुच्या मनीं गणनायका ॥८॥
तुझ्या प्रसादें अत्यंत । सृष्टिसामर्थ्य आमुच्यांत । निर्माण होवो ऐसें मागत । वरदान देवा तुजपाशी ॥९॥
जें जें मनीं ईप्सित । तें तें सर्वही साध्य होत । बंध सर्वही तुटत । ऐसें विघ्नराजा ॥१०॥
तत्त्वांचे वचन ऐकून । ऐसें तें विनमर पावनं । गणपति देई वरदान । महादेवी अभीष्ट तें ॥११॥
श्री गजानन सांगती । दिधले वर मी निश्चिती । जें जें स्फुरलें तुमचे चित्तीं । तें तें सर्वही होईल ॥१२॥
ढुंढी तदनंतर अंतर्धान । ऋषींसमक्ष झाला पावन । स्वानंदस्थानीं जातां महान । खिन्न झाले अन्य देव ॥१३॥
परस्परांसी पाहती । गणेशासी ते शोधिती । परी गणेश त्यांना न दिसती । म्हणोनी झाले दुःखित ॥१४॥
गणेश वरदान लाभत । ज्ञान लाभलें अति अद्‍भुत । महादेव ते बुद्धियुक्त । सृष्टिरचना करते झाले ॥१५॥
परस्परांत प्रवेश करिती । ऋषी देव ते अतिप्रीती । तेणें एकभाव होती । त्यांतून ब्रह्माण्ड जन्मलें ॥१६॥
त्या ब्रह्माण्डीं पुरुष जन्मत । आपुल्या मायेनें शक्तियुक्त । गुणेश गुणवल्लभ साक्षात । ऐसें रहस्य जाणावें ॥१७॥
त्यांच्या देहांतून निघत । जळ तेव्हा ब्रह्मण्डांत । तेणें जळें ती वृद्धी पावत । कालांतरें संपूर्ण ॥१८॥
सर्व अवयव आले । त्याचे तेज आंत फाकले । तेणें तें ब्रह्माण्ड फुटलें । बाहेर आला आदिपुरुष ॥१९॥
असंख्यात सूर्यासम तेज भासत । अपार महिमा ज्याचा होत । सर्वाही सर्व भावन शक्तियुत । विश्वरुप तो जाहला ॥२०॥
सर्वत्र त्याचे हातपाय असत । सर्वत्र नासिका उदर वर्तत । सर्वत्र असती मुखें अनंत । सर्वत्र कर्ण तयाचे ॥२१॥
असंख्य अवयवयुक्त । असंख्य लीला तो करित । परमात्मा उदार विक्रम चरित । आदिमध्यांतहीन तो ॥२२॥
सर्व विश्व व्यापून संस्थित । महतांमध्ये महान असत । त्याचा पार ना दिसत । अणूंमध्ये अणू तो ॥२३॥
जयाच्या उदरांत फिरत । ब्रह्माण्डें अति त्वरित । पराग जैसे गगनांत । ऐसा अद्‌भुत तो ॥२४॥
महाकारण नाम तुरीय । देहधारी तो गुणमय । आत्म प्रतीतिरुपमय । ऐसा तो महाद्युती ॥२५॥
गुणांचा तो अधिपती । गुणेश ऐशी म्हणोनि कीर्ती । सर्वात्मा सर्वरुप जगतीं । नाददेहधर प्रभू ॥२६॥
नाना चेष्टात्मक कर्म केलें । गुणेशें म्हणोनि ते पावले । बहुविध नामें जगती भले । तीं सर्व आतां सांगतों ॥२७॥
आपुल्या शरीरापासून । जल झाले जें उत्पन्न । त्यामाजी निद्रासुख संतोषून । नारायणनामें घेई तो ॥२८॥
नरापासून प्रसूत । जळासी नारा ऐसे म्हणत । त्यांत जो विसावत । तो हा गणेश नारायण ॥२९॥
भिन्न भिन्न त्रिविध निर्मित । म्हणोनी ब्रह्मा हें नाम प्राप्त । प्रभावें आपुल्या सतत । वेदोपनिषदीं वर्णन असे ॥३०॥
ब्रह्मलोक सनातन । सर्वांहून श्रेष्ठ महान । हें सुनिश्चित वचन । पुराणींचे ॥३१॥
सर्वांसी चालना देत । कालरुपे जो वर्तत । म्हणोनी महादेव नामें ख्यात । विविधरुपी नटला तो ॥३२॥
कर्मांचा आधार होत । म्हणोनी सूर्यनामें स्मृत । मोहवी जो वस्तुजात । आदिशक्ती म्हणोनी ॥३३॥
ऐशा विविधनामें युवत । नाना भाव महत्त्व वर्णित । गुणेश तुरीया त्या सतत । सर्वत्र जगीं प्रभू तोच ॥३४॥
सर्व कारणांचें कारण । पुराणांत म्हणती महाकारण । यांत संशय नसे हें जाणून । गुणेश्वर आठवावा ॥३५॥
कर्तां करविता स्वयं हर्ता । रक्षकांचाही रक्षणकर्ता । प्रकाशासी प्रकाशदाता । ऐसा हा देव गुणेश्वर ॥३६॥
गुणांमुळे तीन देह विलसत । डाघ्या भागीं राजस असत । सात्त्विक मध्यभागी होत । उजव्या बाजूस तामस ॥३७॥
ऐसा हा महात्मा आदिदेव । गुणेश्वर अज्ञानानें आवरण भाव । म्हणोनी तपश्चर्या करण्यादेव । बैसला तेव्हां दृढ निश्चयें ॥३८॥
त्यानें तप उग्र केलें । हृदयांत गजानना ध्यायिलें । ऐसे फार दिवस गेले । प्रसन्न झाले गजानन ॥३९॥
वासरासाठीं गाय धावे । तैसा प्रेमें देव पावे । येऊनिया गुणेशा भावें । भक्तवत्सलें बोध केला ॥४०॥
एकाक्षर मंत्र जपें प्रसन्न । तपानें तुझिया मनोमन । महाबाहो गुणेशा वरदान । वांछित माग या वेळीं ॥४१॥
ऐसे कृपायुक्त बोलत । देव गणेश संतुष्ट होत । गुणेश्वर भक्तिभाव समन्वित । स्तोत्र गातसे गजाननाचें ॥४२॥
देवा गणनाथा नमन । योगियांच्या हृदयीं करी निरसन । सदा सुशान्त ईश पावन । योगनाथ दृढ सदा ॥४३॥
ऐसा अपार योगेशा प्रणाम । भक्तिभावें करितो वंदन । ज्याचे योगरुप वर्णन निरुपम । अशक्य होय सर्वथा ॥४४॥
निवृत्तिमात्र असमाधिसंस्थ । अभेद भेदात्मक स्वस्थ । मूलहीन तूं शांतिस्थ । योगीधरा, सदा विनत मी ॥४५॥
सदैव तू समाधींत । मग्न अनंत अपार असत । स्वसंवेद्य विभू सुशांत । निजात्मयोगें लभ्य सदा ॥४६॥
ऐसा प्रभू तूं गणराज । विदेहयोगी सहज । सांख्यरुप निर्व्यांज । लोकां लभ्य सुलभपणें ॥४७॥
ना कधी उपाधींत । सदा सर्वदा सुसंस्थित । सर्व विलासांनी युक्त । आदिदेव हृद्‌बोघ्य ॥४८॥
अभेदमात्र परमार्थ रुप । अनादिमध्यान्त जो निष्पाप । आद्य पुराण पुराणरुप । सुबिंदुआत्मक अप्रमेय ॥४९॥
मायारहित मोहकर । गुणांत विराजे जो उदार । गणेश व्यक्त योगेश्वर । गुणहींन परी गुणचालक ॥५०॥
समस्तरुप जगदीश । सुषुप्तिरुप परमेश । सकलावभास योगीश । अनादि माया महेश्वर ॥५१॥
जगन्मया सूक्ष्म विभूतिधरास । हिरण्मय स्वप्नगत गणेशास । लोकीं विज्ञानकर योगीधरास । सदैव नमितों भक्तीनें ॥५२॥
देवमुनींद्रसिद्ध स्तविती । सदा जगा मोहक व्यक्ती । स्थूल विहार युक्त यती । ऐसा देवा नमितों मी ॥५३॥
असत्स्वरुपात जो विलसे । विविध भेदानें व्यक्त असे । मायामय शक्तिमय विलसे । मनोहीन वचोहीन ॥५४॥
महानुभाव रविस्वरुप अमृत । पुराण पुरुष अभेदात्मक असत । अखंड आनंदघन विलसत । ऐशा गणेशा नमितों मीं ॥५५॥
सर्वव्यापी विष्णुरुप । अचिन्त्य भेदाभेद अरुप । सदा सुखानंद निष्पाप । गणेशा त्या नमितों मी ॥५६॥
ज्याचे रुप चिंतनातीत । सकळ विहीन सदाशिव असत । मोहविहीन आद्य व्यक्त । योगेश्वरा त्या नमितों मी ॥५७॥
पदार्थांच्या रुपें दिसत । विविध प्रभेद विकारयुक्त । पर अप्रमेय बोधात्मक वर्तत । त्वंपदरुपा नमितों मी ॥५८॥
अखंड एकात्मक जगी व्याप्त । विकारहीन अप्रमेय असत । हृदयस्थ तत्पद रुप असत । योगीश्वरा त्या नमितों मी ॥५९॥
ऐशा विविध स्वरुपी विनटला । गणेश कलावतार भला । भव्य सुशांत एक झाला । सर्वथा अलभ्य चित्तासी ॥६०॥
जेव्हां सर्वात्मस्थित म्हणतो । तेव्हा मी तोचि हें ओळखतों । प्रकृति स्वरुपा त्या जाणतो । गकाररुप जगदीशा ॥६१॥
‘ग’ कारा त्या शरण जातों । अयोग संयोगमय ‘ण’ कारा नमितों । निवृत्तिरुपा त्या भजतों । सर्व वरिष्ठा सदा नमन ॥६२॥
ढुंढे तुझे वर्णन । सद्वातीत म्हणून मौन । प्रणाम करितों उन्मन । विघ्नेशा तुज महानुभावा ॥६३॥
गणेशा हे ब्रह्मपते । महात्म्या प्रसन्न हो गणपते । ऐशी प्रार्थना जगतातें । ऐकावी माझी कृपाळा ॥६४॥
धन्य जन्म डोळे धन्य । विद्या ज्ञान तप धन्य । ज्यानें पाहिला गणाधीस धन्य । कृतकृत्य ऐसा झालों मी ॥६५॥
वर देणार तर हा द्यावा । तुमच्या हो भक्तीचा ठेवा । लाभून मोह नष्ट व्हावा । परमेशा देवा गणेशा ॥६६॥
सृष्टिनिर्मितीची शक्ती । भजकांना कामप्राप्ती । सर्वकार्यांत निर्विघ्नप्राप्ती । विघ्नविनाशना देई सदा ॥६७॥
गुणेशाचें ऐसें वचन । ऐंकून प्रसन्न गजानन । मेध गंभीर बोले वचन । ऐकावें तें सादरें ॥६८॥
श्रीगणेश त्यासी वर देती । तुझी जडेल महाभक्ती । तुझ्या हातून सृष्टिनिर्मिती । नानाविधा होईल ॥६९॥
निर्विघ्न सदैव तुझे कार्य । सर्व दातृत्व अनघा अभय । महाकार्यांत दर्शन होय । माझे तुजला योग्य वेळीं ॥७०॥
तू रचिलेलें स्तोत्र वाचील । अथवा जो हें ऐकेल । सर्वमान्य जे भूतिकर । ब्रह्मभूतकर सर्वमान्य ॥७१॥
हे स्तोत्र सर्वसिद्धिप्रद । स्तुतिरुप ब्रह्मपतीस सुखद । महाभाग होय विशद । सकामांना कामधेनू ॥७२॥
निष्कामभक्तां मुक्तिदायक । मज आवडते स्तोत्र पावक । त्रिकाल पाठ करितां निःशंक । साध्य होतसे गजानन ॥७३॥
श्री शिव सांगती पार्वती नंतर । ऐसे बोलून भक्त वत्सल उदार । साक्षात्‍ गणेश सुखकर । अन्तर्धान पावले ॥७४॥
गुणेश विमनस्क जाहला । देवाच्या वियोगीं दुःख त्याला । पुढे काय कथाभाग वर्णिला । वाचावा पुढिले अध्यायी ॥७५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोनिषदि श्रीमन्मोद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते गुणेशवरप्रदानं नाम अष्टमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP