मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय १६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । शिव सांगती गणेशवचन । ऐकून पंचदेव प्रसन्न । प्रार्थिती त्यासी नमर होऊन । ज्ञान सांगा आम्हांसी ॥१॥
तेव्हा गणेश सांगती । गणेशगीतेचें सार त्यांप्रती । जें ऐकतां ज्ञानप्राप्ती । अनायासें होईल ॥२॥
देह चतुर्विध असत । ‘त्वं’ पद ब्रह्मभेदें उक्त । सोऽहं तो मी देही म्हणत ‘तत्‍ पद’ ब्रह्म सद्रूप ॥३॥
त्वंपद तत्‍ पदाचा संयोग होत । ‘असि’ पदें ब्रह्म उक्त । तूं तें ब्रह्म आहेस हा युक्त । बोध महावाक्याचा ॥४॥
तें स्वयंभू ब्रह्म द्विधा होत । विकल्पकरणें तैसे भासत । स्वसुखनिष्ठ सौख्य प्रकीर्तित । क्रीडासहीन परम तें ॥५॥
ज्याचें परतः उत्थान । तें ब्रह्म स्वरुप भिन्न । जें असतें उत्थानहीन । ते स्वानंद अभेदरुप ॥६॥
तेंच पंचधा झालें । स्वयंभू परतः जन्मलें । ब्रह्माचें द्विविध उत्थान भासलें । भिन्न भावे प्रसिद्ध ॥७॥
भिन्न नामें वेदरत । ते द्विविध ब्रह्म ख्यात । त्या उभविंध ब्रह्माचा हृदयांत । अनुभव घेती योगिजन ॥८॥
तेंच रुप असत नामें कथित । प्रख्यात जे वेदांत । ब्रह्मरुपा शक्ति उक्ति । असत्‌मयी विश्वांत ॥९॥
तेथ अमृतमय आधार असत । सूर्य म्हणोनी आत्मा ख्यात । शक्ति सूर्यमय विष्णु होत । आनंद त्यांच्या प्रीतीने ॥१०॥
शक्ति सूर्य विष्णु एकत्र होत । त्रिविध क्रियाहीन शिवांत । नेतिरुपे चतुर्थ ख्यात । तिघांहून भिन्न तो ॥११॥
त्रिविध ते मोहमात्र । सदाशिव निर्मोह पवित्र । त्यांच्या अभेदे सर्वत्र । स्वानंद ब्रह्म विराजतें ॥१२॥
पंच ब्रह्मांचें एक बिंब होत । मायामय ब्रह्म सर्वादी जगांत । या बिंबे सकळ विश्व निर्मित । म्हणोनि ब्रह्मा प्रपितामह ॥१३॥
असत्‍ सत‍ समन्वयें होत । आपण सारे स्वानंदरुप जगात । स्वानंदाहून परब्रह्म जें ख्यात । तेथ प्रवेश दुर्लभ ॥१४॥
कोणा सामान्या प्रवेश न लाभत । माझें दर्शन योग्यांसही न होत । जेव्हां अयोग घडत । पंच ब्रह्मांचा ह्या ॥१५॥
परी स्वानंदीं दर्शन प्राप्त । स्वस्वेद्यात्मक माझ चित्तांत । म्हणोनि स्वानंदवासी म्हणत । रचनाकार वेदीं मला ॥१६॥
योग अयोग भेदें युक्त । चार ब्रह्माचे भोग असत । संयोग वियोग त्यांचा होत । त्यांच्या परतर परम योग ॥१७॥
पूर्ण शांतिप्रद योग । चित्तवृतींच्या निरोधें प्रयोग । क्षिप्त मूढ विक्षिप्त विभाग । एकाग्र तैसे निरोधक ॥१८॥
ऐसे पंचभूमिमय चित्त । तेथ चिंतामणि स्थित । पंचभूमिनिरोधें प्राप्त । योगियांसी हृदयांत ॥१९॥
शांतिरुपात्म योगानें लाभत । मदात्मिकी शांती निश्चित । हे योगात्मक गणेशज्ञान युक्त । तुम्हांसी मी कथिलें असे ॥२०॥
या योगानें नित्य युक्त । न पडा कधी मोहांत । स्वयंबुद्धी चित्तरुप असत । सिद्धी मोहमयी असे ॥२१॥
त्या सिद्धींचा पती खेळत । नाना द्रह्य विभेदें जगांत । चिंता अभिमान होय व्यक्त । व्हाल मद्रूप तरी तुम्ही ॥२२॥
समाधी साधनें जरी जाणत । मीं गणेश हें तत्त्वं मनांत । होऊनी मोहविवर्जित । माझें रुप लाभेल ॥२३॥
भक्तवत्सल गणेश सांगत । हें रहस्य ज्ञान तत्पश्चात । थांबून तो होय अंतर्हित । पंचदेवा शांती लाभली ॥२४॥
शिव म्हणती पार्वतीस । ज्ञानपर श्लोकांत एकवीस । गणेशें जे कथिले सुरस । ते सार गणेश-गीतेचें ॥२५॥
योग साधनें शांति देत । सुशांत जें चित्तांत । त्यांसी ऐके अथवा पाठ करित । त्यासी लाभ मिळेल ॥२६॥
गणेश गीतासार वाचील । श्रद्धेने जो ऐकेल । तो ब्रह्मभूतासम होईल । भोगून भोग सर्व येथें ॥२७॥
अंती योगमय तो होत । त्यांच्या दर्शने पाप जात । सर्व लोकांचे जगांत । ऐसें माहात्म्य या ज्ञानाचें ॥२८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्‌मौद‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते गणेशगीतासारकथनं नाम षोडशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP