मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ४८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । शौनक म्हणती सूतासी । तूं वक्रतुंड चरित्र कथिलेंसी । मत्सरासुर नाशाच्या कथेसी । सिद्धिप्रदा वर्णिलेंस ॥१॥
ह्या अवताराच्या पूर्वीं राहत । वक्रतुंड कोणत्या क्षेत्रांत । तो उत्साहवर्धक वृत्तान्त । सांग सारा आम्हांसी ॥२॥
सूत सांगती प्राची दिगंत संस्थानांत । महर्षी त्या वक्रतुंडा स्थापित । चतुर्थी तिथीस भाद्रपदांत । तो देवराजा प्रकटत ॥३॥
माध्यान्हसमयीं तो प्रसन्न तत्त्वतां वक्रतुंड प्रकट होतां । त्याचें पूजन सर्वांकरता । सुखदायक सिद्धिद सदा ॥४॥
प्रतिद्वीपांत प्रतिखंडांत । स्थापिल्या मुनीनीं दिगंदिगंतरांत । वक्रतुंडाच्या प्रतिमा पुजीत । पूर्वी ऐसे जाण तूं ॥५॥
परी प्राचीदिगंतांत । दहायोजनें विस्तारांत । चतुरस्त्र महापुण्यद होत । भुक्तिमुक्तिप्रद परम ॥६॥
मध्यें संस्थित तो देव गणेश्वर । वक्रतुंड त्याच्या वामांगी मुनिवर । सिद्धि आद्य दक्षिणांगी बुद्धी चतुर । संमुख सिंह वाहन ॥७॥
आठ दिशांत आठसिद्धी असत । आठ गणही भक्तियुत । तैसेचि चार दिशांत । शिव विष्णु रवि शक्ती ॥८॥
ब्रह्मादि देवता स्थित । त्या मागें पूर्व दिशेंत । गंगादी सरिता समस्त । दक्षिणेस उपस्थित ॥९॥
काशिकादी क्षेत्रें वसत । त्याच्या पश्चिम दिशेंत । वसिष्ठादी मुनिश्रेष्ठ संस्थित । तेथ उत्तर दिशेला ॥१०॥
शेषादी नागराज । गंधर्व तैसे पर्वतराज । सिद्ध अप्सरागण नानाजातिज । श्रेष्ठ विद्याधर किन्नरगण ॥११॥
ऐसे जे जे विभूतिमंत । श्रेष्ठ परम ते तेथ वसंत । शंभर वर्षे वर्ण करित । तरी वर्णन असंभव ॥१२॥
ते सारे सेवा करण्या झटत । वक्रतुंड देवाची तेथ । हृष्ट प्रमुदित ते सांगत । चरित्रें त्याची परस्परांसी ॥१३॥
जेव्हां त्या कथा ऐकती । तेव्हां रोमांच अंगी फुलती । त्यांच्या मनीं भक्तिभाव अती । समुद्रीं स्नान करिती ते ॥१४॥
आपापल्या नावें तीर्थ स्थापिती । स्वत्वदेहघारी मुने यती । गणेशतीर्थ हया जगतीं । वक्रतुंडासी हर्षद असे ॥१५॥
त्या तीर्थीं स्नानमात्रें होत । प्राणी कृतकृत्य जगांत । यात्रामात्रें जनीं लाभत । ईप्सित सारे स्वमनींचे ॥१६॥
त्या क्षेत्रीं ज्यांसी मरण येत । ते ब्रह्मभूत प्राणी होत । दूर राहूनही स्मरण करित । त्यासही शुल्कलगति मरणोत्तर ॥१७॥
ऐसी शाश्वत युक्ति सर्वाम लाभत । जे जे असती गणेशभक्त । ते कोठेही निवसोत जगांत । ब्रह्मभूत निःसंदेह ॥१८॥
ह्याचें दर्शन अति पावन । लाभतां लोक दैववान । संक्षेपानें केलें कथन । विस्तार अशक्य ब्रह्मादिकांही ॥१९॥
अयुत अयुत वर्षे प्रयत्न करिती । वेद स्मृति स्कंद योगी जगतीं । तरी वर्णन त्याचें करुं न शकती । परिपूर्ण शब्दांत ॥२०॥
मुद्‌गलें जैसे दक्षाप्रत । सांगितलें तें मीं तुम्हांप्रत । शौनका तुम्ही भावयुक्त आणखी काय श्रवणीं इच्छा? ॥२१॥
तेव्हां शौनक म्हणती सूताप्रत । महाभागा कथिलें अद्‌भुत । गणेशक्षेत्र माहात्म्य उदात्त । ब्रह्मसायुज्यदायक जें ॥२२॥
आता सांग धर्मज्ञा सुखद । मुद्‌गलें पुढे जें केलें दक्षास विशद । सूत सांगे तें मोहद । चरित्र ऐकून तोषत तो ॥२३॥
भक्तिभावें मान लववून । म्हणे ढूंढिराजाचें चरित्र कथन । विस्तारानें सांग पावन । वक्रतुंड शंकरदेहज कैसा झाला ॥२४॥
तेव्हा मुद्‌गल दक्षा सांगत । ऐक महाभागा प्राचीन वृत्तान्त । गणेशाचा महा अद्‍भुत । गुणयुक्त सुखकर ॥२५॥
याज्ञवल्क्य मुनींनी कौशिकाप्रत । सांगितला जों वृत्तान्त । तो ब्राह्मणत्व प्रकाशक समस्त । सांगतों मी तुजप्रती ॥२६॥
भार्गव कुळांत प्रख्यात । ऋची नाम मुनीवर असत । तो तपश्चर्या घोर करित । जीर्णांग कालांतरें झाला ॥२७॥
वृद्धत्व तयासी संप्राप्त । तेव्हा तो महात्मा वनीं पाहत । मृगयूथे होतीं फिरत । पाहून विस्मित तें झाला ॥२८॥
मृगीसंसक्त चित्त । मृग ते तेथ क्रीडा करित । पुत्रपौत्रादींनी युक्त । संचार करितो वनांतरी ॥२९॥
परस्पर आकृष्ट चित्त । त्यांची क्रीडा मुनि निरखित । तेणें भृगुवर ऋचीक होत । कामारसक्त अकस्मात ॥३०॥
विचार करी चित्तांत । म्हणे धन्य गृहस्थाश्रम जगांत । नंतर गाधिनृपा समीप जात । गाधीनें त्यास सत्कारिलें ॥३१॥
स्वागत पूजनादी स्वीकारित । भोजनोत्तर गाधीस म्हणत । कन्या त्याची भार्यात्वें मागत । ऋचीकमुनि मोहवश ॥३२॥
त्या वृद्ध महामुनीचें वचन । विस्मित झाला तें ऐकून । गाधी त्यास म्हणे द्या आणू न । श्यामकर्ण घोडे एक हजार ॥३३॥
एवढे घ्यायचें कन्याधन । निश्चय माझा महान । म्हणोनि विप्रा तूं कन्यासकाम । पुरवावी ही मनीषा ॥३४॥
तें ऐकून ऋचीक जात । तत्क्षणीं वरुणसदनाप्रत । घेऊन आला अश्वसहस्त्र त्वरित । गाधीस देई आनंदे ॥३५॥
आपुल्या वचना स्मरत । गाधी स्वकन्या त्याद देत । विधिवत्‍ मनीं भयभीत । भार्गवोत्तमा ऋचीकाला ॥३६॥
राजपत्नी सुनेस म्हणत । मुली तुझें दुर्दैव असत । आम्ही अगतिक उन्मन येथ । वनवासाम्त रहा बाळे ॥३७॥
ऐसा विलाप करुन । द्रव्य वस्त्रादी तिज देऊन । आपुल्या कन्येचा निरोप घेऊन । राज्धानींत ती परतली ॥३८॥
ऋचीक मुनी भार्येसहित । आपुल्या आश्रमीं जेव्हां परतत । तेव्हां भक्ति तत्पर करित । अनलस सेवा गाधिकन्या ॥३९॥
शीलसंयुक्त तीस पाहत । तपोबळें नगर तेथ निर्मित । चातुर्वर्ण्य समायुक्त । हेमरत्नें भूषलें जें ॥४०॥
दासदासी असंख्यात । नाना वैभवांनी युक्त । ऐश्या त्या नगरांत । ऋचीक निवास करुं लागे ॥४१॥
तपःप्रभावें आपुल्या घेत । यौवनशाली रुप त्वरित । देवेंद्रासम उपभोगित । प्रियेसहित सुखें गृहस्थाश्रमीं ॥४२॥
परी भोगरागादी सुखांत । त्याचें चित्त न रमत । स्त्रीसुख हे अल्प वाटत । पत्नीभव सुख व्यर्थ तदा ॥४३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते ऋचीकगृहस्थाश्रमवर्णन नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननमर्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP