खंड १ - अध्याय १५
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । सूत म्हणती शिववचन । ऐकून विघ्नेश प्रसन्न । भक्तिभावें तुष्ट होऊन । मधुर स्वरें तें बोलत ॥१॥
शंभो महाभागा विमोहित । मायेनें माझ्या वक्रतुंड म्हणत । गणेश मी तपें भावित । पुनर्दर्शन तुज दिलें ॥२॥
तुझा वरदाता मीच झालों । तुझ्यापुढे मी प्रकटला । उग्र तपानें संतोषलों । ज्ञानयुक्त तें तुज केलें ॥३॥
माझी ही माया सतत । मानवांसी मोहवित । विस्मरण तुलाही होत । म्हणोनि माझ्या रुपाचें ॥४॥
ऐसें बोलून दूर करित । शिवाचें मायामोहजाल त्वरित । तेव्हा सर्वही स्मरण होत । गणेशाच्या स्वरुपाचें ॥५॥
समस्त आठवून स्तोत्र गात । परी गणेशरुप अंतर्हित । तेव्हां त्याच्या शुभ रुपा ध्यात । हृदयांत तो योगबलें ॥६॥
परी त्याचें रुप न दिसत । म्हणोनी व्याकुळ चित्तांत । विष्णु तेव्हा समीप येत । सर्व सांगे शिवासी॥७॥
तैसें रुप ना पाहिलें । ऐसें विष्णुही म्हणाले । त्या पांचही देवा न दिसलें । रुप गजराज देवाचें ॥८॥
तेणें झाले अति विस्मित । एकत्र येऊन स्तवन गात । पंचदेवकृत स्तोत्र प्रख्यात । अद्भुत सामर्थ्यशाली ॥९॥
वक्रतुंडा त्रिनेत्रधरा नमन । चतुर्भुजधरा देवा वंदन । पाशांकुशधरा लंबोदरा अभिवादन । नाभिशेषा एकदंता ॥१०॥
महत्रुपा शूर्पकर्णा नमन । सिंदुर अरुन देहा वंदन । रक्तवर्ण धरा सूक्ष्मा आमुचें मन । विनमर झालें महाकाया ॥११॥
सिद्धिबुद्धियुता विभूतिसहिता । चिंतामणिधरा आतां । चिंतामणे परेशा अव्यक्ता । परेशा परा प्रणाम हा ॥१२॥
मनोवाणी विहीना विघ्नेशा नमन । नानामायाधरा वंदन । मायिका मोहकारणा मन। हेरंबा विनमर तव पदीं ॥१३॥
ब्रह्मणां पते निजरुप । दाखवावें निष्पाप । भक्तांसी प्रीतिदायक । सुरुप सर्वनाथा दाखवावें ॥१४॥
तुझ्यामुळें सनाथ असत । आम्ही सारे भक्तियुक्त । ऐसें स्तोत्र म्हणतां प्रकटत । तयांपुढे गजानन ॥१५॥
त्यासी पाहता प्रणत । भक्तिभावें नमस्कार करित । ढुंढी त्यांना तें सांगत । स्तोत्रें तुमच्या तुष्ट झालों ॥१६॥
पंच देवांनो प्रीत । उपजली माझ्या चित्तांत । यांत संशय आजही नसत । वरप्रदान ऐकावें ॥१७॥
जो हें स्तोत्र वाचील । तो मज मान्य होईल । त्याचें वांछित पूर्ण होईल । अंतीं मम सायुज्य लाभेल तो ॥१८॥
ऐका माझे प्रिय वचन । गर्व न करावा मदधीन । तुम्ही सारे कला अंश म्हणून । लीलेसाठीं निर्मिले मीं ॥१९॥
परस्परांशी स्पर्धा करितां । मनांत उपजली भरान्ती तत्त्वता । पूर्ण असोनी अपूर्णता । मुक्ती माझ्या रहस्यज्ञानें ॥२०॥
माझ्या रहस्यज्ञानें भावित । सदैव मोहविनिर्मुक्त । माझ्यासम होण्या श्रेष्ठ सुहित । गणेशतत्त्व सदा ध्यावें ॥२१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते गणेश प्रसन्नभावो नाम पंचदशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP