मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ५१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । शंभूसी ते जेव्हा ज्ञात । तो झाला परम चिंताग्रस्त । देवांचा प्रयत्नही असफल होत । दिवोदासाच्या तयापुढे ॥१॥
शंभू मनीं विचार करित । हा नृप स्वधर्म तपयुक्त । त्याचें उच्चाटन असंभव असत । आता कैसें करावें? ॥२॥
मज काशी केव्हां लाभेल । विरहाग्नींत चित्त जळेल । माझा अंत त्यांत होईल । ऐसा विलाप महेश्वर करी ॥३॥
अस्थिपंजर रुपें राहत । शिव तरी शोक ना सोडित । देव मुनी सान्त्वन करित । आदर भावें त्यासमयीं ॥४॥
महेश्वरा वृथा का चिंता करितां । आपण समर्थ स्वतः असतां । तुमच्या प्रसादयोंगे आतां । जातों काशीकानगरींत ॥५॥
नाना सिद्धींचे प्रलोभने । लोकांसी तेथें दाखवून । त्या दिवोदासा पापभागीं करुन । निर्माण करु दुरवस्था ॥६॥
नंतर आपण काशी घ्यावी । सदाशिवा स्वाश्रयीं बरवी । आपुली विकल अवस्था संपावी । हीच आमुची इच्छा असे ॥७॥
ऐसें सांगून देव प्रहर्षित । गेले काशी नगरींत । नानारुपें घेऊन राहत । लोकांसी भुलविण्यायत्नशील ॥८॥
सिद्धींचे करु प्रदर्शन । लोकां दाखविती प्रलोभन । परी ते सारे धर्मशील जन । मोहास बळी न पडती ॥९॥
एक वर्ष प्रयत्न करुन । देव परतले थकून । भैरव आदित्य वसु योगिनी गण । सारे परतले असफल ॥१०॥
तेव्हा ब्रह्मदेवा बोलावित । त्यासी पाठवी काशींत । दशाश्वमेधें तोषवित । दिवोदास विधीला ॥११॥
म्हणोनि शंकर ध्यान करित । विघ्नराजासी मनीं पूजित । सर्व आशा तो पुरवित । म्हणोनि प्रार्थी पुनःपुन्हा ॥१२॥
गणाध्यक्षा मी सविघ्न । मजसी करी तूं निर्विघ्न । काशीपुरींचे पुनमिंलन घडवून । दासा संरक्षी ॥१३॥
ऐसें एक संवत्सर । निश्चिंत चित्तें ध्यानपर । तोषवी तेव्हां शंकर । कार्यसिद्धीस्तव विघ्नराजासी ॥१४॥
पाहून अहंकार निर्मुक्त । गणेश स्वरुप त्यास दावित । योगिध्येय जें उत्तम असत । पाहून शंकर धन्य झाले ॥१५॥
सिंहावर बैसला होता । चतुर्बाहुधर तो होता । पाशांकुश वरद अभय करीं धरितां । शोभला गणेश प्रभु तेव्हा ॥१६॥
सिद्धिबुद्धि समन्वित । रक्तवर्ण सुशोभाढय दिसत । गजवक्त्र महोदर सुभूषित । शेषनाभि तेजोराशी ॥१७॥
चिंतामणि धारक महाप्रभूस । पाहून ऐशां गजाननास । प्रमुदित शंकर प्रणाम करित । करी पूजन यथामतीनें ॥१८॥
देवांचा देव वक्रतुंड । ज्याची शक्ती प्रचंड । प्रसन्न होता उदंड । सौख्यदायक भक्तांसी ॥१९॥
पूजन यथाविधि करुन । शिव गाती स्तोत्र अनुपम । वक्रतुंडा सर्वासिद्धिप्रदा नमन । वंदन निराकार देवासी ॥२०॥
साकारासी सृष्टिकर्त्यासी । पालकासी विष्णूसी । संहारकर्त्या हरासी गुणेशासी नमन असो ॥२१॥
ब्रह्मकारासी ब्रह्मभूतासी । प्रपंचरुपासी प्रपंचपालकासी । अनंत गुणधारकासी । अनंतविभवा तुज नमन ॥२२॥
अनंत उदररुपासी । हेरंबासी कारणदि परासी । कारणासी अकारणासी । सिंहवाहना तुज नमन ॥२३॥
मीं जीवसमान जन्मलों । अविमुक्तक्षेत्रीं विमुक्त झालों । देवा दयानिधे शरण आलों । तुजला मी संशयातीत ॥२४॥
म्हणोनि निर्विघ्न मजला करी । देई परत मज काशीपुरी । गणाध्यक्षा स्मरण करी । वर पूर्वी जो मला दिला ॥२५॥
‘पुत्र तुमचा होईन’ । ऐसें दिलें जे वरदान । तें पाळावें आता वचन । गजानना परमेशा ॥२६॥
ऐसें बोलून पाया पडत । महेश्वर गणेशाच्या विनीत । गणाध्यक्ष त्यास उठवून म्हणत । हास्यवदन तो वक्रतुंड ॥२७॥
शंकरा तुझे हें स्तोत्र । सर्वांसी सिद्धिकर सर्वत्र । वाचका श्रोत्यांसी सर्वकाळीत । भुक्तिमुक्तिप्रद होय ॥२८॥
अन्य जें जें प्रार्थिलेस । सदाशिवा ते पुरवीन खास । देईन तुज अविमुक्त क्षेत्र सुरस । सुतही मी होईन तुझा ॥२९॥
ऐसे बोलून शरीरांतून । आपुल्या निर्मिला एक ब्राह्मण । जो सर्वांगसुंदर परिपूर्ण । गुणेशाच्या तेजानें ॥३०॥
त्या ब्राह्मणासी आज्ञा करित । काशीत जाई तूं त्वरित । बुद्धिसंमोह लोकांच्या मनांत । शिवसिद्धीचस्तव करी तूं ॥३१॥
दिवोदासा मोहवून । काशीचें राज्य शिवासि देऊन । माझ्या आज्ञेचें करितां पालन । सर्व पूज्य तूं होशील ॥३२॥
विप्र पंडित सारेजन ओळखतील तुज ढुंढी म्हणून । ज्योतिर्विद तू महान । तुझ्या वश सारे राहतील ॥३३॥
ऐसें ऐकता ढुंढीचें वचन । द्विज त्यासी तो करी वंदन । प्रदक्षिणा तयासी घालून । गणपा स्मरत काशीस गेला ॥३४॥
नंतर विष्णूस बोलावून सांगत । बोद्धरुपें जावें काशींत माझ्या आज्ञेचें पालन त्वरित । करी देवहितार्थ ॥३५॥
ढुंढि ब्राह्मण नगरा मोहित । करील तूं तं करी भ्रष्ट । जनार्दना माझ्या वचनांत । संशय कांही धरु नको ॥३६॥
ढुंढी गजानना प्रणाम करुन । बौद्धरुप करी धारण । काशींत जाई । विनम्र मन । विष्णू वक्रतुंडा स्मरत ॥३७॥
ढुंढी ब्राह्मण विष्णू करित । उभयही जैसें गणेश सांगत । तेणें काशीनगर मोहयुक्त । नंतर भ्रष्ट झालें झणीं ॥३८॥
विश्वामित्रा सांगतों अन्य । काशी गणप ध्यानयुक्त धन्य । जेणें संतुष्ट तो मान्य । सहस्त्र वर्षे तपानें ॥३९॥
तिच्या तपःप्रभावें संतुष्ट । वर देण्या येई मूर्तोमंत । सिंहारुढ नाना भूषणभूषित । प्रणाम काशी करी त्यासी ॥४०॥
काशीनगरी परम पावनी । कर्षित विहवल होऊनी । पुन्हा भक्तीनें पूजोनी । कर जोडोनी स्तुती करी ॥४१॥
गणनाथासी नमन । अनंतरुपधरासी वंदन । सर्वदायकासी अभिवादन । मायाधरा नमस्कार ॥४२॥
गजवक्त्रधरासी शूर्पकर्णासी । वक्रतुंडासी सर्वभूषणासी । निराकारासी नित्यासी । निर्गुणासी नमन असो ॥४३॥
गुणात्म्यासी वेदवेद्यासी । सतत ब्रह्मासी ब्रह्मदात्यासी । सिंहारुपासी सर्वां अभय दात्यासी । सिद्धिबुद्धिपतीसी वंदन ॥४४॥
अनाथासी नाथासी । सर्वांच्या पालकासी । भक्तांसी सर्वदायकासी । विघ्नहर्त्या नमो नमः ॥४५॥
अभक्तांना विघ्नकर्त्यासी । भक्तां भुक्ति मुक्ति दायकासी । योगीजनहृदय-निवासकासी । योगगम्यासी नमन असो ॥४६॥
मनोवाणी विहीनासी । शांतिरुपासी शांतिदात्यासी । गणेशासी गणाध्यक्षासी । महाभागासी नमन असो ॥४७॥
वेदशास्त्रें करु न शकलीं । स्तुति तुझी पूर्णत्वें सगळी । तेथ माझी काय कथा राहिली । कसे स्तवूं गणेशा तुला ॥४८॥
मी तुझी दासी प्रपीडित । शिवविरहें मम जीवन व्यर्थ । राख मजला मी शरणागत । अविमुक्ता न मी शिवाविना ॥४९॥
दैव परम अद्‌भुत । तेणें जाहलें शिवहीन जगांत । म्हणोनि तुज शरण येत । दाखवी मज शिवशंकर ॥५०॥
ऐसे बोलून काशी प्रणत । गणाधीशाचे चरण धरित । तिज उठवून गणेश म्हणत । मधुर स्वरें त्या वेळीं ॥५१॥
तू शोक करुं नको कल्याणी । शंकर तुजला दाखवीन झणीं अविमुक्त हें तव नाव गुणी । सार्थ होईल पुनरपी ॥५२॥
तू रचिलेलें हें स्तोत्र वाचित । भक्तीनें सुंदरि जो वा ऐकत । वियोगहारक ते जगांत । ईप्सितप्रद सर्वदा ॥५३॥
ऐसें सांगून गणनाथ । तेथेचि होत अंतर्हित । काशीनगरी त्यास ध्यात । कालप्रतीक्षा करुं लागली ॥५४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते काशीशिववरप्रदानं नामैक पंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP