मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ३८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । ऐसें मत्सर क्रोधयुक्त । बोलला तें वक्रतुंड म्हणत । प्रसन्नचित्तें तो हसत । दैत्येशा गर्व करुं नको ॥१॥
मी नसे देव वा मानव । असुर नाग अथवा गंधर्व । पर्वत नानायोनिज सावयव । अष्टावरणयुक्त न मीं ॥२॥
ब्रह्मरुप मी असत । आनंदकार्क पुनीत । तुझ्या विनाशार्थ अवतरत । स्थापनार्थ देव मुनींच्या ॥३॥
दैत्यनायका दुर्मते वधीने । तुजला मी यांत संदेह न । तुझा पुण्यसंचय संपून । पापसंचय वाढला ॥४॥
नाना पापें तूं केलीस । त्याचें फळ भोगावयास । मीं तुजला दैत्येंद्रास । भाग पाडीन मत्सरा ॥५॥
माझें सामर्थ्य जाण जगांत । कतुमकर्तृं अन्यथाकर्तृ असत । काय करणात तें त्वरित । ठरवी मत्सरा तूं आतां ॥६॥
जीविताची इच्छा असेल । तर मला तूं शरण येशील । धर्माचा द्वेष सोडशील । स्वस्थानांत सुखी सदा ॥७॥
देवादींचा विद्वेष सोडून । राहशील त्यांची मैत्री जोडून । तरी मी घेणार नाहीं तुझे प्राण । आश्वासन हें माझें ॥८॥
मुद्‌गल म्हणती तें ऐकत । मत्सर तेव्हां मनीं विस्मित । प्रसन्नात्मा भक्तियुत वक्रतुंडा । विनमर म्हणे ॥९॥
वक्रतुंडा तुज नमस्कार । संशय हृदयांत जो घोर । तो दूर करावा समग्र । गणनायका झडकरी ॥१०॥
जरी तूं सगुण नससी । निर्गुणही तैसा नससी । सर्वेशा ब्रह्मरुप अससी । तरी हा आकार कसा धरिला? ॥११॥
दुसरा संशय माझ्या मनांत । तूं ब्रह्मभोवन संस्थित । सुर-असुरांसे सम ब्रह्मरुपांत । तरी पक्षपात कां करिशी? ॥१२॥
असुरांचा तूं निहंता । परी देवांचा मात्र पालनकर्ता । हा संशय ब्रह्मरुपा तत्त्वता । विघ्नप तूं दूर करीं ॥१३॥
मत्सरांचें वचन ऐकून । महावीराचा सद्भाव जाणून । वक्रतुंड बोले वचन । ऐक मत्सरा उत्तर माझे ॥१४॥
बुद्धिविशारदें तूं प्रश्न केला । तो मजला आवडला । संशय दूर करण्याला । मीही असे समुत्सुक ॥१५॥
मी अखिल ब्रह्मरुप असत । चराचर सृष्टीतें निर्मित । बंधहीन परी बंधयुक्त । केवळ लीला करावया ॥१६॥
पुरुष प्रकृति रुपें पाळितों । तैसाचि जगता संहारितों । त्यांच्या हृदयीं मीच वसतों । चिंतामणि स्वरुपांत ॥१७॥
सर्वांच्या चित्तवृत्तीचा चालक । मीच असे निश्चयात्मक । माझीच आज्ञा चाले एक । सर्व जगांत दैत्यपुंगवा ॥१८॥
जेव्हां आपुला धर्म सोडून । देव अधर्मी जोडिती मन । दैत्यांच्या निधनार्थ करिती यत्न । तेव्हां त्यासी दंडितों मी ॥१९॥
दैत्य हृदयीं प्रेरक होतों । त्यांच्याकडून तप करवितों । तपप्रभावें वर लाभ होतो । असुर पक्ष तें महाबळी ॥२०॥
नंतर असुर देवांसि मारिती । देव सत्ताविहीन होती । ऐशी देवसंघाविरुद्ध कृति । माझी होतसे त्या वेळीं ॥२१॥
परी दैत्य महादुष्ट सोडिती । आपुला धर्म मूढमती । देवांचा मूलोच्छेद करण्या इच्छिती । तेव्हां असुरांविरुद्ध मी ॥२२॥
देवांच्या हृदयीं वसत । दैत्य राक्षसांचे रहस्य सांगत । तेणें असुरांसी देव वधित । ऐसे चरित्र जाण माझें ॥२३॥
जें दुसर्‍याच्या तपांत । विघ्न करुं इच्छित । त्यांसी मी दंडित । देव असो वा दैत्य असो ॥२४॥
जो कोणी होय अधर्मरत । आपुल्या सामर्थ्ये मदोन्मत । त्याचा वध करण्या निश्चित । अवतार मी घेत असे ॥२५॥
आपापाल्या धर्मीं परायण । जरी असती देव दैत्य ब्राह्मण । तरी त्यांच्या हृदयीं माझी खूण । ब्रह्मभावें विलसतसे ॥२६॥
तूं पीडिलेंस देवांस । आपुला धर्म सोडिलास । म्हणून तुज वधण्यास । आलों दैत्यराजा महामते ॥२७॥
इतुकें बोलून निजरुप दावित । बिंदुमात्रांत जें स्थित । ब्रह्मरुप सुंदर विलसत । विघ्ननायक असुरासी ॥२८॥
वक्रतुंडाच्या प्रसादानें । तैसेंचि त्याच्या दर्शन फलानें । दैत्यराजास मिळालीं लोचनें । पूर्वींहून दिव्य अधिक ॥२९॥
त्या दिव्य नयनांनी पाहत । दैत्य तेव्हां परमाद्‌भुत । ब्रह्माकार जें असत । गणेशाचें रुप दक्षा ॥३०॥
जें न्यून अधिक नसत । ज्याच्या सम कांही न जगांत । स्वभावें पादहीन जें असत । चतुष्पादमय तें झालें ॥३१॥
देह नसत देही नसत । सगुण नसत निर्गुण नसत । माया नसत मायिक नसत । वक्रतुंड गजानन ॥३२॥
त्याचा देह सगुण रुप । मस्तक असे निर्गुण रुप । गजवक्त्राचें हें स्वरुप । सगुण निर्गुण हा संयोग ॥३३॥
मूळ स्वरुपीं जो निर्गुण । अवयवादि युक्त झाला सगुण । भक्तियुक्त दैत्य प्रणाम । करुन स्तवितो वक्रतुंडातें ॥३४॥
वक्रतुंडा चतुष्पादासि  चतुर्देह विहीनासी । बिंदुमात्र संस्थितासी । नमन करी भक्तिभावें ॥३५॥
साकार तैसा निराकार असत । मायामय मायाहीन भासत । जगन्मय जगाच्या अतीत । सर्व काम पुरवी जो ॥३६॥
ऐशा त्या गणनायकासी । सिंहारुढ चतुर्बाहूसी । सिद्धि बुद्धीच्या पतीसी । ब्रह्मरुपा नमस्कार ॥३७॥
सिद्धिबुद्धि प्रदायकासी । लीलायुक्ता लीलाहीनासी । अव्यक्ता व्यक्त रुपासी । हृदयस्थितासी माझें नमन ॥३८॥
वेदांतवेद्यांस गजाननास । ग्रहगोलादींच्या प्रकाशकास । सच्चिदानंद स्वरुपास । वंदन माझें भावपूर्ण ॥३९॥
योग्यांच्या हृदयीं जो विलसे । योगदायक भक्तां असे । भाव अभावमय जो उभय असे । भववर्जित त्या नमस्कार ॥४०॥
पक्षहीन पक्षधर । ब्रह्माधिप सर्वत्र । सर्वाकार निराकार । ऐशा वक्रतुंडा नमितों मी ॥४१॥
अहो माझें भाग्य थोर । मज दिसला गजानन लंबोदर । आतां मी तरेन संसार । भक्तवत्सला या शरण जातां ॥४२॥
देवा तुज मी आलों शरण । आतां करी माझें रक्षण । ऐशी स्तुती गाऊन चरण । वक्रतुंडाचे धरीतसे ॥४३॥
भक्तियुक्त त्याचें मन । पाहून बोले गजानन । त्याच्या भावबळें प्रसन्न । ऐक मत्सरा महाभागा ॥४४॥
तुझ्या विनाशार्थ मी कुपित । निःसंशय आलों येथ । परी त्यागणें शरणागत । असंभव मजलागी ॥४५॥
म्हणोनि मत्सरा तुझें वांछित । जें असेल तें सांग त्वरित । भक्तवत्सल मी पुरवित । भक्तकामना सदैव ॥४६॥
माझें केलं तूं स्तवन । तें मत्प्रीतिविवर्धन । याचें करितां नित्य वाचन । पुरुषार्थ सारे लाभतील ॥४७॥
महा ऐश्वर्य धनधान्यदिक । तैसेचि दीर्घायुदायक । पुत्र पौत्र कलत्रादिक । लाभ बहुविध संपतीचा ॥४८॥
वक्रतुंडाचे वचन ऐकून । मत्सर बोले हात जोडून । प्रसन्न जरी तूं वरदान । एवढेंच द्यावें मजलागीं ॥४९॥
तुझी दृढ भक्ती मनांत । रहावी सदैव जागृत । ऐसा पहिला वर मागत । विघ्नराजा वक्रतुंडा ॥५०॥
तुझे जे जे असतील भक्त । ते ते मज प्रिय व्हावे जगांत । योगक्षेमार्थ योग्य असत । ऐसें स्थान मज सांगावें ॥५१॥
मत्सरासुराचें वचन ऐकून । वक्रतुंड झाला मनीं प्रसन्न । दोन्ही वर त्यांसी देऊन । कृतार्थ केलें त्या वेळीं ॥५२॥
माझ्या पदीं अचल भक्ती । माझ्या भक्तांवरी प्रीती । तुझी जडेल निश्चिती । रक्षण, पालन त्यांचे करो ॥५३॥
जेथ माझी मूर्ति पूजिती । कार्यरंभी माझें स्मरण करिती । सदैव माझे गुण गाती । तेथें विघ्न करुन नको ॥५४॥
अन्यथा सर्व कार्यांत । आसुरीवृत्तीनेंच होई रत । असुर धर्मं जें प्राप्त । तेंच फळ ग्राह्य मानी ॥५५॥
असुरांच्या हृदयीं प्रवेश करी । त्यांच्यावरी तूं राज्य करी । दास्य वृत्ती माझ्या भक्तींत बरवी । सदैव तूं आचरावी ॥५६॥
ऐकूनी गणेशाचें वचन । आज्ञा त्याची स्वीकारुन । वक्रतुंडा प्रणाम करुन । मत्सर परतला आनंदें ॥५७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरित वक्रतुंडविजयो नामाष्टत्रिंशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP