मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
मूर्तिपूजा काठिण्य

वेदांत काव्यलहरी - मूर्तिपूजा काठिण्य

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


देव चराचर व्यापुनि भरला, अचरांत तो परी निजला ॥
चरसृष्टींत दिसे तो जागा, मनुजांत स्पष्ट अवतरला ॥१॥
निजत्यास जागवोनी, त्यासी मग बोलणें कठिण फार ॥
जो आयताच जागा ह्रदयीं, त्यासीच सुलभ व्यवहार ॥२॥
याकारण देवाचें देउळ नरदेह, त्यांत प्रभु जागा ॥
भक्तास पावतो हा सत्वर, येथेंच त्यांस तूं भज गा ॥३॥
सोपें, सन्निध टाकुनि, लांब कठिण साधनांत कां मरती ॥
न कळे वेडें जग हें, दगडाधोंडयास कां उगी भजती ॥४॥
दगडांत देव आहे, भावबळें तो प्रसन्न होइ जरी ॥
दुष्काळ भावनेचा, परकी राज्यांत जाणवे भारी ॥५॥
हा काळ भावनेचा नाहीं, ज्ञानास फार अनुकूल ॥
ज्ञानी पुरुषास शरण जावें, अज्ञान हेंच भवमूल ॥६॥
बहु घर्षण केल्यानें, जड काष्ठीं प्रगटतो जसा अग्नी ॥
बहु आंच भावनेची लागे तरि, प्रगट देव पाषाणीं ॥७॥
वितळे न जसें सोनें, तीव्रपणें उषणता दिल्यावीण ॥
वितळेना दगड तसा देवपणें, तीव्र भावनेवीण ॥८॥
ही तीव्रता दिसेना कोठेंही, मंडभाव तो व्यर्थ ॥
शीणचि पदरांत पडे, यायोगें स्वार्थ नाहि परमार्थ ॥९॥
फलप्राप्ति कठिणमहा मूर्तिमाजील देवताभाव ॥
यास्तव चेतनरूपीं ब्रह्मगुरू सुलभ भक्तिचा ठाव ॥१०॥
भूमींत सर्व ठायीं जल भरलें, खोदतां अती कष्ट ॥
जल आयतेंच भरलें कूप, तृषार्ता असे खचित इष्ट ॥११॥
त्यापरि पाषाणादिक जड मूर्ती देवभाव त्यापरिस ॥
ह्रदयस्थ कळो, न कळो देव, असा भाव सुलभ सर्वांस ॥१२॥
हदयस्थ देव सोडूनि, शिरती कां लोक आडरानांत ॥
न कळे रे ह्र्दयस्था तव भजना सुमति दे तया तात ॥१३॥
इतुक्या उपरी ज्यांच्या दगड पुजावा असेंच ये चित्ता ॥
पूर्वार्जित तितुकेची त्यांचें, तूं मात्र सेवि ह्रदयस्था ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP