मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
मीपण

वेदांत काव्यलहरी - मीपण

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


मीपण मरणें, हें तर वेदांताचें असे परम ध्येय ॥
ज्ञान्याचें परि मीपण निजरूपीं, त्यांस थोरलें श्रेय ॥१॥
तामस राजस बुद्धीमधला जो “मी” तयास मारावें ॥
अंत:करण उपाधी शुद्ध तयांतील “मी” स तारावें ॥२॥
राजस तामस वृत्ती फार अकुंचीत त्यांतला तो “मी” ॥
ममता धरि संसारीं, जीवपणें द्वैत सकल तो निर्मीं ॥३॥
परि निजरूपीं स्फुरणें “मी” यासी नाहि नाहि संसार ॥
या “मी” स पोषणेची या “मी” नें जीव होय भवपार ॥४॥
हा “मी” शिवरूप असे, हेंच असे विमलरूप मायेचें ॥
निजरूपाहुनि माया नाहीं जी भिन्न, अंगची त्याचें ॥५॥
गोडीवांचुन नाहीं गूळ, रवी तो नसे प्रभेवीण ॥
तैसेच नसे आत्मा “मी” स्फुरणावांचुनी कधीं शून्य ॥६॥
याचा अर्थ नव्हे कीं आत्मा “मी” स्फुरणरहित राहीना ॥
परि या “मी” स्फुरणानें आत्मत्वासी उणेपणा ये ना ॥७॥
जल निस्तरंग राहे, वायू नाहींच तोवरीं पाहे ॥
देहउपाधी नच जों, आत्मा निस्फूर्त सहजची आहे ॥८॥
जोंवरि देह न पडला ज्ञान्याचा, “ब्रह्म मी” अशी स्फूर्ति ॥
उठणार, उठेना कां, त्याची ज्ञान्यास कायसी भीती ॥९॥
हा “मी” मरणेंहि असे शक्य, असोनीच स्थूल हें शरिर ॥
सप्तम भूमीमाजीं, परि त्याची इष्टता नसे फार ॥१०॥
काय प्रभेची  भीति मार्तांडा, उलट त्यास शोभा ती ॥
जल काय तरंगानें बिघडे, आत्म्यांत “मी” जरी स्फूर्ती ॥११॥
शेवाळानें जल, रवि झांकोळी मेघ त्यावरी येतां ॥
जीवपणाच्या “मी” नें, येइ आत्माहि झांकिला म्हणता ॥१२॥
परि जलतरंग कैसे झांकी जलधीस, किरण तैं रविला ॥
“मी आत्मा” ही  स्फूर्ती त्यापरि झाकील केंवि आत्म्याला ॥१३॥
यास्तव आत्मत्वीं जें मीपण, तें इष्ट साधकास असे ॥
देह असे ज्ञान्याचा तोंवरि, हा “मी” कधींच मरत नसे ॥१४॥
हा “मी” मरणेंच नसे इष्ट कधीं, वाढवी तया जास्त ॥
परि जीवकलनेनें उठतो जो “मी”, करी तया फस्त ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP