मायेस सगुण म्हणती, निर्गुण तें ब्रह्म यापरी वदती ॥
परि नाहींच मुळीं जी, तेथें गुण कोठुनी कसे येती ॥१॥
द्दश्य असे ती माया, दिसत नसे ब्रह्म यापरी वदती ॥
नसतीच कशी दिसते माया, नवलाव द्दश्य जरि हो ती ॥२॥
साकार स्थूल माया, सूक्ष्म निराकार ब्रह्म त्या वदती ॥
नाहींत तिला कोठुनि, येई आकार स्थूलता जगतीं ॥३॥
बहु नामरूप माया, ब्रह्मासी नामरूप नच म्हणती ॥
नाहींचें रूप कसें, नाम तिचें हें असत्य कां वदती ॥४॥
चंचल माया म्हणती, निश्चळ तें ब्रह्म दगड काय असे ॥
नाहींच मुळीं, तेथें चंचलता मग कुठें कशीच वसे ॥५॥
सिद्धांत आयका हो, संतांची उलट खूण ती न्यारी ॥
साकार, सगुण, द्रष्टा, द्दश्य असे एक ब्रह्म अविकारी ॥६॥
त्याला अनेक नामें, रूप तयाचें अनेक जे दिसतें ॥
स्थूलत्वें जग ज्यासी म्हणतो, ती स्फूर्ति शुद्ध ब्रह्मच तें ॥७॥
दगडाचें स्थैर्य नव्हे, म्हणती तें ब्रह्म स्फुरणयुक्त असें ॥
यास्तव चंचल भासे, निश्चलही तेंच, स्फुरण जेथ नसे. ॥८॥
निर्गुण म्हणजे बहु गुण, ज्या बहु आकार तें निराकार ॥
साकार सगुण म्हणणें मायेसी, सर्वथा निराधार ॥९॥
स्थापन बळेंच करिती, नाहीं जी तीस नाम देवोनी ॥
गुणकर्तेपण तिजवर, परमात्म्याचें उगीच लादोनी ॥१०॥
नाहीं तिचें कशाला नाम, नको स्मरणही कधीं आतां ॥
जे सर्व कार्हि दिसतें, आहे तें सर्व ब्रह्मची ताता ॥११॥
विठ्ठल धाकोजीराव राणे.