ब्राह्मण तोच म्हणावा, जो जाणे ब्रह्म; जात कवण असो ।
कर्मठ तो विप्र म्हणा, शास्त्र सकल वेदही जरि एरिसो ॥१॥
ब्राह्मण षट्कर्माचा अधिकारी; यजन आणि याजनही ॥
अध्ययनासी करुनी अध्यापन, दानप्रतिग्रहा पाही ॥२॥
ब्राहण यजन करीना विप्रासम, तीळ तूप जाळून ॥
तो ज्ञानयज्ञ करितो, रीत कशी तीच घेइ ऐकून ॥३॥
मूलस्फुरण जीमाया विद्यात्मक, तीच पूर्व रे अरणी ॥
जाण अविद्यात्मक ती उत्तर, धरि नामरूप जी अरणी ॥४॥
या दोहींचें मंथन करुनी, निर्माण करित ज्ञानाग्नी ॥
“मंथनरीत”, स्मरावें “मी द्रष्टा” द्दश्य पाह्तांच क्षणीं ॥५॥
मग दो अरणी टाकुनी, सच्चित-आनंद-रूप मग व्हावें ॥
निशिदिनि मंथन करितां, द्दढ अपरोक्षासि सहजची पावे ॥६॥
आकार नाम उद्भव नोहें कालत्रयांत, ही खूण ॥
द्दढ अपरोक्षाची बा, नि:संशय समज हेंच विज्ञान ॥७॥
ब्रह्मांड पिंड मिळुनी अष्ट दिशा देह यज्ञकुंडात ॥
आकार नाम आहुति देउनिया, भस्मसात ती करित ॥८॥
द्रव्य जळालें सारें, उरलें जें भस्म तो पुरोडांश ॥
लय-साक्षी-नारायण उरतो, त्याचा करोनिया ग्रास ॥९॥
यापरि यजन करोनी, याजन इतरांकडूनतो करवी ॥
अध्यात्मशास्त्र पढुनी, अध्यापन करबुनि दुजा भरवी ॥१०॥
प्रतिग्रह, गुरुनें केलें ज्ञानाचें दान घेतलें तेंची ॥
देई इतराला तें दान, खरें ब्रह्मकर्म तें हेची ॥११॥