मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
स्नानाचें पुण्य

वेदांत काव्यलहरी - स्नानाचें पुण्य

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


स्नान नळाचें त्याहुनि, कूपाचें त्याहुनी नदीस्नान ॥
सरिता संगम त्याहुनि, पुण्यप्रद सिंधुस्नान महिमान ॥१॥
जाणुनि रहस्य, करितां स्नान मिळे पुण्य, ना तरी नित्य ॥
गंगेंत बुडी मारुनि, पापीं पापीच राहिलें सत्य ॥२॥
कूप नळाहुनि व्यापक, सरिता त्याहून व्याप सिंधूचा ॥
संगम पवित्र ज्यापरि, दो संतामधील योग भेटीचा ॥३॥
आकुंचनांत वाढें भेद, तिथें पाप त्याहुनी काय ॥
व्यापक त्या मानानें, भेदाचा नाश निश्चयें होय ॥४॥
येवो प्रवाह कसले, ओढयाचे कीं असो गटाराचे ॥
तें सर्व एक होती सरितेमाजीच, भेद त्या कैचे ॥५॥
मी शुद्ध तो अमंगळ, कैसे भेटूं अशा अहंकारें ॥
मिळतेना तरि अटले सडले असते, प्रवाह ते सारें ॥६॥
परि उच्च नीच भेदा टाकुनि, ते जाहले पवित्र नदी ॥
पिकवुनि क्षेत्रें पळती, वेगानें गाठण्या महाजलधीं ॥७॥
येथें दोन नद्यांचा संगम, तें स्थान अधिक पुण्यप्रद ॥
अद्वैत अनुभवी दो संत जसें भेटतांच आनंद ॥८॥
गंगा-यमुना संगम, त्यांतचि सरिता सरस्वती भिनली ॥
ज्ञानाची, भक्तीची, कर्माची एकवाक्यता झाली ॥९॥
गंगा-यमुना संगम, त्यांतचि सरिता सरस्वती भिनली ॥
निरहंकारें टाकुनि वर्णाचा भेद, संगमीं खुलल्या ॥१०॥
श्रीकृष्ण गोपगोपी भक्तीचा पूर लोटका जेथें ॥
ती यमुना भक्तीची सरिता, गंगेस भेटली येथें ॥११॥
गंगातटीं विराजें, काशीचा विश्वानाथ ज्ञानेश ॥
ती ज्ञानरूप गंगा भेटे या संगमांत यमुनेस ॥१२॥
याचाच अर्थ, भक्तीवांचुनिया कोरडें असे ज्ञान ॥
त्याचपरी ती भक्ती अंध असे, ज्ञान जाहल्यावीण ॥१३॥
भक्ती यमुनारूपी भिडली जावोनि, ज्ञानगंगेला ॥
भक्तिज्ञान न जोंवरि उमटे कर्मांत, काय फल त्याला ॥१४॥
म्हणुनि कर्म सरस्वति गुप्तपणें संगमांत ती भिडली ॥
हाच त्रिवेणी संगम, पुण्याची पूर्णता इथें झाली ॥१५॥
भक्तीचा, ज्ञानाचा, कर्माचा जेथ पूर्ण संगम हा ॥
तेथेंच स्नान करितां पापाचा लेश राहतो न पहा ॥१६॥
द्वैतांत पाप मोठें, अद्वैताहूनि पुण्य ना दुसरें ॥
सरिता संगम स्नानें हेंच तुला शिकविलें असे बा रे ॥१७॥
सर्व नदी-नाल्यांना घेउनि पोटांत सर्वदा पूर्ण ॥
पाऊस पडो न पडो, होईना जो कधी अधिक न्यून ॥१८॥
ऐसा सागर ठेला, जो भक्ती, ज्ञान, कर्म पचवून ॥
स्वरुपांत सहज अपुल्या; ज्यासी शिवाती न पाप वा पुण्य ॥१९॥
जन्म-मरण चुकवाया सिधूचें एकदा करी स्नान ॥।
पावन पवित्र होशी, भेदाभेदांस कोणतें स्थान ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP