यम, नियम, त्याग नंतर मौन, पुढें देश, काल, आसनही ॥
मग मूलबंध, समता, द्दष्टीची स्थीरता असे पाही ॥१॥
प्राणायामानंतर प्रत्याहूति धारणा धरावी ती ॥
ध्यान, समाधी यापरि साधनक्रम, राजयोगि आचरिती ॥२॥
ब्रह्मचि सारें ऐसा करणें अभ्यास, तोच यम जाण ॥
नियम तयासी म्हणती, द्वैता सारोन सेवि एकपण ॥३॥
सांडुनि जगदाभासा, चैतन्यचि पाहणें स्वरा त्याग ॥
वाणी फिरे मनासह जेथुनि तें मौन, तेथ तूं जाग ॥४॥
सर्वत्र व्यापला तो परमात्मा, म्हणुनि तो सकल देश ॥
निमिष निमिष भूतांसी मोजी, म्हणुनीच काळ परमेश ॥५॥
ज्यावरती विश्व उठे, सिद्ध पुरुष पावलें असें स्थान ॥
तेंच असें सिद्धासन सुखआसन, दु:खरूप त्यावीण ॥६॥
द्दश्याचें मूळ तिथें मन बांधी, तोच मूळबंध खरा ॥
ब्रह्मीं सदा लपावें ती समता, सर्वदा मनांत धरा ॥७॥
नासाग्र नको द्दष्टी, साधावी त्वरित ज्ञानद्दष्टीच ॥
प्राणायाम म्हणावा, वृत्तीसी ये विराम जरि साच ॥८॥
द्दश्य निषेधीं रेचक, “ब्रह्म असे मीच” भाव पूरक हा ॥
निश्चल ऐसी वृत्ती, कुंभक तो साधणें पवित्र महा ॥९॥
प्रत्याहार म्हणावा, मन जाइल जेथ जेथ तें स्थान ॥
ब्रह्मचि तेथ पहावें, द्दढ द्दष्टी तीच धारणा जाण ॥१०॥
“मी ब्रह्म” ध्यास चित्तीं दिनरजनीं, तेच कीं असे ध्यान ॥
जाणा तीच समाधी, वृत्ती ब्रह्मांत होय जरि लीन ॥११॥
हठयोगांतिल साधन, जडबुद्धी मंद साधकाकरितां ॥
प्रज्ञा तीव्र तयांसी, उपयोगी राजयोग हा ताता ॥१२॥
अष्टांगयोग साधन, शरिर मनासी करीत बहु जाच ॥
सर्वांग योग तो हा ज्ञानाचा, सकल ब्रह्म सहजींच ॥१३॥