भूचरि, खेंचरि, चांचरि, आणि अगोचरि, चरांचरीं, पांच ॥
मुद्रा, बद्ध, मुमुक्षू, साधक, जे सिद्ध, संत यांच्याच ॥१॥
भू जडतत्त्व अशी जी स्थूल तनू त्याकडेच दे लक्ष ॥
ती भूचरी, प्रपची दिनरजनीं, बद्ध तो, परम दक्ष ॥२॥
स्थूल शरीरा सोडूनि, ह्रदयाकाशांत जो धरी ध्यान ॥
ती खेंचरी, मुकुक्षू तो पाही, ह्रदय अंतरीं शून्य ॥३॥
अध्यात्म गुरुमुखानें ऐकें, परि निश्चयो न स्वरुपाचा ॥
चांचर तो साधक हा, मुद्रा ही चांचरी, तशी वाचा ॥४॥
गोचर नसे स्वयं जी सिद्ध सहज साधनाविणें वस्तू ॥
मुद्रा अगोचरी त्या कारण, सूर्यास ज्यापरी केतू ॥५॥
ह्रटयोग सिद्ध त्यासी, सिद्धी माईक प्राप्त होतात ॥
ऐशा सिद्धिबलानें, परमात्मा अधिक झांकिला जात ॥६॥
सर्व चराचरि भरला, ‘परमात्मा तोच मी’ असा बोध ॥
ज्यासी, चराचरीं ही मुद्रा, तो संत त्यास ब्रम्हपद ॥७॥