मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
आत्मसाधनयोग

वेदांत काव्यलहरी - आत्मसाधनयोग

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


प्राप्तत्व असें कांहीं, कर्तव्याची मनीं असे चाड ॥
ज्ञातव्य जरी, तोवरि आत्मसुखाची न होतसे भीड ॥१॥
आत्मा साध्य कराया, साधन करशील तूं नविन कांहीं ॥
सहज सुखामाझारीं, बंधन होईल कष्ट तुज पाही ॥२॥
सुख सहजरूप अपुलें,निर्मिशि सौख्यास साधनें कवण ॥
साधन जों जों करिशी, तों तों सुख दूर आत्म-ओळखण ॥३॥
सुखरूप झोंप कैशी असते, म्हणुनी धरावया जाशी ॥
तोंवरि झोंप न येइल, यत्न सरे झोंप येइ त्यासरशी ॥४॥
जाणाया जरि जाशी, आत्मा जरि पाहशील लक्षांशें ॥
अवलंबशील वृत्तीयोग, त्रिपुटि निर्मिशील ध्यानमिसें ॥५॥
त्रिपुटींत ज्ञान विस्मृती, वृत्ती निमतांच शून्य झोंप असे ॥
यास्तव भिन्नत्वाचें हें साधनमार्ग टाक शुद्ध पिसें ॥६॥
ज्ञानास नसे सन्मुख आत्मा, जाणो तयास जों जातां ॥
कल्पांतवरी भेटी आत्म्याची होइना तुला ताता ॥७॥
यास्तब सोडूनि खटपट जाणायाची, तयास बघण्याची ॥
दोन अवस्था संधित स्थीर रहा, मग चवी कळे त्याची ॥८॥
जागृति सरे, सुषुप्ती जों नाहीं, पूर्ण जागृती आली ॥
त्यांतचि स्थीर असावें, येथें स्वानंदज्ञान तुज लाहे ॥९॥
अथवा सरली सूप्ती, जों नाहीं पूर्ण जागृती आली ॥
लय विक्षेपरहित ही संधीं, त्वां पाहिजेच सादियली ॥१०॥
जागृत ज्ञानाचा लय, सूप्ती-अज्ञानही नसे जेथें ॥
संधीत अशा राही स्थीर, प्रपंचादि इंद्रियें न तिथें ॥११॥
ज्ञानाज्ञानाविरहित, सुखदु:खातीत, वासनेवीण ॥
तृप्ती, निजसुखसंधी येथेची होइ नित्य रमममाण ॥१२॥
संधींत अशा कळतों ब्रह्म तुला, ब्राह्मणा करी संध्या ॥
याविण साधन सगळें, आत्म्याच्या साधना ठरति वंध्या ॥१३॥
नसतां सूप्त अवस्था, सूप्तीचें सौख्य भोगण्यास मिळे ॥
जागृत झोंप असे ही, तूर्या येथेंच, आत्मसौख्य कळे ॥१४॥
हीच सबीज समाधी सुप्तींतिल तीस म्हणति निर्बीज ॥
सबिजास वृत्तिव्याप्ती म्हणती, हें साधणें तुझें काज ॥१५॥
हा वृत्तीव्याप्तीचा योग कसा, गुरुमुखेंच जाणावा ॥
नातारि शून्यांत पडे, आत्मा असुनी समोर नच ठावा ॥१६॥
यास्तव संधीपूर्वीं कास धरी तूं परोक्ष ज्ञानाची ॥
म्हणजे अपरोक्ष कळे, ओळख संधींत होय आत्म्याची ॥१७॥
केवळ विचारयोगें, आत्म्याचें तें परोक्ष ज्ञान मिळे ॥
नित्यानित्यविवेकें लाभ, विचाराशिवाय सर्व खुळे ॥१८॥
अभ्य़ास बहू असती, वायुनिरोधन मनास अवरोधी ॥
होतो प्रपंचलय, परि पडतो शून्यांत वासनानंदीं ॥१९॥
लय झाला, लयसाक्षी कळला नाहीं, अशा समाधींत ॥
मग झोंप काय वाइट, ज्ञानाचा गंधही नसे तेथ ॥२०॥
यास्तव विचारयोगें, सत्संगानें परोक्ष ज्ञान वरी ॥
अपरोक्ष स्पष्ट आत्मा कळतो संधींत तुजशि त्याउपरी ॥२१॥
शमदम षट्‌ संपत्तीवांचुनि, ज्ञानास नाहिं अधिकार ॥
म्हणती बहू, परंतू शमदम, ज्ञानाविणें निराधार ॥२२॥
कुठलेंहि कार्य घ्याना, मन  जडतां तेथ षटक्‌ संपत्ती ॥
सोनार घडवितांना नग, वैराग्यादि दबडितां येती ॥२३॥
त्यापरि विचारयोगें, आत्मज्ञानांत मन जरी जडलें ॥
आपोआप तयाच्या पाठीं वैराग्यही समज आलें ॥२४॥
वैराग्य असो आधीं, येवो कां ज्ञान जाइल्यावरती ॥
किंवा मुळी न येवी, केवळ ज्ञानेंच होय निजप्राप्ति ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP