वेदांत काव्यलहरी - देवाचे नैवेद्य
सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.
नैवेद्य श्रीहरीसी, दूध फळें अन्न भक्त देतात ॥
परि हें परमात्म्याचें खाद्य नव्हे; नेणती कसें भक्त ॥१॥
फळ दूध अन्न आहे शरिराचें भक्ष्य; जीव पुष्ट बने ॥
परमात्मा जीव नव्हे, शरिर नव्हे, व्यर्थ खाद्य हें देणें ॥२॥
तृण कडबा भूस, पशूखाद्य जरी धातलें मनुष्यास ॥
चालेल काय ? तैसें नरतनुचें खाद्य तोय देवास ॥३॥
यास्तव देव उपाशी, किती दिवसापासुनी असा पडला ॥
विरळा भक्त दयाळू, केव्हां परि त्यास देइ खायाला ॥४॥
कंठीं प्राण धरोनी जगला, तितुक्यावरीच तो देव ॥
दुष्काळ त्यांस मोठा अन्नाचा, अन्न त्यांस जिवभाव ॥५॥
जीवचि खाउनि जगतो देव, तया जीव देत ना कोणी ॥
जें देव खाइना तें, जन देती व्यर्था दूध, दहि, लोणी ॥६॥
भक्त खरा जो देई, देवासी जीव आपुला खाया ॥
जीव बने मग देवचि, नातरि हा जीव खाइ यम वाया ॥७॥
यम जीव जरी घेई, पुनर जनन मरण ठेविलेंच असे ॥
देवांस जीव देतां, जन्ममरण कोठुनी तया लाहे ॥८॥
देवास जीव देणें म्हणजे, मी देह प्राण मन बुद्धि ॥
नोहे, निश्चित जाणुनि करणें अभिमान त्याग जिवबुद्धी ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : April 16, 2014
TOP