मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
वेदान्ताचें परमध्येय

वेदांत काव्यलहरी - वेदान्ताचें परमध्येय

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


अत्यंत दु:ख निमणें, परमानंदास प्राप्त मग होणें ॥
वेदान्तशास्त्र सांगे ध्येय परम श्रेष्ठ हेंच की जाणे ॥१॥
अत्यंत दु:ख निमणें तेंच असे परममुख बहू म्हणती ॥
सूक्ष्म विचाराअंतीं, निश्चित हे दोन वेगळे ठरती ॥२॥
अरुणोदय देखोनी आरवतो कोंबडा अती मोदें ॥
अरुणोदय हाचि असे, सूर्योदय यापरीच कोण वदे ॥३॥
धनकुंभवरिल गेला सर्प असे पाहुनी मनीं धाला ॥
मालक, परि इतुक्यानें कैसें होईल प्राप्त धन त्याला ॥४॥
सर्पनिवृत्ती म्हणजे, घनप्राप्तीआड विघ्न तें गेलें ॥
प्रत्यक्ष जों न हातीं धन, तोंवरि कार्य पूर्ण नच झालें ॥५॥
दु:खनिवृत्ती होतां सुख होई, तोहि वृत्तिचा भाग ॥
वृत्तीसुखास कैसें म्हणतां येईल परमसुख सांग ॥६॥
सीता-रामास घडे वनवासीं जे वियोगदु:ख अती ॥
वनवास संपल्यावरि, भेटीनें प्राप्त जाहली शांती ॥७॥
परि एकांतसुखाची, सीता-रामास भासली गरज ॥
एकपणाचाही जो अंत, परम शांत प्रांत तो समज ॥८॥
ही प्रकृती, परमात्मा हा, ऐसे ज्ञान दे सुखास जरी ॥
प्रकृति परमात्म्याच्या ऐक्यसुखाची न येइ कवण सरी ॥९॥
दु:खाच्या सापेक्षें सुख झालें तें नव्हेच परम सुख ॥
सुखदु:ख नसे जेथें, तें निर्मलरूप तेंच परम सुख ॥१०॥
नव्याण्णव टक्कयानें, मानसदु:खेंच रडविती मनुजा ॥
व्यतिरेक ज्ञान होता, हीं दु:खें निरसतीं असे समजा ॥११॥
अत्यंत दु:ख म्हणजे, बहु दु:खें मानसीक संसारी ॥
त्याचा निरास ज्ञानें, विज्ञानें अल्प दु:ख जें शरिरीं ॥१२॥
शरिरास एक टक्का दु:ख नसावें असेल ज्या इच्छा ॥
स्थूलाभ्यासाचामग पुरवावा साधकें बहू पिच्छा ॥१३॥
मानस दु:सें सूक्ष्म, सूक्ष्मविचारें निरास हो त्याचा ॥
शरिरास स्थूल दु:खें, स्थूलाभ्यासेंच नाश दु:खाचा ॥१४॥
अज्ञाननाश होतां, आत्मज्ञानेंच होइ आनंद ॥
परमानंद नव्हे तो, विज्ञानानेंच होइ स्वानंद ॥१५॥
सप्तम असती जाणा ज्ञानाच्या भूमिका, प्रथम तीन ॥
अज्ञान भूमिका त्या, बाकीचे चार ज्ञान सोपान ॥१६॥
प्रथम शुभेच्छा, नंतर वैराग्याचा विचारणा प्रांत, ॥
तनुमानसा तृतिय ती भूमी, ये ध्यान धारणा यांत ॥१७॥
जागृतस्थानीं असती, पहिल्या या तीन भुमिका जाणा ॥
अज्ञान भूमिका; परि साधन उपयुक्त होतसे ज्ञाना ॥१८॥
सत्त्वापत्ती चवथी, जाणा स्वप्नासमान ही भूमि ॥
जग देखे प्रतिभासिक, येथें अपरोक्ष ज्ञान कीं नामी ॥१९॥
येथुनि पुढिल अवस्था ज्ञानाच्या, मोडती सुषुप्तींत ॥
पंचम भूमीपासुनि, अभ्यासें निविंकल्पता येत ॥२०॥
अर्ध सुषुप्तीचे-परि पंचम ही भूमिका असंसक्ती ॥
सर्व पदार्थाभावें स्वानंदी परम षष्ठमीं रमती ॥२१॥
सप्तम गाढ सुषुप्ति, षष्ठीचें दाढर्य तूर्यगा जाणा ॥
म्हणती विदेह मुक्ती याला, जी प्राप्त पूर्ण विज्ञाना ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP