राव म्हणे अहो ऋषि । काशीखंड वाराणशी ॥१॥
तेथें जाऊनियां आम्ही । ऋण फेडूं तुमचें स्वामी ॥२॥
एक मासाची अवधी । तुम्हीं द्यावी कृपानिधी ॥३॥
ऋषि म्हणे खरें बोला । नातरी शापीन तिघांला ॥४॥
रोहिदास म्हणे त्यासी । गहाण राहीन तुम्हांपाशीं ॥५॥
पितृवचनाचें ऋण । त्यांचा उतराई होईन ॥६॥
ऋण हत्या आणि वैर । नाहीं चुकत मेल्यावर ॥७॥
ऐसी बाळकाची वाणी । ऐकूनि दचकला मनीं ॥८॥
ऋषि बोलला नृपासी । नको राहूं आमुचे देशीं ॥९॥
निकें निकें त्यासी म्हणे । बाहेर आलीं तिघेजणें ॥१०॥
वनीं निघाला त्वरित । झाला लोकांचा आकांत ॥११॥
लोट पूर जाती पळा । नेत्रीं उदक ढळढळां ॥१२॥
कैसा ब्राम्हण पहा हो । नृपचंद्रालागीं राहो ॥१३॥
राजा बाहेर दवडुनी । पाहे आमुचाचि धणी ॥१४॥
नगरलोकांसी फिरवुनी । राव निघाला तेथुनी ॥१५॥
अलंकार देखियेला । मागें विश्वामित्र आला ॥१६॥
माझ्या राज्यांतील संपत्ती । तारामती धरिली हातीं ॥१७॥
घेई भूषण उतरोनी । म्हणे नामयाची जनी ॥१८॥