माझें अचडें बचडें छकुडें ग राधे रुपडें । पांघरुं घाली तीं कुंचडें ॥धृ०॥
हरि माझा गे सांवळा । पायीं पैंजण वाजे खुळखुळा ।
यानें भुलविल्या गोपिबाळा ॥१॥
हरि माझा गे नेणता । करी त्रिभुवनाचा घोंगता ।
जो कां नांदे त्रिभुवनीं ॥२॥
ऐसे देवाजीचे गडी । पेंद्या सुदाम्याची जोडी ।
बळिभद्र त्याचा गडी ॥३॥
जनी म्हणे तूं चक्रपाणी । खेळ खेळतो वृंदावनीं ।
लुब्ध झाल्या त्या गौळणी ॥४॥