अनामिक त्यासी पुसे । तुमचें भोजनाचें कैसें ॥१॥
कर संपुष्ट जोडुनी । राव विनवी मधुर वचनीं ॥२॥
जेणें निघे तुमचें काम । राखा माझाही स्वधर्म ॥३॥
नृपा दिलें कोरें अन्न । सुखें करावें भोजन ॥४॥
धान्य घेऊनियां करीं । राव आला गंगातीरीं ॥५॥
स्नान संध्या नेम सारी । राजा स्वयंपाक करी ॥६॥
गाय अग्नीचा पैं ग्रास । ठाव वाढिला धर्मास ॥७॥
ग्रास घालावा वदनीं । आला विश्वामित्र मुनी ॥८॥
बैसावें जों भोजनासी । अकस्मात पावे ऋषी ॥९॥
एक भाग भक्षियेला । दुजा राजाचा उचलिला ॥१०॥
तृप्त होवोनि ऋषेश्वर । उठे देउनी ढेंकर ॥११॥
पदर कसुनी कटासी । सदा सादर सेवेसी ॥१२॥
निराहार शक्तिहीन । दिसे जैसा रंक दीन ॥१३॥
ऐसा छळी प्रतिदिनीं । म्हणे नामयाची जनी ॥१४॥