(गीति)
जिंकाया सृष्टीसी, आरंभी दूसरा नरांतक हा ।
जे भूप शरण आले, राज्य तयां परत दीधलें मुनिं हो ॥१॥
जे नृप समरीं पडले, त्यांच्या पुत्रांस दीधलें राज्य ।
झाले नाहीं वश जे, त्यांना जिंकून घेतलें राज्य ॥२॥
जिंकित राज्यावरती, असुरांना स्थापिलें तिथें भूप ।
यापरि सृष्टी जिंकुन, सृष्टीचा होतसे स्वता भूप ॥३॥
यज्ञादि सर्व कर्मे, करिता झाला समस्त ती बंद ।
नंतर असुरां धाडी, पाताळीं घ्यावया अधीं भेद ॥४॥
बहु शूर असुर ऐसे, मायावीही तसेच ते सारे ।
पाताळीं जाउनियां, झाले तेथें गरुड ते सारे ॥५॥
भक्षित अहींस तेव्हां, कळली ही मात नाग-राजास ।
देउन अमूल्य रत्नें, स्त्री-रत्नें दीधलीं नृपें अरिस ॥६॥
केला समेट ऐसा, देवांतक मानिला अही-भूपें ।
देवांतकबंधूनें, दोनी भुवनांस जिंकिलें सु-तपें ॥७॥
ही मात भृत्य करवी, कळवी स्वर्गी नृपाल जो ज्येष्ठ ।
बंधू देवांतक त्या, लघु बंधूकडुन हें इष्ट ॥८॥
स्वर्गी दुर्लभ वस्तू, पाठवि देवांतकास लघु बंधू ।
महिवरि दुर्लभ वस्तू, पाठवि भावास थोरला बंधू ॥९॥
यापरि दोघे करिती, त्रिभुवनिंचें राज्य अल्प-काल-वरी ।
शंकर-वर-प्रसादें, गर्वानें मातले बहू भारी ॥१०॥
त्यांचा नाश कसा हो, झाला हें सांगतों तुम्ही ऐका ।
विधि व्यासाला वदती, कथना अवधान देउनी ऐका ॥११॥