(गीति)
जृंभा हननानंतर, दुसरे दिवशीं सभा करी भूप ।
आला विनायकासह स्तविलें त्याला सभेमधें अमुप ॥१॥
कश्यपसुतास अणिलें, याचें कारण सभेमधें सांगे ।
अणिलें विवाहसाठीं, मुहूर्त ठरविणें असे मनीं वागे ॥२॥
भूपति भाषण ऐकुन, वदती भूपास सम्य एकमतें ।
कश्यपसुतास अणिलें, तेव्हांपासून ताप लोकांतें ॥३॥
जातां कश्यपनंदन, नंतर करणें विवाह शांतपणें ॥
मंगल मुहूर्त पाहून, युवराजांचा विवाह कीं करणें ॥४॥
कांहीं कालवरी हो, येथें असतां बहूत उत्पात ।
होतिल ऐसें वाटे, साठीं अणखी बघूं तरी गमत ॥५॥
ठरवूं आपण मग तें, काय करावें प्रधान ते वदती ।
भूपें प्रधानवचना, मानियलें मग निघून ते जाती ॥६॥
निशिं भोजनास सारुन, काशीराजा विनायकासहित ।
निद्रित झाल्यावरि ते, राक्षस तीघे त्वरीत ते येत ॥७॥
(ओवी)
व्याघ्रमुख आणि दारुण । ज्वाला मुख बहु भीषण ।
राक्षस नगरीं शिरले जाण । घेती सूड राजाचा ॥८॥
ज्वालामुखें नगर दहन । दारुणें वायुरुप होऊन ।
साहाय्य करावें त्यालागून । पथ धरावा व्याघ्रमुखें ॥९॥
पथिक टाकावें भक्षुनी । विचार केला तिघांनीं ।
वर्तूं लागले यामिनीं । काय केलें तें ऐका ॥१०॥
(गीति)
ज्वालामुख नगरावर, ज्वाला सोडी बहूतशा जोरें ।
झाला अकांत तेव्हां, नगरींचे लोक धावती सारे ॥११॥
कोणा भान नसे कीं, वस्त्रांचीही तयांस शुद्ध नसे ।
भडके अग्नी मोठा, दारुण सहायें प्रसार होत असे ॥१२॥
नृप मंदिरास लागति, अग्निज्वाला बघून ते लोक ।
करिती अकान्त सारे, ऐकुन आले नृपाळ मुनि-तोक ॥१३॥
(पृथ्वी)
विशाल मुखिं पातले सकल लोक ते आयते ।
विनायक तया मुखीं जंववरी नसे येत तें ।
विशाल मुख ऊघडें तंववरी असें राहिलें ।
तशांत रवि ऊगवे नगर भस्म हें जाहलें ॥१४॥
विनायक तदा बघे सकल लोक व्याघ्रा-मुखा ।
बघून शिरला त्वरें असुर तोंच झांकी मुखा ।
विनायक तदा बहू फुगवि ती तनूसी भले ।
असूर तनु फाडुनी सकल लोक ते काढिले ॥१५॥
असूर-तनु भाग ते करुन दोन ते सत्वरें ।
झुगारित तदा स्वयें बहुत दूर ऐका बरें ।
पडे विपिनिं ज्या स्थळीं बहुत नाश तो जाहला ।
दुजा नगरिं खेळण्या म्हणून त्या मुला ठेविला ॥१६॥
(गीति)
लत्ताप्रहार केला, वधिला ज्वालामुखीच तत्काल ।
तैसा दारुण वधिला, विजयी झाला विनायक प्रबल ॥१७॥
नगरींचे जन सारे, बघती नगरांत तेधवां जैसें ।
दिसलें त्यांना आतां, पूर्वीचें जें असेंच तें तैसें ॥१८॥
पाहुन अपूर्व ऐसा, देखियला जो नसे चमत्कार ।
यास्तव स्तवना करिती, ऋषि संघासी कथीत सुत चतुर ॥१९॥
भृगु सांगती नृपासी, कथन असें हें करुन विस्तारें ।
तैसेंच कथुन कवनें, करुन वदविलें मुखेंच त्या चतुरें ॥२०॥